मेंदीच्या पानावर...

राजश्री बिनायकिया
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

भारतीय संस्कृतीतील सण-समारंभांमध्ये मेंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच मेंदीशिवाय उत्सवाच्या साज-शृंगाराला परिपूर्णता येत नाही. सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतले तरच मेंदीचा रंग छान येतो. मेंदी कशी भिजवावी, मेंदीचा कोन कसा असावा, मेंदी रंगण्यासाठी काय करावे, यासाठी काही टिप्स...

मेंदी पूड विकत घेताना चांगल्या प्रतीची, व्यवस्थित रंगणारी घ्यावी. पूड ताजी असावी. हिरव्या रंगाची मेंदी ताजी असते. खूप दिवसांची तपकिरी रंगाची मेंदी रंगत नाही. बाजारातून विकत आणलेली मेंदी सर्वप्रथम मलमलच्या कापडातून दोन वेळा चाळून घ्यावी. भांड्यावर हे कापड ताणून धरून त्यावर मेंदीची पूड टाकून बोटाने दाबून फिरवत वस्त्रगाळ करावी. मेंदी वस्त्रगाळ न केल्यास कचरा कोनाच्या छिद्रात अडकून मेंदी व्यवस्थित कोनातून बाहेर येत नाही.

मेंदीची पूड गाळून झाल्यावर तिचे मिश्रण तयार करायला घ्यावे. मेंदीच्या एका कोनाचे मिश्रण तयार करण्यासाठी एक कप पाणी घ्यावे. त्यामध्ये एक टीस्पून कॉफी, एक टीस्पून चहा पावडर, दोन ते तीन लवंगा कुटून, थोडी चिंच, अर्धा टीस्पून कात घालावी. मिश्रण उकळावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळावे. हे मिश्रण गाळून घेऊन नंतर निलगिरीचे दहा ते बारा थेंब टाकावेत. नंतर त्या मिश्रणात मावेल इतकी वस्त्रगाळ केलेली मेंदी पूड घालावी व चांगले फेटावे. मेंदीचे मिश्रण जास्त घट्ट किंवा सैल असू नये. केकवरच्या क्रीमसारखा घट्टपणा असणारी पेस्ट तयार करावी. भिजवताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

मेंदी दोन ते तीन तास अगोदर लोखंडी भांड्यात भिजवावी नंतर कोनमध्ये भरावी. मेंदीचा रंग अधिक खुलावा, अधिक गडद व्हावा, यासाठी निलगिरी तेल, कात, कॉफी, चहा पावडर, जास्वंदीच्या फुलांचा रस, चुना, भेंडी ठेचून, मंडुरची पावडर असे अनेक पदार्थ मेंदी भिजवताना वापरतात.

भिजवलेली मेंदी प्लॅस्टिक कोनच्या मदतीने काढतात. हा कोन घरी तयार करता येतो. कोन करण्यासाठी स्वच्छ आणि जाड पॉलिथिन वापरावे. दुधाच्या पिशवीऐवजी बाजारात मिळणारे कोनाचे प्लॅस्टिक वापरावे. दहा व बारा सेंटिमीटर आकाराचे प्लॅस्टिक घ्यावे. त्रिकोणी आकारात दुमडून (शंकूचा आकार देऊन) सेलोटेपने बंद करावा. कोनामध्ये छोट्या चमच्याने मेंदी भरावी. नंतर वरून दोन्ही बाजूंनी कोन दुमडावा. कोन भरल्यानंतर वरील बाजूने गुंडाळी करून सेलोटेपने चिकटवावे. हा कोन तयार झाला. कोन जास्त मोठा करू नये. कोन लहान असेल तर मेंदी काढणे सोपे होते. कोन करताना शक्यतो कोनाच्या खालचे चित्र बंद करू नये. कोनातून मेंदी बाहेर काढण्यासाठी कात्रीऐवजी सेफ्टी पिन किंवा सुईचा वापर करावा. मेंदीचा कोन छिद्राजवळ न धरता थोड्या वरच्या बाजूला धरून तेथे हलका दाब द्यावा म्हणजे मेंदी खाली सरकेल. नक्षी काढण्यापूर्वी कोनात भरलेली मेंदी व्यवस्थित बाहेर येते आहे, ना याची खात्री करण्यासाठी खराब कागदावर किंवा कपड्यावर रेषा काढून पाहाव्यात. 

कोन तयार झाल्यावर मेंदी काढण्याअगोदर हात, पाय स्वच्छ धुऊन, कोरडे करावेत. नंतर मेंदी काढावी. हाताला मेंदीचे तेल किंवा निलगिरी तेल लावावे. मेंदीची नक्षी काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम नक्षीतील मोठे मोठे भाग फक्त आऊटलाईनने (म्हणजेच पोकळ) काढून घ्यावेत. त्यांच्यात बारीक चौकटी किंवा आवडतील त्या नागमोडी रेषांची नक्षी काढावी.

आधीच एक एक भाग पूर्ण करत गेले, तर समजा नक्षी थोडीफार बदलण्याची वेळ आली तर आधीची संपूर्ण मेहनत फुकट जातेच. शिवाय बारीक काम करण्यात वेळ जातो. त्यात तेवढा हातही रंगतो. त्यामुळे नक्षी बदलायला काहीच वाव उरत नाही. प्रथम मुख्य ढाचा आखून घ्यावा व त्यानंतर डिझाइनचे काम करावे. मग नक्षीचे रूप कसे खुलून येते पाहा.

मेंदी किमान पाच तास तरी हातावर राहू द्यावी. मेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते. बारीक कलाकुसर केलेली हातावरील मेंदी लगेच सुकून गळून पडायला लागते. म्हणून मेंदी वाळल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस व एक टीस्पून साखर हे मिश्रण कापसाने वाळलेल्या मेंदीवर हळुवारपणे लावावे. या मिश्रणाऐवजी चहाचे पाणी किंवा खोबरेल तेलही लावतात. मेंदी लवकर सुकावी म्हणून मुद्दाम हाताला उष्णता देऊ नये नैसर्गिकरीत्या ती मेंदी सुकू द्यावी. मेंदी सहा तासांपेक्षा जास्त वेळ हातावर ठेवू नये. नंतर मेंदी पाण्याने न धुता हाताला खोबरेल तेल, गोडेतेल लावावे व मेंदी चोळून काढावी.  

मेंदीचा रंग गडद होण्यासाठी मेंदीवर बाम, व्हिक्स किंवा मोहरीचे तेल लावावे. हे पदार्थ उष्णता निर्माण करतात. यामुळे मेंदीचा रंग गडद होतो. तवा तापवून त्यावर चार ते पाच लवंगा टाकून त्याची धुरीही हातावर घेऊ शकता, मेंदीचा रंग गडद होतो. मेंदी धुतल्यानंतर चार ते पाच तास मेंदीचा हात पाण्यात घालू नये. मेंदी धुतल्यावर साबण, शाम्पू हाताला लावू नये. 

मेंदी किती रंगेल हे प्रत्येकाच्या शरीराच्या उष्णतेवर अवलंबून असते. परंतु वरील सर्व गोष्टी पाळल्या तर आपली मेंदी नक्कीच रंगेल. 

संबंधित बातम्या