गद्य शब्दांना स्वरसम्राज्ञीच्या भावनांचा स्पर्श

-
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

कव्हरस्टोरी

‘मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, मराठी ओज, मराठमोळ्या परंपरा हे सारे-सारे मराठीपण या नव्या लाटेत पार धुऊन जाईल असे होता कामा नये. हे मराठीपण नष्ट न होवो, तो दिवस न उगवो अशी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे.’ फेब्रुवारी १९९६मध्ये आळंदी येथे झालेल्या ६९व्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करताना गानसरस्वती लता मंगेशकर यांनी हा मुद्दा अधोरेखित केला होता. गद्य शब्दांना लाभलेला किणकिणत्या स्वरांचा साज आणि त्या शब्दांना झालेला भिजलेल्या भावनांचा स्पर्श यांतून बहरत गेलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भाषण श्रोत्यांना शब्दमोगऱ्याच्या फुलांचा सुगंध देणारे ठरले. त्यांची जिवलग मैत्रीण असणाऱ्या कवयित्री शान्ता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या सत्रात लतादीदींनी आयत्यावेळी लिखित भाषण बाजूला ठेवून केलेल्या भाषणाने समोर बसलेल्या जनसागराला भारावून टाकले होते. दीदींचे ते भाषण अजूनही साहित्य रसिकांच्या आठवणीत आहे. 

‘मी पसायदान गायले तो क्षण माझ्यासाठी अमृतानुभव होता,’ असे सांगताना आपल्या त्या उत्स्फूर्त भाषणात लतादीदींनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पसायदानाचे त्यांना वाटणारे महत्त्व विशद केले होते. त्या म्हणाल्या, ‘आपल्या काव्यातून प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ शतकानुशतके देणारे कवी म्हणजे साक्षात अनुभवसमृद्ध असे आत्मरूप, त्याला ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक देवो म्हणतात. विश्वात्मक ईश्वराचे पसायदान मला गायला मिळाले. हे भाग्य फार थोड्यांना लाभते. तो दुर्लभ साक्षात्कार मला ज्ञानदेवांमुळे मिळाला. तंबोऱ्यांच्या सुरांच्या वलयात मिसळलेले भैरवीचे सूर आणि अमृतमय पसायदानाचे शब्द. सारे काही अलौकिक. ज्या वेळी मी पसायदान गायले ते क्षण अमृतानुभव होता.’ 

मराठी भाषाच राहिली नाही तर मराठी अस्मिता तरी कशी शिल्लक राहणार, असा खडा सवाल उपस्थित करून दीदींनी श्रोत्यांना गंभीर केले होते. ‘साहित्य, संगीत आणि कला ही शिवशक्तीच्या हातातील त्रिशुळाची तीन अग्रे आहेत. यातच एका टोकाचा आकार बिघडला, समतोल ढासळला तर त्या त्रिशुळाचा डौल ढळेल आणि सारे सौंदर्य नष्ट होईल. साहित्य, संगीत आणि कला ही जीवनभाष्याची तीन धारदार माध्यमे आहेत. कोणीच कोणाकडे अनादराने, आकसाने पाहू नये,’ असे प्रतिपादनही त्यांनी केले होते. 

आपल्या जिवलग मैत्रिणीच्या प्रेमातून संमेलनाच्या व्यासपीठावर प्रथमच आलेल्या दीदींनी आपल्या भाषणातली त्यांची शब्दफेक, आपल्या शब्दांचा परिणाम साधण्यासाठी ठिकठिकाणी घेतलेला विश्राम, सहजगत्या केलेली विनोदाची- मिस्कीलतेची पखरण, दीदींचा मंजुळ आवाज आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य या सर्व बाबींमुळे त्यांचे गद्य भाषण एखाद्या सुंदर गाण्याच्या मैफिलीसारखे रंगले होते. ‘शान्ताबाई गातात आणि मी श्रोत्याची भूमिका बजावते, अनेक हिंदी गाणी त्या चांगली गातात,’ ही त्यांनी दिलेली माहिती अनेकांना चकित करणारी ठरली. ‘मी खूप बोलले याची मला कल्पना आहे, पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एवढे भरपूर बोलायचे नाही तर मग कोठून,’ या त्यांच्या मिस्कील टिपणीला व्यासपीठावरील मान्यवरांसह सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला होता. 

साहित्य आणि काव्य यातील आपला अनुभव आणि अनुभूती अत्यंत प्रभावीपणे मांडताना त्या म्हणाल्या, ‘जे शब्द, जी भावना सूरतालात आपोआप गुंफली जाते, ती कविता. जे शब्द, जी भावना सूरतालात आपोआप गुंफली जाते, ती कविता.’ 

‘भवभूतीपासून नवकवितेपर्यंत त्या बोलत असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे भारतीय साहित्याचे दर्शन घेणेच आहे,’ असे शान्ताबाईंचे कौतुक करताना त्यांनी आवर्जून सांगितले होते. 

मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आजही त्या संमेलनाच्या आठवणी निघतात त्या त्यांच्या भाषणाच्या, त्यांच्या मैत्रीच्या आणि उद्‌घाटनाच्या भाषणाचा सगळ्या संमेलनावर पडलेल्या प्रभावाच्याच... पण लतादीदींच्या या उस्फूर्त भाषणाची आठवण नेहमी निघेल कारण साहित्य, संगीत आणि कला यांच्यातील अनुबंध त्यांनी ज्या भावबंधनेतून उलगडला होता, ते अप्रतिम होते.

(आळंदी येथील साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी लता मंगेशकर यांनी केलेल्या भाषणाच्या, ‘दै. सकाळ’मधील२ फेब्रुवारी १९९६ रोजीच्या वृत्तांताच्या आधारे)

संबंधित बातम्या