राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थाः तमिळनाडू

सुधीर फाकटकर
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

 विज्ञानतीर्थे

भारत सरकारने १९८१मध्ये समुद्र संशोधन विभाग या नव्या संशोधन विभागाची निर्मिती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय संघाने राष्ट्रांशी संबंधित सागरांच्या हक्कांसंदर्भात आंतरराष्ट्रीय कायदे व नियम केले. या पार्श्‍वभूमीवर एक तपानंतर, १९९३मध्ये, समुद्र संशोधन विभागाच्या अंतर्गत चेन्नईमध्ये (त्यावेळचे मद्रास) राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी -एनआयओटी) स्थापन करण्यात आली. पुढे २००६ साली ही संस्था पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आली. भारतातील सागरी आणि किनारी संपत्तीसंदर्भात असलेल्या समस्यांचे अभियांत्रिकीच्या माध्यमातून शाश्‍वत निराकरण होण्यासाठी देशातच तंत्रविज्ञान विकसित करण्याचा दृष्टिकोन ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सागरी संपत्तीच्या वापरासाठी जागतिक पातळीवरील तंत्रविज्ञान विकसित करत त्याचा संबंधित आस्थापनांसाठी वापर वाढवणे तसेच सागरी संपत्तीचे व्यवस्थापन आणि बरोबरीने पर्यावरण राखण्याचेही ध्येय या संस्थेने समोर ठेवले आहे. 

या ध्येयाच्या पूर्ततेसाठी;  समुद्र लाटांच्या उपयोगातून वीज निर्मिती, समुद्राच्या पाण्यातून पिण्यायोग्य पाणी मिळवणे, खोल समुद्रातून मॅन्गेनिज, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थांचा शोध घेणे, खोलवर पाण्यात संदेशवहन तसेच छायाचित्रण साध्य करणाऱ्या प्रणालींचा विकास,  शैवालीय आणि सागरी सूक्ष्मजीवविषयक जैवतंत्रज्ञान, त्सुनामीचा वेध घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर मार्गदर्शनार्थ तरंगत्या ठेवण्यात येणाऱ्या खुणा,  जहाज व्यवस्थापन आणि संशोधन, सागरी पर्यावरण; असे मुख्य विषय ठरवण्यात आले आहेत.  

या विषयांच्या अनुषंगाने राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत, १) खोल समुद्र तंत्रज्ञान, २) ऊर्जा आणि पाणी, ३) सागरी निरीक्षण  ४) जहाज व्यवस्थापन, ५) सागरी ध्वनीशास्त्र, ६) सागरी इलेक्ट्रॉनिक्स, ७) सागरी मूलभूत सोयीसुविधा, ८) किनारपट्टी पर्यावरण अभियांत्रिकी, ९) सागरी संवेदक, १०) सागरी जैवतंत्रज्ञान; असे संशोधन विभाग आहेत. हे संशोधन विभाग अद्ययावत प्रयोगशाळा आणि तपासणी प्रणालींनी समृद्ध आहेत. या संशोधन विभागांमधून आजपर्यंत चाळीस प्रकारचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वामित्व हक्क तसेच संशोधित तंत्रज्ञान निर्माण करण्यात आले आहे. 

उथळ पाण्यात तसेच पाण्याखाली सुदूर संवेदन नियंत्रणाद्वारे वापरता येईल अशी मोटरगाडी, समुद्रात पृष्ठभागाखाली पाचशे मीटरपर्यंत खोदकाम करणारी यंत्रणा, ५,४६० मीटरपर्यंत खनिजसंपत्तीचा वेध घेणारी प्रणाली, समुद्राच्या पाण्यावर मार्गदर्शनार्थ तरंगत्या ठेवण्यात येणाऱ्या खुणांच्या आधारे वातावरणीय माहिती मिळवणारी यंत्रणा, समुद्राच्या पाण्यावर तरंगता औष्णिक विद्युतऊर्जा प्रकल्प; अशा कितीतरी उल्लेखनीय विषयांवर या संस्थेत संशोधन करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे, परिसंवादांचे आयोजन केले जाते. तसेच  वार्तापत्रे आणि अहवालांद्वारे या संस्थेतील संशोधन प्रसिद्ध केले जाते. संकेतस्थळावरील ठेवण्यात आलेली आकृत्या, आलेख, छायाचित्रे तसेच चित्रपटांच्या माध्यमातून या संस्थेची आणि संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती घेतली तरी आपल्या देशाने समुद्र तंत्र आणि विज्ञानात घेतलेली झेप लक्षात येते आणि थक्क व्हायला होतं. अभ्यासूंनी आवर्जून हा अनुभव घ्यावा. समुद्र विज्ञान तसेच सर्वच अभियांत्रिकी विषयांमधील विद्यार्थ्यांसाठी या संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यक्षेत्राच्या तसेच संशोधनाच्या संधी उपलब्ध असतात. 

                राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्था

                  वेल्लाचेरी, तांब्रम मुख्य मार्ग  

                  नारायणपुरम, पल्लीकरानाई 
    चेन्नई, ६००१०० तमिळनाडू
    संकेतस्थळः   www.niot.res.in
(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या