आठवणीतला श्रावण

शेखर ओढेकर, नाशिक
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

विशेष

श्रावणाच्या उल्लेखाबरोबर बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ किंवा ‘हिरवे हिरवे गार गालिचे...’ ह्या ओळी आठवतात आणि कवितेतील श्रावण डोळ्यासमोर येतो. पण माझ्या डोळ्यासमोर आत्ता एक वेगळाच श्रावण उभा राहतोय. तो आहे माझ्या बालपणीचा.

शाळेच्या दिवसात श्रावण म्हटल्यावर खरं महत्त्व श्रावणी सोमवारला! कारण शाळा अर्धाच दिवस! मधल्या सुट्टीनंतर शाळा सुटणार म्हणजे केवढा आनंद! शाळा सकाळची असेल तर घरी येऊन दप्तर टाकले की वाड्यातील आम्ही मित्र गावात फेरफटका मारायला मोकळे! 

श्रावणात सणांची रेलचेल! त्यामुळे कुठे मातीचे बैल विकायला असायचे, कुठे विविध प्रकारच्या राख्या, कुठे पूजेचे साहित्य. नागपंचमीचे निमित्त करून गारुडी रस्त्याने ‘नागदर्शन’ देत असत. आम्ही तिथे हजर  असायचोच...

आमच्या गल्लीजवळच्या एका रिकाम्या दुकानात मातीचे बैल तयार केले जात. चिकण मातीपासून बैल कसे करतात हे आम्ही अक्षरशः तासनतास बघत असू. पूजेच्या साहित्यामध्ये नाग-नरसोबाचे रंगीत कागद  विकायला असायचे. बरीचशी मुले गल्लोगल्ली जाऊन ओरडून ते कागद विकत असत. त्या मुलांचा विशिष्ट असा टिपेतला आवाज असायचा, आवाजाची एक विशिष्ट लय असायची, स्वरदेखील वेगळाच असायचा. तो खूप आवडायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्हीदेखील त्या मुलांच्या सुरात सूर मिसळायचो. त्या आवाजाने गल्ली खरोखरच दुमदुमायची आणि श्रावण महिना सुरू झाल्याचे लक्षात यायचे.

नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचदा वाड्यात बांधलेल्या झोक्यावर मुलेच जास्त खेळत, मुलींनी तक्रार केल्यावर मग कुणाची तरी आई येऊन आम्हाला बाजूला सारून मुलींना खेळू देत असे. पण नागपंचमीचे खरे आकर्षण असायचे ते आई त्या दिवशी करत असलेले स्पेशल दिंड आणि गव्हाची खीर! हे पदार्थ म्हणजे एकदम युनिक. त्या काळी हे पदार्थ खरोखरच वर्षातून एकदाच मिळत, त्यामुळे त्यांची अगदी आतुरतेने वाट बघितली जायची. 

श्रावण सुरू झाला आहे हे आमच्या गल्लीतील वातावरणामुळे लगेचच समजत असे. आमच्या गल्लीत बरीच गुरुजी मंडळी राहत होती. त्यामुळे श्रावण महिन्यात असलेल्या वेगवेगळ्या, विशिष्ट प्रकारच्या पूजा, विविध देवतांना अभिषेक, सत्यनारायण पूजा, श्रावणी, मंगळागौर पूजन वगैरे फक्त श्रावणात होणारे धार्मिक विधी यात ही मंडळी व्यग्र असत. जवळपास महिनाभर त्यांची लगबग, विशेषतः श्रावणी सोमवारची गडबड बघण्यासारखी असे. श्रावणातल्या सतत चालणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळामुळे रस्ते तसे ओलेच असायचे, तसेच रस्त्यावर चिकचिक पण! ह्या चिकचिकीमधून गुरुजी मंडळी पूजेचे साहित्य घेऊन जवळपास दिवसभर अनवाणी पायाने फेऱ्या मारताना दिसत. तसेच वटपौर्णिमा किंवा मंगळागौर पूजन ह्या दिवशी रस्त्याचा ताबा सुवासिनी घेत. खास पारंपरिक पोशाख, जरीच्या काठाच्या ठेवणीतील साड्या, नथ आणि इतर अलंकार अशा सालंकृत महिला पूजेचे साहित्य घेऊन दिसत. खरोखरच वातावरण मंगलमय असायचे.

श्रावणी सोमवारची संध्याकाळ आमच्या दृष्टीने फारच इव्हेन्टफुल असे. मुळात संध्याकाळचे जेवण एकदम लवकर म्हणजे साधारण सहा ते सातच्या व्हायचे. श्रावणी सोमवारनिमित्त जेवणात गोड पदार्थ असायचाच. आईची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली की आमची स्वयंपाक घरात लुडबूड सुरू व्हायची. आजच्या जेवणाचा खास बेत काय याचा अंदाज घेण्याचा सारखा प्रयत्न असे. खरे म्हणजे आमचा श्रावणी सोमवार शिरा किंवा केळीचे शिकरण ह्याच्या पुढे कधी गेलाच नाही. (अर्थात त्यावेळी ह्या पदार्थांपेक्षा वेगळी चैन मनातसुद्धा येत नसे..) देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय कोणत्याही पदार्थाला हात लावायचा नाही असे आईचे फर्मान असायचे आणि आम्हीपण ते निमूटपणे ऐकत होतो.

श्रावणी सोमवारची अजून एक सुंदर आठवण म्हणजे कपालेश्वराची पालखी. साधारणपणे संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आमच्या गल्लीच्या टोकाशी येऊन पालखी दहा ते पंधरा मिनिटे तरी तिथेच थांबत असे. आईने आम्हाला सांगून ठेवलेले असायचे की पालखी येईल तिकडे लक्ष ठेवा, आणि आल्यावर सांगा म्हणजे पालखीचे दर्शन घेऊन उपवास सोडता येईल. मग आमच्या वाड्याच्या ओट्यावर बसून पालखीची वाट बघणे आणि पालखीचा आवाज आला रे आला की पळत जाऊन आईला निरोप देणे हा आमचा उद्योग! येणाऱ्या पालखीचे दृश्य मोठे छान असायचे. पालखीच्या सर्वात पुढे एक तुतारीवाला असे, एक भली मोठी तुतारी वाजवताना त्या माणसाचे गाल एवढे जबरदस्त फुगत की बघताच राहावे. त्या तुतारीचा आवाज वातावरणात सर्वदूर पसरे. तीच गोष्ट झांजांची. जेवणाच्या मोठ्या थाळ्या असतात त्या आकाराच्या त्या झांजा अशा कुणालाही सहज वाजवता येत नसत, जड असल्याने त्याला विशिष्ट प्रकारचे कसब लागायचे. आणि या सगळ्यांच्या जोडीला एक मोठ्ठा ढोल! आम्हा मुलांना या वाद्यांचे प्रचंड कुतूहल असायचे. 

राखी पौर्णिमा मात्र आमच्यासाठी त्या मानानं विशेष लक्षात ठेवावा असा सण नव्हता. राख्या बघण्याच्या निमित्ताने आमचा बाजारात फेरफटका व्हायचा, पण अंतिम पसंती साध्या सुती राखीलाच असायची. सख्खी बहीण नसल्याने आईच आम्हाला राखी बांधत असे. 

श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. पोळा म्हटले की आमच्या गल्लीतून सकाळपासून सजवलेले बैल घेऊन जाणारी माणसे आठवतात. रंगवलेली शिंगे, विविध प्रकारचे घुंगरू, गळ्यात रंगीबेरंगी पट्टे, अंगावर विविध रंगांचे हाताचे ठसे अशा पद्धतीने बैल सजविले असायचे. कधी कधी हे बैल कुणाच्या तरी घरासमोर उभे केले जात. मग बऱ्याचशा गल्लीतील स्त्रिया बैलाची पूजा करण्यास येत. पोळ्याच्या दिवशी घरी मातीचे बैल आणून पूजा करायची आमच्याकडे पद्धत होती. (कदाचित आम्हा मुलांसाठी करत असावेत.) मग पोळ्याच्या आधी आम्ही मुलं बाजारात वेगवेगळे मातीचे बैल आणण्यासाठी जात असू. तसे बघितले तर बहुतेक बैल साचेबद्ध, केवळ एकाच रंगाचे असत मात्र त्यांच्या जोडीला सुबकपणे रंगवलेला व चांगल्या आकाराचा, त्यामानाने आकाराने मोठा असा एक बैल विकावयास असायचा. त्यातून निवडून आम्ही पाच बैल विकत घेऊन घरी त्यांची पूजा करत असू.

या पूजेनंतर आमच्या घरी एक वेगळेच आकर्षण असायचे. ते म्हणजे वाण देणे. हे वाण म्हणजे खीर आणि पुरी किंवा साटोरी असा बेत असायचा. प्रत्येक भावाच्या नावाची एक वाटी खीर आणि एक पुरी किंवा साटोरी असायची. नंतर आई देवघराजवळ  बसून त्या सगळ्या वाट्या आणि पुऱ्या स्वतःच्या पुढ्यात ठेवायची आणि आम्हा भावंडांना तिच्या पाठीमागे उभे राहायला सांगून ती एकेकाला विचाराची, ‘आतिक कोण?’ (बहुतेक असंच असावं) माझ्या मते हा शब्द ‘अतिथी’चा अपभ्रंश असावा! मग आम्ही एक एक भाऊ स्वतःचे नाव सांगत असू आणि खीर- पुरी घेऊन बाजूला होत असू. ह्यात अजून एक गंमत होती. जो भाऊ गैरहजर असेल त्याच्याऐवजी हजर असलेल्या पैकी कोणीतरी त्याची खीर पुरी घ्यायची, फक्त खीर पुरी घेताना ‘आतिक कोण?’ विचारल्यावर स्वतःचे नाव न सांगता गैरहजर असलेल्या ‘मेंबर’चे नाव सांगावे लागे. एकंदरीत वाण हा प्रकार आम्हाला खूपच आवडायचा. आत्तासुद्धा डोळ्यासमोर तेव्हाची दृश्य स्पष्टपणे तरळतात. त्या दिवशी दुपारी मग आम्ही सगळेजण आपापल्या घरातील बैल घेऊन वाड्यातील ओसरीवर बैलांची मिरवणूक काढायचो. सगळ्या बैलांच्या पुढे तो आकाराने मोठा घेतलेला बैल उभा करून त्याला मिरवणुकीचे नेतृत्व करायला लावत.

ही साधारण पन्नास एक वर्षांपूर्वीची सांस्कृतिक समृद्धी. जगण्यातला हा साधेपणा, सोपेपणा हा जवळपास लोप पावला आहे. त्याची जागा आर्थिक समृद्धीने घेतली आहे. पण ते समाधान, तो आत्मिक आनंद परत येईल का? हाच प्रश्न आहे.

संबंधित बातम्या