राष्ट्रीय रोगप्रतिकारक्षमता विज्ञान संस्था, नवी दिल्ली

सुधीर फाकटकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

विज्ञानतीर्थे

भारतीय विज्ञान जगतात माणूस आणि अन्य प्राण्यांच्या संदर्भातील ‘रोगप्रतिकारक्षमता’ (इम्युनॉलॉजी) विषय-क्षेत्राची संकल्पना १९७०च्या दशकात मांडण्यात आली. ही संकल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी परिषदेने सुचवली होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेबरोबर (आयसीएमआर) झालेल्या खास चर्चासत्रांनुसार रोगप्रतिकारक्षमता विषय-क्षेत्राबाबत स्वतंत्र संशोधन संस्थेचा विचार झाला होता. १९८१मध्ये आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतीय शाखेशी संलग्न असलेला एक संशोधन आणि प्रशिक्षण विभाग ‘राष्ट्रीय रोगप्रतिकारक्षमताविज्ञान संस्था’ म्हणून नव्याने स्थापन करण्यात आला. 

दिल्लीतील कुतुबमिनार परिसरातील २७ एकर जागा या संस्थेसाठी देण्यात आली व तेथे स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. १९८६मध्ये ही संस्था देशाला अर्पण करण्यात आली. त्यावेळी संततिनियमन आणि लसीकरण या दोन विषयांवर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आले होते.  

राष्ट्रीय रोगप्रतिकारक्षमताविज्ञान संस्थेतील संशोधन चार स्तरांवर चालते. १) रोगप्रतिकारक्षमता आणि संसर्ग, २) प्रजनन विकास आणि पेशी विज्ञान, ३) जनुकीय विज्ञान आणि कर्करोग विज्ञान आणि ४) जैवरासायनिकशास्त्र आणि संरचनात्मक जीवविज्ञान. या संशोधनांसाठी संस्थेत स्वतंत्र प्रयोगशाळांच्या सुविधा आहेत. याखेरीज वर्णपटमापक, पेशीविश्‍लेषक, क्ष-किरण तपासणी, वर्णपटविश्‍लेषक तसेच आधुनिक पृथःकरण (स्कॅन) प्रणाली इत्यादी उपकरणांची अत्याधुनिक स्वरूपातील सुविधा आहेत. रोगप्रतिकारक्षमताविज्ञानातील जगभरातील ज्ञान ग्रंथालय आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे उपलब्ध करून ठेवण्यात आले. या संस्थेत विकसित होणारे तंत्रविज्ञान वार्षिक अहवालांच्या माध्यमातून प्रकाशित केले जाते. जैवविज्ञान संशोधन क्षेत्रात विकसित झालेल्या तंत्र-विज्ञानाचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, केला जाऊ नये यासाठी काही नीतिनियम कसोशीने पाळण्यात येतात. राष्ट्रीय रोगप्रतिकारक्षमताविज्ञान संस्थेने यासंदर्भात स्वतःवर नीतिनियमांची बंधने लादून घेतलेली आहेत, हे या संस्थेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणता येईल. तसेच इथे उच्च पातळीवरील जैविक सुरक्षा पाळली जाते. 

आजपर्यंत या संस्थेने संसर्ग, रोगप्रतिकारक्षमता, पेशीविज्ञान, लस इत्यादी विषयांमध्ये संशोधन केलेल्या ज्ञानावर आधारित पासष्ट प्रकारचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवले आहेत. तसेच पेशी, प्रतिपिंड, प्रथिने तसेच मधुमेह  आणि अस्थीसंधीशोध या आजारासंदर्भात विकसित केलेले सहा प्रकारच्या औषधांचे तंत्रविज्ञान अमेरिकेसहित भारतातील काही उद्योजकांना हस्तांतरित केले आहे. काही वर्षांपूर्वीच या संस्थेने कुष्ठरोगावरील लस स्वतंत्ररीत्या विकसित केली आहे. 

जैवविज्ञानाअंतर्गत असलेल्या विज्ञान-अभियांत्रिकी शाखा तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय रोगप्रतिकारक्षमताविज्ञान संस्थेत पीएच.डी आणि त्यापुढील संशोधनाच्या संधी उपलब्ध असतात. तसेच पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी अल्प मुदतीचे विविध विषयांवरील प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात. एकविसाव्या शतकाला सामोरे जात असताना सर्व मानवजातीसाठी ‘रोगप्रतिकारक्षमता’ हा आव्हानात्मक विषय असेल, हे विविध प्रकारचे प्रदूषण आणि नुकताच अनुभव आलेल्या कोरोनाच्या महासाथीने अधोरेखित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारक्षमता संशोधन संस्थेचे महत्त्व लक्षात घ्यावेच लागते.  

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी
अरुणा असफअली मार्ग,  नवी दिल्ली ११००६७    
संकेतस्थळः www.nii.res.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या