परिक्षण मनोगत

रमेश नारायण गाढवे,, कलाशिक्षक, अमृता मनजित भोईटे, कलाशिक्षक, अनमोल अशोक बनकर, मेंदी कलाकार, प्रशिक्षक
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

विशेष

कलेतून भावभावनांचे सादरीकरण...

रमेश नारायण गाढवे, कलाशिक्षक

यंदाच्या मेंदी स्पर्धेत अनेकविध कलाकृती पाहायला मिळाल्या. कोणत्याही परीक्षेचे परीक्षण ही सर्वात अवघड बाब असते. कारण माझ्यामते स्पर्धेत भाग घेतलेला प्रत्येक स्पर्धक जिंकलेलाच असतो.

मेंदी रेखाटनाची कला ही आता नुसती वैयक्तिक छंदाच्या पातळीवर राहिलेली नाही. आधुनिक जगात आधुनिक रूप घेतलेली ही कला आता कलाकारांसाठी करिअरही झाली आहे. लग्न समारंभ, विविध सण उत्सव या अशा अनेक कार्यक्रमात मेंदी एक अविभाज्य घटक झाला आहे. साधारणपणे लोकांची कल्पना असते तशी मेंदी कला ही फक्त स्त्रियांनाच अवगत आहे असे नाही. या स्पर्धेमध्ये पुरुष कलाकारांचीही मेंदी रेखाटने पाहायला मिळाली. 

कलेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सौंदर्यनिर्मिती’. सौंदर्यनिर्मितीचा पाठपुरावा करताना कलाकारांचा कस लागतो. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांच्या मेंदी रेखाटनांमध्ये अनेक कलाकृती पाहायला मिळाल्या. अनेक स्पर्धकांनी कलाकृती सादर करताना सूक्ष्म पद्धतीचे रेखाटन केले आहे. ‘क्रिएटिव्ह आर्ट’ अलंकारातून स्पेसची निर्मिती याबरोबरच समाजसेवेचे भान ठेवून लॉकडाउनच्या काळात समाजाच्या सेवेत असलेले डॉक्टर, पोलिस, आरोग्यसेवक, समाजसेवक यांनी दिलेल्या सेवेचेही मेंदी रेखाटनांद्वारे सादरीकरण केले आहे. कलाकारांना रेखाटनांसाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य होते, त्यामुळे स्पर्धकांना आपल्या कलेतील भाव सादर करता आले. स्पर्धकांनी मुक्तपणे रेखाटने केल्याचा आनंदही भावला. महाराष्ट्रातून फक्त शहरातूनच नाही तर ग्रामीण भागातूनही अशा काही कलाकृती आल्या. त्यांना प्रकट होता आले. कलात्मक रेषांची जोड असलेली पानेफुले, अलंकार, मानवाकृती तसेच सामाजिक भान असलेल्या विषयांचे सादरीकरण पाहायला मिळाले. 

सगळ्याच स्पर्धकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आपल्या कलाकृतींवर पुन्हा एक कटाक्ष टाका . आपलेच रेखाटन पुन्हा पाहताना आपल्यालाच अनेक नव्या जागा सुचत जातात, असा माझा अनुभव आहे. सर्व सहभागी कलाकारांना शुभेच्छा..!

 

मेंदीः समाजप्रबोधनाचे एक माध्यम

अमृता मनजित भोईटे, कलाशिक्षक

प्रथमतः ‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांच स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करते. कोरोनाकाळाचे सावट असताना कलेच्या अभिव्यक्तीसाठी आणि त्यातून लाभणाऱ्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ‘सकाळ साप्ताहिक’ने मेंदी रेखाटनाची आवड असणाऱ्यांसाठी दिलेली ही संधी कलाकारांना खूप आनंद देऊन गेली असणार यात शंकाच नाही.

यावर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी विविध अलंकारिक आकार, फुले, पाने, हत्ती, उंट, वेगवेगळे पक्षी आणि मानवाकृतींचा अतिशय सुरेख वापर त्यांच्या डिझाईन्समध्ये केला गेला आहे. फ्लोरल डिझाईन, चेक्स डिझाईन, बेल पॅटर्न, बॉर्डर डिझाईन, बांगडी डिझाईन, दुल्हन मेहंदी डिझाईन, अरेबिक मेहंदी डिझाईन, पारंपरिक मेंदी डिझाईन या प्रकारांसोबतच रॉयल डिझाईन, थ्रीडी मेहंदी डिझाईन यांचा ही डिझाईन्समध्ये जास्त वापर होताना दिसला. वरील सर्व प्रकारांसोबतच कोरोना वॉरिअर्स, पर्यावरण रक्षण तसेच ‘बेटी बचाओ’ अशा वेगवेगळ्या समाजप्रबोधनपर विषयांच्या थीम घेऊन रेखाटलेली मेंदी डिझाईनही पहायला मिळाली. यामुळे मेंदी डिझाईन ही केवळ वैयक्तिक कला न राहता समाजप्रबोधनाचेही एक माध्यम होऊ शकते, हे पुन्हा अधोरेखित झाले.

स्पर्धकांच्या प्रवेशिका पाहत असताना मेंदीच्या रेखाटनातील कलाकुसर, आकारांची प्रमाणबद्धता तसेच अलंकारिकताही पाहिली गेली. आवश्यक तिथे केलेली आकारांची पुनरावृत्ती, लयबद्धता तसेच आवश्यक ठिकाणी सोडलेली स्पेस यांचाही विचार केला गेला. सध्याच्या काळातल्या मानसिक ताणावर कला जोपासणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांमधल्या कलागुणांना न रोखता त्या गुणांना वाव द्यावा, कलागुण जोपासण्याची संधी मुलांना द्यावी अशी विशेष विनंती करावीशी वाटते. इतर अनेक कलाविष्कारांप्रमाणे मेंदी रेखाटन हीसुद्धा आता एका वेगळ्या करिअरची वाट ठरते आहे, ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी आहे.

स्पर्धेतील सहभागी झालेल्या सर्वांचेच पुन्हा एकदा खूपखूप अभिनंदन!

 

योग्य मार्गदर्शनाबरोबर सरावही हवा...

अनमोल अशोक बनकर, मेंदी कलाकार, प्रशिक्षक

‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेतील स्पर्धकांच्या रेखाटनांचे परीक्षण करताना पारंपरिक तसेच नवीन डिझाईनमधील व्हरायटी, लेटेस्ट ट्रेंडचे डिझाईन, लाईन वर्क, शार्पनेस, व्यवस्थित केलेले फिलिंग आदी गोष्टी आवर्जून बघितल्या आहेत. विजेत्यांच्या मेंदीमधील बारीक रेषा उल्लेखनीय आहेत, तसेच व्हेरिएशनही आहे. मेंदी शार्प आहे. स्पर्धेमध्ये पारंपरिक आणि दुबई ट्रेंडनुसार मेंदी रेखाटने आहेत. रेखाटनांमधील मानवी आकृत्यांमध्ये डोळे, नाक, कपडे हे जसे बघितले जाते तसेच मेंदीमध्ये आकारांच्या प्रपोर्शनला महत्त्व आहे. वेगवेगळे आकार काढताना ते कुठे सुरू केले, कुठे संपवले, नुसते फिलिंग न करता आकार आणि अन्य रेखाटनांमध्यल्या मोकळ्या जागांचा (गॅप्स) व्यवस्थित या गोष्टीही पाहिल्या आहेत. 

यानिमित्ताने मेंदी रेखाटनाच्या तयारीविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात. मनाजोगत्या रेखाटनांसाठी चांगल्या दर्जाची मेंदी घ्यावी, ती जेवढ्या जास्त वेळा शक्य आहे (चार ते सात वेळा), तेवढ्या वेळा चाळून घ्यावी. जेवढी जास्त वेळा चाळली जाईल तेवढी प्युअर मेंदी मिळेल. मेंदी कालवताना त्यात योग्य प्रमाणात पाणी घालावे. रंग यावा यासाठी लवंग, निलगिरी अशा प्रकारचे नैसर्गिक तेल वापरावे. कोन तयार करण्यासाठी पातळ आणि सॉफ्ट प्लॅस्टिक वापरावे. त्यामुळे मेंदी काढताना डिझाईनचे फिनिशिंग चांगले येते. शक्यतो ताजी मेंदीच वापरावी. 

मेंदी ज्यावेळी काढायची आहे, त्याआधी कमीत कमी सहा-आठ तास आधी भिजवावी. भिजवताना त्यात तेल घालू नये. फेटून झाल्यानंतर घालावे, तेही ऐनवेळी. कोनात भरण्याआधी अर्धा तास आधी तेल घालावे. मेंदी भिजवताना थोडी साखर घालावी, त्यामुळे मेंदीला चिकटपणा येतो. 

मेंदी काढताना दाब देण्याला खूप महत्त्व आहे. पारंपरिक मेंदीमध्ये बारीक नक्षीकाम असते, अरेबिकमध्ये शेडिंग असते. इंडियन-दुबई पॅटर्नमध्ये नक्षीकाम आणि शेडिंग दोन्ही वापरले जाते. प्युअर दुबई मेंदीसाठी हेवी प्रेसिंग करावे लागते. तुरे, दुबई पॅटर्नमधील फुले, मानवी आकृत्या, शेडिंग या सगळ्यासाठी दाबावर नियंत्रण हवे. सगळ्या प्रकारच्या मेंदीचा बेस पारंपरिक मेंदी. त्यामुळे ती पक्की यावी लागते, आणि त्यासाठी मार्गदर्शनाबरोबर मोठा सरावही करण्याची तयारी लागते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा!

संबंधित बातम्या