‘अजूनही प्रवास सुरूच...’

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 7 मार्च 2022

विशेष

एक श्रोता म्हणून, कलाकारांबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. रंगमंचावर नसताना ते कसे असतात, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीतले चढ-उतार, त्यांचे वेगळेपण वगैरे जाणून घ्यायलाही रसिकांना नेहमीच आवडते. म्हणूनच, संगीत क्षेत्रातल्या गायक, वादक, संगीतकार, कंपोजर, अरेंजर अशा वेगवेगळ्या कलाकारांचा प्रवास या सदरातून तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न...

प्रियांका बर्वे.. संगीत क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. तिची गाणी असोत, म्युझिक व्हिडिओ असोत, ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असो, संगीत नाटक असो, किंवा ‘मुघले आज़म’सारखी कलाकृती असो, तिने प्रत्येक संधीचं सोनं करत उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या. तिच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा...

गेल्या दहा वर्षांत तुझी सांगीतिक कारकीर्द जोमानं बहरत आहे, ही वाटचाल तुझ्या ध्यानीमनी नियोजित होती का संधी आल्या तशा तू फक्त घेत गेलीस?
प्रियांका बर्वे : खरं सांगायचं तर मी या सगळ्याची कुठेतरी कल्पना केलेली होती. माझी आजी, मालती पांडे बर्वे, आजोबा पद्माकर बर्वे, माझी आई संगीता बर्वे आणि बाबा राजीव बर्वे या सगळ्यांनी जसं या क्षेत्रात काम केलं आहे, तशाच प्रकारे उत्तम लोकांबरोबर, मला उत्तम काम करायचं आहे हे कायमच डोक्यात पक्क होतं. आयुष्यात ध्येय निश्चित होतं, वाट फक्त शोधायची होती. चांगलं काम मिळवण्याचा आणि करण्याचा माझा प्रवास अनेक वर्षं सुरू होता आणि तो अजूनही सुरूच आहे. हा प्रवास सुंदर आहे आणि त्याचा मी खूप आनंद घेत आहे. प्रवास खूप लांबचा आहे पण मी योग्य वाटेवर आहे याची मला खात्री आहे.

तुझ्या बरोबरच्या इतर गायिका आणि तुझ्यामध्ये कुठलं वेगळेपण तुला दिसतं?
प्रियांका बर्वे : एक पार्श्वगायिका म्हणून मला माझी ओळख निर्माण करायचीच होती. घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण असूनसुद्धा मला पार्श्वगायनच करायचं आहे हे माझ्या डोक्यात पक्क होतं आणि ते मी केलंच. पण खऱ्या अर्थी माझं वेगळेपण म्हणजे मी एक गायिका अभिनेत्री आहे.

आपण शास्त्रीय संगीत गावं असं कधी तुला वाटलं नाही का?
प्रियांका बर्वे : खूप वाटतं आणि आता ते जास्त जाणवतं. मी माधुरी जोशींकडे अनेक वर्षं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहे. माझं सासर आणि माहेर, दोन्हीकडून मला शास्त्रीय संगीतासाठी खूप मार्गदर्शन मिळत असतं. शिवाय माझ्या वडिलांची खूप इच्छा होती, मी शास्त्रीय संगीत गायिका व्हावं, पण माझ्या डोक्यात ते मुळीच नव्हतं. मला लहानपणापासून पार्श्वगायनच करायचं होतं आणि माझा आवाजही त्याच पठडीतला होता. लहानपणी मी वडिलांना सांगत असे, ‘मोठी झाल्यावर मी शास्त्रीय गायिका होईन.’ पण अजून तरी तसं झालेलं नाही.

या सांगीतिक प्रवासात कुठल्या चुका घडल्या का?
प्रियांका बर्वे : चुका नाही, पण एक मोठी चूक होता होता राहिली. ‘मुग़ल-ए-आज़म’ या नाटकात काम करण्यासाठी मला फोन आला. ते एक हिंदी नाटक होतं. सगळी हिंदी कास्ट आणि सगळे अनोळखी लोक त्यात होते. मी तोपर्यंत फक्त मराठी लोकांबरोबर काम केलं होतं आणि म्हणून हे काम माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं. नक्की कोण लोकं असतील, कशी असतील याबद्दल ही मी जरा साशंक होते आणि म्हणून मी त्यात फार रस दाखवला नाही. त्यांचा परत एकदा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला भेटायला बोलावलं. सुदैवानं फोन आला तेव्हा मी मुंबईलाच निघाले होते. प्रत्यक्ष भेटून ‘नाही’ म्हणावं या हेतूनं मी त्यांना भेटायला गेले. तिकडे गेले तेव्हा सगळा अंदाज घेतल्यावर मला लक्षात आलं की ही एक नामी संधी आहे. इतकी वर्षं हेच मला करायचं होतं. अर्थातच मी होकार दिला आणि एक मोठी चूक होता होता राहिली.

प्रत्येक कलाकाराच्या सांगीतिक कारकिर्दीत चढ उतार असतात. तुझ्या आयुष्यात असा कुठला उतार तू अनुभवलास?
प्रियांका बर्वे : सन २००९मध्ये मी ‘सारेगमप’ या रीअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि दुसऱ्याच भागात माझं गाणं तितकसं चांगलं झालं नाही. तो दिवस माझा नव्हता आणि मी त्या स्पर्धेतून बाहेर पडले. माझ्यासकट सगळ्यांनाच तो एक धक्का होता आणि असं कुणालाच  अपेक्षित नव्हतं. मला अजूनही तो मुंबई पुणे प्रवास आठवतो. प्रवासात कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. कुणीच मला काही म्हटलं नाही. पण मला ते खूप लागलं. त्यानंतर मात्र मी मागे वळून बघितलं नाही. मी खूप काम केलं. मला वाटतं तो प्रसंग माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा होता. आज या घडीला मला त्या अपयशानं काही फरक पडत नाही कारण त्याच लोकांबरोबर, किंबहुना अधिक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर मी आज काम करत आहे. पण तो प्रसंग मला खूप काही शिकवून गेला.

आपल्याकडे दोन भावंडांमध्ये कायमच कळत नकळतपणे तुलना केली जाते. तुझी बहीणही गाते, तर तुम्ही दोघी या तुलनेला कसे सामोरे गेलात?
प्रियांका बर्वे : आत्ता जे चित्र दिसत आहे, हे चित्र आम्ही शाळेत असताना पूर्णपणे वेगळं होतं. प्रांजली माझी बहिण, माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि जास्त निपुण आहे. नुसतं गाणंच नाही, तर तिचा अभिनयही उत्तम आहे. ती चित्रही सुंदर काढते. शाळेत असताना वर्गात कायम तिचा पहिला नंबर असायचा. कायम अभ्यासात बुडालेली असायची. लहानपणी गाणं विशेष न शिकताही ती उत्तम गायची. तिचं प्रचंड कौतुक व्हायचं आणि माझ्याकडे कुणाचं लक्ष नसायचं. पण या तुलनेमुळे आमच्यात कधीच अंतर पडलं नाही. ताई म्हणून मी तिला चार गोष्टी सांगते, शिकवते आणि मला वाटतं आमच्यातल्या प्रेमळ नात्याचं श्रेय आई-वडिलांना द्यायला हवं. पालक पाल्याला कसं वाढवतात आणि त्यांच्यावर कसे संस्कार करतात यानं खूप फरक पडतो.

तुझं माहेर आणि सासर, दोन्हीकडे संगीताची पार्श्वभूमी आहे. तुझे सासरे पं. राजन कुलकर्णी आणि तुझा जोडीदार सारंग कुलकर्णी दोघं सरोद वादक आहेत. तुझं यश आणि मुख्य तुझी प्रसिद्धी, यावर त्यांची काय प्रतिक्रिया असते?
प्रियांका बर्वे : त्यांना माझं खूप कौतुक आहे. त्यांचा खूप पाठिंबा मला कायम मिळतो. सगळेच कलाकार असल्यानं त्यांना सगळ्याची सवय आहे. माझं काम, प्रवास, दौरे हे सगळं त्यांच्या परिचयाचं आहे. मला आणि सारंगला माझ्या सासऱ्यांचं कायम हेच सांगणं असतं, की आधी तुमच्या कामाकडे लक्ष द्या, चांगलं काम करा, मजा करायला संपूर्ण आयुष्य आहेच. मला जे काही नाव आणि प्रसिद्धी आहे, ती सगळी घराबाहेर. घरातल्यांसाठी मी त्यांची सून, बायको आणि आईच आहे.

तू आणि तुझा नवरा एकाच क्षेत्रात असल्याचे काय फायदे तोटे तू सांगशील?
प्रियांका बर्वे : मला तरी फायदेच जास्त दिसतात. आमचा कायम एकमेकांना पाठिंबा असतो. आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. कामातून एकमेकांना प्रेरणा देत असतो. एका क्षेत्रातले असल्याने एकमेकांची मनःस्थिती, भावना, कष्ट, संघर्ष आम्हाला कळतात. तो शास्त्रीय संगीतात असल्याने उपशास्त्रीय गाताना मला त्याची मदत होते आणि तो जेव्हा काही संगीतबद्ध करतो, तेव्हा स्क्रॅच रेकॉर्डिंग करायला माझी त्याला मदत होते.

तोटे म्हणशील तर दोघं याच क्षेत्रात असल्यानं आमचं रोजचं एक वेगळं रुटीन असतं, त्याचा थोडा त्रास होतो. विशेषतः आता युवानच्या जन्मानंतर आमचं संपूर्ण रुटीन त्याच्या भोवती फिरत असतं.

तुझ्या सांगीतिक प्रवासाच्या दृष्टीने कशा बाबतीत तुला असुरक्षितता वाटते?
प्रियांका बर्वे : ‘भविष्यात माझी प्रतिभा कमी झाली तर काय?’ या गोष्टीची मला भीती वाटते. एखादं गाणं ऐकलं की जे वाटतं, ‘हां यात काही तरी वेगळं आहे’; ते जाण्याची भीती वाटते. एक काळ होता जेव्हा काहीच विशेष घडत नव्हतं, तेव्हा खूप असुरक्षितता होती. त्या काळात मग कामासाठी अनेक संगीतकारांना भेटले आणि मग हळूहळू घडी बसत गेली. आता यापुढे काम नसेल अशी भीती नाही वाटत, पण कलेतला तो उत्कृष्ट दर्जा तर कमी होणार नाही ना, याची भीती वाटते.

सामाज माध्यमांना तुझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे?
प्रियांका बर्वे : खूप महत्त्वाचं स्थान आहे. जेवणातल्या मिठासारखी त्याची जागा आहे आणि आता तर आपली ती जीवनशैलीच झाली आहे. कलाकारांसाठी तर समाज माध्यमं खूप महत्त्वाची वाटतात. फेसबुकच्या माध्यमातून मी अनेक मोठ्या लोकांना भेटण्याची सुरुवात केली होती. ज्या लोकांना गाठणं शक्य नसतं, अशा लोकांना गाठण्याची ती जागा आहे. माझे अनेक व्हिडिओ सामाज माध्यमांमधूनच लोकांपर्यंत पोहोचले.

चित्रपटात काम करण्याबद्दल तुझी काय भूमिका होती?
प्रियांका बर्वे : एक काळ होता की चित्रपटात काम करण्याची मला खूप इच्छा होती. मला तशा संधी येतही असतात, पण तिथंही समर्पण लागतं. ते काही सोपं काम नाही. आता मी अशा टप्प्यावर आहे की जिथं एखाद्या गायिका अभिनेत्रीची गरज आहे, अशाच ठिकाणी मला काम करायला आवडेल.

नवकलाकारांना काय सल्ला देशील?
प्रियांका बर्वे : संगीताची आवड असणारे, पण पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी जे रीअॅलिटी शो बघतात, त्यांना दुर्दैवाने हे माहीत नसतं की त्यात रीअॅलिटी कमी आणि भास जास्त असतो. रातोरात मिळणारं यश, होणारं कौतुक यामुळे ते आकर्षित होतात पण त्यामागचे कष्ट त्यांना माहीत नसतात. दहा सेकंदाचा व्हिडिओ करण्यात काहीच वाईट नाही, पण तीन तासांची मैफल पण करता यायला हवी, तरच तो खरा कलाकार हे त्यांना समजणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या