एका लग्नाची तिसरीच गोष्ट!

प्रवीण टोकेकर
सोमवार, 25 जुलै 2022

‘मॅरी मी’ हा काही क्रांतिकारक वगैरे चित्रपट नव्हे. हलकाफुलकाच आहे. मुळात तो कोरोनाकाळात आला हे विशेष. असे दिलासा देणारे मानवी सिनेमे संकटकाळात बरे वाटतात. या चित्रपटात ‘आय ऑन वे टू यू’ हे जे-लोचं सुंदर गाणं आहे. इतकं हळूवार गाणं फारा दिसांनी कानावर आलं. अर्थही फार सुंदर आहे ओळींचा. मुळातून ऐकावं.

समजा, फुकट तिकीट मिळालं म्हणून तुम्ही कुण्या लावण्यलतिकेच्या रंगारंग कार्यक्रमाला गेलात. जणू इंद्रसभेतून अवतरलेली अप्सराच. तुम्ही गर्दीत बसून छानपैकी तिचा कार्यक्रम बघताय. तिचं लावण्य गपचूप टिपताय; मधेच स्वतःशीच चपापताय. ‘‘अरे वा, भाऊसाहेब, तुम्ही इथं? कमाल आहे! आम्हाला वाटलं, तुम्ही फक्त सत्संगालाच हजेरी लावता... हाहाहा!’’ असं कुणीतरी हटकेल, या भीतीनं तुम्ही निम्मेअधिक खचलेले आहात. पण गाणी बहारदार आहेत. ‘लागला का बाण?’ असं जहरीपणानं ती स्टेजवरली लावण्यलतिका कुणाला विचारतेय...  तो कोणी खुर्चीतच मरून पडल्याचा अभिनय करून आपणही जामच ‘रशिक’ आहोत, याचे पुरावे देतोय. या बाईंनी आपल्याला विचारलं नाही, बरं झालं, असं म्हणून तुम्ही थोडंसं हुश्श करता. तेवढ्यात तिनं स्टेजवरुन तुमच्याकडे बोट दाखवलं. म्हणाली, ‘‘अहो, तुम्ही... या ना हिते...’’ तुम्ही इकडे तिकडे बघता. सगळे तुमच्याकडेच बघतायत. तुम्ही च्याट! ‘मी?’ असं तुम्ही खुळ्यासारखं विचारता. तेही नुसतंच ओठांची हालचाल करत. घशाला कोरड पडलीय. आवाज फुटणार कुठून? दोघं-तिघं तुम्हाला खुर्चीवरून उठवतात. स्टेजवर ढकलतात. ती बया तुम्हाला शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीनं विचारते, ‘‘लगीन कराल माझ्याशी? आत्ता, हितं?’’ 
तुम्ही खलाऽऽस! 

तुम्हाला घामटं फुटलंया. तुम्ही ‘हो’ म्हणण्याआधी कांदा हुंगायला मागताय. कुणी ऐकत नाही. तेवढ्यात स्टेजच्या विंगेतनं मुंडावळ्या, हार-तुरं येत्यात, आणि मंगलाष्टकं वाजून लगीन लागतंयसुदीक. असं कुठं अस्तंय व्हय?

‘मॅरी मी’ हा एक मस्त सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर चाललाय. मस्त या शब्दाचा अर्थ, अर्थात मर्यादित अर्थानंच इथं घ्यावा. दरवेळी काहीतरी भयंकर प्रभावी, थोर असं काही बघायला मिळावं, हा आग्रह काही बरा नव्हे. रोज रोज पोळी शिक्रण खायचं म्हटलं तरी कंटाळा येतोच. अधूनमधून फोडणीची पोळी आणि फोडणीचा भातही सकाळचा नाश्ता खुलवून जातो, तसंच हे! ‘मॅरी मी’ हा एक मस्त टाइमपास आहे. 

खरं सांगायचं तर सिनेमा हॉलिवुडी असला तरी त्यातली कथावस्तू शतप्रतिशत भारतीय आहे. हाच सिनेमा आपल्याकडे शाहरुख-काजोल, दीपिका-रणवीर टाइप जोड्यांनी केला असता तर हिंदीत खपून गेला असता. या ओरिजिनल हिंदी मालाचा हॉलिवुडी अवतार असा बघायला मिळावा, हा थोरच अनुभव. हाताशी वेळ असेल तर बघून टाकावा हा चित्रपट. मजाय.

हा सिनेमा बघून टाकण्याचं आणखी एक सबळ कारण आहे. यातली लावण्यलतिका कुणी साधीसुधी नव्हे, साक्षात जेनिफर लोपेझ आहे. जेनिफर लोपेझ ऊर्फ ‘जे-लो’ हे अमेरिकन मनोरंजनाच्या क्षेत्रातलं खूप मोठं प्रस्थ. जे-लो ही पॉप गायिका आहे, अभिनेत्री आहे, निर्माती आहे आणि पारंगत डान्सरदेखील आहे. अमेरिकेत अशा त्रिगुणी लोकांना ‘ट्रिपल थ्रेट’ म्हणतात. स्पॅनिश वंशाच्या या अभिनेत्रीनं गेली तीस वर्ष गाजवली आहेत. तिच्या बांधेसूद सौंदर्याचे दिवानेही खूप आहेत. उत्तर अमेरिकेत तिला लाडानं ‘ला गिटारा’ असं म्हणायचे. मूर्तिमंत गिटार म्हणे! 

असं हे ह्या मूर्तिमंत लावण्य उद्या, २४ जुलैला, वयाची बावन्न वर्षं पूर्ण करेल. लावण्यलतिकेचं वय सांगण्याइतका करंटेपणा नाही. पण आता वाढदिवसाचा केक कापायचा म्हटलं तर थोडाफार प्रमाद करावा लागणारच.

***
त्याचं असंय की केट वाल्डेझ ही एक स्पॅनिश वळणाची (आणि अंगवळणाचीही!) पॉप सिंगर आहे. एकदम भारीतली तारका. हजारो बेभान श्रोत्यांपुढे, दोन-दोन मजली ध्वनिवर्धकांच्या जोरावर, तुफ्फानी वाद्यवृंदासोबत जोरदार इव्हेंट करणारी तारका. एकदम फेमस. तिचे पोशाख, आगळेवेगळे मेकप यांची तरुणांमध्ये क्रेझच आहे. आज जपानमध्ये खासगी उद्योजकांच्या पार्टीत गायचं, तर उद्या प्योर्टो रिकोत मित्रांच्या पार्टीला जायचं. परवा कॅरिबियनमध्ये कॉन्सर्ट, तर चौरवा आणखी कुठेतरी जाहिरातीचं शूटिंग... कार्यक्रम भरगच्च आहे केट वाल्डेझचा.

बास्तियां नावाचा आणखी एक रॉक स्टार आहे, त्याची ही मैत्रीण. आज-उद्या हे दोघे लग्न करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. असणारच! कारण अमक्या अमक्या गॉसिप मॅगझिननं तसं छापून टाकलंय. अर्थात केट आणि बास्तियांनं ही बातमी नाकारलेली नाही, कारण खरंच ते लग्न करणार आहेत. एकत्र राहतात. एकत्र कार्यक्रम करतात. एकत्र अल्बम निर्माण करतात. मग लग्नानं काय घोडं मारलं आहे?

...मॅनहटनमधल्या एका प्रचंड मोठ्या कॉन्सर्टमध्ये भर रंगमंचावर हजारो चाहत्यांच्या साक्षीनं रीतसर पाद्री बोलावून लग्नगाठ बांधायची, आणि मोठा इव्हेंट करायचा, असा त्यांचा प्लॅन आहे... म्हंजे होता. कारण ऐन कॉन्सर्टच्या थोडा वेळ आधी बास्तियांचं एक लफडं बाहेर आलं. एका टॅब्लॉइड मासिकानं केटच्याच सहायिकेबरोबर बॅकस्टेजला रंग उधळतानाचे बास्तियांचे फोटो छापले, व्हिडिओसुद्धा व्हायरल केला. 

रंगमंचावर एंट्री घेताना केट सैरभैर झाली होती. या असल्या उल्लू, बिलंदराशी आपण जीवनभराची गाठ मारायला निघालो आहोत, तेही जाहीररित्या? याला आपल्या प्रेमाची काहीच किंमत नाही? आपण इतके मूर्ख आहोत? केट हादरून गेली...

समोर चाहत्यांचा अफाट जमाव पसरलेला. बेभान. बेधुंद. केट आणि बास्तियांचे संयुक्त चाहते.

त्याच गर्दीत चार्ली गिल्बर्ट उभा होता. त्याच्या हातात एक फलक- ‘मॅरी मी’ असं लिहिलेला. हे उगीच. असलं काही त्याच्या डोक्यातही नव्हतं. बायकोविना आठ-दहा वर्षाची मुलगी सांभाळणारा तो एक गरीबडा गणिताचा शिक्षक होता. मुलगी आणि कौटुंबिक मित्र-मैत्रिणी घेऊन आले, म्हणून तो कार्यक्रमाला आलेला. त्याला ना धड गाण्यात रस होता, ना त्या केट वाल्डेझ नावाच्या लावण्यलतिकेत.

तेवढ्यात केट वाल्डेझनं बोट रोखून म्हटलं, ‘येस, मी करीन तुझ्याशी लग्न... ये स्टेजवर!’

मी? ओह, आपल्या हातात हा भंपक ‘मॅरी मी’ अक्षरं असलेला फलक आहे, नाही का? बाई भडकली की काय?

‘‘होय, तुम्हीच... प्लीज, स्टेजवर या!’’ केट वाल्डेझचा आवाज ध्वनिवर्धकांवर दुमदुमला. 

मुलगी म्हणाली, ‘‘डॅड, तुम्हालाच बोलावतेय ती... जा ना, जा!’ मित्रानंही त्याला ढकलला! चार्ली बिचारा पोचला स्टेजवर.

‘‘आपली ओळख नाही. सगळ्या आयुष्याच्या धबडग्यात आपण काय शोधत असतो? तर खरं प्रेम. ते कुठल्या वळणावर मिळेल, काय सांगावं? आपण प्रयत्न करू. मी या लग्नाला तयार आहे...’’ केट म्हणाली. कुठून तरी एक पाद्री अवतरला. त्यानं दोघांनाही आणाभाका घ्यायला लावल्या. ‘आय डू’ म्हणायला लावलं. 

इव्हेंट जबरदस्त हिट झाला. कारण विख्यात पॉपतारका केट वाल्डेझ हिनं एका सामान्य चाहत्याशी लग्न की हो केलं!

***
‘‘हे बघा, आय कॅन अंडरस्टँड! तुमच्या त्या बास्तियां का कोण, त्यानं तुम्हाला असं फसवायला नको होतं. पण आता मी तरी काय करू? मी पडलो साधा गणिताचा शिक्षक. नाही, फोटोबिटोला उभा राहीन मी, पण बाकी लग्नाबिग्नाचं काही जमण्यासारखं नाही आपलं!’’ चार्लीनं समजूतदारपणा दाखवला. केट अजूनही बास्तियांवरच्या रागातच होती. तिनं त्याच्याकडे सहज दुर्लक्ष केलं. ‘त्याला पत्रकार परिषदेत काय बोलायचं ते सांगा,’ असं तुटकपणे आपल्या व्यवस्थापकाला सांगून ती निघून गेली.

पत्रकार परिषद ठीकठाक झाली. हे असले प्रकार केट वाल्डेझच्या अंगवळणी पडले होते, पण बिचारा चार्ली गडबडून गेला. लग्न ही गोष्ट इतकी हलकी, स्वस्त, खोटी आणि व्यापारी छापाची असते? हे त्याला कळेना. 

शाळेत तो गणितं शिकवायचा. मुलांना मॅथलॉनसाठी तयार करायचा. मॅथलॉन म्हणजे एक प्रकारच्या गणिताच्या स्पर्धा असतात. गणिताची गोडी लागावी म्हणून धडपडायचा. नाकासमोर चालणारा गडी. केट वाल्डेझचं गणित मात्र त्याला काही कळत नव्हतं.

एक-दोनदा त्याची केटशी भेट झाली. तिचं राहणीमान कोट्यधीशाचं. हा गणिताचा मास्तर दोन खोल्यात वावरणारा. त्याला जेवढा पगार, त्याच्यापेक्षा जास्त खर्च तिच्या लिपस्टिकच्या कांड्यांचा. केवड्याच्या जुडीत बोंबील आला! काय करावं?

पण हळू हळू त्यांचं जमू लागलं. तो बराच क्यूट आहे, हे केटच्या लक्षात यायला लागलं. अनेकदा तो खूप शहाणपणाचे सल्ले नकळत देऊन जातो, हेही कळलं. एक दिवस ती त्याच्या घरी आली. राहिली एक रात्र...

चार्ली : कमॉन, मी देतो चॅलेंज, चल, एक आठवडा एकटीनं राहून दाखव. एकही नोकर नाही, चाकर नाही. चहासुध्दा स्वतःच करून प्यायचा. घराचं कुलूप स्वतः उघडायचं, बंद करायचं. करतेस?

केट : पैज! बघ हं... मी फार जिद्दीची आहे. तू पण एक आठवडा सोशल मीडियावर वावरून दाखव. जमेल?

... दोघांनीही प्रेमानं पैज लावली, आणि जिंकलीसुद्धा. आणखी बरंच काही सांगता येईल. पण त्यामुळे चित्रपट बघण्यातली गंमतच निघून जाईल. ती पडद्यावर बघण्यात मजा आहे.  

पुढे ही, पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली, एवढं सांगितलं तरी पुष्कळ झालं.

***
‘मॅरी मी’ हा चित्रपट जेनिफर लोपेझचा आहे. तिनंच त्याची निर्मिती केली आहे. ‘सेलेना’, ‘ॲनाकोंडा’, ‘द सेल’, ‘आऊट ऑफ साइट’, ‘द वेडिंग प्लॅनर’, ‘यू-टर्न’, ‘मेड इन मॅनहटन’ अशा कितीतरी चित्रपटात तिनं मस्त मस्त रोल केले आहेत. सावळ्या वर्णाची, सुंदर गाणारी, दिलखेचक नृत्य करणारी ही कमनीय तारका नव्वदीच्या दशकातच ‘जगात भारी’ ठरली. तिचे गाण्याचे अल्बम गाजू लागले होते. सिनेमांना गर्दी होऊ लागली होती. थरारपटांपासून रोमँटिक कॉमेडीपर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका केल्या. अर्थात ती गाते म्हणून तिला कधी ग्रॅमी पुरस्कार मिळाला नाही की अभिनय करते म्हणून ऑस्कर हाती पडलं नाही. तरीही तिच्या लोकप्रियतेचा रथ दशांगुळं वरच आहे. याला कारण तिचा स्पॅनिश वंश आणि त्याच संस्कृतीचा बाज जपणारा तिचा सूर आणि सौंदर्य.

तिचे आईवडील प्योर्टो रिकोचे होते. तिथून ते मुख्य भूमी अमेरिकेकडे आले. न्यू यॉर्क नजीकच्याच ब्राँक्स या काहीशा बदनाम बस्तीत तिचा जन्म झाला. बदनाम बस्ती म्हणायचं, पण ती काही तितकीशी वाईट वस्ती नाही. सतराव्या शतकात कुण्या जोनास ब्राँक्स नामक स्वीडिश निर्वासितानं इथं घर केलं. पुढे निर्वासितांचे तांडेच येऊन वसले. गरीब प्रजा होती सगळी. ब्राँक्सच्या आसपास चांगल्या वस्त्याही आहेत. कॅसल हिल ही तशीच वस्ती. तिथं जेनिफरचं बालपण गेलं. घर अस्सल कॅथलिक वळणाचं. रविवारी चर्चमध्ये जाणं अगदी अनिवार्य वगैरे. तिथल्या हिस्पॅनिको बॅले शाळेत तिनं वयाच्या पाचव्या वर्षापासून नृत्याचे धडे गिरवले. पुढे गळाही छान फुटला. पदवी मिळवल्यावर एका वकिली फर्ममध्ये सेक्रेटरीची नोकरी तिनं केली. एका हॉटेलात वेटर म्हणूनही काम केलं. तिथंच क्रूझ नावाच्या एका क्युबन वेटरशी तिनं लग्नही केलं होतं. पुढे तिनं आणखी तीनेक लग्नं केली. मार्क अँटनी हा गायकही तिचा माजी नवराच. सुप्रसिद्ध सितारा बेन अफ्लेक याच्याशी तर तिनं दोनदा लग्न केलं. वीस वर्षापूर्वी घटस्फोट दिला, आणि अगदी या वर्षारंभीच पुन्हा एकदा शादी करून टाकली. हॉलिवूडमध्ये हे चालायचंच.

पुढे एका टीव्ही शोमधून ती पुढे आली, आणि मग एकदम ‘सेलेना’ हा सिनेमाच केला. तिथून आजवर तिचे अर्धा डझन सुपरहिट अल्बम आणि डझनावारी चित्रपट आले आहेत. कित्येक वर्ल्ड टूर्स तिनं केल्या आहेत. मॅडोना, बार्बरा स्ट्रिसँड, टिना टर्नर आणि मायकेल जॅक्सनची बहीण जॅनेट यांच्याकडे बघत बघत ती मोठी झाली आहे.  

‘ॲनाकोंडा’मधली जे-लो वेगळी, ‘यूटर्न‘मधली वेगळी, ‘मेड इन मॅनहटन’मधली वेगळी! मेड इन मॅनहटनची स्टोरी, ‘मॅरी मी’च्या अगदी उलटी. तिथं एक प्रसिद्ध सिनेटर हॉटेलातल्या सेविकेशी लग्न करतो, ती सेविका जे-लोनं साकारली होती. रोमँटिक कॉमेडीत जे-लो छान खुलते, हे बाकी खरं. 

‘मॅरी मी’ हा काही क्रांतिकारक वगैरे चित्रपट नव्हे. हलकाफुलकाच आहे. मुळात तो कोरोनाकाळात आला हे विशेष. असे दिलासा देणारे मानवी सिनेमे संकटकाळात बरे वाटतात. या चित्रपटात ‘आय ऑन वे टू यू’ हे जे-लोचं सुंदर गाणं आहे. इतकं हळूवार गाणं फारा दिसांनी कानावर आलं. अर्थही फार सुंदर आहे ओळींचा. मुळातून ऐकावं. 

‘धर्मेच अर्थेच कामेच नाति चरामि’ असं वचन आपल्याकडे लग्नकार्यात द्यायचं असतं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ. त्यातला मोक्ष तर एकट्यानं मिळवायचा. उरलेले तीन अर्धांगीसमवेत. त्यात अतिचार न करता... ‘मॅरी मी’ मध्ये या वचनाच्या पलीकडलं काहीतरी सांगायचा फिल्मी प्रयत्न आहे. बघा पटतोय का.
मग? बघताय नव्हं... मॅरी मी?

संबंधित बातम्या