फिरकीबहाद्दर!

प्रवीण टोकेकर
गुरुवार, 21 जुलै 2022

एक काळ असा होता की सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत मेल ब्रुक्सचे सिनेमे हमखास असायचे. त्याला उत्तम अभिनेत्याची बिरुदं मिळाली नाहीत, ऑस्कर, गोल्डन ग्लोबचे सन्मान व्यक्तिशः त्याच्या वाटेला आले नाहीत. तोही कधी त्या मार्गानं गेला नाही. 

‘‘बालपणी मी फार लाडका होतो. त्या वयातला बराचसा वेळ मी हवेतच काढला. म्हंजे असं की कोणी ना कोणी सारखं कडेवर घेऊन ‘भुर्रर्र’ करत हवेत उडवून परत झेलत असे. साधारणतः पाचव्या वर्षापर्यंत माझ्या तळपायाला जमीन काही लागली नाही... त्यामुळे होतं काय की अजूनही बऱ्याचदा मी हवेतच आहे, असं वाटत राहातं...’’ विख्यात विनोदी नट, दिग्दर्शक, निर्माते वगैरे वगैरे असलेल्या मेल ब्रुक्सनं हे त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. गेल्याच वर्षी प्रसिद्ध झालं. मेलविल कामिन्स्की ऊर्फ मेल ब्रुक्सनं वयाच्या फक्त ९५व्या वर्षी आपली कहाणी लिहून ठेवली. ‘ऑल अबाऊट मी’ हे त्याच्या आत्मचरित्राचं शीर्षक. अर्थात त्यात ‘ऑल अबाऊट’ वगैरे फारसं काही नाही. त्या निमित्तानं त्याला उतारवयातही काही विनोदाचे फटाके फोडता आले, एवढंच.

मेल ब्रुक येत्या २८ जूनला वयाची ९६ वर्ष पूर्ण करतो आहे. तरीही त्याला आदरानं ‘अहो-जाहो’ असं संबोधायला लेखणी धजत नाही. मेल ब्रुक्सला बारा वर्षाचं कार्टंही ‘अरे-तुरे’च करतं. चार्ली चॅप्लिनसारख्या विनोदाच्या बादशहाला तरी आपण कुठं आदरानं संबोधतो? चॅप्लिन हॉलिवुडी पडद्यावरचा विनोदाचा देव होता, देव. त्यानं सुरू केलेल्या या विनोदवारीची पताका पुढे मेल ब्रुक्ससारख्यांनी फडकती ठेवली. चार्ली चॅप्लिननं कधी कमरेखालचे विनोद केले नाहीत, पण बदलत्या काळात मेल ब्रुक्सनं मात्र फारशी भीडभाड न ठेवता बेधडक आचरट विनोद पेश केले. पण हमखास हशे फोडले.

त्याच्या आचरटपणाला सीमा नव्हती. मेल ब्रुक्स ऐन भरात होता, तेव्हा ‘पिंक पँथर’वाला पीटर सेलर्ससुध्दा जोरात होता. आणखीही बरेच जण होते. पण मेल ब्रुक्सचे सिनेमे कायम सुपरहिट होत. एक काळ असा होता की सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत मेल ब्रुक्सचे सिनेमे हमखास असायचे. त्याला उत्तम अभिनेत्याची बिरुदं मिळाली नाहीत, ऑस्कर, गोल्डन ग्लोबचे सन्मान व्यक्तिशः त्याच्या वाटेला आले नाहीत. तोही कधी त्या मार्गानं गेला नाही. 

त्याच मूळ नाव मेलविल कामिन्स्की. त्याचे वडील मॅक्स कामिन्स्की पोलिश ज्यू होते. आई केट ब्रूक्समन मोठी धडपडी आणि कामसू बाई होती. ती होती युक्रेनची. मेलला तीन मोठी भावंडं होती. पण मेल दोन वर्षाचा असताना वडील टीबीनं वारले. न्यूयॉर्कजवळ ब्रूकलिनमध्ये मेल राहायचा. तिथंच विल्यम्सबर्गमध्ये चाळीसारखी छोटी घरं होती, तिथं वाढला. त्याचे ज्यो नावाचे एक काका टॅक्सी  चालवत. ब्रॉडवे नाट्यगृहाच्या डोअरकीपरला रात्री घरी सोडण्याची ड्यूटी केल्याबद्दल त्याला कधीमधी नाटकाच्या खेळाला ‘घुसपास’ मिळे. तो छोट्या मेलला घेऊन जाई. तसला कुठला तरी खेळ बघून वयाच्या चौदाव्या वर्षी मेल आपल्या काकांना म्हणाला होता : ‘‘मी कपडे रंगवण्याचं काम नाही करणार. मला ‘हे’ करायचंय!’’ 

पुढे ऑर्केस्ट्रा, बारगृहे, बंदरावरचे गुत्ते अशा ठिकाणी कॉमेडीचे खेळ करत करत मेल वाढला.  वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यानं आडनाव बदलून ‘ब्रूक्स’ करून टाकलं. आईचं आडनाव ब्रूक्समन होतं म्हणून ब्रूक्स. आचरट माणूस चटकन लोकप्रिय होतो. तसंच घडलं. मेल ब्रुक्सला मित्रही ‘त्याचिया जातीचे’ मिळाले. त्यांना तो सामील झाला. त्यापैकी एक कार्ल रायनर. ही एक वल्लीच होती. नंतर एका कार्यक्रमाची आयडिया त्यांना सुचली. रायनर मेलला एक कॅरेक्टर द्यायचा. कुठलंही- तिबेटी साधू, अंतराळवीर वगैरे. उत्स्फूर्त भंकस प्रश्नोत्तरं व्हायची. पब्लिक खूष व्हायचं. त्यात एकदा ‘दोन हजार वर्षं वयाचा माणूस’ मेल ब्रुक्सनं साकारला.

‘‘काय करू? मी हजारो लग्नं केली. मला बेचाळीस हजार मुलं आहेत. पण कोणीही विचारायला येत नाही. कृतघ्न लेकाचे!’’ दोन हजार वर्षांचा माणूस ऊर्फ मेल सुरू व्हायचा. लोक लोटपोट लोळायचे.

हा कार्यक्रम न्यूयॉर्कच्या पार्ट्यांची शान ठरला होता. दुसरं महायुद्ध संपून पाचेक वर्षं जेमतेम झाली होती, तो हा काळ. या कार्यक्रमाच्या ब्रुक्स- रायनर जोडीनं रेकॉर्डी काढल्या. त्यादेखील मजबूत खपल्या. 

खासगी कार्यक्रम आणि टीव्ही शोजमुळे बऱ्यापैकी लोकप्रियता हासिल केल्यानंतर मेल ब्रुक्स-रायनर जोडीनं लॉस एंजलिस गाठलं. म्हणजे हॉलिवूड. तिथं त्यानं ‘द प्रोड्युसर्स’ हा पहिलावहिला चित्रपट केला. आजही मेल ब्रुक्सच्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘प्रोड्युसर्स’चं नाव आवर्जून घेतलं जातं. हिटलरवर धमाल म्युझिकल कॉमेडी शो तयार करण्याची कल्पना फार पूर्वीपासून मेल ब्रुक्सच्या डोक्यात घोळत होती. पण कुणीही निर्माता तयार होत नसे. त्यानं लिहिलं नाटकच. पण केला चित्रपट. पुढे आयुष्याच्या उतारवयात ‘द प्रोड्युसर्स’चं नाट्यरूप त्यानं ब्रॉडवेच्या थिएटरात आणलंच. तेव्हा मात्र इतिहास घडला. या नाटकाला मानाचे १२ टोनी पुरस्कार मिळाले.

सध्या जे पन्नाशीच्या आसपास असतील, त्यांना मेल ब्रुक्सचे दोन सिनेमे तरी नक्की आठवत असतील. एक, १९७६ साली आलेला ‘सायलेंट मूव्ही’ हा मूकचित्रपटाचा प्रकार नाही, चित्रपटाचं नावच ‘सायलेंट मूव्ही’ असं होतं. अर्थात तो नावाप्रमाणे ‘सायलेंट’ही होताच. या सिनेमानं सत्तरीच्या दशकातल्या तरुण पिढीला हसवून हसवून बेजार केलं होतं. आणखी एक धमाल चित्रपट १९८१-८२च्या सुमारास आला होता. ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड- पार्ट वन्.’ गुहेतल्या आदिमानवापासून स्पेनमधल्या उठावापर्यंतचा इतिहासाचं भयंकर विडंबनरूप त्यात होतं. केवळ अफाट! अर्थात ज्यांना थिल्लर आणि काहीशा असभ्य विनोदाचं वावडं आहे, त्यांनी मेल ब्रूक्सच्या चित्रपटांकडे फिरकूच नये. म्हणजे त्यात अश्लील दृश्यं काही नसतात, पण विनोदही फारसा शाकाहारी वगैरे नसतो.  

ज्याला स्लॅपस्टिक म्हणतात, त्या प्रकारचा विनोद चित्रपटाच्या दुनियेत नेहमीच आवडता राहिला आहे. चार्ली चॅप्लिन त्याबाबतीत किंग होता. लॉरेल आणि हार्डी हे जाड्यारड्याही होतेच. बस्टर कीटन नावाचा एक अफलातून नट मूकचित्रपटांच्या काळात धमाल करून गेला. कोराकरकरीत चेहरा ठेवून तो आचरट कारनामे करून पोराटोरांना लोटपोट करत असे. ‘ग्रेटेस्ट स्टोन फेस’ असं त्याला कौतुकानं अमेरिकेत म्हणत असत.

मेल ब्रूक्सचा विनोदप्रकार वेगळाच होता. तो विडंबनातला वाकबगार होता. त्याच्या चित्रपटांना फिरकीपट असं म्हणता येईल. ‘सायलेंट मूव्ही’ हेदेखील एक विडंबनच होतं. या चित्रपटात फक्त एका शब्दाचा संवाद होता- पण ती गंमत पुढे येईलच- बाकी संपूर्ण सिनेमा नि:शब्द. पण जगभरातले लोक पोटात कळा येईतोवर हसून थेटरातून परत जात होते.

***

सायलेंट मूव्हीची गोष्ट थोडक्यात सांगणंही महाअवघड काम आहे. 

मेल फन हा एक हॉलिवूडचा जानामाना दिग्दर्शक. पण सध्या भिकेला लागलेला. दारूच्या आहारी जाऊन त्यानं स्वतःचा पुरता बँड वाजवलाय. त्यात नशिबानं दगा दिलेला. दारू उतरल्यावर त्याला ब्रह्मांड आठवे, मग तो परत बाटली उचले. शेवटी उठून तो ‘एनगल्फ अँड डिव्होर’ या स्टुडिओच्या मालकाला भेटायला गेला. म्हणाला, ‘‘आपण एक सायलेंट मूव्ही बनवूया. त्यात मी बडे बडे स्टारलोक घेतो सस्त्यात. कर्जबिर्ज टाकू फेडून... विषय संपला!’’

‘‘नीघ!’’ स्टुडिओचा मालक म्हणाला. पण नेहमीप्रमाणे तोही मेल फनच्या जाळ्यात सापडला. सांगतो कोणाला? स्टुडिओ दिवाळ्यात निघणार होता.

एक दिग्दर्शक, त्याचे दोन सहकारी (स्टुडिओचा मालक समाविष्ट) एकेका सिताऱ्याला ‘साइन’ करायला जातात, त्यात एकसेएक धमाल सिच्युएशन्स तयार होतात, हेच कथासूत्र.

उदाहरणार्थ, बर्ट रेनॉर्ल्ड्स हा तेव्हाचा सुपरस्टार. घरात बाथटबात अंघोळ करताना एकदम सहा हात त्याला साबण लावायला येतात. आचरटपणाचा कहर! पण काम फत्ते होतं. जेम्स कान हादेखील असाच देखणा नट. त्याला शूटिंगच्या लोकेशनवर गाठूनच साइन करून घेतात. पॉल न्यूमनला साइन करून घेताना तर इलेक्ट्रिक चाकाच्या खुर्चीवरून थरारक पाठलागही होतो. सगळ्यात कहर म्हणजे मार्सेल मार्सो या जगविख्यात मूकाभिनेत्याला (माइम आर्टिस्ट) मेल फन सरळ पॅरिसला फोन लावतो.

मूक चित्रपटात संवादाच्याऐवजी पडद्यावर मजकुराचे फलक यायचे. त्याला ‘इंटरटायटल्स’ म्हणत. तेही सायलेंट मूव्हीत आहेतच. 

मेल फन : (संवाद फलकावरची अक्षरे... मूकचित्रपटात असायची तीच) एका मूक चित्रपटात तुम्ही काम करणार का?

मार्सिल मार्सो : (संवाद फलकाद्वारेच) नॉन... नाही! 

बिल : (अक्षरांद्वारे) काय म्हणाला तो?

मेल फन : (पुढला संवादफलक) मला काय म्हाईत? मला कुठं फ्रेंच येतं?

असले अनेक प्रकार होत एकदाचा चित्रपट पूर्ण होतो. पण स्टुडिओ घशात घालू पाहणाऱ्या कंपनीचे मालक चित्रपटाची रिळंच चोरून नेतात. मग ती परत चोरण्यासाठी नव्या करामती. एकदाचा सिनेमा रिलीज होतो. शेवटी अक्षरं येतात, ‘धिस वॉज अ ट्रू स्टोरी’!

***

संपूर्ण सिनेमात एकच संवाद आहे, -‘नॉन’! आणि तोही विख्यात मूकाभिनय सम्राट मार्सेल मार्सोच्या तोंडी. या चित्रपटासाठी मेल ब्रुक्सनं बडे बडे सितारे घेतले. त्यांना दिवसाकाठी तीनशे डॉलर्स एवढाच मोबदला दिला. तरीही मेलवरच्या प्रेमापोटी त्यांनी हजेरी लावली. ‘सायलेंट मूव्ही’ हे मूकपटांच्या जमान्यावरचं एक विडंबनभाष्य होतं. किंबहुना मेल ब्रुक्सच्या बहुतेक कलाकृती या प्रतिक्रियाशीलच आहेत. एखादी गोष्ट गाजली की तिचा लगोलग समाचार घ्यायचा हा खाक्या. हिटलरवरची प्रतिक्रिया म्हणून त्यानं ‘द प्रोड्युसर्स’ केला. आल्फ्रेड हिचकॉकच्या भयपटांची टिंगल उडवण्यासाठी त्यानं ‘हाय अँक्झायटी’ नावाचा अफलातून चित्रपट केला होता. केविन कॉस्नरचा ‘रॉबिन हूड’ आला, तेव्हा ताबडतोब मेल ब्रुक्सनं ‘रॉबिन हूड : मेन इन टाइट्स’ आणला. अर्थात त्याचं आणखी एक भलताच गाजलेला विडंबनपट  म्हणजे ‘ब्लेझिंग सॅडल्स’! वेस्टर्नपटांची दांडी उडवणारं हे प्रकरण इतकं लोभस आणि मनोरंजक आहे की नंतर क्लिंट ईस्टवूडचे खरेखुरे वेस्टर्नपट बघतानाही हसायला यायला लागतं. ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड- पार्ट टू’ काढण्याची घोषणा मेल ब्रुक्सनं २०१० साली केली होती. पण ते काही जमलं नाही.

आत्मचरित्रात ९६ वर्षाचा मेल ब्रुक्स म्हणतो : लोक मला विचारतात की तू यहुदी... दुसऱ्या महायुद्धात तुझ्या जातभाईंना किती भोगावं लागलं. तुला राग नाही आला कधी? जगावर भडकला कसा नाहीस? मी उत्तर देतो, दोस्तांनो, माझा विनोद आणि माझी ही थट्टा हा एक प्रकारचा रागच आहे, ते तुमच्या लक्षात आलं नाही का?’’

असली त्याची वाक्य वाचली की कळतं, पाणी खोल आहे. हा वरवरचा थट्टेखोर खळखळाट जितका खरा, तितकी आतली खदखदही दाहक असणार. स्वतः मेल ब्रुक्स मात्र बरंच काही भोगून हसतोय, आणि हसवतोय.

प्रख्यात उपहासलेखक आणि स्तंभलेखक आर्ट बुकवाल्ड यांनी अखेरचा श्वास घेण्यापूर्वीच अखेरचा स्तंभ लिहून ठेवला होता. एक छोटासा व्हिडिओसुद्धा तयार करून ठेवला होता. त्यात हसून ते म्हणतात : ‘‘हे, आय जस्ट डाइड!... मी आत्ताच मेलो!!’’  

शतकाच्या उंबरठ्यावरचा फिरकीबहाद्दर मेल ब्रुक्सदेखील तसली काही तरी योजना मनात घोळवत आरामखुर्चीत पडला असेल, असं वाटत राहातं. मग वाटतं, नकोच. मेल ब्रुक्स तसाच्या तसा जगायला हवा. अजून किमान शंभर वर्ष.

संबंधित बातम्या