तरुण लेखकांचे प्रेरणास्थान

-
सोमवार, 20 डिसेंबर 2021

विशेष

‘‘मोठी माणसं जेव्हा एखाद्या मार्गानं चालतात तेव्हा आपसूकच त्यांच्या पावलांचे ठसे त्यावर उमटत राहतात. येणाऱ्या पिढ्या याच ठशांना आदर्श मानून वाटचाल करत राहतात. फुकन सर तरुण लेखकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी अनेकांना लिहतं केलं. काल परवापर्यंत अगदी दुर्धर आजारानं अंथरुणाला खिळून पडेपर्यंत ते सर्वांना सहज उपलब्ध असायचे. तरुणाईचं म्हणणं ऐकून घेत ते त्यांच्यासोबत आनंदानं सेल्फी घ्यायचे. एखादा जवळचा मित्र संकटात सापडला तर ते त्याला आवर्जून मदत करत असत,’’ आसामी पत्रकार आणि लेखिका रत्ना भराली तालुकदार फुकन यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना भरभरून बोलत होत्या. साहित्य सरस्वतीची निर्व्याज सेवा करणारे आणि लोकपरंपरा- लोकसाहित्यांमधील प्रतिकांना मॉडर्न टच देणारे, आसामी भाषेतील प्रख्यात कवी नीलमणी फुकन यांना वर्ष साहित्य क्षेत्रातील २०२०साठीच्या सर्वोच्च मानाच्या ‘ज्ञानपीठ’ सन्मानाने गौरविण्यात आले आहे. 

फुकन यांनी आपल्या लेखणीनं केवळ लोकांना रिझवलंच नाही, तर अनेकांना लिहतंदेखील केलं. सामाजिकबाबतीत प्रचंड संवदेनशील आणि हळव्या असणाऱ्या फुकन यांनी १९५० साली लेखणी उचलली ती आजपर्यंत सातत्यानं कागदांवरून सुसाट धावत होती. आता वयाच्या ८०व्या वर्षात असणाऱ्या फुकन यांना निसर्गनियमांनुसार येणाऱ्या आजारपणानं गाठल्यानंतर त्यांनी लिहणं थांबवलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या अर्धांगिनी दुलूमनी फुकन यांनी जेव्हा आपल्या पतीला या पुरस्काराची खबर सांगितली तेव्हा या साहित्यसम्राटाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं, ‘भल खोबोर, भल खोबोर’ (ही आनंदाची बातमी आहे). सन्मान मोठाय पण त्याचा आनंद घेण्याएवढं बळ फुकन यांच्याकडं राहिलं नसल्याची खंत त्यांच्या पत्नीनं व्यक्त केली. ज्ञानपीठ मिळवणारे फुकन हे तिसरे आसामी साहित्यिक आहेत. याआधी विरेंद्रनाथ भट्टाचार्य आणि मामोनी रेसम (इंदिरा) गोस्वामी यांना हा सन्मान मिळाला होता. 

फुकन यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष कुलधीर सैकिया म्हणाले, फुकन यांनी आसामी कवितेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.  जपानी भाषेतदेखील त्यांच्या कवितांचा अनुवाद झाला. आसाम साहित्य सभेनं त्यांना जतिया कवी आणि साहित्याचार्य असा सन्मान दिलाय. आसामच्या बाहेर अन्य भाषक काव्य रसिकांपर्यंत त्यांच्या कविता नेण्याचा आमचा विचार आहे.

साहित्यकृतीची मुळं पारंपरिक
‘फुली ठोका सूर्यमुखी फुलोर फले’, ‘गोलापी जामीर लगन’, ‘कोबिता’ आणि ‘नृत्ययाराता पृथ्वी’ या फुकन यांच्या गाजलेल्या साहित्यकृती होत. आयुष्यभर प्राध्यापकीचा पेशा जपताना फुकन डेरगावमध्ये रमले, येथील निसर्गानं त्यांना  भुरळ घातली. हाच निसर्ग पुढे त्यांच्या कवितांमध्ये उतरला. जीवनाचा कोलाहल मांडताना त्यांनी निसर्गाची साथ कधी सोडली नाही. त्यांच्या काव्यरचना काहीशा आधुनिक वाटत असल्या तरीसुद्धा त्यांची मुळं ही पारंपरिक लोककथा आणि काव्यांमध्ये आहेत. माणसाच्या  मनाचा  खोलवर तळ ढवळून काढणाऱ्या त्यांच्या काव्यरचना वाचकाला आत्मपरीक्षण तर करायला लावतातच पण त्याचबरोबर त्या जादुई अनुभवदेखील देऊन जातात.

 

नवोदित कवींना फुकन यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पारंपरिक शब्दांचा ते आधुनिक अंगाने ज्या पद्धतीनं वापर करतात ते लाजवाब असतं. त्यांची भाषा आधुनिक असली तरी तिची मुळं पारंपरिक आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि निसर्ग यांचा मोठा प्रभाव त्यांच्या काव्यरचनेवर दिसतो.

 अनुराधा पुजारी, 
‘सातसोरी’ या आसामी नियतकालिकाच्या संपादिका आणि लेखिका.

 

संबंधित बातम्या