नितांतसुंदर कारगिल...

संजीव शहा
सोमवार, 10 जानेवारी 2022

विशेष

श्रीनगरपासून लेहकडे जाताना झोजि ला ही ऐतिहासिक खिंड पार केल्यानंतर आपण द्रास या जगातील क्रमांक दोनच्या सर्वात थंड गावाला पोहोचतो. पंधरा किलोमीटर पुढे गेल्यावर आपल्यासमोर येते जगातल्या अतिसुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण, कारगिल!

श्रीनगर ते कारगिल प्रवास सुमारे २०० किलोमीटरचा आहे. मी पहिल्यांदा कारगिलला गेलो होतो ते २००५ साली. त्यावेळी आम्ही काही मित्र मोटारसायकलने जम्मू-श्रीनगर-द्रास-कारगिल करत मनालीला गेलो होतो. त्याच वेळी मला कारगिल गाव आणि आसपासचा परिसर बेहद्द आवडले होते. तत्पूर्वी १९९९ साली कारगिल युद्ध झाले त्यावेळी हे गाव माहीत झाले होते. त्यानंतर मी कारगिलला अनेकवेळा गेलो आहे आणि तिथे मुक्कामही केला आहे. ‘सरहद’ संस्थेचे काम करत असताना तिथले काही लोक माझ्या परिचयाचे झाले आहेत. 

या विविध भेटींदरम्यान मी कारगिल, लेह, द्रास, बटालिक असे हे संपूर्ण क्षेत्र खूप जवळून पाहिले आणि अनुभवले. तिथल्या पहाडी लोकांचा साधेपणा आणि आपुलकी तसेच त्या भौगोलिक भागाचा रांगडेपणा आणि अनुपम सौंदर्य या गोष्टींनी माझ्या मनाला भुरळच घातली म्हणा ना! आयुष्यामध्ये प्रत्येकाने किमान एकदा तरी कारगिल आणि आसपासचा परिसर पहावा, असे माझे मत तेव्हापासूनच आहे. इथे सापी, सुरु, झंस्कार आणि आर्यन या खोऱ्यांचे नितांतसुंदर आणि रमणीय प्रदेश आहेत, पाषाणात कोरलेली भव्य बुद्धमूर्ती आहे आणि इथले स्थानिक जनजीवन, पारंपरिक नृत्ये आणि सण या गोष्टी अत्यंत मनमोहक आहेत. यांच्या जोडीला आता तिथे युद्धाचे स्मृतीस्थळदेखील आवर्जून भेट देण्याजोगे ठिकाण झाले आहे. हिमालयाच्या कुशीत आणि भव्य डोंगर, त्यातील सुळके, हिमशिखरे, शांत नद्या अशा दिव्य निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव आहे. विशेषतः बटालिक सेक्टरमधला आर्यन व्हॅली हा भाग म्हणजे ‘दरद’ किंवा दार्द जमातीच्या लोकांचे निवासस्थान. उंच पर्वतांनी वेढलेला हा भाग खरोखर एक अलौकिक टापू आहे. हे लोक आर्यांचे वंशज समजले जातात. इसवीसनापूर्वी सिकंदर किंवा अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली, तेव्हा त्याच्या सैन्यातील काही लोक इथे स्थायिक झाले आणि तेच आताच्या दरद-आर्य लोकांचे पूर्वज समजले जातात. या अर्थी यांचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांचा आहे. सुरु, सापी, झंस्कार अशा अन्य खोऱ्यांनादेखील असाच रोचक इतिहास आणि रोमांचक निसर्ग लाभलेला आहे. तो सर्वच इथे मांडणे स्थळमर्यादेमुळे शक्य नाही.

कारगिल क्षेत्रामध्ये पूर्वी पर्यटनाच्या दृष्टीने फारशा सोयीसुविधा नव्हत्या. रस्तेही फारसे चांगले नव्हते. मात्र १९९९च्या युद्धानंतर ही परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे. भारताच्या सीमेलगत  असल्यामुळे हा संपूर्ण भाग लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. त्यामुळे इथे भारतीय लष्कराचा वावर आणि अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहेत.

पुढे २०१६ साली पुण्यामध्ये ‘सरहद’ द्वारे आयोजित काश्मीर महोत्सवामध्ये कारगिलचे एक हॉटेल व्यावसायिक हमजा अली यांच्याशी माझी ओळख झाली. ‘सरहद’ गेली अनेक वर्षे काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या मानवतावादी प्रकल्पांमध्ये आणि विकासकार्यांमध्ये काम करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारगिल क्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. संस्थेने इथले हुंडरमन गावही दत्तक घेऊन तिथे वाचनालय, शाळा इत्यादी उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतलेला आहे. लेह-कारगिल भागातील सुमारे चाळीस मुले-मुली संस्थेच्या पुण्यातल्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. एकदा संजय नहार, हमजाभाई, मी आणि माझे मित्र अरविंद बिजवे बसून विविध विषयांवर गप्पा मारत असतानाच कारगिलला एखादी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित का करू नये? असा विषय समोर आला. यामुळे दोन-तीन गोष्टी साध्य होणार होत्या. एक म्हणजे यामुळे कारगिलला एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली असती, दुसरे तिथे विमानतळ असावा यासाठी ‘सरहद’ करत असलेल्या प्रयत्नांना बळ मिळाले असते, तिसरे म्हणजे स्थानिक हॉटेले आणि पर्यटनसंस्थांच्या रूपात रोजगारनिर्मिती झाली असती आणि चौथे म्हणजे एक निव्वळ पर्यटनक्षेत्र म्हणून, तसेच एक क्रीडा पर्यटनकेंद्र म्हणूनही कारगिल देशात व जागतिक स्तरावर पुढे आले असते.  ही कल्पना आम्हा सर्वांनाच खूप आवडली आणि आम्ही त्या दृष्टीने काम सुरू केले. 

मॅरेथॉन शर्यत हा तसाही एक आव्हानात्मक क्रीडाप्रकार आहे, त्यात कारगिलसारख्या उंचावरील प्रदेशामध्ये, जिथे प्राणवायूचे प्रमाण सहसा कमी असते, अशा ठिकाणी धावणे हा क्रीडापटू आणि माझ्यासारख्या हौशी धावकांकरता आव्हानात्मकच नव्हे तर एक रोमांचक अनुभवही ठरू शकतो. इथले वळणदार आणि उंचसखल धावणारे रस्ते वाहनांमधून जितके सुंदर दिसतात, तितकेच ते धावपटू, सायकलपटू, मोटरसायकलपटू आणि गिर्यारोहक यांच्याकरिता आव्हानात्मक आणि म्हणूनच आनंददायी आहेत.

मॅरेथॉन आयोजित करण्याचा निर्णय झाल्यानंतर मी मुद्दाम पूर्वपाहणीकरता कारगिल आणि आजूबाजूच्या परिसराला भेट दिली. प्रसिद्ध अशा टायगर हिलपर्यंत जाण्यासोबतच विविध अंतरांचे टप्पे आम्ही धावपटूंची आव्हाने म्हणून निश्चित केले. भारतीय लष्कर, स्थानिक प्रशासन, ‘सरहद’ मधील कारगिल परिसरातील मुले यांची आम्ही मदत घेतली. त्याचबरोबर कारगिल हिल ऑटोनॉमस कौन्सिल, तसेच हॉटेल व्यावसायिक असोशिएशनचेही सर्व तऱ्हेचे सहकार्य आम्हाला मिळाले आणि अशा प्रकारे सर्वांच्या प्रयत्नांमधून ‘कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा’ २०१७ साली पहिल्याप्रथम आयोजित करण्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतर कोविड संसर्गाची दोन वर्षे वगळता ही स्पर्धा दरवर्षी नित्यनेमाने आयोजित करण्यात येते आणि प्रत्येक वर्षी देशविदेशातून हौशी आणि व्यावसायिक धावपटूंचा प्रतिसाद वाढतच आहे. तसेच, एरवीदेखील पर्यटनासाठी आता अनेक लोक कारगिलला जाऊ लागलेले आहेत. आपल्या देशातील या सुंदर, संवेदनशील आणि रम्य स्थळाचा हळूहळू पर्यटनाच्या क्षितिजावर उदय होत आहे. या लेखाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील धावपटूंना कारगिल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याचे आणि पर्यटकांना कारगिलला भेट देण्याचे पुनश्च एकवार आवाहन.

संबंधित बातम्या