मेरी पॉपिन्स

 प्रवीण टोकेकर
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022


... मौसम है क्लासिकाना 2.0

‘मेरी पॉपिन्स’ची जन्मकथा हीच एक आधुनिक परीकथा वाटावी. या चित्रपटानं अक्षरश: इतिहास घडवला. डिस्नेच्या संपूर्ण कारकिर्दीत दिसले नसेल इतके व्यावसायिक यश ह्या चित्रपटाला मिळाले. आजही हा चित्रपट अभिजात लेणं म्हणून मिरवतो.

ज्ञानोबा माऊलींनी मराठी भाषेला ‘भाखासुंदरी’ म्हणजेच भाषासुंदरी म्हटलं आहे. ओव्यांमधून आली की ती अशी गोड लागते की कानांच्या जिभा व्हाव्यात, आणि रसाळ जिभेलाही जळकूपणाने इसाळ यावा. ‘ऐका रसाळपणाचिया लोभा। श्रवणिंचि होती जिभा । बोलें इंद्रिया लागे कळंभा । येकमेकां।।’ असं माऊलींनी सांगून ठेवलंय. नाही का? आपली भाषा आहेच देखणी. सुंदर. लोभस. जात्यांवरल्या ओवीतून ऐकावी. कीर्तनाच्या झडीतून कानांवर यावी, कवितेतून मेघांसारखी बरसावी किंवा सुस्पष्ट, वैचारिक, करकरीत मुद्रेनिशी मार्गदर्शक व्हावी.

भाषा उगीच अभिजात होत नसते. त्यासाठी ती अशा साहित्यलेण्यांनीच नटलेली असावी लागते. सांस्कृतिक संदर्भांनी सशक्त व्हावी लागते. शतकानुशतकाचा इतिहास तिच्या पोटात असावा लागतो, आणि वर्तमानातही ती जनसामान्यांच्या ओठांवर असावी लागते. तेव्हा कुठं ती भाषा अभिजात असते. आपली मराठी अशीच आहे.

जिला वाघिणीचं दूध म्हणतात, ती इंग्रजी भाषाही उगीच का अभिजाताचे नानाविध अलंकार मिरवते? अभिजात भाषेला निव्वळ प्राचीनत्त्वाचे पुरावे पुरेसे नसतात. ती सर्वार्थानं समृध्द असावी लागते. साहित्य, कला, लोकजीवन यांचं पोषण करणारी असावी लागते अभिजात भाषा. जाणाऱ्या प्रत्येक पिढीनं त्या भाषेला काहीतरी दिलेलं असावं लागतं, आणि येणाऱ्या पिढ्याही त्याच इरेला पडून आपली भाषा मिरवणाऱ्या असाव्या लागतात. इंग्रजी भाषा सुदैवी. तिला लेकरंही कर्तृत्ववान आणि प्रेमळ आणि मातृप्रेमी मिळाली...

अभिजाताचा स्पर्श झालेल्या कितीतरी कलात्मक गोष्टी इंग्रजीत आहेत. शतकानुशतकं चालणाऱ्या परीकथा असोत किंवा परीकल्पना. कथा असोत वा कादंबऱ्या. वैचारिक लिखाण असो वा प्रापंचिक... या भाषेनं जगाला आपलं सर्वस्व दिलं. तिच्या लेकरांनीही तिचे पांग फेडले.

पी.एल. ट्रॅव्हर्स हे नाव ऐकलंय? गेल्या शतकात परीकथांची झडी लावून बच्चेकंपनीला वेड लावणारी ही लेखिका. ‘मेरी पॉपिन्स’ नावाची एक भन्नाट नॅनी तिनं जन्माला घातली. पी.एल. ट्रॅव्हर्स १९९६मध्ये वयाच्या ९६व्या वर्षी निवर्तल्या. त्यानंतर काही वर्षांनी जे. के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटरनं इंग्रजी साहित्यात धुमाकूळ घातला. ही रिले शर्यत अशी शतकानुशतकं चालू आहे, त्यात खंड नाही.  
पी.एल. ट्रॅव्हर्स ऊर्फ पामेला लिंडन ट्रॅव्हर्स. पण हे त्यांचं खरं नाव नव्हे. मूळच्या त्या ऑस्ट्रेलियन हेलन लिंडन गॉफ. पण इंग्लंडमध्ये येऊन कुठे कुठे लिहिताना त्यांनी आपलं नाव बदललं, ते बदललंच. मेरी पॉपिन्सच्या परीकथा लिहिल्याखातर ब्रिटिश सम्राज्ञीनं त्यांना ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’चा (ओबीइ) सन्मान दिला. ‘डेम’ म्हणून मिरवण्याचा किताब दिला. मेरी पॉपिन्स पडद्यावर जिवंत करणाऱ्या ज्यूली अँड्र्यूज यांनाही हाच मान पुढे मिळाला. या दोघींना एकत्र आणणारा दुवा होता, काल्पनिकाच्या नवलनगरीचा बेताज बादशहा साक्षात वॉल्ट डिस्ने! जगातले सगळेच सन्मान या बादशहापुढे फिके आहेत…  

ज्यूली अँड्र्यूज हे असंच अभिजाताच्या परिसाचा स्पर्श झालेलं नाव. नव्वदीच्या उंबरठ्यावर आलेल्या मादाम अँड्र्यूज आज वार्धक्याच्या मस्त मस्त उतारावर आनंदानं जगताहेत. ब्रिटिश लोकांना त्या मानवी जीव वाटतच नाही. ती परी होती, आणि अजूनही म्हातारी झाली तरी परीच आहे. 

सौंदर्य, अभिनय, शास्त्रीय संगीत, लेखन, बालवाङ्‌मयात मोलाची भर घालणारी लेखिका, सुसंस्कृत आणि सुशिक्षित ब्रिटिश आज्जी, म्हणजे मेरी पॉपिन्स... सॉरी, ज्यूली अँड्र्यूज! इंग्रजी भाषेला समृध्द करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अँड्र्यूजबाईंचा महिमा काय वर्णावा?

एक काळ असा होता की तरुण ज्यूली अँड्र्यूज रंगमंचावर उभी राहिली की लोक मंत्रमुग्ध होत. चारही सप्तकात फिरणारा तिचा सूर ऑपेरागृहाच्या घुमटाकार वास्तूमध्ये भरून राही. तिच्या शुध्द वाणीवर आणि व्यक्तित्त्वावर साक्षात जॉर्ज बर्नाड शॉ खूष होते. त्यांच्या मनातली ‘माय फेअर लेडी’ तिनंच तर सगुण साकार केली. लंडनच्या ब्रॉडवेवर ‘माय फेअर लेडी’चे खेळ सुरू झाले आणि रंगभूमीच्या इतिहासातलं एक सोनेरी पान जणू लिहिलं गेलं. शॉ यांची सिद्धहस्त लेखणी आणि ज्यूली अँड्यूजचा स्वरविलास आणि अभिनय... एक मैफलच जमून गेली होती म्हणा ना. आपल्याकडे नाही का, पु. ल. देशपांडे यांच्या ‘फुलराणी’ला भक्ती बर्वेंनी अजरामर करून ठेवलं... तसंच! पुलंची लेखणी आणि त्यांचंच दिग्दर्शन. त्याला साथ भक्ती बर्वेंच्या अभिनयाची. सगळीच नजरबंदी! 

‘माय फेअर लेडी‘मुळे प्रकाशझोतात आलेल्या ज्यूली अँड्र्यूजला बघून वॉल्ट डिस्ने यांनी ‘हीच ती मेरी पॉपिन्स’ असं ठरवून टाकलं होतं. 
ज्यूली अँड्र्यूजला ब्रिटिश सम्राज्ञीनं सन्मानानं ‘डेम’ हा किताब दिला, आपल्या दरबारात स्थान दिलं. आजही मादाम अँड्र्यूज ब्रिटिश कलाक्षेत्रात आपला दबदबा राखून आहेत. जिवंत दंतकथा म्हणतात ती यालाच. त्यांच्या आवाजातली जुनी अभिजात गाणी आजही काही ब्रिटिश म्हाताऱ्यांच्या संग्रही असतील, आणि संध्याकाळच्या उतरत्या उन्हात पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून तिचा सूर कानात साठवून घेण्याची परंपरा आजही काही तुरळक जुन्या घरांमध्ये जपली जात असेल. एखादा स्मिथसाहेब किंवा जॉर्ज आजोबा आजही ज्यूली अँड्र्यूजचं नाव घेतलं की किंचित मोहरत असेल. असल्या गोष्टी कालातीत असतात. त्यांना उमर नसते. ज्यूली अँड्र्यूज हे नाव त्यापैकीच.

***

साधारणतः १९४४ साल असावं. दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. वॉल्ट डिस्नेच्या कल्पनेच्या भराऱ्या त्या तसल्या काळातही चालू होत्या. एका रात्री तो आपल्या लाडक्या लेकीला ‘गुडनाइट’ पप्पी देण्यासाठी तिच्या खोलीत गेला. चिमुरडी लेक कसलं तरी चोपडं वाचत होती. नाव होतं, ‘मेरी पॉपिन्स’.

‘‘हे काय आहे? बरंय का... ’’ त्यानं लेकीला विचारलं. वास्तविक ते पुस्तक त्यानं आधी वाचलं होतं.

‘‘मस्त आहे... सिनेमा करा त्याचा!,’’ झोपाळलेल्या आवाजात लेक म्हणाली. त्या प्रतिभावंत बापानं पुस्तक उचललं, आणि मग खालीच ठेवलं नाही. त्यानं त्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. पण त्या पुस्तकाचे हक्क मिळवण्यासाठी बऱ्याच लढाया त्याला लढाव्या लागल्या. अगदी प्रदीर्घकाळ. थोडीथोडकी नव्हे, वीस वर्ष! 

... याला कारण लेखिका पीएल ट्रॅव्हर्स ही अतिशय विक्षिप्त बाई होती. एकलकोंडी, माणूसघाणी आणि टोकाची मतं असलेली. तिनं डिस्नेला प्रचंड छळलं. (त्याच्यावरही एक चित्रपट आहे.-‘सेव्हिंग मि. बँक्स’. एम्मा थॉम्प्सन आणि टॉम हँक्स! क्या बात!!) विशी-बाविशीची ज्यूली अँड्र्यूज त्यानं एका ऑपेरात पाहिली. पण तेव्हा नेमकी ती तीन महिन्यांची गरोदर होती. ‘‘कुठली तारीख दिलीये डॉक्टरांनी?’’ असं वॉल्ट डिस्नेनं विचारून घेतलं, आणि चक्क थांबण्याचा निर्णय घेतला! 

‘मेरी पॉपिन्स’वर चित्रपट करायचा तर ज्यूली अँड्र्यूज बरोबरच, असा त्याचा निर्धार होता. नवोदितांसाठी असं कुणी थांबतं का? पण तो थांबला. 

पुढे ‘मेरी पॉपिन्स’नं रजतपटावर इतिहास घडवला. 

***

जॉर्ज बँक्स हा एक बँक व्यवस्थापक. कामसू. प्रामाणिक वगैरे. त्याची बायको विनिफ्रेड दुसऱ्याच दुनियेत जगणारी. या जोडप्याला चार-पाच मुलं. एकही नॅनी टिकाव धरू शकणार नाही, अशी द्वाड. ‘त्यांना सांभाळायला कडक, शिस्तशीर दाई हवी आहे’ अशी जाहिरातच जॉर्जनं देऊन टाकली. मुलांनी, म्हणजे जेन आणि मायकेलनं ‘प्रेमळ, सुंदर, गाणारी, खोडकर’ दाई हवी असल्याची दुसरी जाहिरात लिहून पेपरात छापायचं ठरवलं. पण झालं काय की वडील जॉर्ज यांच्या हातात तो कागद सापडला आणि त्यांनी संतापून तो आगीच्या बंबात घातला. आगीतून ठिणग्या उडाल्या. त्या धुरांड्यातून वर वर वर आभाळात पोचल्या. एक दिवस...

एक दिवस या बेशिस्त मुलांना सांभाळण्यासाठी एक छत्रीधारी नॅनी आभाळातून अवतरली. आगीत भस्मसात झालेली मुलांची जाहिरात तिच्या कनवटीला पूर्ण स्वरूपात होती. जॉर्जला काही बोलता येईना! हीच मेरी पॉपिन्स.

चुटकीसरशी घर आवरणारी. चुटकीसरशी हवी ती वस्तू हजर करणारी. चुटकीसरशी चित्रातल्या ढगात किंवा नदीत घेऊन जाणारी. चुटकीसरशी हवेत उडू शकणारी. तिनं मुलांना गाणीबिणी शिकवली. शिस्तही लावली. शहाणं करून सोडलं. परत छत्रीचा दांडा धरून निघूनही गेली... एवढंच कथासूत्र होतं. त्यात अनेक सुंदर प्रसंगांचे असे काही रंग भरले होते की अवघं इंग्रजी जगत मेरी पॉपिन्सच्या प्रेमातच पडलं. मेरी पॉपिन्सचं संगीत, तिची गाणी, तिचे काव्यमय संवाद... सारंच सुखद होतं. हा चित्रपट मुळातून पाहण्याजोगा आहे. त्याची स्टोरीबिरी सांगणं म्हंजे अगदीच ‘हे’!

***

‘मेरी पॉपिन्स’ची जन्मकथा हीच एक आधुनिक परीकथा वाटावी. पीएल ट्रॅव्हर्सनं वॉल्ट डिस्नेला या संपूर्ण प्रकरणात चिक्कार त्रास दिला. १९४४पासून डिस्ने हक्क मिळवण्यासाठी धडपडत  होता. सुरुवातीला ट्रॅव्हर्स बाईंनी त्याला धुडकावूनच लावलं. माझी कथा चित्रपटासाठी योग्य नाही, आणि तुझ्यासारखा माणूस तर ते काम करूच शकणार नाही,’ असं तिनं वॉल्ट डिस्नेला ठणकावून सांगितलं. शेवटी १९६१ साली आर्थिक चणचणीमुळे त्यांनी पहिल्या मेरी पॉपिन्स पुस्तकाचे हक्क दिले. पण चित्रपटाबाबतीत माझा शब्द अंतिम राहील अशी अट घालून! या चित्रपटाच्या नामावळीत ट्रॅव्हर्सबाईंचं नाव ‘मूळ कथा आणि निर्मिती सल्लागार’ असं येतं. या चित्रपटात डिस्नेनं कुठल्याही परिस्थितीत त्याची ती घाणेरडी कार्टून (?) वापरायची नाहीत, अशीही लेखी अट ट्रॅव्हर्सबाईंनी घातली होती. 

चित्रपटात १९१०चं सम्राट एडवर्डच्या काळातलं इंग्लंड आहे. गीत-संगीतकार शेरमन ब्रदर्सनी सुंदर गाणी बसवली होती. पण ती सगळीच्या सगळी ट्रॅव्हर्सबाईंनी नाकारली. ‘यात एडवर्डकालीन संगीत कुठाय?’ असा त्यांचा सवाल होता. बाईच्या नाकदुऱ्या काढता काढता वॉल्ट डिस्नेच्या तोंडाला फेस आला. 

शेवटी झालं असं : मेरी पॉपिन्समध्ये कार्टूनही आली. बोलणारी बदकं, बोलके पेंग्विंन आणि बोलकी छत्रीही आली. शेरमन ब्रदर्सची गाणीही शाबूत राहिली. इतकंच नव्हे तर मेरी पॉपिन्स ही एक मजेमजेदार, गोड गोड नॅनी म्हणून पेश झाली. ज्यूली अँड्रूयज दिसून दिसून किती गंभीर दिसणार? प्रत्यक्ष कथेत मात्र ही जादुई नॅनी खाष्ट आणि गंभीर चेहऱ्याची दाखवली आहे. चित्रपटाचा शेवटही मजेदार करण्यात आला. 

हे सगळं ट्रॅव्हर्सबाईच्या मनाविरुद्ध घडलं. तिला प्रिमिअर शोचं निमंत्रणही डिस्ने कंपनीनं पाठवलं नाही. तरीही ती प्रदर्शनानंतरच्या मेजवानीत घुसली. भर मेजवानीत तिनं वॉल्ट डिस्नेला तिनं गाठलं. म्हणाल्या, ‘‘वेल, मि. डिस्ने, आपण त्या कंटाळवाण्या कार्टून पेंग्विंनपासून कटाईच्या कामाला सुरूवात करावी काय?’’

‘‘जहाजानं किनारा सोडलाय, पामेला! विसर आता सगळं!’’ एवढं बोलून वॉल्ट डिस्ने विजेत्यासारखा निघून गेला.

या चित्रपटानं अक्षरश: इतिहास घडवला. डिस्नेच्या संपूर्ण कारकिर्दीत दिसला नसेल इतका गल्ला या सिनेमानं ओढला. ज्यूली अँड्रूज रातोरात स्टार झाली. खुद्द पीएल ट्रॅव्हर्स यांना कोट्यवधी डॉलर्स मिळाले. त्यांचं दैन्य हटलं. आजही हा चित्रपट अभिजात लेणं म्हणून मिरवतो. ट्रॅव्हर्सबाई १९९६ साली गेल्या. तेव्हा त्यांनी मृत्युपत्रात लिहून ठेवलं : माझ्या गोष्टींचे हक्क कुठल्याही अमेरिकन चित्रकंपनीला विकू नयेत. डिस्नेला तर बिलकूल देऊ नयेत. 

मादाम ज्यूली अँड्रूज (ओबीइ) मात्र शतकातील सर्वात ग्लॅमरस आज्जी बनून आज नातवंडं खेळवताहेत. मेरी पॉपिन्स इज स्टिल देअर. तिच्याच भाषेत सांगायचं तर... 

‘Supercalifragilisticexpialidocious’!

 

संबंधित बातम्या