देवाजीची मुले!

प्रवीण टोकेकर
सोमवार, 11 एप्रिल 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0
 

पस्तीस वर्षांपूर्वी ‘चिल्ड्रेन ऑफ लेसर गॉड’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला होता. त्या चित्रपटात सारा मॉर्गनची प्रमुख भूमिका साकारणारी मार्ली मॅटलीन नावाची अभिनेत्री होती. या मूकबधिर अभिनेत्रीनं ऑस्कर मिळवण्याचा पराक्रम तेव्हा करून दाखवला होता. तीच मार्ली यंदाच्या ऑस्कर विजेत्या ‘कोडा’तही जॅकी रॉस्सी नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसते.

As if some lesser god had made the world,
But had not force to shape it as he would?
- Alfred Lord Tennyson, Idylls of the King: The Passing of Arthur

देव सर्वांभूती असतो. तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असतो. देव ही सर्वोच्च शक्ती आहे. असं असेल तर मग या जगतात इतकं दु:ख कुणी निर्माण केलं? सर्वशक्तिमान देवाजीला काय अशक्य होतं? बिना दुःखाचं जग त्यानं का नाही निर्माण केलं? नियती नावाचं आणखी एक लचांड का आपल्या जगण्याच्या मागे लावलं? देव एकच असतो की तेहेत्तीस कोटी? काही देव भारीतले असतात, काही थोडे कमी भारीतले, असं काही असतं का? देवलोकातही वर्गविग्रह आहे की काय? 

जन्मांधळे, जन्मादारभ्य मुकेबहिरे यांचा देव वेगळा असतो का? ही छोट्या देवांची मुलं आहेत का? मग त्यांच्या वाट्याला हे असलं जगणं का?...

प्रश्नांचं जंजाळ संपत नाही. जितकं त्या जंजाळात शिरावं, तितकं अधिक गोंधळायला होतं. ‘तुझ्यातही मी आहे, आणि माझ्यातही तूच आहेस...’ असं प्रत्यक्ष भगवंतानं सांगितलं असलं तरी त्याचा नेमका अर्थ अजूनही लागलेला नाही आपल्याला. 

मध्यंतरी पार पडलेल्या शानदार ऑस्कर सोहळ्यात ‘कोडा’ या चित्रपटानं बाजी मारली. ‘कोडा- चाइल्ड ऑफ डेफ अॅडल्ट्स’! मूकबधिर कुटुंबातल्या एकमेव नाकी-डोळी-कानी धड असलेल्या एका मुलीची ही भावमधुर कहाणी आहे. आईवडील, भाऊ सगळे मूकबधीर... मुलगी, सारा तेवढी ठीकठाक. आईवडलांचे कान आणि तोंड होऊन जगायचं की स्वतःच्या तारुण्यसुलभ ऊर्मी आणि स्वप्नांना कुरवाळायचं, असं तिच्या मनातलं द्वंद्व ‘कोडा’मध्ये दाखवलंय. हा नितांतसुंदर सुंदर चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.

या चित्रपटात कामं करणारे अभिनेतेही खऱ्याखुऱ्या आयुष्यातही मूकबधिरच आहेत. मूकबधिर अभिनेत्यांनी ऑस्कर पटकावलं म्हणून जगानं टाळ्या वाजवून दाद दिली. पण ‘कोडा’चं ऑस्कर यश खेचून नेणारे हे मूकबधिर अभिनेते पहिले नव्हेत. पस्तीस वर्षांपूर्वी ‘चिल्ड्रेन ऑफ लेसर गॉड’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला होता. त्या चित्रपटात सारा मॉर्गनची प्रमुख भूमिका साकारणारी मार्ली मॅटलीन नावाची अभिनेत्री होती. या मूकबधिर अभिनेत्रीनं तेव्हा ऑस्कर मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला होता. तीच मार्ली ‘कोडा’तही जॅकी रॉस्सी नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसते. भन्नाट भूमिका आहे. बघाच.

‘कोडा’च्या चमूनं ऑस्करच्या रंगमंचावर येऊन सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार स्वीकारला, तेव्हा मार्ली मॅटलीन तिथं हजर होती. 

मार्लीचं नाव आपल्या स्मरणातून गेलं असेल कदाचित, पण अमेरिकेत ती तशी सुपरिचित आहे. कारण तिनं पुढे पडद्यावर भूमिकाही केल्या. नाटकांमध्ये कामंही केली. मूकबधिरांच्या संघटनेमार्फत ती समाजकार्यातही सक्रिय राहिली. लेखिका म्हणूनही तिनं नावलौकिक कमावला. ‘आय विल स्क्रीम लेटर’ हे तिचं आत्मचरित्र गाजलं होतं...

केवळ १८ महिन्यांची असताना मार्लीची कर्णेंद्रियं बधीर झाली. पुढे सुरू झाली संकेतांची भाषा. तसल्या परिस्थितीतही ती शिकली. मोठी झाली. आयुष्यभराचे आघात सोसूनही तिनं कडवटपणा जवळ फिरकू दिला नाही. उलट विनोदबुद्धी जोपासली. मार्लीची कहाणी हासुद्धा वेगळा कथाविषय ठरेल.

मार्ली मॅटलीनच्या ‘चिल्ड्रेन ऑफ लेसर गॉड’नं एक वर्तुळ आखायला सुरुवात केली, ‘कोडा’नं ते पूर्ण केलं. काय होतं त्या चित्रपटात?

***
न्यू इंग्लंड हा अमेरिकन भूमीचा एक विशाल इलाखा आहे. सहा राज्यांना जोडणारा. या न्यू इंग्लंडनजीक अटलांटिक महासागरात लाँग आयलंडसारखी छोटीमोठी बेटं आहेत. अशाच एका सुंदरशा बेटावर जेम्स लीड्स नावाचा तरुण शिक्षक उतरला. तिथल्या मूकबधिरांच्या शाळेत शिक्षक म्हणून त्याला रुजू व्हायचं होतं. शांतीसेनेत काही वर्ष काढलेला जेम्स दुनिया फिरून आलेला. ‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार,’ असं म्हणतातच. तसं चातुर्य गाठीला बांधूनच जेम्स शाळेत आला.

आल्या आल्याच त्याला तिथली साफसफाई करणारी तरुण मुलगी दिसली. घुमी, काहीशी रागीट... शाळेच्या मेसमध्ये स्वयंपाकिणीशी भांडतानाच दिसली. भांडण तरी कसं? नुसतेच हातवारे, आरडाओरडा. 

चौकशी केल्यावर कळलं की ही सारा मॉर्गन आहे. जन्मजात कर्णबधिर आहे. इथं पाचव्या वर्षापासून येते. इथलीच विद्यार्थिनी. पण आता मोठी झाल्यावर साफसफाईची कामं करते. विद्यार्थीवर्गाशी बरं वागते, पण शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांशी तिचं काही जमत नाही. जेम्सचं कुतूहल चाळवलं. शाळेचे मुख्याध्यापक मि. रेलिन यांनीही साराबद्दल कुरकूर केली. 

‘‘ती वाया गेलेली मुलगी आहे. लक्ष देऊ नका! कसं वागायचं ते तिला अजूनही समजलं नाही,’’ ते म्हणाले.

जेम्सच्या मनात खूप काही कल्पना होत्या. त्यादेखील मुख्याध्यापकांनी मोडीत काढल्या. म्हणाले, ‘‘जेम्स, तुमचा उत्साह मी समजू शकतो, पण इथं काही आपल्याला क्रांतीबिंती करायची नाही. मूकबधिर मुलांना थोडं अधिक शिकवून तयार करायचं, एवढंच आपलं काम आहे... कळलं?’’
जेम्स सर वर्गात पोचले...
‘‘इथं कुणाला खुणांची भाषा, साइन लँग्वेज येते?’’ जेम्सनं विचारलं. 
सगळे गप्प.
‘‘कुणाला ओठांच्या हालचालींवरून शब्द ओळखता येतात? लिपसिंक?’’ जेम्स.
सगळे गप्प.
‘‘ओके... क्लास डिसमिस!’’ जेम्स म्हणाला. 
सगळे उठले.
‘‘बसा, बसा! सगळ्यांना लिपसिंक येतंय, हे कळलं!’’ जेम्स म्हणाला. 
...अशी सुरुवात झाली.

***
जेम्सनं साराशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती तुटक तुटक बोलली, म्हणजे खाणाखुणांनी. तोंडातून एक शब्द उमटला नाही. चौकशी अंती कळलं की साराला आई आहे, पण तिचं आईशीही पटत नाही. किंबहुना बोलणाऱ्या जगाशीच तिचा पंगा आहे. बोलघेवड्यांचं जग तिला आपलं वाटत नाही. आता अशा पोरीचा निभाव कसा लागणार? हिला जरा तयार करायला हवं...

जेम्स हळू हळू सारामध्ये गुंतत गेला. तिचा राग, त्रागा, उतावीळ प्रतिक्रिया यांना तो समजून घ्यायचा. बिलकूल न चिडता. सारानं एक दिवस त्याला काही बाही सांगितलं.

लहानपणी शाळेतली मुलं तिचा गैरफायदा घ्यायची. त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. देहाचा उपभोग. सारा आणि तिची बहीण रूथ या दोघीही शिकार ठरल्या. बोलघेवड्यांच्या आणि मुक्याबहिऱ्यांच्या वासनेच्या. तिथून ती जी तुटक झाली, ती झालीच.

एक दिवस शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी जेम्सनं बघितलं -सारा एकटीच तरण तलावात उतरली आहे. तिचा निःसंकोच, निर्वस्त्र देह बघून जेम्सदेखील विरघळला. तो सरळ जाऊन तरणतलावात कोसळला.

...एक शब्द आणि निःशब्दाची प्रेमकहाणी फुलू लागली.

जेम्स तिला सतत सांगायचा, ‘‘सारा तू बोलत का नाहीस? तू बोलू शकतेस. जमेल तुला. प्रयत्न तरी करून बघ!’’ पण सारा बधली नाही. ती दरवेळेला काही ना काही कारणं काढायची, चिडायची, रागवायची, पण मोठ्यांदा बोलण्याचा सराव टाळायची.

शाळेतही त्यांच्याबद्दल लोक काहीबाही बोलू लागले होते. मुख्याध्यापकही जेम्सवर भडकलेले. माझ्या शाळेत लफडी चालणार नाहीत, असं त्यांनी थेट जेम्सला सुनावलं होतं.

पण सारा पंचवीस वर्षांची होती. विद्यार्थिनी नव्हती. जेम्सच्या मते यात काय गैर आहे?

दोघंही एकत्र राहायलादेखील लागले होते.

त्याच सुमारास जेम्सनं शाळेतल्या मुलामुलींचं नृत्य बसवलं होतं. शाळेतच. मस्त गाण्यावर नाच बसवून घेताना जेम्स रमून गेला. वार्षिक समारंभात ते सादर झालं. तो कार्यक्रम पाहून प्रेक्षकात बसलेली सारा मात्र पार खचून गेली. 

जेम्सला शेवटी आवाजांची दुनियाच प्यारी आहे. हादेखील चारचौघांसारखाच. याला मौनाचे अर्थ समजत नाहीत. साराची समजूत काढता काढता जेम्सची पुरेवाट झाली. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. 

एक दिवस संतापून सारा ओरडली: ‘‘घे, ऐक, माझे शब्द! हा माझा आवाज! हेच हवं होतं ना तुला? की आणखी काही हवंय? किंचाळून दाखवू का आता?’’ (संपूर्ण चित्रपटात सारा मॉर्गनच्या तोंडी हा एकमेव संवाद आहे...)

अखेर सारानं शाळाच सोडली. पुढे तिचं जेम्सशी लग्न झालं? की इथंही तिच्या नशिबी मौनाचा पाढाच आला? ते पडद्यावर बघण्यातच काही अर्थ आहे.

***
मार्क मेडॉफ नामक एका लेखकानं १९७७ साली दुसऱ्याच एका मूकबधिर अभिनेत्रीसाठी ‘चिल्ड्रेन ऑफ लेसर गॉड’ नावाचं नाटक लिहिलं होतं. नाटकही चित्रपटाप्रमाणे काहीसं म्युझिकलच होतं. त्याचे काही प्रयोगही झाले. ते नाटक रँडा हाइन्सच्या पाहण्यात आलं. रँडा हाइन्स ही तेव्हा नावारूपाला आलेली दिग्दर्शिका होती. नाटकामध्ये मार्ली मॅटलीन काम करत होती. तिलाच घेऊन चित्रपट करायचं ठरलं. जेम्स लीडच्या भूमिकेसाठी विल्यम हर्ट या कसलेल्या अभिनेत्याची योजना झाली. सिनेमाचं बजेट कमी होतं. जेमतेम एखाद कोटी डॉलर्स. पण मार्क मेडॉफ यांच्या बांधीव पटकथेला सजीव करण्यात रँडा हाइन्सनं कुठलीही कसर ठेवली नाही. 

१९८५च्या उन्हाळ्यात अवघ्या दीड महिन्यात शूटिंग आटोपलं. या चित्रपटानं इतिहास घडवला. मार्ली मॅटलीननं पदार्पणातच ऑस्कर कमावलं. जेमतेम बजेटवाल्या या चित्रपटानं तब्बल अकरा कोटी डॉलर्सची कमाई केली. 

याच काळात मार्ली विल्यम हर्टच्या प्रेमात पडली होती. हर्ट तेव्हाही शादीशुदा होता. दोनेक वर्ष त्यांचं नातं टिकलं. पुढे सगळा चिखल झाला. दारू, ड्रग्ज आणि वासनांचे डोंब दोघांच्याही आयुष्यात उसळले. विल्यम हर्ट मार्लीला प्रचंड मारहाण करायचा. बलात्कारसुद्धा करायचा. ऑस्कर मिळालं, त्या रात्री तर भर मोटारीत त्यानं डाव साधला. ‘‘हे सगळं यश डोक्यात जाऊ देऊ नकोस! तुझी औकात आहे का? या बाहुलीसाठी लोक जीव टाकत असतात. तुला आयती मिळाली!’’ असं त्यानं ऐकवलं. ‘आय विल स्क्रीम लेटर’ या आत्मचरित्रात मार्ली मॅटलीननं हे सगळं आडपडदा न ठेवता लिहिलंय. अगदी ड्रग्जच्या सवयीसकट सगळं. दोन वर्षांपूर्वी विल्यम हर्ट प्रोस्टेट कॅन्सरनं गेला. तेव्हा मात्र मार्लीनं ‘‘विल्यमनं मला इतकं काही दिलंय की तेच आयुष्यभर पुरतंय,” असं म्हटलं. मार्ली मॅटलीनची विनोदबुद्धी मस्तच आहे. ती संवादक शेजारी बसवून बोलते. तिच्या ओठांच्या हालचालींबरहुकूम जॅक जेसन नावाचा संवादक भराभरा शब्द उच्चारतो, आणि तिचं बोलणं आपल्याला कळतं. हे सगळं इतक्या वेगात होतं की लोकांना वाटतं खरंच हिला ऐकू येतं की काय?

‘‘त्याचं काय आहे की दर बुधवारी मला ऐकू येतं!’’ असं ती त्यावर गमतीनं म्हणते. तो दिवस शुक्रवारचा असेल तर ‘शुक्रवारी ऐकू येतं’ असं सांगते! मार्ली सध्या खुशीत आहे. ‘कोडा’मुळे आपण सुरू केलेला एक सिलसिला ‘अंजाम तक’ पोचल्याची तिची भावना आहे. खरंच, मोठा देव, छोटा देव असतो का? नसावा. थोडा भाव, थोडा अभाव असंच तर आपल्या सगळ्यांचं प्राक्तन असतं. ध्वनीला जशी कंपनं असतात, तशीच मौनालाही असतात. मौनाचेही अनेक अन्वयार्थ असतात. देवाचा आवाज तरी कोणी ऐकला आहे? त्याच्या पावलांनाही आवाज नाही, आणि काठीलाही...

संबंधित बातम्या