मी पाहिलेला युक्रेन...

राधिका टिपरे
सोमवार, 14 मार्च 2022

विशेष

माझी युक्रेन या देशाची भेट पर्यटनासाठी म्हणून मुळीच नव्हती. माझ्या सुनेचा, मरीनाचा देश बघायला जायचं एवढाच उद्देश होता. आम्ही इस्तंबूलमार्गे हारकोव्ह या युक्रेनमधील दोन क्रमांकाच्या शहरात पोहोचलो. मरीनाचे हे गाव आहे मात्र अप्रतिम सुंदर...! या शहराच्या नावाच्या स्पेलिंगनुसार रशियनमधून उच्चार होतो ‘खारकोव्ह’, मात्र युक्रेनीयन पद्धतीने ‘हारखोव्ह’असे म्हटले जाते.

खारकोव्ह हे अतिशय सुंदर आणि गर्द हिरवाईने नटलेले. सोविएत काळातील भव्य इमारती आणि जुनी चर्च, मोठमोठ्या बागा, त्यात असणारे सुरेख वृक्ष यामुळे शहराला एक शांत आणि संयत व देखणे रूप प्राप्त झालेले आहे. मुलांसाठी खेळायला असणाऱ्‍या मोकळ्या जागा आणि हिरवाई यामुळे या शहराने  माझे मनच जिंकून घेतले जणू. इथली सेंट्रल पार्क आणि गोर्के पार्क फारच सुंदर आहेत. मधोमध सुंदर तलाव आहे. भरपूर घनगर्द वृक्षराजी आहे. बागेत जागोजागी लहान मुलांचे सुंदर ब्राँझ पुतळे ठेवलेले आहेत. ही ब्राँझची शिल्प फारच सुंदर आहेत. हे सेंट्रल पार्क शहराच्या मध्यभागी आहे. सुंदर कारंजे, नव्याने बांधलेले चर्च यामुळे हे पार्क खूपच छान वाटते. त्याच आवारात बऱ्‍यापैकी नीटनेटके प्राणिसंग्रहालय आहे. पार्कच्या आवारातच एका बाजूला डॉल्फिन शोही सुरू असतो. सेंट्रल पार्कच्या समोर ऑपेराची देखणी इमारत आहे. तेथून जवळच असलेल्या युनिव्हर्सिटी हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या भागात शनिवार आणि रविवार, शहरातील कलाकार एका लहानशा पार्कच्या बाजूला, मोकळ्या जागेत आपली चित्रे विकायला मांडून ठेवतात. काही चित्रे इतकी सुंदर होती की पाहातच राहावे. युक्रेनियन, रशियन निसर्ग सौंदर्य कॅनव्हासवर चित्रित केलेले होते. मला फार आवडली ही चित्रं... मी न राहवून चार चित्रं विकत घेतली. ती युक्रेनमधून बाहेर आणताना दमछाकच झाली माझी... पण आज माझ्या घरात हीच चित्रं भिंतीची शोभा वाढवताहेत!!

सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर आर्थिक विपन्नतेमुळे संपूर्ण देशातील सर्वच कार्यप्रणालीमध्ये कमालीचा भ्रष्टाचार बोकाळला होता. असे म्हटले जायचे की येथील बहुतेक सर्व सरकारी कार्यालयांमध्ये पैसे चारल्याशिवाय काम होत नाहीच नाही...! असे मला माझी सून मरीनाने सांगितले. या देशातील लोकांच्या समस्यांचा जो काही उल्लेख मरीनाच्या बोलण्यातून समोर आला तो ऐकून फार वाईट वाटले. तरुणांकडे नोकऱ्‍या नाहीत, परदेशात जाण्यात अडचणी. राज्यकर्त्यांना काही करावेसे वाटत नाही. या सर्व बाबींमुळे देशात एक प्रकारची सामाजिक उदासीनता जाणवते. विशेष म्हणजे या देशातील महिला अधिक आक्रमक, सक्षम आणि सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे मला तीव्रतेने जाणवले. मरीनाला जेव्हा मी माझे मत बोलून दाखवले, तेव्हा तिने हसून या गोष्टीला होकार दिला. पण एवढे असूनही सगळीकडे स्वच्छता आहे, बागबगीचे, रस्ते, मेट्रो, ट्रॅम, बस, यांसारख्या सेवा अतिशय स्वस्त आणि स्वच्छ आहेत असे तीव्रतेने जाणवले. वृद्ध व्यक्तीला या सर्व सेवा, त्याचबरोबर वैद्यकीय सेवा सुविधा मोफत आहेत. ब्रेड, बटर, फळे यांसारखे खाद्यपदार्थ स्वस्त आहेत, असे मरीना सांगत होती.

इथे वयोवृद्ध लोकांना साठ वर्षे वयानंतर निवृत्त होऊनही कमी वेतनावर काम करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सत्तरी ओलांडली तरी कामावर जातात. माझी सत्तरीला पोचलेली रशियन विहीण, नीना, तीसुद्धा इंजिनिअर म्हणून अजूनही कामावर जायची. पण तिच्या मुलाला धड नोकरी मिळत नव्हती. नीना माझ्या सुनेच्या आईची बालपणापासूनची मैत्रीण आहे. तीच मरीनाची आई झाली, कारण मरीनाचे आई-वडील दोघेही कर्करोगाने वारले. नीनाचे यजमानही कर्करोगानेच पंधरा वर्षांपूर्वी गेले. चेर्नोबिल अणुभट्टीच्या स्फोटानंतर पसरलेल्या रेडिएशनमुळे त्या काळात मध्यमवयीन असणारे बरेच लोक कर्करोगाने गेले किंवा जात आहेत असे मरीनाने सांगितले.  

इथले लोक दिसायला अतिशय देखणे आहेत. त्यातही स्त्रिया कमालीच्या सुंदर. 
कार, मोटरसायकल, दुचाक्या यांचा वापरही फार कमी असल्याचे माझ्या तिथल्या वास्तव्यात जाणवले. लोक चालत कामावर जाता-येताना आणि बस आणि मेट्रो यांसारख्या सरकारी सुविधांचा वापर करताना दिसत. या सुविधा परिपूर्ण वाटल्या. मला युक्रेनच्या आणि आपल्या जीवनशैलीमध्ये, तसेच संस्कृतीमध्ये खूप साम्य जाणवले. नीनाच्या घरी राहताना गोऱ्‍या परदेशी लोकांच्या घरी राहतेय असे जाणवलेच नाही. मुलीच्या सासरकडच्या मंडळींची जेवढी म्हणून सरबराई करता येईल ते सारे काही नीनाने माझ्यासाठी केले.

 युक्रेनियन पद्धतीचे जेवण आपल्यासाठी अगदीच बेचव असते. त्यात ही मंडळी मांसाहार जास्त करतात. त्यामुळे मला स्वतःसाठी काहीतरी करावे लागायचे. शिवाय नातवाची फर्माईश असायचीच... ‘आजी, आय वाँट वरण भात... आजी आय वाँट चपाती...’ पण नीना त्यांच्या पद्धतीचे काही बाही करत राहायची... ब्लेनी, लाडुस्की, बोश नावाचे बीटचे सूप...! या लोकांची सॅलड करण्याची पद्धत मात्र सुरेखच. आपल्याकडे आवडणारी शेपूची भाजी या लोकांचीही फार आवडीची भाजी आहे. पण शेपू इथे सॅलडमध्ये कच्चा चिरून घालतात. मी केलेली मटकीची उसळ, थालीपीठ, गरमागरम चपाती, पुऱ्‍या या गोष्टी नीनाला आणि मरीनालाही फार आवडतात.

युक्रेनमध्ये थोड्या थोडक्या नाही, तर चारशे नद्या वाहतात. निप्रो ही विशाल नदी युक्रेनची सर्वात मोठी नदी असून अख्खा देश या नदीमुळे ‘उजव्या तीरावरील’ आणि ‘डाव्या तीरावरील’ असा विभागलेला आहे. युक्रेनच्या राजधानीचे शहर किव्ह हेसुद्धा या विशाल नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले आहे. मला किव्ह दाखवण्यासाठी नीना घेऊन गेली. युक्रेनमधील सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे इंग्रजी भाषा अजिबात बोलली, समजली जात नाही. माझ्या विहिणीला तर इंग्रजीचा ओ की ठो कळत नाही. पण तरीही नीना दोन वेळा भारतात येऊन आमच्याकडे तीन आठवडे राहून गेली. अर्थात त्यावेळी मरीना सोबत होती. खारकोव्हच्या भेटीत मी मध्यरात्री जेव्हा विमानतळावर उतरले होते; तेव्हा माझ्या मुलाबरोबर नीना मला रिसीव्ह करायला आली होती. मला पाहताच पुढे येऊन मला मिठीत घेत आनंदाने म्हणाली, ‘गो टू युक्रेन राधिका... गो टू युक्रेन...’ मी आश्चर्याने तिच्या तोंडाकडे पाहतच राहिले...! ‘कम’ला ‘गो’ आणि ‘गो’ला ‘कम’ म्हणणारी नीना आणि तिचे हाय फंडू इंग्रजी याचा नंतर भरपूर आनंद घेतला...! दहा वेळा ‘आय लव्ह यू’ म्हणत राहायची. पण तिला इंग्रजी येत नाही म्हणून आमचे कधी अडले नाही. किव्हमध्ये भटकंती करताना कुठेच काही अडचण आली नाही. खाणाखुणा आणि हातवारे यांच्यामुळे सगळे काही उमजायचे. जुन्या मैत्रिणींप्रमाणे हातात हात घालून मस्त फिरलो आम्ही. खारकोव्हप्रमाणेच किव्ह शहर अफलातून सुंदर आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर, हिरवाईने नटलेले. 

किव्हला जवळ जवळ पंधराशे वर्षांचा इतिहास आहे. खास युक्रेनियन शैलीतील चर्च आणि मठ पाहून जीव थक्क होतो. सगळ्यात भावते ती स्वच्छता आणि हिरवाई. युक्रेनमधील सेंट मायकल कॅथड्रल चर्च फार सुंदर आहे. आकाशाच्या गडद निळ्या रंगातील हे चर्च पाहून डोळे निवतात. सोन्याने मढवलेले घुमट इतके शोभून दिसतात, की हे कॅथड्रल आपल्या मनात ठसून जाते. विशेष म्हणजे इकडील कॅथड्रलच्या घुमटांचा आकार ‘युक्रेनियन बॅरोक’ पद्धतीचा असून त्याचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते. विशेष म्हणजे बहुतेक सर्व घुमट सोन्याने मढवलेले आहेत. 

किव्ह शहरातील हा भाग सर्वात जुना आणि प्रसिद्ध भाग आहे. या भागातील रस्ते फारच सुंदर आहेत आणि ते युरोपमधील रस्त्यांप्रमाणे दगडी पेवर ब्लॉक लावून केलेले आहेत. याच भागातील एका रस्त्याच्या कडेला एक सुंदर ब्राँझ शिल्प पाहायला मिळाले. गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीसमोर प्रेम व्यक्त करणाऱ्‍या प्रियकराचे हे शिल्प किव्हमध्ये प्रसिद्ध आहे. जुन्या किव्ह शहरातील हा रस्ता खूप प्रसिद्ध आहे. सोव्हिएत काळातील अनेक मान्यवर, लेखक, कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती या रस्त्यावर वास्तव्यास होते. 

फुलांचे ताटवे, हिरवीकंच हिरवाई यामुळे मला किव्ह शहर फार आवडले.. त्या दिवशी चालून चालून पाय दुखायला लागले होते, पण किव्हच्या शांत रस्त्यावरून नीनाबरोबर भटकण्यात वेगळाच आनंद मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी, मेट्रो स्टेशनात नीना माझा हात घट्ट धरून ठेवत असे, पण आपल्यासारखी गर्दी इकडे नव्हतीच. अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या या देशात गर्दी पाहायला मिळाली नाही. भारतात आल्यानंतर मुंबई आणि पुण्यात फिरताना मरीना कावरीबावरी होऊन जाते. घाबरून जाते... कारण आपल्याकडे माणसांना चालण्यासाठी जागा नसतेच. तिची भीती अनाठायी नव्हती हे मला इथे आल्यामुळे कळून चुकले. 

रशियन पद्धतीचे स्थापत्य असलेल्या जुन्या पण देखण्या इमारती, प्रशस्त रस्ते आणि पदपथ, त्यावर डेरेदार वृक्षांनी केलेल्या कमानी यांमुळे किव्हला अनोखे वैभव प्राप्त झालेले आहे. मला सर्वात आश्चर्य वाटले ते जवळजवळ जमिनीखालून धावणाऱ्‍या चाळीस ते पन्नास वर्षे जुन्या मेट्रोचे. आठ-दहा मजले उंची भरेल एवढ्या खालून ही मेट्रो धावते. या मेट्रोसाठीची भुयारे किती खोलवर आहेत हे तीन तीन एस्कलेटर बदलून वर येताना कळते. विशेष म्हणजे शहराच्या काही भागात मेट्रो निप्रो नदीच्या खालून जाते. या मेट्रो अक्षरश: आजही नव्या सारख्या वाटत होत्या. 

माझी सून आणि नातू दोघेही रशियन भाषेतच बोलतात. त्यामुळे काही शब्द आता ओळखीचे झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठीतील आणि संस्कृत भाषेतील बरेचसे शब्द रशियन भाषेत त्याच अर्थाने वापरले जातात. मला सर्वात आवडला तो मरीनाचा दाचा. सोव्हिएत काळात युक्रेनमधील बहुतेक सर्व कुटुंबांना सरकारतर्फे जमिनीचा छोटासा तुकडा बागबगीचा करण्यासाठी दिला जायचा. भाजीपाला, फळाफुलांची झाडे लावण्यासाठी ही जागा प्रत्येकाच्या वाट्याला असतेच. या बगीचाला ‘दाचा’ म्हणतात. या दाचामध्ये एखादे छोटेसे गार्डन हाऊसही असते. मरीनाची आई नादिया आणि नीना या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. त्यांची मैत्री लग्नानंतरही अतूट राहिली होती. अशीच आणखी दोन कुटुंबेही मरीनाच्या आईवडिलांच्या फार जवळची होती. नीना, लुदमीला, व्होल्गा आणि मरीनाची आई नादिया या चार मैत्रिणी आणि त्यांची वाढलेली कुटुंबे...! एका रविवारी नीनाच्या दाचामध्ये या सर्वांनी मिळून मरीनासाठी आणि मला बोलवण्यासाठी म्हणून एक मोठी बार्बेक्यु पार्टी ठेवली. इथे सर्वांची भेट झाली. मरीनाला रक्ताचे नातेवाईक नसले तरी तिच्या कुटुंबाशी स्नेहाच्या नात्याने जोडलेले तिचे सर्व सोयरे त्या दिवशी मला भेटले... खूप छान वाटले!  

मला हे दाचा प्रकरण फार आवडले. नीनाच्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या दाचामध्ये मरीना आणि आर्यनबरोबर मी बऱ्‍याच वेळा गेले. तेथे गेले की प्रसन्न वाटायचे! दोघींच्या बागेतही सुरेख फुलझाडे तर आहेतच, पण सफरचंद आणि अॅप्रिकॉटची झाडेही आहेत. मांडवांवर द्राक्षाचे वेल चढवलेले होते. सफरचंदाला फळे लागलेली होती. द्राक्षाच्या वेलीला लहान लहान द्राक्षांचे घोस लागले होते. दोन्ही दाचामध्ये सुंदरशी लाकडामध्ये बांधलेली घरे आहेत. लहानसे स्वयंपाकघर, बागेसाठी लागणाऱ्‍या सामानाची खोली, वरच्या मजल्यावर बैठक आणि झोपायची खोली! घराच्या खाली तळघर म्हणजेच सेलर असतेच. त्यात साठवणीच्या गोष्टी ठेवल्या जातात. घरी केलेली वाईन, सफरचंद भरून ठेवलेले बॉक्स. बर्फ पडायला लागले की मग ही सफरचंदे खाण्यासाठी बाहेर काढतात. तोपर्यंत ही फळे अगदी ताजी आणि टवटवीत राहतात. बाहेर बसण्यासाठी लोखंडी टेबल, बाकडी कायमसाठी ठेवलेली... रविवारची सुट्टी बहुतेक कुटुंबीय आपल्या दाचामध्ये घालवतात. बागेचे काम करायचे, बार्बेक्यु करायचे... वाईन, बीअर प्यायची आणि सुट्टी मजेत घालवायची.. मला हे सारे काही फार फार भावले! मी नीनाला म्हटले, माझ्याकडे असा दाचा असता तर मी तिथे बसून खूप खूप लिखाण केले असते... ही संकल्पना मला फार फार आवडली. सुट्टीच्या दिवशी दाचामध्ये घाम गाळायचा, बार्बेक्यू करायचे, फ्रेश व्हायचे आणि मग नव्याने आठवड्याची सुरुवात करावयाची. सगळेच छान होते. 

युक्रेनमधील तीन आठवड्यांचे वास्तव्य कापरासारखे उडून गेले. मुख्य म्हणजे काही बाबतीत या माणसांची मने अगदी आपल्या भारतीयांसारखीच आहेत हे मला या वास्तव्यात जाणवले. ती भावना माझ्यासाठी फार आनंददायी होती.. असो, माझ्या सुनेचा सुंदर देश पाहून मी अत्यंत समाधानाने भारतात परतले.
युक्रेन मला खूप आवडला होता. आज या घडीला या सुंदर देशाची दुर्दशा झाली आहे. माझ्या लाडक्या विहिणीची मदत करण्यासाठी मी काही करू शकत नाहीये. खारकोव्ह शहर अक्षरशः उद्‍ध्वस्त झाले आहे. नीनाने तान्या आणि दोन्ही नातवंडांसहित शहरच नाही, तर देशही सोडला आहे. मॅक्सिम या तिच्या मुलाला मात्र सीमा ओलांडून पुढे जाता आले नाही. नीना सुखरूप जर्मनीत पोहोचली आहे, एवढेच कळले आहे. आता पुढे काय हे कुणालाही ठाऊक नाही... मन या झाल्या प्रकारामुळे दुःखी आहे... आपण काही करू शकत नाही हीच खंत आहे....!

संबंधित बातम्या