राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

सुधीर फाकटकर
सोमवार, 3 जानेवारी 2022

विज्ञानतीर्थे

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) ही भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) स्वातंत्र्यपूर्व काळात आखणी केलेल्या काही राष्ट्रीय प्रयोगशाळांपैकी एक आहे. आपला देश स्वतंत्र होत असताना ‘रसायन’ या विषयाच्या अनुषंगाने देशाची भविष्यातील वाटचाल डोळ्यासमोर ठेवत ‘सीएसआयआर’चे त्यावेळचे महासंचालक सर शांतिस्वरूप भटनागर यांनी भौतिकी, धातू, इंधन या विषयांबरोबरच रसायन विषय-क्षेत्राला अग्रस्थान देत या संस्थेची उभारणी केली. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ३ मार्च १९५० रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्‌घाटन झाले. रसायनांशी संबंधित विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील मौलिक संशोधनाद्वारे देशाच्या प्रगती आणि भरभराटीसाठी योगदान देण्याचा दृष्टिकोन ठेवत ही संस्था उभारण्यात आली आहे. रसायन विषय-क्षेत्राशी संलग्न पदार्थ, जैविक आणि अभियांत्रिकी विषयांमध्ये संशोधन करत भारताची ‘रसायन’ विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. याखेरीज संशोधनात्मक उपक्रमांमध्ये रासायनिक उद्योग तसेच व्यावसायिकांना सहभागी करत त्यांच्या यशस्वितेसाठी ज्ञान व माहिती निर्माण करण्याचाही उद्देश आहे. 

या उद्देशांच्या पूर्ततेसाठी १) उत्प्रेरक आणि असेंद्रीय, २) जैवरासायनिक, ३) रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया, ४) बहूरेण्वीय विज्ञान अभियांत्रिकी, ५) पदार्थ आणि भौतिकीय रसायनविज्ञान आणि ६) सेंद्रिय रसायनशास्त्र; असे प्रमुख संशोधन विभाग आहेत. या संशोधन विभागांना संलग्न पदार्थांसाठी शास्त्रीय गुणवैशिष्ट्य तपासणी केंद्र, तसेच वर्णपट विश्‍लेषण केंद्राचीही इथे सुविधा आहे. बरोबरीने रसायन विज्ञानात गरजेचे असलेले रेणूंचे भांडार आणि जैवरासायनिक विषयक्षेत्रात आवश्यक असलेले सूक्ष्मजीव संकलन केंद्र या प्रयोगशाळेची खास ओळख आहे. 

एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना ‘एनसीएल इनोव्हेशन’ची स्थापना करण्यात आली. या प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या नवनवीन तंत्रविज्ञानाच्या समाजोपयोगी प्रचार आणि प्रसारासाठी हे  केंद्र उभारण्यात आले आहे. याखेरीज मागील दशकांदरम्यान राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण संशोधन सुरू असलेल्या सूक्ष्मादीसूक्ष्म पदार्थ, रासायनिक क्रिया-प्रक्रियांसाठी आवश्यक असणारी भट्टी (रिअ‍ॅक्टर), सौरऊर्जा तसेच रसायनविज्ञानविषयक संगणकीय प्रणाली अशा काही विषयांमध्ये सर्वोत्तम संशोधन होण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उभारली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रायोजित स्वरूपाचेही संशोधन चालते, तसेच येथे तांत्रिक सेवा आणि सल्ला व मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध आहे. 

‘एनसीएल’चे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तेथील समृद्ध ग्रंथालय. रसायनशास्त्र आणि त्या संबंधित विषयांवरील तब्बल दीड लाखांपेक्षाही जास्त ग्रंथ ‘एनसीएल’च्या ग्रंथालयात आहेत. याखेरीज जगभरातील नियतकालिके आणि आधुनिक माध्यमांच्या स्वरूपातीलही ज्ञानमाहिती संपदा तेथे आहे. इथे विकसित झालेल्या तंत्रविज्ञानाचे संशोधन अहवाल, प्रबंधही जतन करून ठेवण्यात आले आहेत. 

संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनसीएल’मध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण (इंटर्नशिप), पीएच.डी. आणि तत्सम उच्च शिक्षण व संशोधनाच्या स्वतंत्र सुविधा आहेत. ही संस्था या संदर्भात ‘अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक ॲण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च’ या केंद्र संशोधन संस्थेशी जोडलेली आहे. ‘सीएसआयआर’च्या कार्यारंभ दिनाचे (दि. २६ सप्टेंबर १९४२) औचित्य साधून दरवर्षी २६ सप्टेंबरला ‘एनसीएल’ विज्ञानप्रेमी नागरिकांना ‘एनसीएल’ला भेट देता येते. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा 
संकेतस्थळः www.ncl-india.org
(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या