सांगा, कसं जगायचं?

प्रवीण टोकेकर
सोमवार, 28 मार्च 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

‘इट्स अ वंडरफुल लाइफ’ चित्रपटाची जन्मकहाणीही गमतीदार आहे. चित्रपट तेव्हा काही चांगला चालला नाही, काहींनी तर चक्क नाकं मुरडली. पण पुढे शतकातल्या सर्वोत्कृष्ट हॉलिवूडपटांच्या पंक्तीत हा चित्रपट मानाचं पान मिळवून बसला. इतकंच नव्हे तर ‘आयुष्य सुंदर आहे’ हा अष्टाक्षरी मंत्रच जणू चित्रसृष्टीला या चित्रपटामुळे गवसला. सकारात्मक चित्रपटांचं एक दालन सजू लागलं. एवढं काय होतं या चित्रपटामध्ये?

जगण्याबिगण्याची बात निघाली की मोठमोठाले गुरू रिकाम्या पेल्याचा दृष्टांत देतात. पेला अर्धा रिकामा आहे, असं म्हणायचं, की अर्धा भरलेला, हे तुम्हीच ठरवा, असला काहीतरी उपदेश ऐकायला मिळतो. हा झाला जगण्याबद्दलचा दृष्टिकोन. सकारात्मक का काय म्हणतात तसा हा दृष्टिकोन आहे चांगलाच, पण दुःखातिरेकानं संपूर्ण वाकलेल्या माणसाला या हितोपदेशाचं काय कौतुक असणार? ‘भरल्या पोटीची ही तुमची तत्त्वज्ञानं, तुम्हालाच लखलाभ’ असंच तो म्हणणार.

अभावातही ऊराशी भाव जपत जगावं हे लागतंच. दुःखाचे डोंगर कोसळले म्हणून जीव नकोसा होणं हा झाला पलायनवाद. काही अभाग्यांना नाही झेपत हे दुःख पेलणं. गपचूप एक दिवस स्वतःला संपवण्याचा चुकीचा मार्ग ते पत्करतात. दुःखाच्या निराकरणाचा हा मार्ग काही खरा नव्हे. जगातली सगळीच तत्त्वज्ञानं या पलायनवादाचा धिक्कार करतात. बहुतेक सगळेच गुरुजन आयुष्याला भिडण्याचा उपदेश करतात. जीवनाला सन्मुख अशा शब्दांचं एक मोहक जाळं आपल्या दिशेनं फेकलं जातं. त्यानं दुःखाचे कढ थोडे उणावतात. ज्या जगण्याला आपण नावं ठेवतोय, ते तितकंसं वाईट नाही, हे कळू लागतं. 

गुरुपदेश वगैरे राहू द्या, आपल्या परिकथाही हाच तर संदेश सांगत असतात. खडतर आव्हानांना तोंड देत देत मार्गक्रमण केलं की कार्य सिध्दीस गेलंच म्हणून समजा, असा आत्मविश्वास पेरण्याचं काम किती तरी परिकथांनी केलं. ‘...ॲण्ड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर’ या वाक्यानं शेवट होणाऱ्या या परिकथांनीही जीवनसन्मुखताच शिकवली. तीही कुठल्याही अभिनिवेशाशिवाय. –निव्वळ एका छानदार गोष्टीतून.

***

दुसरं महायुद्ध झालं. निम्मंअधिक जग देशोधडीला लागलं होतं. लोक हळूहळू पुन्हा चिवटपणानं मान वर काढू लागले. युद्धानंतरचा काळ खरोखरच भयंकर होता. दारिद्र्य आलेलं. हाताला काम नाही, खिशात दाम नाही... जीवन कलहाची नवीच लढाई सुरू झालेली. त्या काळात हॉलिवूडनं माणसाचं जगणं किती नायाब आहे, हे सांगणारे अनेक चित्रपट केले. त्यात परिकथाही होत्याच. त्यातलाच एक १९४६मध्ये आलेला ‘इट्स अ वंडरफुल लाइफ’ हा चित्रपट. दिग्दर्शक होता साक्षात फ्रँक काप्रा. काल्पनिक आणि वास्तवाची मस्त सरमिसळ असलेली हीसुद्धा एक परिकथाच म्हणावी लागेल. आधुनिक परिकथा म्हणा हवं तर...

या चित्रपटाची जन्मकहाणीही गमतीदार आहे. जो संदेश हा चित्रपट माणसाला देऊ पाहत होता, तोच संदेश जणू प्राक्तन होऊन चित्रपटाच्या वाट्याला आला. चित्रपट तेव्हा काही चांगला चालला नाही, काहींनी तर चक्क नाकं मुरडली. पण पुढे शतकातल्या सर्वोत्कृष्ट हॉलिवूडपटांच्या पंक्तीत हा चित्रपट मानाचं पान मिळवून बसला. इतकंच नव्हे तर ‘आयुष्य सुंदर आहे’ हा अष्टाक्षरी मंत्रच जणू चित्रसृष्टीला या चित्रपटामुळे गवसला. सकारात्मक चित्रपटांचं एक दालन सजू लागलं. एवढं काय होतं या चित्रपटामध्ये?

गोष्ट आहे गेल्या शतकाच्या सुरुवातीची. जॉर्ज बेली नावाचा एक इसम आत्महत्त्या करायला निघालाय, या कल्पनेनं चित्रगुप्ताच्या कचेरीत हलकल्लोळ झाला. एवढा चांगला माणूस, यादीत नाव नसताना कसा उचलायचा? या शंकेनं यमराजसुद्धा हैराण! पण जॉर्ज तर हट्टाला पेटलेला. त्यानं जगणंच सोडलंय. पुलावरून नदीत उडी मारायला निघालाय.

शेवटी देवदूतांची इमर्जन्सी मीटिंग झाली. काहीही करून जॉर्ज बेलीला परावृत्त केलंच पाहिजे, असा निर्णय झाला. या कामगिरीसाठी क्लॅरेन्स ऑडबॉडी नावाच्या देवदूताची निवड झाली. हा जॉर्जचा ‘गार्डियन एंजल’ होता. मागल्या टायमाला काहीतरी घपला केल्याने क्लॅरेन्सनं आपले पंख गमावले होते. (देवदूतांना पंख वगैरे असतात, हे जनरल नॉलेज इथं असायला हवं!) जॉर्जला आत्मघातापासून वाचवलं तर पंख परत मिळतील, असं आश्वासन हेडदेवदूतानं दिलं, तेव्हा कुठं क्लॅरेन्स ऑडबॉडी राजी झाला.

क्लॅरेन्सला जरा ‘जॉर्ज बेलीच्या आजवरच्या आयुष्याची चित्रफीत दाखवा, त्याला पार्श्चभूमी ठाऊक असायला हवी,’ असं सांगून हेडदेवदूतांनी मीटिंग संपवली. क्लॅरेन्सनं जॉर्ज बेलीचं लहानपणापासूनचं आयुष्य चित्रफितीवर पाहून घेतलं... म्हणाला, ‘अरेच्चा, असंय होय हे प्रकरण! जरा नाजूकच दिसतंय!!’

काय पाहिलं क्लॅरेन्सन? त्याला दिसलं ते असं :

न्यूयॉर्कजवळच्या बेडफोर्ड फॉल्स नावाच्या गावातली गोष्ट. मि. बेली म्हणून एक सावकार होते. सज्जन माणूस. ‘बिल्डिंग अँड लोन’ कंपनी चालवणारे. ही कंपनी लोकांना तारण घेऊन कर्ज द्यायची. परवडण्याजोगी घरंही बांधून द्यायची. बेलींना दोन मुलं. जॉर्ज आणि हॅरी. त्यातल्या जॉर्जची ही गोष्ट आहे.

बालपण : मनातल्या मनात कुढणाऱ्या लहानग्या जॉर्जला नको नको झालं होतं. आपण अगदी ‘गुड फॉर नथिंग’ म्हणतात तसे आहोत, अशी त्याची ठाम खात्री होत चालली होती. तेवढ्यात एकदा बर्फात गोठलेल्या नदीवर आइस स्केटिंग करताना हॅरी पाण्यात कोसळला. जॉर्जनं त्याचा जीव वाचवला. त्या भानगडीत तोच बर्फगार पाण्यात पडला. परिणामी त्याचा एक कान कायमचा अधू झाला.

अंकल मि. गॉवर गावात एक फार्मसी चालवायचे. एकदा चुकून त्यांनी विषसमान दवाई प्रिस्क्राइब केली, ती जॉर्जनं नजरेला आणून दिली. अंकल गॉवर पुत्रवियोगाच्या दुःखानं व्याकूळ झाले होते, त्या अवस्थेत त्यांच्या हातून ती घोडचूक घडली. पण जॉर्जनं त्यांना सावरलं. ते त्याचे कायमचे उपकृत झाले. अशा कितीतरी गोष्टी घडल्या.

तारुण्य : मेरी हॅच आणि व्हायोलेट विंक या दोन्ही पोरी जॉर्जच्या पूर्वीपासून प्रेमात होत्या. पण मेरी जॉन वेनराइटच्या प्रेमात असल्याचा गैरसमज उराशी बाळगत जॉर्ज गप्प राहिला. पदवी मिळवून बेडफोर्ड सोडायचं, आणि जग हिंडून यायचं. मोठमोठाल्या उत्तुंग इमारती बांधायच्या, हॉटेलं बांधायची, नुसती धमाल करायची. पण त्याचं हे स्वप्न अपुरंच राहिलं.

दरवेळी असं काहीतरी घडलं की त्याला स्वप्नांवर तुळशीपत्र ठेवावं लागायचं.

उदाहरणार्थ, पदवी मिळवल्यावर जॉर्ज वडिलांच्या कंपनीत काम करायला लागला होता. धाकटा हॅरी पदवी मिळवून हाताशी आला की आपण स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडायचं जॉर्जनं ठरवून टाकलं होतं. पण छे, हॅरीनं कॉलेजात श्रीमंताची पोरगी गटवली, आणि त्याच्या सासऱ्यानं त्याला जवळजवळ  घरजावई केलंन. एवढं पुरेसं नव्हतं, म्हणून वडील अचानक वारले. ‘बिल्डिंग अँड लोन’ची जबाबदारी जॉर्जवरच आली.

त्या परिस्थितीतच त्यानं मेरीशी लग्न केलं. चार मुलं झाली. पण व्यवसायातली आव्हानं त्याला जखडून ठेवत होती. गंडांतरं येत होती, आणि हा आपला अडकत  चालला होता. हेन्री पॉटर म्हणून त्यांच्या कंपनीचे एक संचालक होते. अत्यंत लोभी, स्वार्थी आणि भ्रष्ट माणूस! पॉटरसाहेबांनी जॉर्जला पार जेरीला आणलं. त्याची कंपनी गिळंकृत करण्याचा त्यांचा डाव होता. अखेर जॉर्जवर त्यांनी हेराफेरीचं बालंट आणलं.

खरंतर जॉर्जला भव्य बेली पार्क उभं करायचं होतं. साध्यासुध्या चाकरमान्यांना परवडेल अशी घरं बांधायची होती, त्यासाठीच ही बेलीनगरी त्याला उभारायची होती. त्यासाठी त्यानं सारं काही पणाला लावलं होतं. पण पॉटरमहाशयांनी त्यात खोडा घातला. कारण त्यांच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा जॉर्जकडे वळणार होता. त्यांनी जॉर्जला भल्याभक्कम रकमेचं आमिष दाखवलं. नोकरी देऊ केली. पण जॉर्ज बधला नाही. शेवटी पॉटर त्याच्या जीवावर उठले.

आत्मघाताच्या कड्यावर : चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणेच जॉर्ज बेलीची अवस्था झाली. अखेर त्यानं हार पत्करली. आत्मघातासाठी तो पुलावर गेला. खाली उडी मारणार इतक्यात देवदूत क्लॅरेन्स धाडकन पाण्यात पडला. दुसऱ्याला मदत करण्याच्या सहज स्वभावामुळे जॉर्जनं उडी मारून त्याला ‘वाचवलं’! (ही आयडिया हुशार क्लॅरेन्सचीच!) 

क्लॅरेन्सनं त्याला शेवटी जॉर्ज नसलेल्या जगाचा कालप्रवाह दाखवला. जॉर्ज चाटच पडला. आपल्यासारखा यःकश्चित इसम या पृथ्वीतलावर नसला तर एवढी उलथापालथ होते? माय गॉड!

प्रत्येक लहानथोराच्या अस्तित्त्वाचं जगतात काहीएक प्रयोजन असतं. आणि ज्याला मित्र असतात, तो कधीही अपयशी नसतो, हे क्लॅरेन्सनं जॉर्जला पटवलं. पुढची गोष्ट पडद्यावर बघा. क्लॅरेन्सला पंख त्याला परत मिळाले, एवढंच सांगितलं तरी तूर्त पुरे! 

***

विख्यात ब्रिटिश लेखक आणि सामाजिक भाष्यकार चार्ल्स डिकन्स यांच्या गाजलेल्या ‘अ क्रिसमस कॅरल’ या कादंबरिकेवर आधारित अशी गोष्ट फिलीप व्हॉन डॉरेन स्टर्न यांनी लिहिली ती १९३९मध्ये. तेव्हा दुसरं महायुद्ध भडकलेलं होतं. ही बारकीशी गोष्ट डझनभर मासिकांच्या संपादकांनी साभार परत करून टाकली. शेवटी चिडून स्टर्न यांनी स्वतःच दोनशे प्रती छापल्या आणि ते २४ पानी चोपडं आपल्या मित्र-नातलगांना पाठवून दिलं. अमेरिकी सितारा कॅरी ग्रँटला ते एकदा फावल्या वेळात वाचायला मिळालं. त्यानं आरकेओ स्टुडिओला याचे हक्क घेऊन ठेवण्याची विनंती केली. स्टुडिओनं १० हजार डॉलर्स देऊन हक्क घेतले, पण सिनेमा काही केला नाही. 

पुढे फ्रँक काप्राकडे ही गोष्ट गेली. स्टुडिओनं १० हजार डॉलर्समध्येच सगळे हक्क त्याला देऊन टाकले. वर त्या गोष्टीच्या पटकथेवर आजवर झालेलं कामही फुकट देऊन टाकलं. वास्तविक डाल्टन ट्रम्बोसारख्या निष्णात पटकथाकारानं त्यावर काम केलं होतं. ट्रम्बो अवलिया होता. कम्युनिस्ट असल्याचा आरोप ठेवून हॉलिवूडनं पुढे त्याला बहिष्कृत केलं. पण टोपणनावानं सिनेमे लिहून त्यानं ऑस्करही पटकावलं होतं. पण त्यानं लिहिलेली पटकथा काप्रानं टाकून दिली. नव्याने लिखाण केलं. जेम्स स्टुअर्टसारखा ताज्या दमाचा नट मुख्य भूमिकेसाठी मुक्रर केला. 

स्टुडिओनं हात झटकल्यावर काप्रालाही झटके बसायला लागले. कुणीही चांगला नट मिळेना. वास्तविक काप्रा, विल्यम वायलर ही त्याकाळची फार मोठी नावं होती. तरीही सगळीकडे नन्नाचा पाढा! पण काप्रानं हट्ट सोडला नाही. भरपूर भांडणं, वाद-तंटे, अडचणी, कटकटी भोगत त्यानं अखेर चित्रपट पूर्ण केला. टाकाऊ गोष्ट म्हणून धक्के खाणारी ही ‘ग्रेटेस्ट गिफ्ट’ पुढे १९४६ सालच्या ऑस्कर सोहळ्यात चार चांदाची मानकरी ठरली. प्रेक्षकांनीही सुरुवातीला हा सिनेमा फारसा बघितलाच नाही. थिएटरं ओस पडली होती. पण हळूहळू या चित्रपटाचं महत्त्व लक्षात येत गेलं. आजतर जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. ‘इट हॅपण्ड वन नाइट’सारखा नितांतसुंदर चित्रपट देणाऱ्या फ्रँक काप्राला त्याचा सर्वात आवडता चित्रपट ‘इट्स अ वंडरफुल लाइफ’ हाच वाटतो.

सांगा, कसं जगायचं?

कण्हत कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

...अशी एक कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आहे. पुढल्या ओळी आहेत : 

डोळे भरुन तुमची आठवण

कोणीतरी काढतंच ना?

ऊन ऊन दोन घास

तुमच्यासाठी वाढतंच ना?

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं

तुम्हीचं ठरवा!

...असं हे अर्थगर्भ बोलगाणं. पाडगावकरांनी सांगितलं, तेच फ्रँक काप्रानं खूप वर्षांपूर्वी सांगितलं नव्हतं का? आपले पाडगावकर आणि क्लॅरेन्स ऑडबॉडी नावाचा तो देवदूत यांच्यातलं साम्य दिसलं की मन हरखतं. पाडगावकरांचं एकेक बोलगाणं परिकथा वाटू लागतं. फ्रँक काप्राही पाडगावकरांसारखा आपला वाटू लागतो. 
 

संबंधित बातम्या