निरवधी काळाचा अवधी

श्रीनिवास शारंगपाणी
सोमवार, 30 डिसेंबर 2019

विशेष
 

कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी। 
भवभूतिच्या मालतीमाधवमधील हा श्‍लोक. म्हणजेच काल अनंत आहे आणि पृथ्वी खूप मोठी आहे. अमर्याद काळाचं भान आपल्या पूर्वजांना होतं. मात्र काळ ही एक संकल्पना आहे. काळ हा अमूर्त आहे. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काळ हा भ्रामक आहे असं म्हटलं आहे.

हे सगळं जरी खरं असलं, तरी अशा अमर्याद आणि भ्रामक काळाचं मोजमाप करणं मानवाला आवश्यक ठरलं. दोन घटनांमधील अवधी मोजण्यासाठी कालमापन अपरिहार्य ठरलं. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात दिवस आणि रात्र एवढं मापन ठीक होतं, पण जसजशी संस्कृती विकसित होत गेली तसतशी अधिक काटेकोर मापनाची गरज भासू लागली.

प्रथम सूर्योदय, सूर्यास्त, मध्यान्ह यावरून कालमापन होत असे. पुढं दिवस आणि रात्री कधी लहान तर कधी मोठ्या अवधीचे असतात आणि यांचा ऋतूंशी संबंध आहे याचं ज्ञान मानवाला झालं. त्यामुळं कालमापनामध्ये प्रगती झाली. कृषीच्या अवलंबनानंतर ऋतूंचं आगमन आधी कळणं आवश्यक होतं, अन्यथा शेतीचं व्यवस्थापन बिघडण्यास वाव होता. दूरवर स्थिर असलेली नक्षत्रं आणि त्यांच्या पटलावर होणारं सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहगोलांचं भ्रमण याचं गणित मांडणं शक्य झालं तेव्हा कालमापनाला खरा प्रारंभ झाला असं म्हणता येईल. 

सूर्य ज्या कक्षेमधून भ्रमण करताना दिसतो (खरं तर पृथ्वी) तो विशिष्ट काळात विशिष्ट नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर दिसतो, तेव्हा सूर्य अमुक-अमुक नक्षत्रात आहे असं म्हटलं जातं. मूलत: लक्षावधी नक्षत्रं अस्तित्वात असली, तरी वार्षिक सूर्यभ्रमणाच्या संदर्भात २७ नक्षत्रं आधारभूत धरली जातात. उदा. अश्विनी, भरणी इ. या नक्षत्रांच्या नावावरूनच हिंदू महिन्यांची (यांना मराठी महिने का म्हणतात ते नकळे) नावं आलेली आहेत, उदा. चित्रावरून चैत्र, विशाखावरून वैशाख इ. २७ नक्षत्रांप्रमाणंच या भ्रमणकक्षेचे १२ काल्पनिक विभाग (आंतरराष्ट्रीय समुदायानं आता १३ भाग केले आहेत) पाडलेले असून त्यांना राशी अशी संज्ञा आहे.

तेव्हा सूर्य कोणत्या नक्षत्र अथवा राशीतून भ्रमण करीत आहे, त्यावरून ऋतूंचा अंदाज आपल्या पूर्वजांना येत असे. अर्थात एक भ्रमण पूर्ण झाल्यावर (पुन्हा त्याच नक्षत्र/राशीत आल्यावर) ऋतूंचं चक्र पुन्हा आवर्तीत झालंय असं त्यांच्या लक्षात आलं. यालाच त्यांनी वर्ष किंवा संवत्सर असं नाव दिलं. सोयीसाठी एका वर्षाचे १२ भाग करण्यात आले आणि त्यांना मास किंवा महिने असं नाव देण्यात आलं.

अर्थात जगामध्ये हे सर्व भागात अगदी असंच झालं नाही. प्रथम आपण आपल्या भारतात काय झालं ते पाहूया. भारतीय गणिती आणि खगोलशास्त्रींचं निरीक्षण असं होतं, की चंद्राच्या कक्षीय भ्रमणामुळं त्याच्या वेगवेगळ्या कला दिसतात आणि पूर्ण चंद्र (पौर्णिमा) ते पूर्ण चंद्र हा कालावधी सर्वसाधारणपणे एका महिन्याएवढा असतो. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या पूर्वजांनी बारा चांद्र महिने एका सौर वर्षाशी जोडून टाकले. येथपर्यंत सर्व ठीक होतं. पण यामध्ये एक त्रुटी होती.

चंद्राचं एक परिभ्रमण म्हणजेच आपला चांद्र महिना बरोबर २९.५ दिवसांचा असतो. या हिशोबाप्रमाणं २९.५ X १२ म्हणजेच ३५४ दिवसांचे बारा महिने अर्थात एक वर्ष होतं. मात्र, पृथ्वीचा सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाचा काळ बरोबर ३६५.२५ दिवसांचा आहे. म्हणजेच बारा चांद्र महिने एका सौर वर्षाला जोडायचे झाले, तर बरोबर ३६५.२५-३५४ म्हणजे ११.२५ दिवसांचा फरक पडतो. मात्र हे अनुभवानं लक्षात आलं. जो दीपावलीचा सण अश्विन कृष्ण त्रयोदशी (धनत्रयोदशी) ते भाऊबीज (कार्तिक शुक्ल द्वितीया) या दरम्यान साजरा होतो तो कधी उन्हाळ्यात, कधी हिवाळ्यात तर कधी पावसाळ्यात येऊ लागला. कारण ऋतू हे सौर भ्रमणावर अवलंबून असतात. मग विशिष्ट कालावधीनंतर अधिक मासाची योजना करण्यात आली आणि चांद्र महिने व सौर वर्ष यांची सांगड घालण्यात आली.

पाश्‍चिमात्य देशांत ग्रीक, रोमन कालदर्शिका सौर कालमापनावरच आधारित होत्या. मात्र, महिन्यांच्या दिवसांत एकसूत्रता नसल्यानं इ.स.पू. ४५ आधी असलेल्या ज्यूलिअन कालदर्शिकेप्रमाणं वर्षाचे दिवस ३५० ते ३५५ पर्यंत काहीही असत. महिनेही आधी दहाच होते, ते बारा करण्यात आले. पुढं ज्युलिअस सीझरनं यात सुधारणा करून महिन्यांना आधुनिक नावं (जानेवारी, फेब्रुवारी इ.) दिली आणि महिन्यांचे दिवसही (३० अथवा ३१) असे निश्‍चित केले. अपवाद फक्त फेब्रुवारी महिन्याचा. या महिन्यात मूलतः २८ दिवस असून दर चार वर्षांनी एक दिवस वाढवून त्या वर्षाला अधिवर्ष (Leap Year) असं संबोधण्यात आलं. यातच पुढं थोडी आणखी सुधारणा करून आजचं ग्रेगॉरियन कॅलेंडर अस्तित्वात आलं. या कालदर्शिकेमध्ये चांद्र-भ्रमणाचा काहीही संबंध येत नाही.

या उलट इस्लामी (हिजरी) कालदर्शिका पूर्णपणे चांद्र आहे. मुहर्रम, सफर, रबि-अल-अव्वल इ. १२ महिन्यांचं एक वर्ष होतं. महिन्याचे दिवस २९ ते ३० असू शकतात आणि ते चंद्रदर्शनावर अवलंबून असतात. अशा रीतीनं हिजरी वर्षाचे दिवस ३५४ ते ३५५ होतात. सौर वर्ष आणि हिजरी वर्ष यात १०-११ दिवसांचं अंतर पडत असल्यानं सामान्यत: ३३ वर्षांनंतर हिजरी वर्षाची पुनरावृत्ती होते. यामुळंच मुस्लिमांचा उपवासाचा (रोजा) रमदान महिना कधी उन्हाळ्यात तर कधी हिवाळ्यात येताना दिसतो.

बौद्ध कालदर्शिका थोड्याफार फरकानं हिंदू कालगणनेप्रमाणेच आहे आणि ती अनेक दक्षिण आशियायी देशांत वापरली जाते. चिनी कालमापनपद्धती मात्र खूप गुंतागुंतीची आहे.

हे झालं बृहत्कालाच्या संदर्भात. सूक्ष्मकालाच्या मापनासाठी जरी आपल्या पूर्वजांकडं उपकरणं नव्हती तरी सूक्ष्मकालासाठी त्यांनी मापकं मात्र योजिली होती. त्रुति (३ शतांश मायक्रोसेकंद, रेणु (जवळजवळ २ मायक्रोसेकंद), लव (१ दशांश मिलिसेकंद) अशा सूक्ष्म कालावधींपासून ते घटिका आणि अहोरात्र अशी दिवसभराच्या कालावधींपर्यंत मापकं त्यांनी दिली आहेत.

प्राचीन काळी कालमापनाची साधनं असली तरी ती ओबडधोबड होती आणि अचूक नव्हती. सोळाव्या शतकात गॅलिलिओनं खऱ्या अर्थानं अचूक कालमापनाला सुरुवात केली. यांत्रिक घटिकामापक (घड्याळ) तेव्हा अस्तित्वात आलं. अतिशय सूक्ष्म आणि बिनचूक यांत्रिक घड्याळांची निर्मिती स्विझर्लंडमध्ये होऊ लागली. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स क्रांती झाल्यावर घरोघरी अचूक डिजिटल घड्याळं दिसू लागली. आता आण्विक घड्याळं तर १५ अब्ज वर्षांत केवळ एक सेकंदानं चुकू शकतात.

दिवसाचे चोवीस भाग (तास), तासाचे साठ भाग (मिनिट) आणि मिनिटाचे साठ भाग (सेकंद) ही आधुनिक कल्पना असली, तरी तिचं मूळ बॅबिलोनियन संस्कृतीमधील षष्टिकमान (sexagesimal) मापनपद्धतीत आहे. Minute म्हणजे छोटा भाग आणि Second म्हणजे दुसरा (छोटा भाग) एवढीच या शब्दांची व्युत्पत्ती आहे. यावरून पूर्वी त्यांचं साठ भागात वर्गीकरण नव्हतं हे लक्षात येईल. पुढं अचूक मापनासाठी षष्टिकमान पद्धतीचा वापर करून आधुनिक मापन सुरू झालं. अतिसूक्ष्म मापनापासून ते अतिविराट मापनासाठी प्लँक-काल (सेकंदाचा शतखर्वावा म्हणजेच १०-४४ भाग), मिलिसेकंदवरून योटासेकंद म्हणजेच एकावर २४ शून्यं येथपर्यंत हा पट जातो. एक योटासेकंद म्हणजे विश्‍वनिर्मितीच्या कालावधीचा भाग म्हणता येईल एवढा मोठा काळ आहे.

आपल्या पूर्वजांची गणितीय विद्वत्ता अतुलनीय आहे. शून्य आणि दशमानपद्धतीचा वापर करून महाप्रचंड आणि अतिसूक्ष्म संख्यांची व्याप्ती त्यांनी फार पूर्वीच दाखवून दिली होती. त्यामुळं वर दिलेल्या अतिसूक्ष्म कालावधीपासून ते ३११ शंकू (३११ ट्रिलियन) वर्षं म्हणजेच विश्‍वाचं आयुष्य येथपर्यंतचं गणित ते देऊ शकले.

तेव्हा काल अनंत असला तरी त्याचे भाग मापनायोग्य आहेत असं समजायला हरकत नाही... निरवधी काळाचा अवधी.

संबंधित बातम्या