वाहन कर्ज...

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 28 मार्च 2022

विशेष

आपल्या मालकीचे वाहन असण्याची गरज वाढत असताना, वाहनाची खरेदी आता फारशी अवघड राहिलेली नाही. वाहन खरेदीसाठी कर्जे देखील आता सहजगत्या उपलब्ध होत आहेत. मात्र वाहन कर्ज घेताना व्याजाचा दर, परतफेडीचा कालावधी, मार्जिन व प्रोसेसिंग चार्जेस यांचा तुलनात्मक अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यावा.

शहरी तसेच ग्रामीण भागातील अपुरी परिवहन व्यवस्था ( पब्लिक ट्रान्स्पोर्ट), दूर अंतरावर असणारी कार्यालये अथवा व्यवसायाची ठिकाणे यांचा एकत्रित परिणाम झाल्याने स्वतःचे वाहन ही आता चैनीची बाब न राहता गरजेची वस्तू झाली आहे. आज घराघरांत एक किंवा त्याहून अधिक वाहने असल्याचेही दिसून येते.

स्कूटर /मोटारसायकलची गरज आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा भासू लागली आहे. विशेषतः छोटे व्यावसायिक, कुरिअर किंवा ग्राहकांच्या त्यांच्या पत्त्यावर वस्तूची थेट डिलीव्हरी देणाऱ्या इ-कॉमर्स कंपन्यांकडे डिलिव्हरीचे काम करणारे कर्मचारी, रिक्षा तसेच वाहतूक सेवा देणाऱ्या व्यावसायिक यांना स्वतःचे वाहन असणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. मध्यमवर्गीय ग्राहकही आता मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करू लागले आहेत, तर अनेक कंपन्या वाहन निर्मितीच्या क्षेत्रात आल्याने मागणी व पुरवठा या दोन्हीतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. या मागणी व पुरवठ्यात झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाहन खरेदीसाठी सहजगत्या उपलब्ध होत असलेले वाहनकर्ज, यामुळे आता उपयुक्त व परवडेल अशा वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसते. या पार्श्वभूमीवर वाहन कर्जाबाबतचे हे काही महत्त्वाचे मुद्दे. 

बँका तसेच बिगर वित्तीय संस्था (एनबीएफसी) तीन प्रकारचे वाहन कर्ज देऊ करतात 

 • नवीन वाहन खरेदी करण्यासाठी
 • वापरलेले वाहन (सेकंड हँड ) वाहन खरेदी करण्यासाठी 
 • असलेल्या वाहनाच्या तारणावर अडचणीच्या वेळी कर्ज देतात.यातील १ व २ प्रकारची वाहन कर्जे मोठ्या प्रमाणावर दिली जात असून तिसऱ्या प्रकारचे कर्ज अपवादात्मक परिस्थितीत दिली जातात .
 • नवीन वाहन (कार/स्कूटर/मोटारसायकल) यासाठीच्या कर्जास आजकाल १० टक्के इतके मार्जिनवर  किंवा १०० टक्के फायनान्स दिला जातो. कर्ज परतफेडीचा कालावधी ७ ते ८ वर्षांपर्यंत दिला जातो. सध्या बहुतांश बँकांचे वाहन कर्जाचे फ्लोटिंग रेट व्याज दर ७ टक्के ते ८.५ टक्क्यांच्या दरम्यान असून ते आरएलएलआर (रेपो लिंक्ड लेंडिंग रेट) नुसार कमी अधिक होत असतात.
 • जुन्या वाहन खरेदीसाठी १५ ते २० टक्के इतके मार्जिन आकारले जाते तर व्याज दर १० टक्के ते १३ टक्के असल्याचे दिसून येते. सर्व साधारणपणे ५ वर्षे पर्यंतच्या जुन्या वाहनास कर्ज दिले जाते. कर्ज परतफेडीची मुदत वाहन प्रथम खरेदी केलेल्या तारखेपासून १० वर्षां पर्यंतच असते.
 • जुन्या कारच्या तारणावर जास्तीतजास्त रु. १० लाखांपर्यंत (कारच्या मूल्यांकनानुसार) २० टक्के ते २५ टक्के मार्जिन घेऊन  परतफेडीचा कालावधी १ ते ३  वर्षांपर्यंत दिला जातो. या कर्जास १२ ते १४ टक्के दराने व्याज  आकारणी होऊ शकते.

वाहन कर्जाच्या प्रमुख अटी 

 • अर्जदाराचे वय २१ ते ६० /६५ च्या दरम्यान असावे (नोकरदारांसाठी ६० वर्षे व व्यावसायिकांसाठी ६५ वर्षे)
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किमान रु. २ लाख असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार नोकरी करणारा असल्यास एकूण किमान २ वर्षे नोकरी झाली असली पाहिजे व त्यातील सध्याची नोकरी किमान एक वर्ष झाली असली पाहिजे .
 • अर्जदाराचा क्रेडीट स्कोर (सीबील) स्कोर किमान ७५० किंवा त्याहून अधिक असावा.
 • कर्ज परतफेडीचा कालावधी १ ते ७ वर्षांपर्यंत असू शकतो व कर्ज परत फेड समान मासिक हप्त्याने (ईएमआय) करावयाची असते.
 • बहुतांश बँकाचे व्याज दर फ्लोटिंग पद्धतीचे असून ते रेपो रेटच्या बदलानुसार कमी अधिक होत असतात.
 • प्रोसेसिंग चार्जेस बँकेनुसार कमी अधिक असून सुमारे रु. १५०० ते ३५०० च्या दरम्यान आहेत.
 • कर्ज अर्जासोबत केवायसी पूर्ततेसाठी आधार कार्ड, झेरॉक्स प्रत, गेल्या तीन वर्षांचे आय टी रिटर्न्स, नोकरी करत असल्यास सुगत तीन महिन्याच्या सॅलरी स्लीप्स, गेल्या ६ महिन्याचा बँक खात्याचा उतारा, व्यावसायिक असल्यास मागील तीन वर्षांचे लेखा परीक्षित ताळेबंद (ऑडिटेड बॅलन्सशीट्स) ही कागदपत्रे जोडावी लागतात .
 • वाहन कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत वाहनाची इन्शुरन्स पॉलिसी कर्ज देणाऱ्या बँकेस असाईन करावी लागते यामुळे अपघात अथवा वाहन चोरीचा मिळणारा क्लेम परस्पर बँकेस मिळतो.
 • वाहन कर्ज घेताना ‘आरसी बुक’मध्ये बँकेचा हायपोथीकेशन चार्ज आरटीओ ऑफिसमध्ये नोंदवावा लागतो. हा चार्ज कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यावर बँकेकडून ना हरकत पत्र घेऊन रद्द करता येतो.
 • याशिवाय प्रॉमिसरी नोट, हायपोथीकेशन बाँड (आवश्यक स्टॅम्प ड्यूटी भरलेला) द्यावा लागतो.

यातील पहिल्या सात अटी बँकेनुसार कमी अधिक असू शकतात. व्यावसायिकाने वाहन कर्ज घेतल्यास आर्थिक वर्षात भरलेल्या व्याजापोटीची रक्कम खर्च म्हणून दाखविता येते तसेच घसाऱ्याचा (डेप्रिसिएशन) लाभ घेता येतो व प्राप्तिकरातही सूट मिळते.

आता वाहन कर्ज मागणी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा करता येते.  बहुतेक बँका ही सुविधा देऊ करीत आहेत व कर्जाची छाननी सुद्धा अगदी कमीत कमी वेळात केली जाते. बहुतांश डीलरच्या शोरूम मध्ये बँकांचे / एनबीएफसीचे प्रतिनिधी असल्याचे दिसून येते व ते आपल्या कागदपत्रांची पाहणी करून तिथल्यातिथे तत्त्वतः कर्ज मंजुरी देतात. वाहन कर्ज घेताना व्याज दर, परतफेडीचा कालावधी, मार्जिन व प्रोसेसिंग चार्जेस यांचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा.

एव्हढे मात्र खरे की आता आपल्या मालकीचे हवे ते वाहन घेणे सहज व सुलभ झाले आहे.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
 

 

संबंधित बातम्या