‘स्वर-युगनायिका’

सतीश पाकणीकर 
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

कव्हरस्टोरी

सगळा धीर एकवटून मी दीदींना म्हणालो, “मी एक कॅलेंडर तयार केले आहे. ते मला तुम्हाला द्यायचे होते. मी ते कधी आणून देऊ?” कल्पना करा...कोण कुठला पुण्यातला एक तरुण, भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर, टळटळीत दुपारी, असा प्रश्न विचारतोय. पण सरस्वती प्रसन्न हसली आणि म्हणाली, “संध्याकाळी घरी येऊन देऊ शकता. आमचं घर सारसबागेजवळ आहे.” त्या मंजूळ, किणकिणत्या आवाजाने भर दुपारी पिठूर चांदणेच पसरले जणू.

भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या ‘अभिवादन’ कार्यक्रमात परवा फोटो काढत होतो. स्निती मिश्रा नावाची तरुण गायिका छान गात होती. इतक्यात मला हॉलच्या बाहेरून बोलावणे आले. निरोप होता की भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत खूपच खालावलीय. त्या आता उपचारांना प्रतिसाद देत नाहीयेत. मन सुन्न झाले. आदल्याच दिवशी मी मीनाताई खडीकर यांच्याशी चॅट केलेलं- दीदींच्या तब्येतीविषयी. आणि हे काय झालं? गेल्याच वर्षी दीदी न्युमोनियाशी यशस्वीपणे लढून घरी आल्या होत्या की! त्या याही वेळी यशस्वी होणार याची खात्री होती. मग हे अचानक काय? काहीच सुचेना. डोळे मिटले तर दीदींच्या असंख्य भावमुद्रा डोळ्यांसमोर फेर धरू लागायच्या आणि उघडले की मनात विचारांचा नुसता भुंगा. मानव मर्त्य आहे. आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी जायचे आहेच. हे सगळं माहीत असूनही मन मानायला तयारच होत नव्हतं. सहा फेब्रुवारीच्या सकाळी या शतकातील ती सर्वात दुःखद बातमी धडकली की ‘लता मंगेशकर’ नावाचे सप्तसूर आता हरपले आहेत. कोणाशीही बोलावेसे वाटेना. फोन अनेकवेळा वाजून गेला. तो घ्यावासा वाटेना. दिवसभर हीच अवस्था असणार विश्वभरातील रसिकांची!

मन एकदम पस्तीस वर्षे मागे गेलं. त्यावेळी मी दीदींना आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं. २३ एप्रिल १९८७ची संध्याकाळ होती ती. बालगंधर्व रंगमंदिरात पुणे महानगरपालिकेतर्फे लता मंगेशकर यांचा सत्कार समारंभ होता. सुसंस्कृतता, अभिजातता, निगर्वी आणि विनयशील वृत्ती धारण केलेला असामान्य कलाकार असे वर्णन असलेले एक मानपत्र त्यांना त्यावेळी अर्पण करण्यात आले. भीमसेनजी, बाळासाहेब ठाकरे, ज्योत्स्नाबाई भोळे, नानासाहेब गोरे, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि कुटुंबीय अशा आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत मिळालेल्या त्या मानपत्राचा स्वीकार तितक्याच नम्रपणे करीत आपल्या कलेसाठी पुणेकरांच्या मान्यतेचे शिक्कामोर्तब झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. “ईश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मनात असलेले संकल्प पार पाडण्याची शक्ती मला मिळो,” अशी नम्र भावना त्यांनी व्यक्त केली होती.  

आभाळाच्या उंचीवर पोहोचूनही असा नम्र!  भाव अनुभवताना खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहातील सर्व रसिक पाच मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत राहिले.

कार्यक्रम संपल्यावर दीदींना भेटण्यासाठी आणि ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. त्यांच्या छोटेखानी मूर्तीमुळे अनेकांना त्यांचं दर्शनसुद्धा झालं नाही. त्या गर्दीतच माझी बहीणही होती. घोर निराशा घेऊन ती घरी आली.

एप्रिलचा महिना असल्याने व लग्नसराई सुरू असल्याने मला ‘सकाळ’मधील एका लेखासाठी लग्नाच्या बस्त्याचे काही फोटो काढायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मी लक्ष्मी रोडवरील साडी सेंटरमध्ये  पोहोचलो. वरील मजल्यावर फोटो काढण्यात माझा अर्धा-पाऊण तास गेला असेल. कॅमेरा गळ्यातच होता. मी जिना उतरू लागलो आणि पुढच्याच क्षणाला स्तिमित झालो. साक्षात गानसम्राज्ञी लता दीदी जिन्यातून वर येत होत्या. त्यांच्या बरोबर उषाताई मंगेशकर व बाळ फुले होते. माझी फुले यांच्याशी ओळख होती. त्यांनी खुणेनेच मला आत्ता फोटो काढू नका असे सुचवले. मी त्यांना वेगळ्याच फोटोंच्या कामासाठी आल्याचे सांगितले आणि दीदींना व उषाताईंना नमस्कार करून दुकानाबाहेर पडलो. आपल्या आवडत्या कलाकाराला इतक्या जवळून बघता आल्याच्या आनंदातच घर गाठले. घरी पोहोचल्या पोहोचल्या बहिणीला म्हणालो, “तुला लता मंगेशकर यांना बघायचे आहे ना? दोन मिनिटात तयार हो. आपण लगेच निघायचे आहे.” आणि पंधरावीस मिनिटातच आम्ही दोघेही परत लक्ष्मी रोडवर पोहोचलो होतो. बाळ फुले यांची गाडी अजूनही तेथेच उभी असल्याचे पाहून मी सुस्कारा सोडला आणि बहिणीला म्हणालो, “आता काहीवेळातच तुला लता मंगेशकर यांचं दर्शन होणार आहे.” तिचा माझ्यावर विश्वास बसेना. कसा बसणार? एप्रिलच्या भर दुपारी टळटळीत उन्हात मी तिला लक्ष्मी रोडवर गानसम्राज्ञीचे दर्शन होणार आहे, असे सांगत होतो.

काहीच वेळात आमची प्रतीक्षा संपली. खरेदीच्या पिशव्या हातात घेतलेल्या दीदी आणि उषाताई बाहेर पडून आमच्याच दिशेनं गाडीकडे येऊ लागल्या. निवांतपणे. माझ्या बहिणीचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. काल केवढा आटापिटा केला होता तिने या दर्शनासाठी. आज इतक्या निवांतपणे आणि तेही इतक्या जवळून साक्षात सरस्वतीचे दर्शन! बाळ फुले व त्या दोघी गाडीजवळ पोहोचताच आम्ही त्यांना वाकून नमस्कार केला. त्या अतिसुंदर हसल्या. मी त्यावेळी नुकतेच माझे पहिले कॅलेंडर प्रसिद्ध केले होते, ‘म्युझिकॅलेंडर’ नावाने. सगळा धीर एकवटून मी दीदींना म्हणालो, “मी एक कॅलेंडर तयार केले आहे. ते मला तुम्हाला द्यायचे होते. मी ते कधी आणून देऊ?” कल्पना करा ...कोण कुठला पुण्यातला एक तरुण, भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर, टळटळीत दुपारी, असा प्रश्न विचारतोय. पण सरस्वती प्रसन्न हसली आणि म्हणाली, “संध्याकाळी घरी येऊन देऊ शकता. आमचं घर सारसबागेजवळ आहे.” त्या मंजूळ, किणकिणत्या आवाजाने भर दुपारी लक्ष्मीरोडवर पिठूर चांदणेच पसरले जणू. नक्की येतो म्हणून आम्ही परम आनंदात घराकडे निघालो. नुसतं दर्शनच नाही तर त्याबरोबर निमंत्रणही मिळालं होतं.

दुपारीच जाऊन मी सोसायटी बघून ठेवली. संध्याकाळी सहा वाजता मी त्यांच्या घराची बेल वाजवली. कोणी तरी दार उघडले. मी येण्याचे कारण सांगितले तर उजव्या बाजूच्या खोलीतून दीदीच बाहेर आल्या. पुढे होऊन मी त्यांना कॅलेंडर दिले व नमस्कार केला. त्यांनी कॅलेंडरचे एक पान उलटले आणि म्हणाल्या, “अहो, हे कॅलेंडर आहे आमच्याकडे. मुंबईला मी घरात लावले आहे.” मला फक्त भोवळ यायची बाकी होती. त्याच लगेच म्हणाल्या, “हेही असूदे. मी ते इथे लावीन.” हा पुढचा सुखद धक्का. मी मान डोलावली आणि त्यांचा निरोप घेतला. जिना उतरताना डोक्यात प्रकाश पडला, जानेवारी महिन्यात लक्ष्मी क्रीडा मंदिरात ‘भाव सरगम’चा कार्यक्रम झाला होता त्यावेळी मी पं. हृदयनाथ मंगेशकर यांना कॅलेंडर भेट दिले होते आणि ते मुंबईला पोहोचले होते. मनभर आनंद म्हणजे काय याचा मी अनुभव घेत होतो.

पुढे काही दिवसांनी पुण्याच्या नेहरू स्टेडिअमवर लता मंगेशकर रजनीचा कार्यक्रम होणार होता. दीदी पुण्यात आल्याचे कळले. कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी त्या कसून रिहर्सल करतात हे मी ऐकलं होतं. मनात विचार होता की जाता येईल का आपल्याला त्या रिहर्सलला? मी माहिती काढली. मला कळले की त्या मराठा चेंबरच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये रिहर्सलसाठी येणार आहेत. माझा एक मित्र संदीप होले व मी मिळून मराठा चेंबरमध्ये पोहोचलो. दारातच उभे राहिलो. माझ्या गळ्यात मी टेली लेन्स लावलेला कॅमेरा अडकवलेला होता. दुपारी अडीच वाजता एक गाडी चेंबरच्या दारात थांबली. मला मिळालेली माहिती बरोबर होती. गाडीतून दीदी आणि उषाताई उतरल्या. उषाताईंच्या हातात एक चौकोनी काळी ब्रीफकेस होती. त्या दोघी लिफ्टने वरच्या मजल्यावर गेल्या. आम्ही एकेक पायरी गाळत धावत वर गेलो. त्यांच्यामागोमाग त्या हॉलमध्ये शिरलो. अजून तेथे कोणीही आले नव्हते. माझ्या गळ्यातील कॅमेरा बघून त्यांना आम्ही कोणी प्रेसचे वार्ताहर आहोत असे वाटले असावे. त्या दोघी समोरच्या बैठकीवर बसल्या. आम्ही त्या हॉलच्या दुसऱ्या टोकाला उभे राहिलो. पुढे जाऊन बोलण्याचे धाडस होत नव्हते. काही वेळानंतर दीदींनी ब्रीफकेस उघडली. त्यातून त्यांनी गाण्यांचे काही कागद बाहेर काढले. त्यावर नजर फिरवत त्यांचे एकमेकींशी बोलणे चालू होते. बराच वेळ गेला. वादक कलाकार आले नसल्याने वक्तशीर असलेल्या दीदींची अस्वस्थता वाढत चालली होती. इतक्यात तेथे संगीत संयोजक अनिल मोहिले पोहोचले. वादक कलाकारांना चुकीची वेळ दिली गेल्याचे लक्षात आले. ते पोहोचायला वेळ लागणार होता. आता काय करायचे? दीदी म्हणाल्या, “आपण करूया रिहर्सल सुरू.” आणि पुढचा पाऊण तास कोणत्याही वाद्याविना दीदी एकामागोमाग एक गाणी गात होत्या. हॉलच्या त्या चार भिंती आणि आमचे कान धन्य झाले होते. सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणारी ही ‘गानकोकिळा’, समस्त जगातील अनेकानेक मान्यवर मंचावरून आपली असाधारण, अद्वितीय कला सादर केलेली ही स्वरसम्राज्ञी अचूकतेचा किती ध्यास असणारी आहे याचा आम्हाला साक्षात्कार होत होता. माझ्या कॅमेऱ्यात त्यांच्या काही भावमुद्रा मी अंकित करू शकलो होतो.

याच सुमारास त्या ‘दैनिक सकाळ’च्या कार्यालयास भेट देणार होत्या. मी ‘सकाळ’साठी त्यावेळी फिचर फोटोग्राफी करीत असल्यामुळे माझे तेथे जाणे-येणे होतेच. ‘सकाळ’मधील वातावरण एकदम लतामय होऊन गेलं होतं. सकाळच्या सर्व विभागांना भेटी देऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. इतकी मोठी गायिका अत्यंत सहजतेने, कोणताही अहंभाव न ठेवता आपल्याशी प्रेमाने बोलतेय याचं अप्रूप तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होतं. ‘सकाळ’ ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. त्याला उत्तर देताना त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर कसा आवश्यक आहे आणि तो ‘सकाळ’मधील कर्मचारी किती योग्य प्रकारे करीत आहेत हे आपण पाहिल्याचे आवर्जून सांगितले. त्यांचे ते भाषण म्हणजे नम्रपणा, साधेपणा यांचा उत्तम मिलाफ होता. अर्थातच त्याही वेळी माझ्या कॅमेऱ्यात त्यांच्या या नम्रपणाच्या काही मुद्रा मी बंदिस्त केल्या होत्या.

ज्या महान कलावतीच्या नुसत्या दर्शनाची मी त्यावेळी अपेक्षा केली होती त्या स्वरलतेची अनेक प्रकाशचित्रे मला त्याकाळी टिपता आली. १९९४नंतर माझी त्यांच्याशी उत्तम ओळख व्हावी हा दैवी आशीर्वाद होता माझ्यासाठी. सर्व मंगेशकर कुटुंबाच्या स्नेहाचा मी धनी झालो. मी दीदींचं स्वतंत्र फोटोसेशन करू शकलो, त्यांचा विश्वास संपादन करू शकलो. मंगेशकर कुटुंबावर मी प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरने घराघरातील भिंतींवर स्थान मिळवले. त्यामुळे पुढील तीन वर्षे मला दीदींनी अजून तीन कॅलेंडर करण्यासाठी आमंत्रित केले. त्या प्रत्येक कॅलेंडरच्या निर्मितीप्रक्रियेत प्रत्येकवेळी चार- पाच तास त्यांच्यासमोर बसून त्यांच्या सुमधुर आवाजात सिनेसंगीताचा इतिहास उलगडताना ऐकणे हा अनुभव अविस्मरणीय होता. हा सर्व प्रवास आता पाहिले तर स्वप्नवत वाटतोय.

ते स्वप्न होतं का, आत्ता पडलंय ते स्वप्न आहे काही कळेनासं झालंय. रोजच्या प्रमाणेच आजही दिवसभर दीदींची गाणी ऐकू येत होती. कसा विश्वास ठेवणार हा स्वर्गीय स्वर आता आपल्यात नाही म्हणून? शरीराने त्या आता नाहीत, पण ही हजारो गाणी आहेत ना आपल्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी! कोणीतरी म्हणून ठेवलंय, ‘वुई ऑल विल डाय. द गोल इजन्ट टू लिव्ह फॉरएव्हर; द गोल इज टू क्रिएट समथिंग दॅट विल!’

 

संबंधित बातम्या