डोंगर म्हातारा झाला...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 30 मे 2022

किमान तीन पिढ्यांचा समकालीन अभिनेता म्हणून मॉर्गन फ्रीमन यांचं नाव घ्यावंच लागेल. मॉर्गन फ्रीमन हे एका हाडामांसाच्या व्यक्तीचं नाव आहेच, त्याहीपेक्षा ते एका विशिष्ट, गूढसुंदर आवाजाचंही नाव आहे. मॉर्गन फ्रीमनचा आवाज कानात गुंजत राहातो. ते काही गायक नव्हेत, पण त्यांचं साधं बोलणंही गाभाऱ्यात म्हटल्या जाणाऱ्या ऋचांसारखं मंत्रभारित वाटतं. हॉलिवूडमधली हा एक चिरंतन डोंगर आहे, मॉर्गन फ्रीमन नावाचा. येत्या एक जूनला तो वयाची ८४ वर्ष पूर्ण करेल. हा डोंगर आता थोडा थकलाय. पण रिटायर मात्र झालेला नाही. 

तुम्हाला मळकर्णीचा डोंगर माहीत आहे का? नसेल. कोणे एके काळी मेहेरबान इंग्रज साहेबानं मळकर्णीच्या डोंगराच्या टकुऱ्यावर बारमाही भरलेलं तळं आहे आणि तिथं उन्हाळ्यातही गारीगार असतं, असा शोध लावला. मळकर्णीचं महत्त्व मग वाढू लागलं. नगरशेठांनी त्याच्या माथ्यावर बंगले उठवले. त्याच वस्तीत राहायचा कमराद म्हातारा. पाठीत वाकलेला आणि आपली रुसी पँट सावरत टुणूक टुणूक चालणारा. पोरं त्याला माकडासारखी हसत. आता माणसानं माकडाला हसलं पाहिजे, माकडानं माणसाला हसून कसं चालेल? पण कमराद म्हाताऱ्याला त्याचं काही वाटत नसे. तो त्याच्या पद्धतीने जगत राहिला. डोक्यातला, मनातला स्टॅलिन जपत राहिला. कमराद म्हातारा, म्हाताराच होता. त्याला बघत बघत शेजारचा मळकर्णीचा डोंगरही म्हातारा होत गेला...

मळकर्णीचा डोंगर भूगोलाच्या कुठल्याच नकाशात नाही. त्यावर गिर्यारोहण शक्य नाही, नि जमीन वगैरे विकत घेणं इम्पॉसिबलच. कारण मळकर्णीचा डोंगर अस्तित्त्वातच नाही. तो आहे, दिवंगत मराठी लेखक अनिल बर्वे यांच्या कादंबरीतला- काल्पनिक. हॉलिवूडचा म्हातारा झालेला डोंगर मात्र खराखुरा आहे आणि अजूनही दोन पायांवर उभा आहे. खळखळून हसतो आहे. देवादिकांनाच त्यांच्या अस्तित्त्वाचे प्रश्न विचारतो आहे. या डोंगराचं नाव मॉर्गन फ्रीमन. 

चेहऱ्यावर, गालांवर वार्धक्याच्या खाणाखुणा भरपूर दिसू लागलेल्या. डोईवरच्या केसांची बरीच पीछेहाट झालेली. उंचपुरा, सडपातळ शरीरयष्टीचा कृष्णवर्णीय मॉर्गन फ्रीमन गेली पन्नास वर्षं हॉलिवूडमध्ये पाय रोवून आहे. हॉलिवूडचा केवढा तरी प्रवास त्यांनी बघितला आहे. चित्रपट कलावंताला जे जे मानसन्मान मिळायला हवेत, ते ते सारे त्यांना कधीच मिळून गेले आहेत, अगदी ‘ऑस्कर’च्या बाहुलीसकट. त्यांच्या अभिनयाचे गोडवे तेव्हाही गाइले जात होते, आणि आजही त्यांचं नाव घेतलं की अनेक जण कानाची पाळी पकडतात. जुनं ते सोनं. सरधोपट कहाणी सांगणाऱ्या सत्तरीच्या दशकातल्या चित्रपटांपासून हल्लीच्या साय-फाय विज्ञानपटांपर्यंत सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये मॉर्गन फ्रीमनचा चेहरा होता आणि अजूनही आहे. एडवर्ड झुइकसारख्या दिग्दर्शकापासून तरुण  ख्रिस्तोफर नोलानपर्यंत सगळ्यांबरोबर त्यानं कामं केली. किमान तीन पिढ्यांचा समकालीन अभिनेता म्हणून मॉर्गन फ्रीमन यांचं नाव घ्यावंच लागेल.

मॉर्गन फ्रीमन हे एका हाडामांसाच्या व्यक्तीचं नाव आहेच, त्याहीपेक्षा ते एका विशिष्ट, गूढसुंदर आवाजाचंही नाव आहे. मॉर्गन फ्रीमनचा आवाज कानात गुंजत राहातो. ते काही गायक नव्हेत, पण त्यांचं साधं बोलणंही गाभाऱ्यात म्हटल्या जाणाऱ्या ऋचांसारखं मंत्रभारित वाटतं. हॉलिवूडमधली ही एक चिरंतन डोंगर आहे मॉर्गन फ्रीमन नावाचा. येत्या एक जूनला तो वयाची ८४ वर्ष पूर्ण करेल. हा डोंगर आता थोडा थकलाय. पण रिटायर मात्र झालेला नाही. 

***

मिसिसिपीमध्ये तशा सुखवस्तू घरात जन्मलेल्या मॉर्गन फ्रीमन नावाच्या कृष्णवर्णीय बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते. वयाच्या आठव्या वर्षीच शाळेच्या वार्षिक मेळ्यात त्यानं तोंडाला रंग लावून नाटुकल्यात झक्क काम केलं होतं. अर्थात शिक्षणाचं गाडंही पुढे चालू राहिलं. थोडं वय वाढल्यानंतर त्याला अभिनयशाळेची शिष्यवृत्तीही मिळणार होती. पण त्याऐवजी तो सरळ अमेरिकेच्या सैन्यात रडार दुरुस्तीविभागात भरती झाला. ‘देश हा देव असे माझा’ हीच राष्ट्रवृत्ती त्याच्या अंगी बाणली होती. सैन्यातला शेर संपल्यावर त्यानं मिसिसिपीमध्येच थोडीफार नाटकांची खटपट सुरू केली. नाटक हा त्याचा प्राण होता. शेक्सपीअरची नाटकं करायला मिळणं, हा कुठल्याही नटाच्या कारकिर्दीतला भाग्याचा क्षण मानणारी ती नटांची पिढी होती. शेक्सपीअरचं हे गारुड अजूनही तसंच आहे म्हणा. पण तेव्हा मॉर्गन फ्रीमन शेक्सपीअरची स्वगतं तोंडपाठ आणि साभिनय म्हणून दाखवत उपस्थितांची दाद मिळवत असत. त्या काळात त्यांनी अभिनयाच्या कार्यशाळाही घेतल्या. १९७०मध्ये त्यांना टीव्ही मालिकेत काम मिळालं. त्या मालिकेतून ओळख मिळाली, आणि पैसेही मिळाले. पण हा काळ माझ्या आयुष्यातला अतिशय खडतर आणि काळा होता, असं मॉर्गन फ्रीमन म्हणतात. ‘ड्रायव्हिंग मिस डेझी’मधली त्यांची भूमिका मात्र चांगलीच गाजली. पुढल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शेकडो चित्रपट-मालिका, नाटकं केली. ‘कोरिओलेनस’ ही शेक्सपीअरचीच एक गाजलेली शोकांतिका आहे. त्यातल्या प्रमुख भूमिकेसाठी त्यांना बहुमानाचं ‘ओबी अवॉर्ड’ मिळालं होतं. त्यांनी उभा केलेला ज्युलिअस सीझरही रसिकांच्या लक्षात राहिला आहे.

पण या संपूर्ण वावरण्यात दरवेळी लक्ष वेधत राहिला तो त्यांचा दैवी आवाज.

मॉर्गन फ्रीमनचा आवाज हा देवाशी कायमचा जोडला गेला. त्याला कारणीभूत ठरला २००३मध्ये आलेला ‘ब्रूस ऑलमायटी’ हा चित्रपट. खरंतर हा सिनेमा पूर्णत: जिम कॅरीच्या आचरट आविर्भावांनी भरलेला होता. जिम कॅरी हे एक हॉलिवूडमधलं स्वतंत्र प्रकर्ण आहे. माझ्याच वाट्याला या कटकटी का? असा वारंवार देवाला जाब विचारणाऱ्या ब्रूसला अखेरीस देव कंटाळतो, आणि विश्वाचा पसारा सांभाळण्याची जबाबदारी तो ब्रूसलाच देऊन टाकतो. एका रात्रीत ब्रूसकडे अफाट दैवी शक्ती येते, आणि तेवढीच जबाबदारीही येऊन पडते. देवाच्या कॉम्प्युटरमध्ये ईमेलचा भयानक वेगानं पाऊस पडत असतो, आणि त्या प्रत्येक मेलला तितक्याच वेगानं ‘अक्नॉलेजमेंट’ देण्याची पाळी ब्रूसवर येते. ‘एवढ्या प्रार्थनांची फळं द्यायची म्हंजे वेळ लागणारच ना?’ हे शेवटी ब्रूसला मान्य करावं लागतं. 

या चित्रपटात मॉर्गन फ्रीमन देवाच्या भूमिकेत आहे. पांढराशुभ्र सूट, शुभ्र कार्यालय, सगळं काही शुभ्र... पण देव मात्र काळा! आपला पांडुरंग तरी कुठं गोरा आहे? त्या निळ्यासावळ्याचं ते दर्शन मॉर्गन फ्रीमननं असं काही घडवलं की नंतर त्याला प्रवचनांच्यावेळी चर्चमधून बोलावणी येऊ लागली. लोक आदरानं लवू लागले. त्याच्या आवाजात गॉस्पेल रेकॉर्ड करून घेण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली. या काळात कित्येक धार्मिक आणि ऐतिहासिक लघुपटांना त्यानं आपला दैवी आवाज देऊ केला. 

तसा त्याचा आवाज पहिल्यापासूनच लोकांना आवडला होता. पण तो देवाच्या जवळ जाणारा आहे, हा साक्षात्कार ‘ब्रूस ऑलमायटी‘ नंतरच घडला. पुढे कुणीतरी ‌स्टीव कॅरलसोबत ‘इवान ऑलमायटी’ हा सिनेमाही केला होता. त्यातही देव मॉर्गन फ्रीमनच होता. 

‘शॉशँक रिडम्प्शन’ या सदाबहार चित्रपटातलं अखेरचं काव्यमय स्वगत मॉर्गन फ्रीमनच्या आवाजात ऐकणं हा एक असामान्य अनुभव आहे, आणि रसिकांनी तो मिळवावाच असा आहे. ‘शॉशँक रिडम्प्शन’ हा गेल्या शतकातला सर्वाधिक गाजलेल्या पहिल्या दहा चित्रपटांपैकी एक. एका कैद्याचं पलायन हे त्याचं कथासूत्र. त्या कथेतला एक जन्मठेपेचा कैदी मॉर्गननं अतिशय प्रभावीपणे साकारला. स्टिफन किंग यांच्या ‘रिटा हेवर्थ अँड शॉशँक रिडम्प्शन’ या कादंबरिकेवर आधारित असलेला हा सिनेमा होता. फ्रँक डाराबाँट या संवेदनशील दिग्दर्शकानं पडद्यावर मांडलेली ही कहाणी शतकातली सर्वात सुंदर गोष्ट ठरली. अर्थात ही गोष्ट १९९४ सालची. त्याच्याआधी पंचवीसेक वर्ष मॉर्गन फ्रीमनचा चेहरा रसिकांना ठाऊक झाला होता. अगदी १९७०च्या ‘ड्रायविंग मिस डेझी’पासून! मॉर्गन फ्रीमननं प्रमुख भूमिका बऱ्याच साकारल्या, पण त्याची ओळख ठरली ती साहाय्यक भूमिकांद्वारे. 

‘इनविक्टस’ या चित्रपटात मॉर्गन फ्रीमन यांना त्यांच्यामते ‘जगातली सर्वात चांगली’ प्रमुख भूमिका करायला मिळाली. हा नेल्सन मंडेला यांचा चरित्रपट होता. चरित्रपट असं म्हणता येणार नाही. पण वर्णविद्वेषाचा शाप असलेल्या दक्षिण आफ्रिकेत स्वतःच्या देशाचा रग्बी संघ जिंकावा, यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या एका राष्ट्राध्यक्षाची ही गोष्ट होती. वर्णविद्वेषानंतरची पहाट द. आफ्रिकेत उगवली होती, आणि २७ वर्षं तुरुंगवास भोगून आलेले मंडेला पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. रग्बी विश्वकरंडकाचं यजमानपद त्यांनी वर्णविद्वेषाला पूर्णविराम देण्यासाठी कसं वापरलं, त्याची ही हृद्य कथा आहे. फ्रीमननी रंगवलेली मंडेलांची व्यक्तिरेखा ग्रेटच होती. त्यात नवल नव्हतं. कारण वर्णविद्वेष हा मॉर्गन फ्रीमन यांच्या विचारी मनाला छळणारा फार जुना विषय होता. स्टिव्हन स्पीलबर्गच्या ‘अमिस्टाड’मध्येही त्यांनी समजून उमजून एका कृष्णवर्णीय वकिलाची भूमिका साकारली होती. गुलामी नष्ट करण्याचा कायदा ज्या काळात झाला, तेव्हाचं हे कथानक होतं. इतकंच नव्हे तर, त्याच्या खूप वर्षं आधी ‘बोफा!’ हे नाटकही दिग्दर्शित केलं होतं. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा वर्णविद्वेषाचा कहर चालू होता, आणि साऱ्या जगाने द. आफ्रिकेला बहिष्कृत केलं होतं, त्या काळात घडलेली एक पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट या नाटकात मांडण्यात आली होती. हा पोलिस अधिकारी कृष्णवर्णीय असतो! 

मॉर्गन फ्रीमन यांनी साहाय्यक भूमिकांचं सोनं केलं. संथ चालीचे समांतरपट, चरित्रपट, ऐतिहासिकपट, थरारपट, भयपट, गुप्तहेरकथा, विज्ञान काल्पनिका, परिकथा.. अशा कितीतरी रूपबंधांमध्ये त्यांनी कामं केली. कश्शालाही नाकं मुरडली नाहीत. आपल्या वाट्याला आलेली भूमिका मात्र चोखपणे बजावली. ज्या ऊर्मीनं स्पीलबर्गच्या ‘अमिस्टाड’मध्ये ते पडद्यावर वावरले, त्याच तडफेनं त्यांनी नोलानच्या ‘डार्क नाइट’ धारेतही रोल केले. 

तरुणपणीचे मॉर्गन फ्रीमन बऱ्याच जणांना आठवणार नाहीत. आठवण्याजोगेही नाहीत. या गृहस्थाचे केस जसे पिकत गेले, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या, तस तसा हा माणूस बहरत गेला -डोंगरासारखाच! पाऊणशे वयमान उलटल्यानंतर किंवा त्याच्या आसपास त्यांनी ‘द बकेट लिस्ट’ हा चित्रपट केला. जॅक निकल्सनसारखा तगडा अभिनेता जोडीला. कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं ग्रासलेल्या आणि अंतसमय जवळ आलेल्या दोघांच्या अंतिम इच्छांची यादी म्हणजे ही बकेट लिस्ट होती. ‘किकिंग द बकेट’ असा एक इंग्रजीत वाक्प्रचार आहे. अंतसमयी मरणशय्येजवळ शुश्रुषेची एक बादली ठेवलेली असते. ‘तो’ क्षण आला की अंथरुणावरची व्यक्ती पाय झाडते. त्यानं ती बादली कलंडते. प्राणपक्षी उडाल्याची ती खूण मध्ययुगात मानली जायची. त्या बादलीत जाणाऱ्याच्या साऱ्या उरलेल्या इच्छा-वासना भरलेल्या असतात, अशीही समजूत होती. ती ही बकेट लिस्ट. पण चित्रपटातले हे दोघे भिडू आपापल्या इच्छा मरण्यापूर्वीच पूर्ण करून टाकतात. या चित्रपटात मॉर्गन फ्रीमनचा अभिनय बेजोड झाला आहे. अगदी जॅक निकल्सनपेक्षा कांकणभर सरसच. ‘गोइंग इन स्टाइल’ हा आणखी एक त्यांचा उतारवयातला चित्रपट. पेन्शन थांबल्यामुळे कडकीत आलेले तीन म्हातारे चक्क बँक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी आहे.

सिनेमा-नाटकात स्थिरावलेल्या मॉर्गन फ्रीमन यांनी भरपूर नावलौकिक कमावला. पैसाही चिक्कार मिळवला. आज या मॉर्गनआजोबांच्या मालकीची तीन जेट विमानं आहेत, आणि मिसिसिपीत दोनेक मोठी हॉटेलंही आहेत. मधल्या काळात त्यांनी ‘स्टोरी ऑफ गॉड विथ मॉर्गन फ्रीमन’ ही टीव्ही मालिका बीबीसीसोबत केली. त्या निमित्ताने जगभरातल्या जागृत देवस्थानांना भेटी देत, दृष्टांतांच्या कथा-कहाण्या आणि पुरावे शोधत ते जगभर हिंडले. ठिकठिकाणच्या श्रद्धा -अंधश्रद्धा त्यांनी तर्काची चाळण लावून तपासल्या. जगात देव आहे की नाही, याचं नेमकं उत्तर त्यांना काही मिळालं नाही. ‘ही मालिका केल्यानंतरही माझ्या धर्म आणि ईश्वराबद्दलच्या कल्पना बदललेल्या नाहीत’ असं त्यांनी स्वच्छपणे सांगितलं. ‘तुमचा देवावर विश्वास आहे का हो?’ असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक आहे. ते म्हणाले, ‘‘मी याआधीही म्हणालोय... वी इन्व्हेंटेड द गॉड! माणसानंच तर देवाचा शोध लावलाय, मग त्यावर विश्वास का नाही ठेवायचा?’’

अनिल बर्व्यांच्या ‘डोंगर म्हातारा झाला’ या कादंबरिकेतला कमराद म्हाताराही असेच निरुत्तर करणारे प्रश्न विचारतो, आणि निष्प्रश्न करणारी उत्तरं देतो. मॉर्गन फ्रीमन स्वतःच हॉलिवूडच्या त्या प्रसिद्ध डोंगररांगेतलं एक शिखर झाले आहेत.

संबंधित बातम्या