सिंधू नदी... भारताच्या इतिहासाची साक्षीदार!

रूपा देवधर
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

विशेष

सिंधू नदीशी निगडित इतिहासाचा पट महाकाय आहे. एका छोट्या लेखात तो मावणं अशक्य आहे, तरीही या प्राचीन इतिहासाचा वेध घेण्याचा, भारतीयविद्येच्या संदर्भात नजर टाकण्याचा हा प्रयत्न.

वर्षा ऋतू नुकताच संपलाय. त्याचं नातं भारतीय संस्कृतीशी आणि नद्यांशी जोडलेलं आहे. या काळात नद्यांना पूर येतात. जीवनदायिनी नद्या कधी प्रसन्न होतात तर कधी कोपतात. भारतात देवता मानल्या जाणाऱ्या नद्यांचे पूजा - उत्सव केले जातात. इतकंच नाही, तर रोजच्या स्नानाच्यावेळी नद्यांनी येऊन हे पाणी पवित्र करावं यासाठी प्रार्थना केली जाते. 

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन संनिधिम कुरु ।।

या प्रातःकालीन प्रार्थनेतील सिंधूनं मला जरा जास्तच आकर्षित केलं. इंडॉलॉजीमध्ये एमए करत असताना प्रत्येक वळणावर ही भेटत गेली. 

सुरुवात सिंधू संस्कृतीपासून झाली. नंतर पाणिनी - अलेक्झांडर - डरायसबद्दल ऐकताना, प्राचीन वाङ्‌मयाचा इतिहास - सम्राट अशोकाचे शिलालेख - इंडोग्रीकांची नाणी - कनिष्काचं साम्राज्य - रेशीममार्गावरील व्यापारी आणि बौद्ध भिक्षूंचे प्रवास याबद्दल शिकताना कुठेतरी कळत नकळत पार्श्वभूमीला ही असायचीच. लक्षात आलं, केवढा इतिहास पाहिला आहे या नदीने! 

सिंधू नदीनं आणि वायव्य भारतानं मला हळूहळू कब्जात घ्यायला सुरुवात केली. नक्की कुठे उगम पावते ही? कुठून कुठे प्रवास करते? नेमकं काय काय घडलं या नदीकाठी? परदेशातून प्रवासी - व्यापारी - आक्रमक आले तेव्हा नदी त्यांनी कुठे ओलांडली? 

एखादा मुद्दा आठवून इथे तिथे संदर्भ शोधणं सुरू झालं. इंडॉलॉजीच्या गुरुजींची लेक्चर्स ऐकू यायला लागली. भारतीय संस्कृती कोष, एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका, इंटरनेटवरील अन्य काही माहितीकोश हे ‘महागुरू’ मदतीला आले आणि उलगडत गेला एका विशाल नदीचा आपल्याशी असलेला सांस्कृतिक संबंध!  

भारतात सिंधूइतका घडामोडींनी भरलेला इतिहास दुसऱ्या नदीकाठी नाही. भारतीयांच्या मनात आणि हृदयात अढळ स्थान असलेली, हिंदूंच्या धार्मिक विश्वाचा अतूट भाग असलेली विशाल सिंधू नदी. आजही मुलीचं नाव सिंधू ठेवलं जातं. सध्याच्या राजकीय नकाशानुसार मात्र सिंधू नदीचा सर्वांत जास्त भाग वाहतो पाकिस्तानमधून! 

मूळ तिबेटमध्ये उगम पावलेली ही नदी चीन, भारत आणि पाकिस्तान या तीन देशांमधून वाहते. तिबेटमधल्या ‘लेक मापाम’ म्हणजेच मानसरोवराजवळ उगम पावलेली सिंधू, वळणं घेत लडाखमधून पुढे गिलगिट, बाल्टिस्तान, स्कार्डू, अटक, खैबर पख्तुनख्वा, पंजाब, सिंध असा मोठा प्रवास करून दक्षिणेला कराचीजवळ अनेक मुखांनी अरबी समुद्राला मिळते. 

या सर्व प्रवासात तिला वाटेत लागतात अनेक पर्वत, दऱ्या, अरण्यं. अनेक नद्या येऊन मिळतात. तिचा प्रवाह मोठा होत जातो. आणि हे कैक, हजारो वर्षं चालू आहे. 

नदी तीच आहे. भूगोल थोडा बदललाय आणि इतिहास मात्र सतत बदलत गेलाय. सिंधूच्या साक्षीनं, तिच्या काठांवर हजारो वर्षें इतिहास निर्माण झाला. युद्धांचा इतिहास, आक्रमणांचा इतिहास, संस्कृतींचा, मूर्ती आणि शिल्पांचा, भांड्यांचा, नाण्यांचा आणि साहित्य - व्याकरणाचाही! 

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांच्या गटात सिंधू महत्त्वाची नदी आहे. ज्या ठिकाणी ती उगम पावते तो १५ हजार फुटांवरचा मानसरोवराचा परिसर हिंदूंसाठी पवित्र आहे. त्सो माफाम (Tso Mapham) हे सरोवराचं मूळ तिबेटी नाव आहे, तर सेंगे झांगबो (Sengge Zangbo) हे सिंधूचं तिबेटी नाव. जिथे या नदीचा जन्म झाला, तिथलं - पाळण्यातलं नाव! 

वेदांमध्ये सिंधूला अत्यंत पवित्र मानलं आहे. सिंधू, वितस्ता (झेलम), असिक्नी (चिनाब), परुष्णी (रावी), विपाशा (बियास), शुतुद्री (सतलज), सरस्वती या प्राचीन नावांनी सप्तसिंधूचे म्हणजे या सात नद्यांचे उल्लेख आहेत. ऋग्वेदातील नदीसूक्तात सिंधूचं काव्यमय वर्णन केलं आहे. सिंधुसूक्तही आहे. त्यात तिच्या पर्वताकडून पठाराकडे वाहणाऱ्या पाण्याचा उल्लेख आहे, त्या पाण्याच्या रौद्र आवाजाचं वर्णन आहे, भूमी सुजलाम सुफलाम करण्याचं आणि तिच्या नवयुवतीप्रमाणे असणाऱ्या रमणीय सौंदर्याचंही वर्णन आहे. 

ऋग्वेदात वर्णन असलेल्या दाशराज्ञ युद्धात विजयी झालेल्या सुदा राजानं सिंधू आणि इतर नद्यांची, ओलांडू द्यावे म्हणून स्तुती केली आहे. सिंधुसूक्तामध्ये इतर नद्या व सिंधूच्या उपनद्यांचा उल्लेख आहे. याला भौगोलिक महत्त्व आहे. वेदसाहित्यातील सप्तसिंधूच्या उल्लेखांमुळे पंजाब व वायव्य भारताचा हा प्रदेश वैदिकांचा भूभाग होता असं कळायला मदत होते. सिंधू नदीच्या पाण्यात स्नान केलं असता अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविक हिंदूंची श्रद्धा असते. सिंधी लोकांसाठीही सिंधू नदी पूजनीय असून ‘उडेडोडाल’ हा सिंधू देवतेचा मानवी अवतार होता असं मानतात. नदीची दिवे सोडून पूजा केली जाते. नदीला पूर येतो तेव्हा ‘चालीहो’ हा उत्सव केला जातो. 

सिंधूच्या पश्चिमेस, इराणमध्ये ‘स’ ला ‘ह’ म्हणत असल्याने सिंधूचा उल्लेख ‘हिंदू’, ‘हप्तहिंदू’, असा होऊन तेच नाव या लोकांना, प्रदेशाला मिळालं.  पाश्चिमात्यांनी यावरून ‘इंडस’ हे नाव दिलं. त्यावरून ‘इंडिया’ हा शब्द आला. 

हिमालयातून उगम पावणारी ही नदी जगातील सर्वांत लांब नद्यांपैकी एक आहे. डाव्या किनाऱ्यानं झंस्कार, सुरु, सोन, तसेच  झेलम - चिनाब - रावी - बियास - सतलज यांनी बनलेली पंचनद, तर उजव्या किनाऱ्यानं श्योक, हुंझा, गिलगिट, स्वात, कुनार, काबूल इत्यादी नद्या सिंधूला येऊन मिळतात. प्रवासात ती अनेक नावं धारण करते. ‘सिंग गे चू’, ‘आबसीन’, ‘नीलआब’ अशी काही नावं आहेत. जवळजवळ अर्धा भाग ती हिमालय, काराकोरम पर्वतरांगांच्या पायथ्याशी खळखळून नंतर पाकिस्तानातील अटकजवळ पठारी प्रदेशात येते. तिथून वळणं घेत, एकूण ३२०० किमी प्रवास करत, वार्षिक २४३ घनकिमी पाणी वाहून नेते. वाटेतले आजच्या पाकिस्तानातले सिंध आणि पंजाब हे कमी पावसाचे प्रदेश आहेत. धरणं बांधून, कालवे काढून हा मोठा प्रदेश भिजवला आहे. सिंधूला दोनदा पूर येतो. पाकिस्तानची ही जीवनदायिनी अनेक पिकं काढत, गावांना प्यायचं पाणी पुरवत पुढे जाते. 

सिंधूकाठी झालेली संस्कृतींची सरमिसळ

कधी साम्राज्यविस्तारासाठी, तर कधी संपत्तीची लूट करण्यासाठी, प्राचीन काळापासून वायव्येकडून भारतात परकीयांची आक्रमणं होत राहिली. नकाशात पाहिलं तर दिसतं, की आजच्या भारतात येण्यासाठी सिंधू ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. पूर्ण भारताला वळसा घालून, जणू एक संरक्षक प्रवाह बनूनच ती समुद्राला मिळते. 

इ.स.पूर्व पाचव्या शतकातील डरायस पहिला, तसंच अलेक्झांडर, नंतरचे शक पहलव कुषाण, अफगाणी गझनीचा महमूद, बाबर, नादिरशहा, अहमदशाह दुर्रानी इत्यादींनी भारतीय प्रदेशात आक्रमणं केली. त्यांनी मुख्यतः खैबरखिंडीतून प्रवेश केला, तरी सिंधू ओलांडल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. पर्वतीय प्रदेशात जिथे प्रवाह लहान असतो, तिथे नदी ओलांडून, मुख्यतः अटक या ठिकाणी पहिला पडाव असे. सर्वांनी साधारण याच ठिकाणी सिंधू ओलांडली. हेच ते अटक, जिथे रघुनाथराव पेशव्यांनी झेंडे रोवले. आज नकाशा पाहिला तर कळतं, त्याकाळी पुण्यापासून घोडे दौडवत, वाटेतला प्रदेश आणि शत्रू पार करत अटकेपर्यंत जाणं आणि किल्ल्यावर ताबा मिळवणं किती कठीण असणार ते! काबूल नदी जिथे सिंधूला मिळते, त्या महत्त्वाच्या ठिकाणी हा अटकचा किल्ला अकबरानं इ.स. १५८३ साली बांधवला, तो मुख्यतः सिंधू ओलांडून येणाऱ्या अफगाण आक्रमकांना रोखण्यासाठी. हा किल्ला नंतरही सर्व राजकारणात अत्यंत महत्त्वाचा ठरला. मुघल, अफगाण, शीख, ब्रिटिश सर्वांना तो आपल्या ताब्यात हवा असे. सध्या तिथे पाकिस्तानी लष्कराचं कार्यालय आहे. 

अशी विविध आक्रमणं झेलून, अनेक स्थलांतरितांना आपलंसं करत, कधी रोखत या वायव्य भारतात विविध संस्कृतींची सरमिसळ होत राहिली. वेगवेगळ्या भाषा, लिपी, धर्म-पंथ, साहित्य- व्याकरण, शिल्पं-मंदिरं-देवता यांची देवाण घेवाण आणि नवीन निर्मिती होत राहिली. 

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात चीनमधून सुरुवात झालेल्या रेशीममार्गाचा या देवाणघेवाणीत मोठा वाटा होता. ग्रीस, रोम, पर्शिया, अफगाणिस्तान, भारत, चीन, पूर्वेकडील देश या सर्व भागांत रेशमी उपमार्गांचं जाळं पसरलं होतं. ताम्रलिप्ती ते तक्षशिला हा उत्तरापथ (आजचा ग्रँड ट्रंक रोड) पूर्वीचा रेशीम मार्गावरचा महत्त्वाचा रस्ता होता. व्यापारामुळे हा भाग समृद्ध झाला होता. 

रेशीममार्गावरील प्रवासात व्यापाऱ्यांच्या सोबतीने भिक्षूही प्रवास करत. सिंधू सर्वांनी ओलांडली. आक्रमकांनी, व्यापाऱ्यांनी तसंच बौद्धभिक्षूंनीही. या भिक्षूंबरोबरच बौद्ध धर्म चीन आणि पश्चिम आशियात पोचला.  चीनमधून फाहिएन, श्वान झान्ग (ह्यू एन त्संग) सारखे बौद्ध भिक्षू भारतात याच भागातून आले गेले. हिंदू आणि बौद्ध शिल्पं, मंदिरं आणि धार्मिक साहित्य या भागात मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं. 

बहरलेल्या प्राचीन संस्कृती
या विशाल नदीकाठी अनेक संस्कृती निर्माण झाल्या. सर्वांना माहीत असलेली म्हणजे प्राचीन सिंधू संस्कृती, जिला आता सिंधू- सरस्वती किंवा हडप्पा संस्कृती म्हणून ओळखलं जातं. पण त्याही आधी नवाश्मयुगीन संस्कृती होत्या. मेहरगढ हे त्यांपैकी एक - उत्खननातून कळलेलं स्थळ आहे. (इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ३०००). या नवाश्मयुगीन संस्कृतीचे धागेदोरे हडप्पा संस्कृतीपर्यंत सलगपणे टिकलेले आहेत. तेथील उत्खननात टेराकोटामधील मातृका, मानवी आकृती, मातीची भांडी, दफनं सापडली आहेत. 

नंतरचा मोठा टप्पा येतो तो हडप्पा संस्कृतीचा. सिंधू नदीच्या काठी विकसित झालेली ही संस्कृती भारतीय उपखंडातलं पहिलं नागरीकरण म्हणून ओळखली जाते.  काळ अंदाजे इ.स.पूर्व ३५०० ते इ.स.पूर्व १३००. ही विकसित संस्कृती काळाच्या ओघात जमिनीखाली गेली होती. १९२२-२४ च्या सुमारास रेल्वे कामगारांना अपघातानंच त्याचा शोध लागला. तेव्हाचे पुरातत्त्व विभागाचे (ASI) अधिकारी जॉन मार्शल यांनी शिस्तबद्ध उत्खनन, संशोधन, टिपणं करून भारत, इंग्लंड येथून लेख प्रसिद्ध केले आणि प्राचीन मेसोपोटेमियन, सुमेरियन संस्कृतीला समकालीन अशी ही संस्कृती जगासमोर आली. हडप्पा संस्कृतीची दृश्य वैशिष्ट्यं म्हणजे तेथील नगररचना, स्नानगृह, तसंच (माती, सोनं, तांबं, शंखशिंपले, हस्तिदंत, दगड यांपासून बनवलेले) दागिने, खेळणी, विविध मुद्रा, नर्तकी - धर्मगुरू यांचे पुतळे, भांडी, मणी, दफनं, कलाकुसरीच्या वस्तू इत्यादी. यातली मोहेंजोदारो नर्तकी सध्या दिल्ली संग्रहालयात आहे. 

हडप्पन लिपी मात्र अजून वाचता आलेली नाही. ती वाचता येईल, तेव्हा सिंधू खोऱ्यातील कितीतरी गुपितं उलगडतील. तरी समकालीन मेसोपोटेमियन राजाच्या अभिलेखावरून त्यांचा व ‘मेलुहा’ म्हणजेच हडप्पा संस्कृतीतील लोकांचा असलेला समृद्ध व्यापार कळतो. हडप्पाहून मेसोपोटेमियाला जात असलेल्या वस्तूंमध्ये सोनं, तांबं, लाकूड, हस्तिदंत, लॅपिस लॅझुलीसारखे मौल्यवान दगड, तसंच काही प्राणी पक्षी - मोर, माकड, कुत्रा, मांजर इत्यादीही होते. हडप्पाकडे येणाऱ्या वस्तूंमध्ये धान्य, लोकर, चांदी, रंग, मासे यांचा समावेश होता. 

आंतरराष्ट्रीय व्यापार, सुनियोजित शहरं, कलात्मक वस्तू - भांडी निर्माण करणाऱ्या, लेखनकला अवगत असलेल्या अशा या समृद्ध संस्कृतीला इ.स.पूर्व १७०० पासून उतरती कळा लागली आणि इ.स.पूर्व १३००-१२०० पर्यंत ती पूर्णपणे नष्ट झाली. नैसर्गिक, तसंच मानवी कारणं असावीत असा संशोधकांचा अंदाज आहे. काही अभ्यासकांच्या मते शेवटच्या टप्प्यातील हडप्पन कालखंड हाच वैदिक कालखंड आहे. भूभागही तोच आहे. 

मौर्य साम्राज्याच्या खाणाखुणा
इसपूर्व तिसऱ्या शतकातलं मौर्य सम्राट अशोकाचं विशाल साम्राज्य याही भागात होतंच. अशोकाचे महत्त्वपूर्ण शिलालेख त्याच्या साम्राज्याच्या सर्व सीमांवर आहेत. सिंधू खोऱ्यातील खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील मानसेहरा आणि पेशावरजवळील शाहबाझगढी येथेही हे लेख प्राकृत भाषा आणि खरोष्ठी लिपीत दिसतात. अशोकाच्या धर्माज्ञा त्याच्या सूचनेनुसार स्थानिक भाषेत आणि लिपीत असत. 

इंडोग्रीक, सिथिअन, पार्थिअन, कुषाण राजवटी
सिंधू आणि तिच्या उपनद्यांकाठची प्राचीन शहरं आपल्या इतिहास आणि परंपरांशी जोडलेली आहेत. आजही पाकिस्तानमध्ये, सिंधूच्या खोऱ्यात आणि परिसरात या खुणा दिसतात. महत्त्वाच्या स्थापत्यांमध्ये मुलतानचं आदित्य मंदिर, सिरकॅप येथील बौद्ध स्तूप, रावळपिंडी येथील अनेक मंदिरं व स्तूप, काटसराज मंदिर -पंजाब, कराचीचं वरुणमंदिर, सिंधू नदीतील सहा मंदिरं यांचा उल्लेख केला जातो. 

या नद्यांकाठची इतिहासातली महत्त्वाची शहरं म्हणजे तक्षशिला, लाहोर, मुलतान, पेशावर, कराची वगैरे.

कराची (बार्बरीकॉन) हे रेशीममार्गावरील महत्त्वाचं बंदर होतं. रावी नदीकाठचं लाहोर म्हणजे पूर्वीचं शालातुर किंवा छोटा लहुर. येथेच पाणिनीनं इसपूर्व सहाव्या शतकात संस्कृत व्याकरण चौकटीत घट्ट बसवलं. 

तक्षशिला हे सिंधू आणि झेलम यांच्या मधल्या भागात वसलेलं, संस्कृती समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण! तिथे मोठं विद्याकेंद्र होतं. ग्रीक - गांधार शिल्पकला, व्यापार, विविध कला यांच्या शिक्षणाची सोय होती.  

तक्षशिला येथे ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम, जॉन मार्शल इत्यादींनी महत्त्वपूर्ण उत्खननं केली. त्यात मौर्यांनंतरच्या इंडोग्रीक, शक, पहलव, राजांची नाणी मिळाली आहेत. केवळ नाण्यांच्या आधारेच या राजांचा बराचसा इतिहास कळतो. (इ.स.पूर्व २रे ते इ.स.चे १ले शतक हा काळ).

इंडोग्रीक म्हणजे अलेक्झांडरच्या सरदारांचे वंशज. अपोलोडोटस, अगॅथॉक्लेस, पँटेलिऑन, मिनान्डर अशा काही इंडोग्रीक राजांनी इथे सव्वाशे वर्षं राज्य केलं. नाण्यांवर कृष्ण, बलराम, लक्ष्मी अशा हिंदू देवतांची चित्रे घातली, ग्रीकबरोबर प्राकृत भाषा आणि  ब्राह्मी - खरोष्ठी लिपीही वापरली. मिनान्डर राजा आणि नागसेन भिक्षू यांचा संवाद ‘मिलिंदपन्ह’ या ग्रंथात प्रसिद्ध आहे. इंडोग्रीक राजांनी गांधारमध्ये अनेक बौद्ध स्तूप उभारले. अझिलायझेस, गोंडोफर्नेस अशा शक आणि पहलव (सिथियन, पार्थियन) राजांनीही हिंदू देवता आणि प्राकृत भाषा, खरोष्ठी लिपी नाण्यांवर वापरली. 
यानंतर होता कुषाण

साम्राज्याचा महत्त्वपूर्ण काळ! 
मुळात मध्य आशियातून आलेल्या या टोळीवाल्या कुषाणांचं इ.स. पहिलं ते तिसरं शतक या काळात वायव्य भारतात बलाढ्य साम्राज्य होतं. त्याच्या सर्वोच्च काळात हे साम्राज्य दक्षिण रशिया, अफगाणिस्तान, पंजाब, काश्मीर, मथुरा इथपर्यंत पसरलं होतं. कुषाणांनी भारतातली पहिली सोन्याची नाणी पाडली. त्यांच्या नाण्यांवरसुद्धा शिव, उमा, कार्तिकेय, बुद्ध यांच्या प्रतिमा इतर इराणी, ग्रीक देवतांबरोबर दिसतात. कुषाण सम्राट कनिष्काची पुरुषपूर (पेशावर) ही राजधानी होती. त्याच्या काळात समृद्धी तर होतीच, पण कला, साहित्य यांनाही आश्रय होता. नाटककार आणि कवी बुद्धघोष त्याच्या दरबारी होता. बौद्ध धर्माचे काही प्रश्न सोडवण्यासाठी कनिष्कानं पुढाकार घेऊन चौथी संगीती (संमेलन) काश्मीरमध्ये बोलावली होती. 

गांधार कला
कलेच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुषाण काळात विकसित झालेली शिल्पकला. गांधार (आणि मथुरा) या ठिकाणी कुषाणकाळात मोठ्या प्रमाणावर दगडातील शिल्पं निर्माण होऊ लागली. गांधार शैलीतली पहिलं ते तिसरं शतक या काळातली शिल्पं मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात मिळाली आहेत. ग्रीक शैलीचा प्रभाव असलेली, मुख्यतः बुद्ध व बुद्धकथा यांचं अंकन असलेली ही महत्त्वपूर्ण शैली या भागात विकसित झाली. प्रमाणबद्ध शरीरं, रेखीव अवयव, भारतीय व्यक्तिरेखा, पण परकीय चेहरे- वेशभूषा ही वैशिष्ट्यं असलेली गांधारकला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. उभा बुद्ध, हारिती व पांचिक, हाडांचा सापळा झालेला बुद्ध, वज्रपाणि अशी अनेक शिल्पं दिसतात. ती सध्या पाकिस्तान तसंच जगातील अनेक संग्रहालयांमध्ये आहेत. 

पुढचा मोठा काळ विविध राजवटी आणि आक्रमणं, राजकीय घडामोडींचा राहिला. 

तिसरं ते सहावं शतक या काळात गुप्तांची राजवट इथेही होती. गुप्त काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. सर्वोच्च दर्जाचं साहित्य, शिल्पकला, सोन्याची सुबक नाणी या समृद्ध काळात निर्माण झाली. नंतर मात्र हूणांच्या सततच्या आक्रमणांमुळे गुप्त साम्राज्य खिळखिळं होऊन मग लयाला गेलं. 

त्यानंतर ससॅनिअन, हूण, वर्धन, तोमर, प्रतिहार यांची  वायव्य भारतात सत्ता होती. ९वं  ते ११वं शतक या काळात काबूलच्या (हिंदू) शाही राजांनी काबूल, पेशावर, लाहोर येथे राज्य केलं. अनेक आक्रमणं होत गेली,  मुघल, अफगाण, मराठे, शीख, ब्रिटिश यांच्या ताब्यात हा भाग येत गेला. 

आजची परिस्थिती
१९४७ नंतर सिंधू नदीचा मोठा भाग पाकिस्तानचा झाला. नद्यांच्या पाण्यावरून प्रश्न निर्माण होऊ लागले. सप्टेंबर १९६०मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला. सिंधू आणि तिच्या उपनद्यांची वाटणी झाली. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयुबखान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

काळाच्या ओघात या पवित्र सिंधू नदीचं स्वरूप खूपच बदललं आहे. पाकिस्तानची जीवनदायिनी म्हणून सिंधूचं स्थान आहे, पण प्रदूषणाचाही मोठा प्रश्न आहे! शहरी कचरा, औद्योगिक कचरा, प्रक्रिया न केलेलं सांडपाणी, अशा गोष्टींनी सिंधू प्रदूषित होते आहे. समुद्रात नद्यांद्वारे जो प्लॅस्टिकचा कचरा जमा होतो, त्यात ती जागतिक प्रदूषणात वरच्या क्रमांकावर आहे. 

रोजच्या जीवनात संबंध येत नसला, तरी भारतीयांच्या मनात सिंधूला श्रद्धास्थान आहे. मात्र भारताच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या, भारतीयांशी भावनिक बंध असलेल्या, विशाल, सुंदर, खळखळत्या सिंधूचं पावित्र्य आणि स्थान  -‘स्वच्छ वाहणारी नदी’- म्हणून पुन्हा निर्माण व्हावं, असंच कोणत्याही निसर्गप्रेमीचं मत असणार हे नक्की!!

संबंधित बातम्या