रोजचा एप्रिल फूल...!

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 4 एप्रिल 2022

विशेष

सगळ्यात मोठी फसवणूक आपण करतो ती म्हणजे आपली.. कारण, काहीही करत असताना, आपल्या मोबाईल फोनमुळे त्यातला आत्माच हरवून बसलो आहोत आपण आणि तरी आपल्याला वाटतं आपण खूप मजा करत आहोत. स्वतःची फसवणूकच नाही का ही?

‘ए  सांग नं! कसं करायचं बाबाचं एप्रिल फूल?’ दिवसभर मुलींनी डोक्याला भुणभुण लावली होती. मी सुचवत असलेले कुठलेच प्रस्ताव त्यांना पटत नव्हते. शेवटी कंटाळून, ‘जाऊदे बाबा ! तुम्हीच ठरवा...’, असं म्हणून मी त्यातून काढता पाय घेतला आणि मोकळी झाले. विचार करायचं एक काम वाचलं पण विचार थांबेनात. अशी प्रथा का बरं चालू झाली असावी? सत्यानी आणि खरेपणानी वागणाऱ्यांना एक दिवस मुभा म्हणून? पण आता ती प्रथा चालू ठेवण्यात किती अर्थ राहिला आहे ? रोज पदोपदी फसवणूक करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या आपल्या सारख्यांना त्या एका दिवसाचं काय मेलं कौतुक असावं ?

सकाळ उजाडते तीच मोबाईलच्या दर्शनाने आणि तिथेच होते फसवणुकीची सुरुवात. खोटे इमोजी आणि बऱ्याचशा खोट्या शुभेच्छांचा वर्षाव! खोटी फुलं, खोटे केक, खोट्या मिठ्या आणि खोटंच प्रेम. समोर भेटल्यावर तोंड फिरवणारे, सामाजिक माध्यमांवर मात्र अति भावुक असतात. मग दिवसभर सुरू होतात इन्स्टा आणि फेसबुकचे लाईक्स. प्रत्यक्ष भेटल्यावर कौतुकाची थाप मिळणं अवघड; पण सामाजिक माध्यमांवर मात्र कौतुकाचा पाऊसच जणु! ‘कि ऽऽऽत्ती गोड, कि ऽऽऽत्ती मस्त’ असली उत्तरं देणारे किती लोक पूर्ण पोस्ट वाचतात, ऐकतात किंवा बघतात देवच जाणे. फसवणूक सामाजिक माध्यमांवर होते, का प्रत्यक्षात हेच अजून कळलेलं नाही.

व्हॉट्सअॅपचा एक किस्सा तर या सगळ्याचा कहरच!

खूप वर्षांनी शाळेतल्या मित्र मैत्रिणींच एकदा भेटायचं ठरलं. आजकाल मैत्रीच्या तारा जुळायच्या आधी, व्हॉट्सअॅपचे ग्रुप जमतात. तसा ग्रुप जमला. ठरलेल्या दिवशी भेटी झाल्या आणि गप्पा सुरू झाल्या. मग सुरू झाले ‘सुप्रभात’ आणि ‘शुभ रात्री’चे मेसेजेस, आणि एक दिवस एकानी भल्या पहाटेच मेसेज टाकला... ‘योगिनी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!’ झालं!! कळपातून पुढच्या मेंढराच्या मागे मान खाली घालून जाणाऱ्या मेढरांप्रमाणे प्रत्येकानी योगिनीला डोक्यावर घेतलं पण योगिनीचं काही उत्तर येईना. न धन्यवाद, न इमोजी!! दुपारी फोन बघितल्यावर, पहिला मेसेज पाठवणाऱ्या मित्राच्या लक्षात आलं... अरेच्चा आपला तर ग्रुपच चुकला! मग ‘माफ करा हां, ग्रुप चुकला!’ असं म्हणून त्यानी पोस्ट डिलीट केली.

अशा या बिनबुडाच्या शुभेच्छा!!

सामाजिक माध्यमावरच्या पोस्ट म्हणजे तर निव्वळ फसवणूकच. फोटोमध्ये सगळं सुंदर सुंदर, पण ‘यम्मी’ थाय करीला कशी चव नव्हती... डोंगराची निसर्गरम्यता अनुभवण्यात कशी दमछाक झाली... वीकएंडला ट्रिपला गेल्यावर जेवणाचे कसे हाल झाले... हे कोण लिहिणार? प्रत्यक्षात कशी का परिस्थिती असेना पण समाजमाध्यमांवर मात्र प्रत्येकाचं आयुष्य हेवा वाटावा असंच.

त्या व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजेसची तर गम्मतच वाटते. त्यातून काही ज्ञान मिळतच असेल तर मिळणाऱ्या त्या ज्ञानाच्या दहा टक्के जरी आपल्याला अमलात आणता आलं असतं तरी सगळीकडे रामराज्यच झालं असतं. अमलात आणायचं सोडून केवळ ते फॉरवर्ड करण्यातच आनंद मिळवत बसलो आहोत आपण.

नक्की कुणाची फसवणूक करतो आपण, जगाची का स्वतःची?..!  हेच कळत नाही  कधीतरी. 

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळ मिळालाच आणि मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक भेटले, तरी खोटेपणा आहेच. मनमोकळ्या गप्पा, हसणं खिदळणं, चेष्टा मस्करी सगळं हरवून बसलं आहे कुठेतरी. न गप्पांमधे मन रमतं, न भेटून समाधान वाटतं कारण, ‘आम्ही मस्त... तुम्ही मस्त...’च्या पुढे गप्पा जातच नाहीत. कुणाला तरी आपला हेवा वाटेल म्हणून आपले आनंद ही आपल्या कुशीत आणि दुःखाचा बाऊ कशाला म्हणून ती ही आपल्यालाच कवटाळलेली. ही आपल्या जवळच्या लोकांची फसवणूक नाही तर काय? 

सगळ्यात मोठी फसवणूक आपण करतो ती म्हणजे आपली.. कारण, काहीही करत असताना, आपल्या मोबाईल फोनमुळे त्यातला आत्माच हरवून बसलो आहोत आपण आणि तरी आपल्याला वाटतं आपण खूप मजा करत आहोत. स्वतःची फसवणूकच नाही का ही? 

आजकाल ते फिट बिट घड्याळ्यांचं भारी बाई फॅड आहे. सकाळी व्यायाम करताना बी.पी. किती? हार्ट रेट किती? किती कॅलरी बर्न झाल्या? आणि आपल्या स्टेप्स किती झाल्या? याकडेच सगळं लक्ष. व्यायाम झाला, असं म्हणणं फसवणूकच! आपल्या मुलांसाठी ‘क्वालिटी टाइम या नावाखाली जो काही थोडा फार वेळ आपण देतो तो देत असताना एकीकडे ऑफिसचं काम करणं मुलांची निव्वळ फसवणूकच. बायकोशी गप्पा मारत असताना इतर कुणाशी सहज चॅट करणं किंवा आलेले खंडीभर फॉरवर्डस बघणं, ही बायकोची फसवणूकच. गावाला गेलेलं असताना त्या क्षणांचा आनंद घ्यायचा सोडून सेल्फी काढत बसणं स्वतःची फसवणूकच, एखादी कलाकृती अनुभवत असताना फोन घेणं त्या कलाकाराची आणि कलाकृतीची फसवणूकच, भेटायला येतो असं सांगून, ‘आता नाही ग वेळ, खूप उशीर झालाय...’ असं म्हणून आईवडिलांना व्हिडिओ कॉल करणं ही त्यांची फसवणूकच!! 

फसवण्यात इतके तरबेज झालो आहोत आपण, आपल्याला लागतो कशाला एप्रिल फूल डे? ‘फूल’ आपण रोजच्या रोज बनतो आणि वाईट म्हणजे आपल्या लक्षातही येत नाही ते! हे थांबणं शक्य नाही पण निदान वागण्यात खरेपणाचा प्रयत्न करणं तरी शक्य आहे. तो आधी करू आणि मग खुशाल साजरे करू असले एखाद्याच दिवसासाठीचे एप्रिल फूल डे...!

संबंधित बातम्या