भौतिकीय संशोधन प्रयोगशाळाः गुजरात

सुधीर फाकटकर
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

विज्ञानतीर्थे

भारत स्वतंत्र झाल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून कितीतरी आव्हाने आपल्या पुढ्यात होती. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीच्या आधारेच या आव्हानांचा सामना करणे शक्य होते. याच जाणीवेने त्याकाळातल्या समाजधुरिणांनी वैज्ञानिक दृष्टी ठेवून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक शिक्षण आणि संशोधन संस्थांची उभारणी सुरू केली. आरंभी यातील काही संस्था मान्यवर शास्त्रज्ञांनी वैयक्तिक योगदानातून उभारल्या. भारतातील अवकाश संशोधनाचे जनक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांनी १९४७मध्ये, त्यांचे कुटुंब आणि मित्रांकडून निधी उभारला; आणि केवळ एकदोन खोल्यांमध्ये भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेचा आरंभ केला. डॉ. साराभाई त्यादरम्यान इंग्लंडमधून वैश्विक किरणविषयक (कॉस्मीक रे) संशोधन करून भारतात परतले होते. वैश्विक किरणांचे वेध घेण्यासाठी तसेच सौर भौतिकी तसेच खगोलभौतिकीच्या अभ्यासासाठीच त्यांनी अहमदाबादेत ही प्रयोगशाळा उभारली. याचबरोबरीने त्यांनी पुणे, बंगलोर, गुलमर्ग येथूनही वैश्विक किरणांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. भौतिकीय संशोधन प्रयोगशाळा स्थापन केल्यानंतर डॉ. साराभाईंनी देशातील मान्यवर शास्त्रज्ञांना तेथे काम करण्यासाठी आमंत्रित केले. पुढे अवघ्या चार वर्षात ही प्रयोगशाळा स्वतंत्र आवारात कार्यान्वित झाली. 

१९५०च्या दशकात डॉ. साराभाईंच्या प्रयोगशाळेने भारतातील अवकाशीय वातावरणाच्या संशोधनाचा पाया रचला तर पुढच्या दहा वर्षात रेडिओ भौतिकीचे संशोधन केले. या संशोधनाच्या आधारेच पुढे भारतासाठी अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) स्थापनेस पाठबळ मिळत गेले. भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेने १९७०च्या दशकात पृथ्वीविज्ञान आणि ग्रहीय विज्ञान तसेच अवरक्त किरण खगोलशास्त्रात आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला. माऊंट अबू या पर्वतशिखरावरील अवरक्त किरणांचा दूरदर्शक याच प्रयोगशाळेने उभारला. पुढच्या दशकात मुलकण भौतिकशास्त्र या अभिनव विज्ञान शाखेतील संशोधन सुरू करण्यात आले. पुढे पुढे जगभरातील बदलत्या तंत्र-विज्ञानाचा संदर्भ घेत पुंजभौतिकी, क्ष-किरण खगोलविज्ञान, ग्रहीय संशोधन अशा अभिनव विज्ञानशाखांमधील संशोधन होत राहिले. 

संशोधनाच्या अनुषंगाने भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत; १) अवकाश आणि वातावरणीय विज्ञान, २)  खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र, ३) आण्वीय, रेण्वीय आणि प्रकाशिय भौतिकी, ४) भूविज्ञान, ५) ग्रहीय विज्ञान, ६) सैद्धांतिक भौतिकशास्त्र असे स्वतंत्र संशोधन विभाग आहेत. बरोबरीने स्वतंत्र असा महासंगणक कक्ष, कार्यशाळा आणि अद्ययावत ग्रंथालय सुविधा आहे. याशिवाय उदयपूर येथील सौर वेधशाळाही या प्रयोगशाळेचाच एक विभाग म्हणून कार्यरत आहे.  

इस्रोसाठी उपग्रहांकरिता भौतिकीय  संशोधन प्रयोगशाळेने क्ष तसेच गॅमा किरणांसाठी वर्णपटविश्‍लेषक-मापक, (विद्युत) तडीत शोधक, वातावरणातील उच्च ऊर्जाकण शोधक तसेच सौरवाताच्या मोजमापासंदर्भातील विविध उपकरणे व प्रणाली विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत नियमितपणे होणारी चर्चासत्रे, परिसंवाद तसेच व्याख्याने ही विविध विज्ञान व अभियांत्रिकी विषयांमधील अभ्यासकांसाठी महत्त्वाची पर्वणी असते. यासंदर्भात आजपर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांची तपशीलवार नोंद संस्थेत  ठेवण्यात आली आहे. 

भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत असलेल्या प्रत्येक विभागातील विषयांत संशोधन तसेच पीएच.डी.च्या संधी उपलब्ध असतात. याखेरीज विज्ञान शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी अवकाश आणि वातावरण विषयाशी संबंधित लघु, दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण वर्गही घेतले जातात. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीही निबंध व भाषण स्पर्धा आणि वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजनही केले जाते.
    भौतिकीय संशोधन प्रयोगशाळा 
    नवरंगपुरा, अहमदाबाद 
    गुजरात 380009 
    संकेतस्थळः https://www.prl.res.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या