एक होता चॅप्लिन...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 18 एप्रिल 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

कुठली नवी व्यक्तिरेखा साकारावी, ह्याचा चार्ली विचार करत असताना त्याला वाढत्या अंगाची बेंगरुळ विजार सापडली. कोनाकोपऱ्यात उसवलेला एक कोट मिळाला. आकाराने द्रोण झालेले जुनाट बूट मिळाले. एक काठी मिळाली. चेपलेली हॅट मिळाली... जणू ह्या चीजा येऊन चार्लीला चिकटल्याच. आपोआप... ओठांवर एक माशीकट मिशी आली, आणि आरशालाही खुदकन हसू फुटलं.

साधारणतः १९३१च्या सुमारास महात्मा गांधी लंडनला गेले होते. तिथल्या लोकांना त्यांना भेटायची खूप इच्छा असायची. मोठमोठे विचारवंत त्यांना भेटण्यासाठी धडपडायचे. चार शब्द बोलण्यासाठी आतुर असायचे. गांधीजींना त्याचं सोयरसुतक नसायचं. पूर्व लंडनमधल्या एका घरात ते उतरले होते. त्यांना सांगण्यात आलं की चार्ली चॅप्लिन तुम्हाला भेटायचं म्हणतोय. त्यांनी विचारलं, “कोण चार्ली चॅप्लिन?”  नंतर १९४०साली चॅप्लिननं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हा बोलपट केला, तेव्हा त्यातल्या क्लायमॅक्सच्या नितांतसुंदर भाषणात चक्क गांधीजीच डोकावतात. 

विख्यात सिनेदिग्दर्शक सर रिचर्ड अॅटेनबरो ह्यांनी ‘गांधी’ चित्रपट १९८२ साली पडद्यावर आणला. त्यानं जगाची वाहवा मिळवली. त्यांची फार पूर्वीपासून इच्छा होती की चार्ली चॅप्लिनचा चरित्रपटही करायला हवा. पण योग जुळून येत नव्हता. अखेर दशकभरानं म्हणजे १९९२ साली तो योग आला. चित्रपटाचं नाव होतं- ‘चॅप्लिन’. बस, फक्त ‘चॅप्लिन’. ‘गांधी’ सारखाच एकशब्दी. पण त्यातही केवढा मोठा अवकाश सामावलेला आहे.

सर अॅटेनबरोंचा ‘चॅप्लिन’ १९९२ साली आला. त्याला ऑस्कर पुरस्काराची नामांकनं मिळाली, पण पुरस्कार नाही मिळाले.

१६ एप्रिल हा चॅप्लिनचा वाढदिवस.   
* * *

स्वित्झर्लंडमधल्या शानदार हवेलीत राहणाऱ्या वृध्द चार्ली चॅप्लिनला हल्ली राहून राहून वाटत होतं की आपण आत्मचरित्र लिहायला हवं. संध्याकाळचे रंग दिसू लागले की कलावंताला आपल्याच प्रवासाचं कुतूहल वाटायला लागतं. चार्लीनं जॉर्ज हेडन नावाचा एक लेखक-संपादक निवडला. जॉर्जसुद्धा साठी उलटलेलाच. जॉर्ज अचूक प्रश्न विचारायचा. त्याचं उत्तर शोधताना चार्लीच्या मनात आपोआप जुन्या आठवणींचं रिळ उलगडत जायचं... असं चरित्र सिद्ध होत होतं.

“तुझ्या आईसंदर्भात फार त्रोटक लिहिलंयस तू... थोडक्यात विचारतो, तुझ्या आईचं वेड हाताबाहेर नेमकं कधी गेलं?,” जॉर्जनं एकदा विचारलं.

“अवघड आहे तसं सांगणं... खरं तर ती चांगली होती. कधीतरीच तिचं बिनसायचं...,” वृद्ध चार्ली सांगू लागला. त्याच्या डोळयासमोर तो क्षण उभा राहिला. आल्डेरशॉट गावातला. साल होतं १८९४. 

युद्धसैनिकांसाठीच्या एका कार्यक्रमात ती स्टेजवर गाण्याची ओळ विसरून वेंधळयासारखं बघत बसली. सैनिकांनी तिची हुर्यो उडवली. अंडी, बूट, चपलांचा मारा झाला. विंगेत उभ्या असलेल्या पाच वर्षाच्या चार्लीनं तेच गाणं अस्सं काही पेश केलं की त्याच सैनिकांनी त्या चिमुरड्यावर नाणी फेकली, नाणी! 

तिथून सुरू झाला हा सिलसिला.

...एका खोलीत सिड आणि चार्लीला घेऊन राहणाऱ्या हॅना चॅप्लिनला चूल पेटती ठेवणं अवघड होऊन बसलेलं. त्यात खोलीचं भाडं थकलेलं. मालकिणीनं अखेर डाव साधला. दारात पोलिस आले. सामान रस्त्यावर आलं, आणि हॅना इस्पितळात. मुलं मजूरगृहाच्या आश्रयाला गेली.

...वाट्टेल ती कामं करतानाच चार्लीचे गुण दिसू लागले होते. त्याला कॉमेडीचं अंग चांगलं आहे, हे मोठा भाऊ, सिडनीच्या लक्षात आलं होतं. दोघंही ‘टेन लँकेशर बॉइज’ नावाच्या गटात सामील झाले. चार्ली सुंदर नृत्य करायचा. कुठंही शिकला नव्हता तरीही. धाकट्या भावासाठी सिडनीची धडपड सुरू झाली होती.अशी काही वर्ष गेली. मग पुढे काय?

“पुढे काही नाही...एकदा एका कार्यक्रमात दारुड्याचा अंक केला. त्याचं असं झालं की सूत्रधार स्टेजवर आला. म्हणाला, ‘‘लेडीज अॅण्ड जंटलमन, आता पुढच्या आयटेमसाठी श्वास रोखून तयार रहा. एक आश्चर्य तुमच्यासमोर साकार होणार आहे..,” चार्ली सांगत होता.

...कार्यक्रमाची घोषणा होत असतानाच प्रेक्षागाराच्या उजवीकडल्या बॉक्समध्ये एक अंमलदार आला. डोक्यावर हॅट. झकपक सूट. बुटबैंगण. पण गडी कंप्लीट टुन्न होता. त्याला भिंतीवरची हॅट अडकवायची खुंटी सापडेना. सिगार पेटवण्यासाठी काड्यापेटी गावेना. खुर्चीत नेम धरून बसणंही त्याला कर्मकठीण झालं होतं. दणादणा उलथापालथा पडणाऱ्या त्या अंमलदारानं जेवढ्या टाळ्या काढल्या, तेवढ्या कुणालाही आजवर मिळाल्या नव्हत्या. ‘कसली कसली माणसं हल्ली नाटकाबिटकाला येतात’, असले शेरेही प्रेक्षकांमधून ऐकू येत होतेच. कार्यक्रमाचा सूत्रधार हतबल झालेला. त्यानं त्या अंमलदाराला आवरायचा प्रयत्न केला, पण कसलं काय... प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं. कार्यक्रमाला उशीर होतोय, हेसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आलं नाही. सगळे लोटपोट हसत होते. अर्धा कलाक हा बेंगरुळ प्रकार चालू राहिला. तेवढ्यात सूत्रधारानं जाहीर केलं, ‘‘लेडीज अॅण्ड जंटलमन, प्लीज मीट मि.. चार्ली चॅप्लिन!...’’ क्षणात दारुड्या अंमलदारानं सोंग टाकून अदबीनं टाचा जुळवत मानवंदना स्वीकारली.

ओह!! हाच आयटेम होता तर... प्रेक्षक चक्क उठून उभे राहिले.

* * * 

आपलीही एखादी नाटक कंपनी असायला हरकत नाही, असं चार्लीला वाटायला लागलं होतं. त्याच सुमारास एका उपहारगृहात त्याला एडना पर्वियन्स भेटली. तिनं त्याला ओळखही धड दाखवली नाही. चार्ली किंचित दुखावला.

अमेरिकेत मॅक सेनेट नावाचा एक कॉमेडियन धमाल करत होता. तो मूकपट करायचा. त्याला ‘किंग ऑफ कॉमेडी’ म्हटलं जायचं. त्यानं चार्लीचा तो दारुड्याचा आयटेम पूर्वी बघितला होता. त्यानं तार करून चार्लीला बोलावून घेतलं. चार्ली अमेरिकेला नशीब काढायला निघाला. बरीच उठाठेव केल्यानंतर त्याची एकदाची सेनेटशी भेट झाली. तो कसलं तरी मूकपटाचं शूटिंग करत होता. चार्ली तिथं पोचला.

‘तूच तो? अशक्य!’ सेनेट किंचाळला. त्यानं बघितला तो दारुड्या बराच पिकलेला होता. हा तर लेकाचा कोवळा तरुण आहे. देखणाही आहे. उत्तरादाखल चार्लीनं तिथल्या तिथं धुळीत दोनचारदा पडून दाखवलं. आयटेमच करून दाखवला. काम मिळालं.

एक दिवस चित्रीकरणासाठी तयार होण्यासाठी चार्ली मेकअप रुममध्ये गेला. आसपास अस्ताव्यस्त सामान, पोशाख पडलेले. तेव्हा घडलं ते गारूड.

कुठली नवी व्यक्तिरेखा साकारावी, ह्याचा चार्ली विचार करत असताना त्याला वाढत्या अंगाची बेंगरुळ विजार सापडली. कोनाकोपऱ्यात उसवलेला एक कोट मिळाला. आकाराने द्रोण झालेले जुनाट बूट मिळाले. एक काठी मिळाली. चेपलेली हॅट मिळाली...जणू ह्या चीजा येऊन चार्लीला चिकटल्याच. आपोआप...ओठांवर एक माशीकट मिशी आली, आणि आरशालाही खुदकन हसू फुटलं. 

आरशात दुसराच कुणीतरी दिसतो आहे. फेंगडं चालणारा एक बेंगरुळ इसम. चेहऱ्यावर अवकळा. पण नजरेत निरागस कुतूहल.चालीत थोडा खट्याळपणाही. दारिद्र्य ही अगदीच टाकाऊ गोष्ट नाही. अभावालाही भाव असतो राजा! हा गडी अगदी एकटा आहे... एकटा. भणंग. ट्रॅम्प.

...इथून पुढे जे काही घडलं त्याला कलेच्या क्षेत्रातच नव्हे, तर मानवी इतिहासातही खूप मोठं स्थान द्यावं लागेल.

* * *

बघता बघता चार्ली नावाचं एक हसतं खिदळतं वादळ अमेरिकेत घोंघावायला लागलं. चार्ली कमालीचा प्रतिभावान तर होताच. पण त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंही होतं. केवळ मनोरंजन म्हणून तो चित्रपट बनवत नसे. 

चार्ली डाव्या हातानं व्हायोलिन वाजवत असे. त्याला संगीत उत्तम कळायचं. अनेक वाद्यं अवगत होती त्याला. ऑपेरासारखं नृत्य बहारदाररीत्या पेश करत असे. पदलालित्य तर असामान्य होतं. कथाकथनाची शैली खुमासदार होती. तो स्वतः चांगला लेखकही होता. हे सगळं तो कुठेही शिकला नव्हता. किंबहुना तो काही शिकलाच नव्हता....

चार्लीचं एक साम्राज्य निर्माण झालं. अबालवृद्धांचा हा लाडका 

ट्रॅम्प देशांच्या सरहद्दी लीलया ओलांडून गेला. पैसा पायाशी 

लोळण घेऊ लागला. मधल्या काळात त्याची तीन लग्नं झाली. मुलं झाली. एक तर त्याचं नसलेलं मूल त्याला वाढवावं लागलं. त्याच्या एका होऊ पाहणाऱ्या बायकोनं कमी वयात पोर जन्माला घातलं 

होतं. ते माझं नाहीच हे चार्ली छाती ठोकून सांगत होता. 

पालकत्वाच्या वैद्यकीय चाचणीतही ते सिद्ध झालं. पण कोर्टानं मानलं नाही. त्याला आठवड्याला भरभक्कम रक्कम त्या संतानासाठी द्यावी लागत असे. अमेरिकेच्या एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन)चा संस्थापक आणि संचालक जे. एडगर हूव्हरशी त्यानं विनाकारण पंगा घेतला, आणि एक जबरदस्त लष्टक त्याच्या मागे लागलं. तो कम्युनिस्ट आहे, अशी भूमका उठवली गेली. हूव्हरनं त्याला सळो की पळो करून सोडलं.  त्याचा अमेरिकी व्हिसाच रद्द ठरवण्यात आला. 

एका श्रीमंत भणंगाला घर उरलं नाही. चार्लीच्या लक्षात आलं की आपण इंग्लंडचेही नाही. अमेरिकेचेही नाही. आपला असा कुठलाच देश नाही. त्यानं स्वित्झर्लंडमधली एक हवेली विकत घेतली. तिथं तो चौथ्या पत्नीसमवेत राहू लागला. विख्यात लेखक युजिन ओनिल ह्यांची कन्या ऊना ओनिल हिनं उतारवयातल्या चार्लीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती अवघी १८ वर्षांची होती.

* * *

त्यानंतर खूप वर्षांनी १९७२ साली त्याला विशेष सन्माननीय ऑस्कर देण्याचं ठरलं. एव्हाना त्याच्यावर खूप अन्याय झालाय, 

हे अमेरिकनांना कळलं होतं. ते ऑस्कर घेण्यासाठी चार्ली 

चाकाच्या खुर्चीतून आला. पुरस्कार देण्याआधी प्रेक्षागृहातले दिवे घालवण्यात आले. अंधार झाला. चार्लीला एका खास सज्जात बसवण्यात आलं.

पडद्यावर भणंगाची व्यक्तिरेखा दिसली. प्रेक्षकांचं भान हरपलं. त्याच्या चित्रपटांमधली क्षणचित्रे उलगडत राहिली. 

तो पहा, 'सिटीलाइट्स'मधला तो पहिलाच सीन. अनावरणाच्या क्षणी पुतळ्याच्या कुशीत झोपला तो भणंग.  त्या आंधळ्या फुलराणीत त्याचा जीव किती अडकलाय. 

‘द कीड’ मधल्या त्या खोडकर, निरागस पोरासाठी जीव पाखडणारा तो अनिकेत. 

‘द गोल्ड रश’ मधला बुटाची लेस नूडलसारखी चवीनं खाणारा तो निराश्रित भुकेला. साता जन्माची भूक त्याच्या डोळ्यात साकळलेली आहे. 

‘अ डॉग्ज लाइफ’ मधल्या त्या ट्रॅम्पचं नशीब अधिक सडकछाप की त्याच्या निष्कपट ऊबेसाठी जवळ आलेलं ते कुत्र्याचं पिल्लू.

‘मॉडर्न टाइम्स’ मधला तो अवाढव्य चक्रांमधून सफाईनं फिरणारा कामगार. यांत्रिकतेच्या अतिरेकानं डोकं फिरलेल्या समाजाला तो कुठला संदेश देतोय. 

असे कितीतरी लाजबाब सीन. खळखळून हसवणारे. काळजाला हात घालणारे. क्षणात फुलबाजीसारखे अग्निफुलं उधळणारे. घशात मोठाला आवंढा आणणारे. हा माणूस खरंच माणूस होता की कुणी देवदूत ? एकाच माणसाच्या पदरात देवानं प्रतिभेचं इतकं दान कसं काय टाकलं असावं?

...सरतेशेवटी 'द ग्रेट डिक्टेटर’मधलं ते हिटलरच्या 

पोशाखात सामान्य केशकर्तनकारानं केलेलं कळकळीचं मानवतावादी आवाहन. 

...अचानक एक स्पॉटलाईट झपकन एका सज्जाकडे गेला. टक्कल पडलेला वृद्ध चार्ली तिथं हसतमुखानं हात हलवत अभिवादन स्वीकारत होता. समोरच्या पडद्याकडे बोट दाखवून खुणेनं सांगत होता, बाबांनो, मी तिथं आहे, इथं नाही... इथं नाही.

* * *

पु.ल. देशपांडे ह्यांनी ‘जावे त्यांच्या देशा’ ह्या प्रवासवर्णनात व्हेनिस महोत्सवात अचानक झालेल्या चॅप्लिन दर्शनाचं केवळ अद्‌्भुत असं वर्णन केलं आहे. सर अॅटेनबरोंच्या चित्रपटातलं हे शेवटचं दृश्य पाहतानाही असाच अंगावर काटा येतो. कारण थेट पुलंचीच आठवण सरसरून येते. ह्या दृश्याशी चित्रपट संपतो तेव्हा खुर्चीत बसून राहाणं अशक्य होतं. 

सर अॅटेनबरोंनी ठरवून रॉबर्ट डाऊनी ज्युनियरची निवड केली होती, निर्मात्यांनी नाकं मुरडली, तरीही ते बधले नाहीत. रॉबर्ट डाऊनीनंही प्रचंड मेहनत घेतली. चॅप्लिनचा तो प्रसिद्ध मळका कोटही घालून पाहिला. त्याच्या खिशात त्याला जुनं सिगारचं थोटुक मिळालं. ते त्यानं आजही घरी काचकपाटात बंद करून जपून ठेवलं आहे म्हणे. 

हा चरित्रपट स्वादतृप्ती करतो, पण कलात्मक भूक भागवणारा नाही. चॅप्लिनभक्तांनाच चिक्कार आवडेल, अशी त्याची सरधोपट मांडणी आहे. लेखक-संपादक जॉर्ज हेडनच्या भूमिकेसाठी अँथनी हॉपकिन्ससारखा अफलातून नट अॅटेनबरोंनी खर्ची घातला आहे. 

* * *

स्वित्झर्लंडमधल्या कॉख्सिए स्यू वेवे ह्या अति निसर्गरम्य गावात एक शानदार बंगला आहे. लेक जेनेवापासून थोड्याच अंतरावर आहे. पुढे निळाशार तलाव, मागे द्राक्षमळ्यांनी लगडलेले आल्प्सच्या डोंगरांचे उतार. त्या शानदार बंगल्याचं नाव ‘मॅनॉर द बान’. पस्तीस एकरात पसरलेल्या बंगल्याच्या आवारात प्रशस्त हिरवळी, आणि सावली देणारे मोठमोठाले वृक्ष आहेत. इथंच २५ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली चॅप्लिननं वयाच्या ८८व्या शेवटचा श्वास घेतला. माणूस भणंग होता. अनिकेत होता, तरीही त्याच्या फाटक्या खिशात त्रिखंडाला पुरून उरेल इतकी माया होती.

संबंधित बातम्या