शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरणाचे जग...

ऋत्विक गजेंद्रगडकर 
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

विशेष

मला कुठल्या विषयावर आणि कुठल्या साहित्यकृतींवर काम करायचे आहे, हे स्पष्ट करणारा एक आराखडा तयार करून तो मी जेव्हा जर्मनीतल्या विविध विद्यापीठांत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांना पाठवायला सुरुवात केली, तेव्हापासून आजपर्यंत आलेले काही वेगळे अनुभव हे साहित्याची आणि वाचनाची आवड असणाऱ्या लोकांपर्यंत पोचावेत यासाठी हा लेख मी लिहितो आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी म्युनिकला आलो आणि माझा पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला. साहित्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या विषयांसाठी म्युनिक विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिष्ठा आहे. कुठल्याही विद्यापीठात पीएच.डी करण्यासाठी प्रवेश मिळवायचा, तर तिथल्या तज्ज्ञ प्राध्यापकाने आपल्याला मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवणे हे सर्वात महत्त्वाचे. जेएनयूमध्ये जर्मन साहित्यात एम.ए. झाल्यानंतर, मी जर्मनीमध्ये पीएच.डी. करण्यासाठीची तयारी आणि गाइड शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मुळात परदेशी जायची हौस म्हणून जर्मनीत डॉक्टरेट करण्याचा विचार माझ्या मनात मुळीच आला नव्हता. साहित्याकडे ज्या दृष्टीने मला पाहायचे होते, आणि एम.ए.च्या दोन वर्षांत ज्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची मनापासून इच्छा निर्माण झाली त्या विषयावर काम करायचे होते. तशी दृष्टी आणि व्यासंग असणारे माझे जेएनयूमधले गाइड निवृत्त होणार असल्यामुळे आणि इतर प्राध्यापकांचे अभ्यासाचे विषय खूप वेगळे असल्यामुळे मी जर्मनीमध्ये पीएच.डी. करण्याची संधी शोधायला लागलो. 

मी जवळजवळ पंचवीस प्राध्यापकांना माझा संशोधन प्रस्ताव पाठवला असेल. त्यापैकी बहुतेक सर्वांनी मला उत्तर दिले. खरे त्यांना असे अनेक मेल येत असणार. कुठलीच ओळख नसताना त्यांनी मला प्रस्ताव वाचून सविस्तर उत्तर दिले, याचेच मला खूप आश्चर्य वाटले. मला आणखी काय सुधारणा करता येईल, मी आणखी काय वाचायला हवे, हे तर त्यांनी मला सांगितलेच. पण काही जणांनी ‘हा विषय अवघड आहे आणि आमच्या अभ्यासाच्या क्षेत्राबाहेरचा आहे. त्यामुळे विषय जरी आवडला असला तरी तुला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही योग्य  नाही,’ अशी कबुली दिली. आपले संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी वाहून घेतलेले असूनही, एखाद्या विद्यार्थ्याचा पीएच.डी.चा विषय वाचून त्यांना असे का वाटावे, असा प्रश्न मला हे उत्तर वाचून सुरुवातीला पडला. एखाद्या विषयाचा ध्यास लागणे, त्याच्या खोलात जाऊन संशोधन करणे, आपण संपादन केलेले ज्ञान आणि आपले अनुभव पुढच्या पिढ्यांना द्यायची मनापासून इच्छा असणे या सगळ्यातून गेल्यावर माणूस कदाचित आणखी नम्र, मनाने आणखी खुला होत असेल, असे मला विचार केल्यावर वाटले. माझ्या आजोबांच्या (डॉ. रा. चिं. ढेरे) रूपात तशी व्यक्ती मी अगदी लहानपणापासून बघितलेलीसुद्धा आहे. पण तरीही विद्वान व्यक्तीच्या मनातली ही सगळी प्रक्रिया मला आबा असताना समजली नव्हती (ते समजण्याचे माझे तेव्हा वयही नव्हते), आणि अजूनही ती पुरती समजली आहे, असे मी म्हणणार नाही! 

म्युनिक विद्यापीठाच्या जर्मन विभागामध्ये कार्यरत असलेले प्रो. बीगंमान यांना मी जेव्हा माझा प्रस्ताव पाठवणारा मेल लिहिला, तेव्हा त्यांनी मला अक्षरशः एका दिवसात उत्तर दिले. पीएच.डी.चा अभ्यास मला ज्या वर्षी, ज्या सेमिस्टरपासून सुरू करायचा होता, बरोबर त्याच सेमिस्टरच्या सुरुवातीला ते निवृत्त होणार असल्यामुळे ते स्वतः मला मार्गदर्शन करू शकणार नव्हते. तरीही त्यांनी मला जमेल ती सगळी मदत करायची तयारी दाखवली. त्याच विभागातले दुसरे प्राध्यापक आणि त्यांचे जवळचे मित्र प्रो. फोलहार्ट यांना मी संपर्क करावा, असे त्यांनी मला सुचवले आणि खरोखर एका आठवड्याच्या आत, केवळ मी सादर केलेल्या लेखी आराखड्यावर, फोलहार्ट यांनी मला स्वीकृतीपत्र दिले. या मुलाला मदत करावी असे प्रो. बीगंमान यांना का वाटले असेल? किंवा जर्मनीमध्ये पीएच.डी. करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका अनोळखी विद्यार्थ्याच्या क्षमतेचा नेमका अंदाज नसताना, त्याला एकही प्रश्न न विचारता पीएच.डी.चा विद्यार्थी म्हणून स्वीकारत असल्याचे पत्र द्यावे असे प्रो. फोलहार्ट यांना का वाटले असेल? आपल्या विभागामध्ये एक चांगला संशोधनात्मक प्रबंध सादर होईल आणि तो लिहिण्याची क्षमता माझ्यामध्ये असेल हा विश्वास त्यांना का वाटावा? मला स्वतःलाही त्यावेळी तो नव्हता, तर माझा जुजबी आराखडा वाचून त्यांना तो का वाटावा? हा अनुभव मात्र माझ्यासाठी विलक्षण होता. 

 प्रवेशासाठी लागणारी सगळी कागदपत्रे माझ्याकडे होती, पण पुढचा महत्त्वाचा टप्पा होता तो शिष्यवृत्ती मिळवण्याचा. एमबीए किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायला अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांसाठी मिळणारे कर्ज काढतात आणि नोकरी मिळाली की मग ते फेडायला लागतात. कला शाखेमध्ये मात्र ‘डिग्री मिळाली की नोकरी’ या समीकरणाला फारसे स्थान नाही. याची जाणीव असल्यामुळेच संपूर्ण शिष्यवृत्ती देणाऱ्या जर्मनीतल्या संस्था शोधायला मी सुरुवात केली. सुदैवाने मला रीतसर अर्ज, मोठी स्पर्धा आणि मुलाखतीचा अवघड टप्पा पार केल्यानंतर एक उत्तम शिष्यवृत्ती मिळाली आणि कोविडच्या महासाथीमुळे आलेल्या असंख्य अडचणी पार करून मी जर्मनीमध्ये दाखल झालो.

माझ्या गाइडचा सेक्रेटरी मला स्टेशनवर घ्यायला आला. तिथून तो मला जेवायला घेऊन गेला, हॉस्टेलवर सामान न्यायला त्याने मदत केली आणि जर्मनीमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी कुठल्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात, कोणत्या कामांना मी प्राधान्य द्यावे, हेही त्याने समजावून सांगितले. जी शिष्यवृत्ती मला मिळाली त्याच शिष्यवृत्तीसाठी त्यानेही पूर्वी तो विद्यार्थी असताना अर्ज केला होता, पण त्याला ती मिळाली नव्हती. हे सांगत असताना त्याच्या बोलण्यात मला जराही दुःख किंवा ईर्षा जाणवली नाही. उलट जर्मन विद्यार्थ्यांनाही सहजासहजी न मिळणारी शिष्यवृत्ती एका परदेशी विद्यार्थ्याला मिळाली आहे, याचा अर्थ त्याची तेवढी क्षमताही असणार, हा विश्वास मला त्याच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. पीएच.डी.साठी विषय शोधणे, त्यासाठी अनेक पातळ्यांवर वाचन करणे आणि आपले विचार ॲकॅडेमिक भाषेत मांडणे, ही सर्व प्रक्रिया त्याला नुसती माहीत नव्हती, तर त्या सगळ्या प्रक्रियेतून तो स्वतः प्रत्यक्ष गेलाही होता. मीही तसाच यशस्वीपणे हा मार्ग पार करू शकेन असा विश्वास त्याला पहिल्याच भेटीत का वाटावा? 

आणखी एक उल्लेख करावासा वाटतो, तो विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागाचा. या विभागाचे नाव ऐकले तरी भारतात अनेकांना (विद्यार्थी काय आणि इतर नागरिक काय!) धडकी भरते. पण जर्मनीमधल्या बहुतेक सर्व शासकीय विद्यापीठांमध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य असते. त्रैमासिक किंवा वार्षिक अहवाल, सेमिनार करून मार्क मिळाल्याचे पुरावे किंवा या प्रकारचे काहीही इथले प्रशासकीय विभाग मागत नाहीत. तीन वर्षे गाइडच्या संपर्कात राहून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून थेट पूर्ण झालेला प्रबंध सादर करायचा असतो. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली विद्यापीठे आणि तिथले प्रशासन - ज्यांना आपला दर्जा जराही कमी होऊ द्यायचा नाही, उलट आणखी उंचावायचा आहे - त्यांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर असा विश्वास टाकावा ही केवढी मोठी गोष्ट आहे!  

माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि वाचता वाचता हेर्मान ब्रॉख, या विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आपली कारकीर्द सुरू केलेल्या ऑस्ट्रियन कादंबरीकारावर आपल्याला काम करता येईल, त्याने लिहिलेल्या आणि काही अंशी दुर्लक्षित राहिलेल्या त्याच्या समीक्षात्मक लेखांवर नव्याने प्रकाश टाकून त्याची साहित्यशास्त्राची कल्पना अधोरेखित करता येईल, असा विचार मनात आला आणि तो मी प्रो. फोलहार्ट यांच्याकडे व्यक्त केला. योगायोग असा, की १९८०च्या दशकात, जर्मनीमध्ये जर्मन साहित्याच्या क्षेत्रात ब्रॉखवर पहिलावहिला प्रबंध कोणी लिहिला असेल तर तो त्यांनीच. मला ब्रॉख माहीत आहे, मला त्याच्या साहित्यावर काम करायची इच्छा आहे, हे ऐकूनच त्यांना मनापासून आनंद झाला आणि त्यांनी अर्थातच या विषयाचे स्वागत केले. माझ्या अभ्यासाची पद्धत पाहून काही महिन्यांनंतर त्यांनी मला गेल्या दोन दशकांमध्ये ब्रॉखवर झालेल्या संशोधनाचा आढावा घ्यायला सांगितले आणि म्हणाले, “सर्वच्या सर्व संशोधन तुला वाचायला जमेल की नाही, मलाही माहीत नाही, पण कुठल्या महत्त्वाच्या लेखांचा आधार घेत पुढे जावे हे तुला समजेल, असा मला विश्वास आहे.” ९०च्या दशकापासून ब्रॉखवर प्रकाशित झालेल्या जवळ जवळ सर्व संशोधनाचा आधार हा त्यांचा प्रबंध आहे तरीही माझ्या कामात पुढे जाताना मला इतके स्वातंत्र्य द्यावे असे त्यांना का वाटावे? 

मला पडलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे इथल्या शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरणात असावीत असे माझ्या आता लक्षात येते आहे. नागरिकत्व, धर्म, देश, लिंग या सगळ्या पलीकडे असणारे जग इथल्या संशोधकांना, विद्वानांना महत्त्वाचे वाटत असणार आणि ते जतन करण्याच्या त्यांच्या धडपडीचे फळ आपल्याला दिसत असणार, असे मला वाटते. आपल्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी आणि त्यातून साध्य होणाऱ्या आपल्या विकासासाठी मनापासून कष्ट करणाऱ्यांना मदतीचा हात देणे, ही इथल्या विद्यापीठाशी जोडलेल्या सर्वांना आपली जबाबदारी वाटते. कोणावर उपकार करत असल्याची भावना जराही त्यांच्या वागण्यामध्ये येत नाही. आपले घर, आपली माणसे, हे सगळे सोडून कोणीतरी इतक्या लांब स्वेच्छेने अभ्यास करायला येते, याचे त्यांना केवळ कौतुक असते. ही या संपूर्ण देशाचीच संस्कृती आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उठत असताना, इथे रेस्टोरंट्सच्याही आधी पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालये खुली होणे, किंवा एमबीए करून आपल्या क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करणाऱ्‍या मंडळींनी आवर्जून ग्रंथालयात येऊन एखाद्या महाकवीचे वाङ्‍मय वाचत राहणे, यातूनही हीच संस्कृती दिसत राहते.  

साहित्यशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अभ्यास म्हणजे नुसते भरपूर वाचन नाही, तर अनेक विषयांवरच्या पुस्तकांचे सखोल वाचन करणे महत्त्वाचे आहे, असे सांगणारे गुरू मला भेटत गेले. त्या सर्वांना जोडणारा एक दुवा म्हणजे ‘वाचलीच पाहिजेत’ आणि ‘स्वतःच्या संग्रहामध्ये असलीच पाहिजेत’, अशा पुस्तकांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे आणि ती विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देणे! तशी घरातल्या  वातावरणामुळे माझी पुस्तकांशी मैत्री लहानपणीच झाली. पण पुढे पदव्युत्तर काळात जसा अभ्यास वाढत गेला, तसे पुस्तके जमवण्याचे वेडही लागले! भारतात उपलब्ध नसणारी अनेक पुस्तके मला इथे मिळताहेत, अगदी सहज मिळताहेत, असे म्हणायलाही हरकत नाही. शिवाय आपल्या विषयातल्या अनेक अभ्यासकांशी संवाद-चर्चा करणेही महत्त्वाचे असते. कोविडमुळे प्रत्यक्ष भेटी शक्य नसल्या तरी मेलद्वारे मला अनेकांचे मार्गदर्शन इथे मिळते आहे. माझे गाइड स्वतः माझ्याशी नियमित चर्चा करून मला दिशा दाखवताहेत. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. या विषयातल्या (एक जर्मनीतल्या आणि एक अमेरिकेत असलेल्या) इतर दोन तज्ज्ञांशीही त्यांनी माझा संपर्क करून दिला. माझ्याबद्दल, माझ्या संशोधनविषयाबद्दल त्यांना सांगून मला मदत करण्याची विनंती त्यांनी केली आणि आश्चर्य म्हणजे माझ्या मेल्सना या दोघांनीही अतिशय मनापासून उत्तरे दिली. काही महिन्यांपूर्वी माझ्या आईने लिहिलेल्या ‘पुस्तक संस्कृती’ या लेखात माझ्या जर्मनीतल्या बऱ्‍याच अनुभवांचा उल्लेख केला होता. कोविडची दुसरी लाट आली तेव्हा इंटरनेटवर पुस्तके खरेदी करताना मिळालेली सवलत, मी विद्यार्थी आहे हे लक्षात घेऊन मला मिळालेली जादाची सवलत हे सर्व मी पुन्हा सांगत नाही, पण एक वेगळा अनुभव मात्र आवर्जून सांगावासा वाटतो. 

जर्मन साहित्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना गेओर्ग ब्यूशनर या १९व्या शतकामधील महान साहित्यिकाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्याचे समग्र साहित्य एकाच खंडात प्रकाशित झाले, ती प्रत मला एका जुन्या पुस्तकांच्या भांडारात सापडली. ती मी अर्थातच विकत घेतली. काही दिवसांनी त्याच दुकानात एका मोठ्या विचारवंताने संपादित केलेल्या त्याच लेखकाच्या समग्र साहित्याची प्रत मला दिसली. या खंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ब्यूशनरवर झालेल्या संशोधनाची संदर्भसूची, त्याचे साहित्य कसे वाचावे किंवा विद्यार्थ्यांना त्याच्यावर काम करायचे असेल तर कोणते विषय अजून हाताळले गेले नाहीयेत, या सर्व गोष्टी होत्या. त्या दुकानाच्या मालकिणीला मी ती प्रत माझ्यासाठी वेगळी काढून ठेवायला सांगितली. लायब्ररीमध्ये माझी बॅग ठेवून असाच फेरफटका मारायला निघालो होतो; त्यामुळे जवळ पैसेही नव्हते. आधी विकत घेतलेले पुस्तक जसे होते त्याच स्थितीमध्ये परत आणून देईन आणि मग ही प्रत नेईन असे सांगून मी निघालो, तेव्हा ती म्हणाली, ‘पैसे जमेल तेव्हा दे, आधी पुस्तक घेऊन जा. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर.’ हे ऐकून मला त्यावर काय बोलावे, तिचे आभार कसे मानावेत हेच कळेना! त्या दुकानात मी इथे आल्यापासून अनेक वेळेला गेलो होतो, पुस्तकांची खरेदी केली होती, तिच्याशी आणि तिच्या आईशी जर्मन महाकवी शिलरच्या आयुष्याबद्दल आणि साहित्याबद्दल गप्पा मारल्या होत्या, पण त्या सगळ्यामुळे तिला माझ्यावर असा सहज विश्वास ठेवावासा वाटेल, असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. माझ्या या वाटण्याला पूर्वीच्या एका अनुभवाची पार्श्वभूमीही होती.   

माझ्या आजोबांनी त्यांच्या संशोधनासाठी केलेले अपार कष्ट मी पाहिले नव्हते, ऐकले मात्र होते. पण हवी असणारी पुस्तके मिळवण्यासाठी लागेल ते करण्याची त्यांची तयारी मी अनेक वेळा पाहिली होती. वयाच्या सत्तरीनंतर, तब्येत फारशी साथ देत नसताना त्यांनी जे संशोधनाचे प्रवास केले तेव्हा निदान चार-पाच वेळा तरी मी त्यांच्यासोबत गेलो होतो. संशोधनाची साधने मिळविण्यासाठीची त्यांची धडपड पाहून मी भारावून जायचो. एकदा हैदराबादजवळच्या एका छोट्या गावात नरसिंहाचे एक लहानसे देऊळ पाहायला आबा, माझी मावशी आणि मी असे आम्ही तिघे गेलो होतो. त्या देवस्थानाच्या ट्रस्टने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाची एक प्रत देवस्थानाच्या ऑफिसमध्ये होती आणि ती काही करून आबांना हवी होती. तिथले लोक मात्र ती कुठल्याच स्वरूपात द्यायला अजिबात तयार नव्हते. फोटोकॉपी करायला म्हणून प्रत दिली तर ती परत यायची खात्री काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर एका क्षणाचाही विचार न करता आबा  म्हणाले, “माझी मुलगी आणि माझा नातू इथेच तुमच्यापाशी थांबतील, मी गाडी घेऊन जाऊन फोटोकॉपी काढून आणतो, तुम्हाला पुस्तक परत करतो आणि मग या दोघांना घेऊन जातो!” ते पुस्तक घेऊन आबा परत येईपर्यंत खरोखरच आम्ही दोघे त्या देवळात, तिथल्या लोकांच्या डोळ्यासमोर ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून बसून होतो! माझा जर्मनीतला अनुभव मात्र याच्या नेमका उलटा होता. 

मी पीएच.डी. करतोय आणि तेही जर्मन साहित्यामध्ये, हे ऐकल्यावर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या, इतर विषय शिकणाऱ्या समवयस्क जर्मन मित्र-मैत्रिणींपासून ते विविध सेमिनार्समध्ये भाग घेतल्यावर इतर प्राध्यापकांपर्यंत, तसेच इथल्या पुस्तक विक्रेत्यांकडून आणि ग्रंथालयांकडून मला जे कौतुक आणि प्रतिष्ठा मिळते, त्याचा अनुभव घेताना सतत आबांच्यावतीने हे मी अनुभवतो आहे असे मला वाटत राहते. कारण त्यांना जर इथे येऊन संशोधन करण्याची संधी मिळाली असती, तर इथल्या विद्वानांनी त्यांचे काम अक्षरशः डोक्यावर घेतले असते, याबाबत मला शंका नाही!  

मी राहत असलेल्या हॉस्टेलमध्येही सगळ्यांना माझ्या पीएच.डी.च्या टप्प्याविषयीची जाणीव आणि विशेष कौतुक आहे. हॉस्टेलमेट्सचा एकूणच खूप चांगला अनुभव मी घेतो आहे. इंजिनिअरिंग, मेडिकलपासून अगदी भूगोल आणि बी.एड.पर्यंत अनेक विषयांची पार्श्वभूमी असलेल्या जर्मन तसेच इतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मी संपर्कात आलो तो या हॉस्टेलमुळे. काहींशी तर खूप छान मैत्री झाली. या हॉस्टेलमध्ये पीएच.डी. (आणि तीही जर्मन साहित्यामध्ये) करणारा मी एकमेव विद्यार्थी असल्यामुळे माझ्या अभ्यासाचे नेमके स्वरूप काय याची त्यांना कल्पना नव्हती. पण त्या सगळ्यांनी माझा अभ्यास, माझ्या पीएच.डी.चा विषय अतिशय उत्सुकतेने आणि मनापासून समजून घ्यायची तयारी दाखवली. एखादी गोष्ट समजली नाही, तर मला थांबवून प्रश्नसुद्धा विचारले. कुठलीच सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण होण्याचे मला बंधन नसल्यामुळे त्यांच्या परीक्षांच्या काळात मी तसा मोकळा असतो. ते पाहून माझा हेवा न वाटता मी या टप्प्यापर्यंत येण्यासाठी खूप कष्ट घेतले असणार, असे गृहित धरून त्यांना माझे कौतुकच करावेसे वाटते, ही माझ्यासाठीही उत्साहवर्धक गोष्ट आहे! शिक्षणासाठी किंवा नोकरी-व्यवसायासाठी परदेशात स्थिरावलेल्या आपण भारतीयांनीही या गोष्टीचं अनुकरण करायला हरकत नाही, असे मला वाटले.  

आतापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक प्रवासातून मला एक गोष्ट नक्की कळली आहे; पीएच.डी. हा शैक्षणिक जीवनाचा असा टप्पा आहे, जो पार करणे तेव्हाच शक्य असते, जेव्हा या विषयात आत्तापर्यंत का प्रवास केला आहे या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतःसाठी शोधतो! कुणाच्या आग्रहामुळे किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली डिग्री म्हणून जर कुणी पीएच.डी. करायला घेतली, तर ती कदाचित पूर्ण होईलही, पण त्यातून आपण काय शिकलो, आपली किती आणि नेमकी कोणत्या प्रकारे प्रगती झाली आहे, आपल्या अभ्यासामुळे आपल्याला कोणती नवी दृष्टी मिळाली आहे, हे कळणे फार कठीण असेल! 

साहित्य, नाटक, सिनेमा यांसारख्या कला आपले रोजचे आयुष्य, आपल्या कुटुंबासोबतची, मित्रांसोबतची आणि व्यवसायामुळे जोडली गेलेली नाती यांकडे आपल्याला नव्याने पाहायला प्रवृत्त करू शकतात, हे एक कारण साहित्याचा आधार घेत पुढे जायला, आणखी अभ्यास करण्यासाठी मला प्रोत्साहन द्यायला पुरेसे होते. साहित्याकडून आधीपासून कुठलीही अपेक्षा न करता एखादी साहित्यकृती आपल्याशी संवाद साधू शकते का? ती वाचून आपल्याला आपल्या स्वतःच्या वागण्याकडे बघावेसे वाटेल का? एखादी कथा आपल्याला आपण केलेल्या चुका मान्य करण्यातला आनंद दाखवू शकेल का? हे प्रश्न आणि त्याबरोबर येणारी उत्सुकता मनात बाळगून आपण साहित्य वाचले, तर कदाचित त्या प्रश्नांवर सकारात्मक उत्तरसुद्धा मिळेल. आणि मग साहित्यशास्त्र हे काही आकाशातून पडलेले नसून आपल्यासारख्याच वाचकांनी त्याला जन्म दिला आहे आणि आपल्यासारख्या ‘सामान्य’ वाचकांसाठीच ते आहे, हे हळूहळू लक्षात यायला लागते. मग साहित्यामध्ये पीएच.डी. हा पूर्णविराम नसून खूप लांबच्या मार्गावरचा हा एक मैलाचा दगड आहे, आपले स्वतःचे आयुष्य आणि आपल्याशी जोडली गेलेली इतरांची आयुष्ये आणि त्यांचे अनुभव हे समजून घेण्याची ही संधी आहे, असे वाटायला लागते. महाकवी शिलरच्या शब्दात सांगायचे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी, निसर्गाने दिलेल्या जन्माचे चीज होण्यासाठी, म्हणजेच माणूस म्हणून स्वतःला घडवण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी असा अभ्यास महत्त्वाचा वाटू लागतो!

संबंधित बातम्या