नॅशनल मेटॅलर्जीकल लॅबोरेटरी, जमशेदपूर

सुधीर फाकटकर
सोमवार, 31 जानेवारी 2022

विज्ञानतीर्थे

स्वातंत्र्यपूर्वकाळात १९४६मध्ये, तत्कालीन सरकारने भविष्यातील औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट ठेवून उभारलेल्या संशोधन संस्थांमध्ये नॅशनल मेटॅलर्जीकल लॅबोरेटरीचा -राष्ट्रीय धातुशास्त्र प्रयोगशाळा- समावेश होतो. त्याकाळात एक कोटी रुपये खर्चून उभारलेली ही प्रयोगशाळा १९५०मध्ये कार्यान्वित करण्यात आली. आता अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या या राष्ट्रीय प्रयोगशाळेने भारतातील औद्योगिक विकासासाठी मौलिक योगदान दिलेले आहे. विशेषतः भारतातील उद्योगांसाठी महत्त्वाची गरज असलेल्या पोलाद, मिश्रधातू तसेच लोहेतर (नॉनफेरस) धातूंच्या निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय ठरणारे संशोधन केले आहे.

धातुशास्त्राच्या अनुषंगाने या प्रयोगशाळेत १) खनिज प्रक्रिया, २) खनिजातून धातू निर्माण प्रक्रिया, ३) पदार्थ अभियांत्रिकी, ४) पदार्थ मूल्यांकन, ५) धातू पृष्ठभाग अभियांत्रिकी, ६) घन पदार्थांची रासायनिक, यांत्रिकी आणि विद्युत गुणवैशिष्ट्ये, ७) उपयोजित आणि विश्‍लेषणात्मक रसायनविज्ञान आणि ८) ऊर्जा आणि पर्यावरण असे संशोधन विभाग आहेत. या संशोधन विभागांमध्ये; भूपृष्ठाखालील खनिजसाठ्यांचा अभ्यास आणि शोध, खजिनांच्या संरचनांचा आणि गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास, खनिजातून धातू निर्माण करण्यासंदर्भात प्रारूपांचा विकास, धातुंसंदर्भात गंज तसेच घर्षण, वंगणांचा अभ्यास, धातूंचे रासायनिक विश्‍लेषण, मिश्रधातुंचा विकास, धातूंच्या सुक्ष्मपातळीवरील संरचना, धातू विकसित होताना निर्माण होणाऱ्या दुय्यम उत्पादनांचे उपयोजन, धातूंचा पुनर्वापर तसेच धातू विकास आणि उत्पादनसमयी निर्माण होणारे प्रदूषण इत्यादी विषयांवर अभ्यास आणि संशोधन केले जाते.  

धातुविषयक संशोधनाबरोबरच या प्रयोगशाळेत सर्वसामान्य उद्योग व व्यवसायांसाठी धातुविषयक गुणवैशिष्ट्ये तपासणी, निर्मिती प्रक्रिया तसेच मूल्यांकन अशा दोनशे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. याचबरोबरीने अन्य अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रांसाठी धातुशास्त्राच्या अनुषंगाने सूक्ष्मादीसूक्ष्म पदार्थकण, विद्युतरासायनिक, स्फटीकधातू, चुंबकीय गुणधर्मविषयक धातू अशा एकवीस विषयांमध्ये सल्ला व मार्गदर्शन केले जाते. या राष्ट्रीय प्रयोगशाळेत संशोधन आणि उत्पादन प्रक्रियांकरिता ‘संदर्भ‘ म्हणून आवश्यक असलेले धातू विकसित करण्यात आले आहेत. धातुविज्ञानात विविध तपासण्यांसाठी महत्त्वाची असलेली शंभरपेक्षाही जास्त उपकरणे आणि यंत्रणा प्रणाली या संस्थेत विकसित केली आहेत. 

या प्रयोगशाळेने धातूंसंदर्भात तापमान, दाब-ताण, वातावरण इत्यादी घटकांमुळे दीर्घ कालावधीनुसार होणारा परिणाम तपासणारी (क्रीप टेस्टिंग) विकसित केलेली प्रयोगशाळा आशिया खंडात नावाजलेली आहे. वार्षिक अहवाल तसेच मासिक वार्तापत्रांच्या माध्यमातून या संस्थेची प्रगती सर्वसामान्यांना कळू शकते. तसेच विद्यालयीन शिक्षकांसाठीही येथे माहितीपर उपक्रम राबवले जातात.  

राष्ट्रीय धातुविषयक प्रयोगशाळेत धातुशास्त्राशी संबंधित विज्ञान व अभियांत्रिकी शाखांमधील पदवीप्राप्त आणि पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थांसाठी प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहाय्यक, तंत्रज्ञ, तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यक्षेत्र उपलब्ध आहे. शिवाय पीएच.डी. किंवा संशोधनविषयक संधीही असतात. विकसनशील आणि विकसित देशांनाही तंत्रविज्ञान प्रदान करणारी आपल्या देशातील ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. 

    राष्ट्रीय धातुशास्त्र प्रयोगशाळा 
    बर्मा माइन्स, जमशेदपूर 
    झारखंड ८३१ ००१
    संकेतस्थळः https://www.nmlindia.org

संबंधित बातम्या