विणकर मुंग्यांचे अद्‌भुत विश्व

शेखर  ओढेकर, नाशिक
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021


विशेष

विणकर मुंग्यांची कार्यपद्धती बघितल्यावर असे सहजपणे जाणवते की कोणतेही मोठे किंवा क्लिष्ट काम किंवा आव्हान असले तरी ते कमीतकमी सूचनांद्वारे, सांघिकरीत्या शिस्तबद्ध पद्धतीने केले, तर यश निश्चितच मिळू शकते.

काही दिवसांपूर्वी आमच्या बिल्डिंगच्या आवारात असलेल्या जास्वंद आणि हेमेलिया या झाडांवर विणकर मुंग्यांची घरटी दिसली. काही घरटी पूर्ण झालेली होती तर काही ठिकाणी घरटी तयार करण्यासाठी मुंग्यांची लगबग दिसत होती. मात्र दोन्ही झाडांवर विणकर मुंग्यांचे बऱ्यापैकी साम्राज्य दिसत होते. ह्या सर्व हालचाली कॅमेऱ्यात टिपण्यासाठी माझे जवळपास दररोज निरीक्षण चालू होते. कधी कॅमेऱ्यामधून तर कधी प्रत्यक्ष झाडाजवळ जाऊन! अर्थात कायम एक सुरक्षित अंतर ठेवूनच! पक्षी, वन्यजीव यांच्याप्रमाणेच असे छायाचित्रण करताना एक आचारसंहिता काटेकोरपणे पाळावीच लागते. मुंग्यांची लगबग पाहण्यातून निर्माण झालेल्या जिज्ञासेतून एका अद्‌भुत आणि रंजक जगाचे दर्शन झाले.

विणकर मुंग्यांचे विश्व खरोखरच अद्‌भुत म्हणावे लागेल. आपण नेहमी बघत असलेल्या मुंग्या जमिनीवर वारूळ करून राहतात, तर विणकर मुंग्या झाडावरच घरटी बांधतात. खऱ्या वृक्षवासी! ह्या मुंग्या आकाराने जरा मोठ्या असतात. कोकणात ह्यांना ‘लाल डोंगळे’ असेही म्हणतात. ह्या मुंग्यांच्या विश्वाची सुरुवात त्यांच्या घरट्यापासूनच होते .

विणकर मुंग्यांची घरटी विणण्याची पद्धत खरोखरच स्तिमित करणारी आहे. सर्वप्रथम त्या जागेची निवड करतात. जागा आपल्या वसाहतीला योग्य आहे, हे ठरल्यानंतर झाडाच्या पानांची तपासणी केली जाते. दोन मुंग्या झाडाचे पान दोन विरुद्ध दिशांनी ओढून बघतात. पानाची लवचिकता बघून ते पान सर्व बाजूंनी वाकवून बघून मगच घरटं विणविण्यासाठी निवडले जाते. पान घरट्यासाठी योग्य न वाटल्यास घरटे विणले जात नाही. आता मुंग्यांचे खरे काम सुरू होते. छोटी घरटी विणायची असल्यास मोठ्या पानाचे तुकडे करून ते पान छोटे केले जाते. घरटे मोठे असल्यास पान तसेच ठेवले जाते. दोन पाने जोडणे, हा घरटी विणण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग. ह्यासाठी एक मुंगी एका पानाच्या अगदी टोकावर बसून समोर दिसणारे दुसरे पान ओढण्याचा प्रयत्न करते, खूप प्रयत्न करून ते पान आवाक्यात आले तर ती मुंगी ते तसेच ओढून धरते व इतर सहकारी मुंग्या सर्व बाजूंनी ओढून दोन पाने एकत्र करतात. खरी कसरत असते जेव्हा दोन पानांमध्ये जास्त अंतर असते व एक मुंगी त्या पानापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा. अशावेळी पहिली मुंगी पानाच्या अगदी काठावर उभी राहून दुसऱ्या पानाकडे जाण्याचा प्रयत्न करते व त्याचवेळी मदतीला आलेल्या मुंग्यांपैकी एक मुंगी पहिल्या मुंगीच्या कमरेला पकडते, पहिली मुंगी त्यामुळे जास्त पुढे जाऊ शकते. एवढे करूनदेखील पहिली मुंगी दुसऱ्या पाना पर्यंत जाऊ शकली नाही, तर एक एक मुंगी आधीच्या मुंगीच्या कमरेला धरून एक प्रकारची साखळी तयार करतात, जेणेकरून सर्वात पुढची मुंगी दुसऱ्या पानापर्यंत सहज पोहोचते आणि त्या पानाला ओढायला सुरुवात करते. त्याचवेळेस मागे असलेल्या मुंग्या एकाचवेळी सर्व ताकद लावून पान ओढतात आणि साहजिकच दुसरे पान त्यांच्या ताब्यात येते. ह्यावेळी मुंग्या एक पान तोंडात पकडतात आणि दुसरे पान पायाने पकडून धरतात. ही क्रिया रस्सीखेच ह्या खेळाची आठवण करून देते. एकीचे बळ! 

आता पानांना जोडण्याचे मुख्य काम सर्व टीम करते. पण पाने जोडायची कशी? यासाठी मुंग्यांची दुसरी तुकडी तयार असते. दुसऱ्या तुकडीतल्या या मुंग्या दुसऱ्या झाडावरून आपल्याच अळ्यांना तोंडात धरून आणतात आणि आपल्या डोक्यावरील अँटेनांच्या साहाय्याने त्या अळ्यांचा  विशिष्ट भाग दाबून त्यातून निघणारे रसायन पानांवर पसरवून पाने जोडतात. हे रसायन एक प्रकारच्या रेशमासारखे असल्याने पाने व्यवस्थित चिकटतात. ह्या सर्व प्रक्रियेत विणकर मुंग्या आपणास खरे म्हणजे व्यवस्थापनाचे धडेच देत असतात. कारण ह्या मुंग्या त्यांचे कार्य सामूहिकरित्या यशस्वीपणे पार पाडतात. त्यामध्ये एकमेकातला ताळमेळ, समन्वय, शिस्त, जबाबदारी पालन अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो आणि ह्या मुंग्या ते अगदी यशस्वीपणे पूर्ण करतात.

विणकर मुंग्यांच्या जगात डोकावून बघितल्यास आणखी एक विशेष गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांची संदेश वहनाची पद्धत! सध्याची परिभाषा वापरायची झाल्यास असे म्हणता येईल की ह्यांचे ‘नेटवर्क अतिशय पॉवरफुल असते’. संवाद साधायची पद्धत आश्चर्यकारक! ह्या मुंग्या एकमेकींच्या तोंडाला, पायांना, डोक्यावरील अँटेनाला स्पर्श करून वेगवेगळे संदेश देतात. तसेच आपल्या शरीरातील विशिष्ट रसायन हवेत सोडून दूर असलेल्या मुंग्यांना हवेमार्फत जलद संदेश पोहोचवतात; किंवा चालताना आपल्या शरीरातील विविध ग्रंथींमधून स्राव सोडून अनेक प्रकारचे संदेश पोचवतात. शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून येणाऱ्या धोक्याची सूचना त्वरित आपल्या सहकाऱ्यांना देतात. त्यांचा सहनिवास खऱ्या अर्थाने सहकारी तत्त्वावर असतो असेच म्हणावे लागेल. त्यांच्या वसाहतीत अगदी आठ दहा घरट्यांपासून अगदी शंभर घरटीसुद्धा नजरेस पडू शकतात. या वसाहतीत प्रत्येक मुंगी, म्हणजे अगदी राणी मुंगीपासून ते कामगार मुंगीपर्यंत आपले काम अतिशय काटेकोरपणे करते आणि त्यात शिस्त आणि शिस्तच असते!

ह्या मुंग्यांचे प्रकर्षाने जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आक्रमकता. घरट्याच्या जवळपास कोणाचाही वावर आढळल्यास ह्या मुंग्या सावध होतात. घरट्यातील राणी मुंगीचा, अळ्या, अन्न ह्यांचे संरक्षण ही बाहेरील मुंग्यांची जबाबदारी असते. त्यामुळे घरट्याच्या जवळपास कोणीही आले तरी आपल्याला धोका आहे असे समजून त्या सावध होतात. एखादे संकट जास्तच जवळ येत आहे असे वाटले तर ह्या मुंग्या शरीरातील विशिष्ट रसायन हवेत सोडून आपल्या इतर सहकाऱ्यांना मदतीचा संदेश पाठवतात. काही वेळा शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून आक्रमक होऊन संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करतात. माणसे जेव्हा अशा घरट्याजवळ येतात तेव्हा त्यांच्या हालचालींमुळे मुंग्या सावध होतात, एवढेच नव्हे तर माणसाच्या श्वासाचे त्यांना हवेतून ज्ञान होते आणि त्या जास्त आक्रमक होतात आणि हल्ला करतात. त्या चावल्यानंतर त्यांच्या शरीरातील फॉरमिक ॲसिड सोडतात त्यामुळे इजा जास्त गंभीर होते. अर्थात माणसाला ह्या मुंग्यांचे उपयोगही आहेत. ज्या झाडावर मुंग्यांची घरटी असतात, त्या झाडावरील सर्व प्रकारच्या किड्यांवर हल्ला करून मुंग्या त्यांचा बीमोड करतात. त्यामुळे त्या झाडावरील फळांचे किड्यांमुळे होणारे नुकसान आपोआपच टळते. म्हणजे ह्या मुंग्या एकप्रकारे नैसर्गिक कीटकनाशकच आहेत!

काही आदिवासी जमातींच्या आहारात ह्या मुंग्या वाटून केलेल्या चटणीचा समावेश असतो. ही चटणी आंबटसर लागते. मुंग्यांमध्ये असलेल्या फॉरमिक ॲसिडमुळे जंगलात राहताना एरवी कमी मिळणाऱ्या प्रथिनांची कमतरता भरून काढली जाते. भारतातील काही प्रदेशांमध्ये, मुख्यतः छत्तीसगडमध्ये या मुंग्यांचा औषध म्हणून वापर केला जातो. संधिवात, गालगुंड व काही त्वचेच्या रोगांवर तेलाबरोबर ह्या मुंग्यांचा वापर करून इलाज केला जातो. तसेच ह्या मुंग्यांच्या अळ्या पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून पूर्वेकडील देशात मोठया प्रमाणावर वापरल्या जातात. त्यामुळे हा व्यवसाय बऱ्याच प्रमाणात केला जातो. थायलंडच्या काही भागांत तर या अळ्या जेवणातील एक मुख्य घटक आहेत.

काही अभ्यासकांच्या मते विणकर मुंग्यांना वादळाची व पर्जन्यमानाची आगाऊ सूचना मिळते. वादळाची शक्यता जेव्हा वाटते तेव्हा ह्या मुंग्या आपली घरटी जास्त सुरक्षित ठिकाणी हलवतात तसेच पर्जन्यमान कमी होणार असे जेव्हा वाटते त्यावेळी मुंग्यांच्या घराचा आकार लहान असतो व जास्त पावसाच्या शक्यतेने घरटी मोठी बांधली जातात.

या मुंग्यांची कार्यपद्धती बघितल्यावर असे सहजपणे जाणवते, की कोणतेही मोठे किंवा क्लिष्ट काम किंवा आव्हान असले तरी ते कमीतकमी सूचनांद्वारे, सांघिकरीत्या शिस्तबद्ध पद्धतीने केले तर यश निश्चितच मिळू शकते. थोडक्यात प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली तर यश कसे सुकर होऊ शकते हा मंत्रच जणू मानवजातीला विणकर मुंग्यांकडून मिळतो!

संबंधित बातम्या