सातवं वरीस धोक्याचं!

प्रवीण टोकेकर
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

सात या आकड्याशी लग्नसंस्थेचं काय येवढं लग्न लागलंय कुणास ठाऊक. आठवं पाऊल कायम वाकडं काय म्हणून पडावं? काही दिलबर मंडळींच्या बाबतीत या सातव्या वर्षाला काहीच किंमत नसते. त्यांच्याबाबतीत कधीही काहीही घडू शकतं. सब थोडेही एक डाल के पंछी होते है? 

चारचौघांसारिखे एकदाचे नरजन्मां यावे. पडावे, धडपडावे, वाढावे. मायबापे नेतील, त्या शाळारूपी कोंडवाड्यात गमभन गिरवावे. बापश्रींनी दिलेल्या तुटपुंज्या पॉकेटमनीच्या जोरावर कॉलिजात जमेल तितकी चंगळ करावी. शिकून सवरून पोटापाण्यास लागावे. मायबापे दावतील, त्या शालीन, सोज्वळ मुलीशी निमूट लगीन करून संसारी रमावे. देवाच्या कृपेने दोन-तीन मुले होऊ द्यावीत. यथावकाश त्यांनाही बोट धरुन शाळेत नेवोनि घालावे...निवृत्तीनंतर थोडका पैका उरल्यास,  ‘श्रमसाफल्य’, ‘सुकृत’, ‘गोकुळ’, ‘सरस्वती निवास’ अशा नावाचं घरकुल बांधून पुढील पिढ्यांची चाकोरी समाधानाने न्याहाळत एक दिवस विठ्ठलचरणी लीन व्हावे...

सरळमार्गी माणसाचं चरित्र हे वरच्या एका परिच्छेदात संपतं. तपशीलात थोडाफार फरक राहील, पण शील तेच. चौकट तीच. ‘मागीलां’च्या पावलांनी रुळलेल्या चाकोरीतूनच ‘पुढीलां’चाही प्रवास होणार. पण खरंच असं घडतं का? कुळशील चाकोरीतल्या जीवनाचं असलं तरी तपशीलात काही वेगळेच रंग भरलेले असतात प्रत्येकाच्या. कुठेतरी केव्हातरी हृदयावर ओरखडा आलेला असतो. एखाद-दुसरी गंभीर गफलत हातून घडलेली असते. दिलाचं जुनं दुखणं अधून मधून ठणकतं. त्यानं आताशा काही फरक पडत नाही, इतकंच.

असं म्हणतात की लग्नबिग्न झालं की नव्हाळीचे नवे दिवस जीवनात इंद्रधनुष्याचे रंग दाखवू लागतात. हे दिवस आले, तसे ‘जातात’सुध्दा. निसर्गधर्मच तो. संसाराचा वेलू मांडवावर चढेचढे पर्यंत वाभरं मन पुन्हा इथं तिथं पाहू लागतं. पुरुष हृदय अति कठीण! मना सज्जनाला कितीही आवरून धरलं तरी संधी मिळताच पाय घसरायचा तो घसरतोच. हे सगळं सप्तपदीनंतर सातव्या वर्षी घडतं, असा सर्वसाधारण समज आहे, किंवा पूर्वी होता म्हणा हवं तर. इतका की मानसतज्ज्ञांनाही हे कमीअधिक प्रमाणात मान्य होतं. त्याला ते एक संबोधन वापरत, ‘सेव्हन इयर इच’. सातव्या वर्षातली निराळीच कंड.

सात या आकड्याशी लग्नसंस्थेचं काय येवढं लग्न लागलंय कुणास ठाऊक. आठवं पाऊल कायम वाकडं काय म्हणून पडावं? काही दिलबर मंडळींच्या बाबतीत या सातव्या वर्षाला काहीच किंमत नसते. त्यांच्याबाबतीत कधीही काहीही घडू शकतं. सब थोडेही एक डाल के पंछी होते है? अगदी स्वतःच्या लग्नाच्या मांडवातही भिरभिरत्या डोळ्यांनी हिरवळ बघून घेणारे जातिवंत रोमिओ असतात की! काही पुरुष मंडळी बायकोच्या पश्चात मोकळा वेळ ‘सत्कारणी’ लावतात, किंवा उतारवयात एखादं प्रेम जमवण्याची ताकदही काही रसिकवरांमध्ये राखून ठेवलेली असते.

इश्कने ग़ालिब निकम्मा कर दिया,

वर्ना हम भी आदमी थे काम के

... असं खुद्द मिर्झा ग़ालिबच कबूल करून गेले आहेत. तो फिर, दिल की पुकार को टालनेवाले हम कौन होते है? असो. तो काही आपला थेट विषय नाहीए. 
मुद्दा हा आहे, की लग्नानंतर सातव्या वर्षी नवे रंग खुणावू लागतात. हे सातवं वर्षं मोठं धोक्याचं.

त्याच वर्षात एका गृहस्थाचं काय भजं झालं, ते सांगणारी एक धमाल गोष्ट १९५५मध्ये पडद्यावर आली होती -द सेवन इयर इच! 

या सिनेमाची स्टोरी आता घिसीपीटी वाटेल. बोअरिंगसुध्दा वाटेल. पण पन्नाशीच्या दशकात ती नवलाई होती. इतकी की आयर्लंडसारख्या काही कर्मठ देशांमध्ये या बाहेरख्यालीपणाला प्रोत्साहन देणाऱ्या, विवाहबाह्य संबंधांचं गुणगान गाणाऱ्या वात्रट, वाह्यात चित्रपटावर कडक बंदी होती. सेन्सॉर बोर्डानंही हातात लंबी कात्री घेऊन चित्रपट चिक्कार कापला होता. तरीही तो दशांगुळे उरलाच. वास्तविक त्यात इंचभरही उत्तान किंवा भडक असं दृश्य नव्हतं. डबल मीनिंगवाले संवादही नव्हते. मोकळा ढाकळा फार्सिकल अंगानं जाणारा चित्रपट होता तो.  पण निव्वळ कथासूत्रच लफड्याचं म्हटल्यावर कथित परंपराप्रेमी भडकले होते.

या सिनेमात एक गुलबकावलीचं फूल होतं!

अफाट, अचाट, अद्‌भुत, मनाला चाळवणारी, घायाळ करणारी, मनात ठाण मांडून बसणारी, जाता न जाणारी एक विश्वव्यापी चीज या चित्रपटात अशी काही जादू करून गेली की पुरुषांचं संपूर्ण जागच्या जागी गारीगार झालं. त्या गुलबकावलीच्या फुलाचं नाव होतं - मर्लिन मन्रो. चुकला का काळजाचा ठोका? चुकणारच. बाई होतीच तशी.

या मदनिकेनं त्या काळी जगातल्या तमाम नरपुंगवांना असं काही घोळात घेतलं होतं की ज्याचं नाव ते! तिचं ते पोस्टर आठवतंय? 

... वाऱ्यानं उडणारा तो झगा, तिचे ते आकारबद्ध पाय...

चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि डोळ्यात आश्चर्याचा धक्का.

... आक्रसलेल्या खांद्यांमधला स्त्रीसुलभ संकोच. 

जणू वाऱ्यावर उडणारा पदर घाईघाईनं सारखा करू पाहणारी घरेलू मुलगीच. घटकेत मदालसा, घटकेत शेजारी राहणारी अवखळ  तरुणी. घटकेत मैत्रीण, घटकेत जिवाभावाची सखी... मर्लिन मन्रोत कितीतरी स्त्रीरूपं एकाच वेळी वास करून होती. 

चित्रपटांच्या इतिहासात गाजलेलं ते सुप्रसिध्द ऐतिहासिक दृश्य याच चित्रपटातलं, रसिकहो! त्या चित्रचौकटीनं पाश्चात्त्य समाज-जीवनाच्या प्रवाहाचं वळणच्या वळण बदललं, हे ठाऊक आहे का तुम्हाला? स्त्रीविषयक जाणिवा टोकदार झाल्या. सौंदर्याचे निकष बदलले.  

‘सैल लहंगा, बिलगे अंगा, फुलवेलाची वर नक्षी’ अशा शब्दांत कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या कवितेतल्या ‘सकिना’चं जे वर्णन केलं आहे, तशीच होती मर्लिन. आख्ख्या जगाची सकिना!

...स्त्रीच्या विभ्रमांपुढे नांगी टाकणारे भले भले खंदे वीर किती कोत्या मनाचे असतात, हे दाखवून देणारी मर्लिन. स्त्रीदेह ही सौंदर्याची खाण आहे, वखवखलेल्या पुरुषांच्या नजरेची चूष नव्हे, हे ठणकावून सांगणारी मर्लिन. परंपरावाद्यांचे ढोंगी चेहरे सपशेल धराशायी करणारी मर्लिन. भल्या भल्या ऋषिमुनींचा तपोभंग करणाऱ्या अप्सरांशी स्पर्धा करणारी मर्लिन... ती एकमेवाद्वितीय होती. 

मर्लिन मन्रोपेक्षा सुंदर मदनिका तेव्हाही होत्या, आणि त्यानंतरही आल्या. पण तिच्यासम तीच! तिची सर कोणालाच आली नाही. तेव्हाही, आणि आताही. 

मर्लिन मन्रो हे प्रकरण नेमकं काय होतं हे आताच्या पिढीला ठाऊक नसेल बहुधा. ती पृथ्वीतलावरून निघून गेल्यालाच आता कित्येक दशकं उलटून गेली आहेत. तिचं मोहजाल नेमकं कसं होतं, याची झलक ‘सेव्हन इयर इच’मध्ये बघायला मिळते. तेवढ्यासाठीही हा चित्रपट मुद्दाम बघायला हरकत नाही. 

***

स्टोरी विचाराल तर काही ग्रेटबिट नाही. तुम्ही विचारू नये, आम्ही सांगू नये. असल्या स्टोऱ्या आपल्या हिंदी चित्रपटवाल्यांकडे छत्तीस रुपये डझन भावांनी उपलब्ध असतात. चित्रपटवाल्यांना कशाला नावं ठेवावीत? मराठी रंगभूमीवरचे कित्येक जुने फार्स याच ‘सेव्हन इयर इच’च्या कथासूत्राभोवती घोटाळणारे आहेत. संसारी पुरुष, त्याच्या चाकोरीबद्ध विवाहित आयुष्यात अचानक अवतरलेली एक मदनिका, आणि पुढे बघायला मिळणारा अशक्यकोटीतला धमाल विनोदी प्रकार... बस, संपली स्टोरी.

पण त्यात मर्लिन मन्रो असली की हीच सपक गोष्ट चाफ्याच्या झाडासारखी फुलांनी कशी लगडून जाते.  

रिचर्ड शेरमन हा एक टिपिकल न्यू यॉर्कचा रहिवासी. एका प्रकाशन संस्थेत संपादकाचं काम करणारा. प्रकाशन संस्थासुद्धा कसली? तर पुस्तकं प्रसिद्ध करणारी. प्रासंगिक कवितेपासून एखाद्या नटीच्या अप्रासंगिक मुलाखतीपर्यंत काहीही लिहिणारा हा जो कुणी संपादक नावाचा इसम असतो, त्याला बसल्या बैठकीला भलभलत्या कल्पना सुचत असतात. अमका यशस्वी लेखक आपल्यामुळेच यशस्वी वगैरे झाला, किंवा ‘ढमका लेखक काय लेखक आहे? खर्डेघाशा लेकाचा’ असली मते बाळगणारा, कधीतरी आपणही विख्यात वगैरे लेखक होऊ, अशीही स्वप्ने बघणारा हा संपादक स्वतः असतो कल्पकच. कल्पनेचे घोडे भरधाव सोडण्यात त्याचं मन तरबेज असतं. रिचर्ड शेरमन याच प्रजातीचा.

रिचर्डचं लग्न होऊन नेमकी सात वर्ष झाली आहेत. बायको हेलन, मुलगा रिकी असं त्रिकोणी नेमस्त कुटुंब. सुटी टाकून शेजारच्या मेन इलाख्यात झकास होडी चालवावी, मासे पकडावेत, शेकोटी करून सहकुटुंब गाणीबिणी म्हणावीत, थोडंफार अपेयपान करावं, असा बेत आखून सगळं कुटुंब सहलीला निघतं. स्टेशनात रिकी जाहीर करतो की, होडी चालवण्याचं वल्हं घरीच राहिलं. आता?

‘‘तुम्ही पुढे व्हा, मी मागाहून वल्हं घेऊन येतो,’’ असं सांगून परत फिरलेल्या शेरमनबेट्याला हे ठाऊक नसतं की त्याच्या पुढ्यात कुठलं ताट वाढून ठेवलं आहे.

...वल्हं उचलण्यासाठी घरी आलेल्या शेरमनच्या डोक्यात वरच्या मजल्याच्या सज्जातून एक कुंडी येऊन पडते. एक मुखचंद्र डोकावतो. ‘‘सॉरी, मी मुद्दाम नाही हं पाडली कुंडी... खरंच, मी माफी मागते!’’ असे मंजुळ आवाजातले उद्‌गार डोकं चोळणाऱ्या शेरमनवर जादू करतात.

‘‘छे, छे! चालायचंच’’ असं म्हणत शेरमननं तिला कॉफीपानाचं निमंत्रणच देऊन टाकलं. आणि ती आली ना...!

ती एक नव्यानंच राहायला आलेली युवती आहे. नुसती युवती. तिला नाव गाव काही नाही. सुंदर चेहऱ्याची. मादक देहाची. हसली की जणू चांदणं सांडतं. चालते कशी राजहंसीसारखी डौलदार. बोलते कित्ती गोड. निरागस, खळखळून हसते. ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला...’ अशी शेरमनबेट्याची अवस्था झाली.

त्याच्या कल्पनेचं वारू चौखूर दौडू लागलं. त्याला नाही नाही ती स्वप्नं दाखवू लागलं. आपल्या लग्नालाही सात वर्षं उलटली, या जाणिवेनं तो थरारला. च्यामारी, बघता बघता झालीच की भानगड.

शेरमननं शेवटी डॉ. ब्रूबेकरना गाठलं. हे भलतंच लफडं आपल्या हातून घडलंय. वाढलं तर संसाराची विधुळवाट लागणार. गरीब बिच्चारी बायको हेलन उघड्यावर पडणार. उघड्यावर ती कशाला? आपणच  पडू. तिला कळलं तर धाडधाड गोळ्या घालेल, गोळ्या. शेरमनच्या डोळ्यासमोर संवाददृश्यच उभं राहिलं...

ती : (पिस्तूल झाडत) नालायक, विश्वासघातक्या...मर आता! ठोठो... ठो!

तो : (खाली पडून) मी...मी मरतोय हेलन... माझी सिगारेट कुठाय?

ती : (कमरेवर हात ठेवून) डॉ. मर्फींनी धूम्रपानाविषयी काय सांगितलंय आठवतंय ना? देणार नाही सिगारेट!!

डॉ. ब्रूबेकर ही एक असामी आहे. मानसोपचारतज्ज्ञ. ‘सातवं वर्ष लफड्याचं’ या तत्त्वावर गाढा विश्वास असलेले हे डॉक्टर महाशय एक वल्लीच म्हणायची. त्यांचं पुस्तक सध्या शेरमननं संपादनासाठी हातात घेतलं आहे. त्यांच्यात पुढे घडलेला एक संवाद :

शेरमन : डॉ. ब्रूबेकर, तुमची फी फार जबर आहे का हो?

डॉ. ब्रूबेकर : चिक्कार! विचारू नका!

शेरमन : तरीही अनुकंपा तत्त्वावर काही कमीजास्त? नाही म्हंजे एखादी केस अगदीच इंटरेस्टिंग असेल तर कमी करत असाल ना तुमची फी?

डॉ. ब्रूबेकर : तासाला पन्नास डॉलर देणाऱ्या प्रत्येकाची केस इंटरेस्टिंगच असते! बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे?

शेरमनचा प्रॉब्लेम तमाम पुरुष जातीचा आहे, हे आता वेगळं काय सांगायचं? वळणा वळणानं गोष्ट शेवटी सरळ मार्गाला येऊन ठेपते, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. यातलं शेरमनच्या कल्पनेत किती घडलं? वास्तवात किती? शेरमनचं पावित्र्य ढळलं की अनाघ्रात राहिलं? त्याच्या संसारात वादळ आलं की नाही? या सगळ्याची उत्तरं शोधायची तर हा चित्रपट बघणं भाग आहे.

***

बिली वाइल्डर नामक अफलातून प्रतिभेच्या दिग्दर्शकानं मर्लिन मन्रोसोबत दोन सिनेमे केले. एक हा, ‘सेव्हन इयर इच’ आणि दुसरा ‘सम लाइक इट हॉट’ दोन्ही चित्रपट त्या काळात ‘वाह्यात’  म्हणून ओळखले गेले. त्यांना पुरस्कार वगैरे मिळाले नव्हते, पण पब्लिकनं डोक्यावर घेतले. मर्लिन मन्रोची जादू बिलीनं ओळखली होती. तिचे नैराश्याचे झटके, झोपेच्या गोळ्या खाणं, मद्यपान या तमोगुणांपायी ‘सेव्हन इयर इच’ तीन वर्षं रखडला. बजेट जवळपास अठरा लाख डॉलरनी फुगलं. पण बिली वाइल्डरनं ते सगळे भोग शांतपणे भोगले, पिक्चर हिट झालं, आणि सगळं काही बैजवार पार पडलं. प्रचंड गल्ला ओढला या दोन्ही चित्रपटांनी.

मर्लिन मन्रोचं ते सुप्रसिध्द ‘झगादृश्य’ आजही पाश्चात्त्य चित्रसृष्टीतल्या निर्मात्यांना-दिग्दर्शकांना, अभ्यासकांना, रसिकांना मोहून टाकतं. ‘प्रिटी वूमन’ चित्रपटात ज्युलिया रॉबर्ट्सनंही अशाच प्रकारचं दृश्य दिलं आहे. एका जेम्स बाँडपटातही असं दृश्य दिसलं होतं. लंडनच्या सुप्रसिध्द मादाम तुसाँच्या मेणबाहुल्यांच्या प्रदर्शनातही मर्लिन याच स्वरूपात उभी केली केली. पुढे २०११ साली एका रिचर्डसन नामक कल्पक डिझायनरनं मर्लिन मन्रोचे असे अनेक महाकाय पुतळे बनवून अमेरिकेत अनेक चौकांमध्ये उभारले. 

मर्लिन मन्रोचं गारूड अजूनही न उतरल्याचीच ही सगळी लक्षणं. पुढे मागे खास मर्लिन मन्रोबद्दल विशेषत्त्वानं लिहावं लागणार आहे. लिहू.. तोवर ‘मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो’ या सुरेश भटांच्या ओळी गुणगुणत  मर्लिन मन्रोची विविध रूपं मनाच्या पडद्यावर बघत दिवस कंठावेत. सातव्या वर्षातला धोका कधीच मागे पडलाय, राजेहो.

संबंधित बातम्या