केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था, राजस्थान

सुधीर फाकटकर
सोमवार, 7 मार्च 2022

विज्ञानतीर्थे

शेतीबरोबर होणाऱ्या विविध जोड-व्यवसायांमध्ये पशुपालन व पशुसंर्वधनात मेंढी पालन हा स्वतंत्र प्रकार आहे. उबदार वस्त्रांकरिता लोकर प्राप्तीसाठी मेंढी हा प्रमुख स्रोत आहे, तसेच खाद्यान्नात मांसासाठी मेंढी हा मागणी असलेला घटक आहे. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीतील मेंढीपालनाचे महत्त्व सर्वज्ञात आहे. म्हणूनच भारतीय कृषी संशोधन परिषदेने १९६२मध्ये राजस्थानमधील मालपुरा या तालुक्याच्या ठिकाणी, मेंढी संवर्धन आणि लोकरीसाठी उपयुक्त ठरणारे मूलभूत आणि उपयोजित संशोधन करण्यासाठी ‘केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था’ स्थापना केली आहे. सुमारे १६०० हेक्टर परिसरातील माळरान, डोंगर, दऱ्यांच्या प्रदेशात या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. मुख्य ठिकाणाशिवाय राजस्थानमधीलच बिकानेर, हिमाचल प्रदेशातील कुलू आणि तमिळनाडूतील मन्नावनुर येथे या संस्थेची प्रादेशिक संशोधन केंद्रे आहेत. 

उत्तम दर्जाचे मांस आणि लोकर मिळवण्यासाठी मेंढ्यांच्या जाती विकसित करणे,  संस्थेत विकसित झालेल्या तंत्रविज्ञानाचा प्रसार करणे, संबंधित शेतकरी आणि कारागिरांसाठी माहिती पुरवणे आणि उत्पादनासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन सुविधा देणे असे या संस्थेचे उद्देश आहेत. यासाठी १) मेंढीसंदर्भातील जनुकीय विज्ञान आणि प्रजनन, 

२) प्राणी आहार, ३) प्राणी आरोग्य, ४) मेंढी शरीरविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान, ५) लोकरयुक्त वस्त्र उत्पादन आणि लोकरविषयक रसायनशास्त्र आणि ६) तंत्रविज्ञान हस्तांतरण आणि सामाजिक विज्ञान असे विभाग आहेत व त्या अंतर्गत १) माळरान आणि चारा कृषिशास्त्र, २) पशुधन उत्पादन तंत्र, ३) प्राणीविषयक जैवतंत्रज्ञान, ४) लोकरधागेविषयक भौतिकी आणि ५) प्रकल्प अवलोकन आणि परीक्षण समिती, असे उपविभागही आहेत.  

या संस्थेत विकसित केल्या गेलेल्या गुणवत्तापूर्ण मेंढ्यांच्या जातीत ‘मालपुरा’ नामक मेंढा अग्रस्थानी आहे. तसेच भरघोस लोकर देणाऱ्या मेंढीच्या वर्गात ‘चोकला’, ‘मॅग्रा’, ‘मेलिनो’ या मेंढ्या विकसित झाल्या आहेत. जन्माच्यावेळी तीन किलो वजनाचे असणारे कोकरू सहा महिन्यांत सुमारे चाळीस किलो वजनाच्या मेंढीत रूपांतरित होईल, असा मेंढीचा वाण इथे संशोधित करण्यात आला आहे. मेंढ्यांच्या तीन जातींच्या संकरातून नवीन प्रजाती निर्माण करण्यास या संस्थेला यश मिळाले आहे. याशिवाय कोकरांचा मृत्युदर चौपट प्रमाणात कमी करण्यात यश मिळवण्यात आले आहे. 

मेंढ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून चरण्याव्यतिरिक्त आहार मिळण्यासाठी खास खाद्यान्नाचे घटक विकसित करण्यात आले आहेत. मेंढीच्या कृत्रिम रेतनच्या संदर्भात इथे अद्ययावत सुविधा उपलब्ध आहे. ‘कळपाने चरणे’ हे मेंढी या प्राण्याचे खास गुणवैशिष्ट्य असते. कळपाने चरताना संसर्गजन्य आजार पटकन पसरतो. याच संदर्भाने कळपाची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे सहजसोपे तंत्रविज्ञान या संस्थेत विकसित करण्यात आले आहे. 

मेंढ्यांपासून लोकर निर्मितीबरोबरच वस्त्रप्रावरणांसाठी खास माग निर्मिती, लोकरीचे सूत, तसेच लोकरीवरील रंग आणि नक्षीकाम करण्यासंदर्भातही विविध प्रक्रियांचेही संशोधन होऊन त्याद्वारे उच्चगुणवत्तेच्या शाली, गालिचांसंदर्भात संशोधन करण्यात आले आहे. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या मांसासंदर्भातही विविध प्रकारचे सुगंध, आकारांमध्ये तसेच चरबीचे नियंत्रित प्रमाण असलेले गुणवत्तापूर्ण मांस घटकही विकसित करण्यात आले आहे. 

या संस्थेत विकसित होणारे तंत्रविज्ञान सर्वसामान्य शेतकरी आणि मेंढी व्यावसायिकांसाठी उपलब्ध होण्यासाठी खास विभाग आहे़त. संकेतस्थळावरील आभासी दर्शनाद्वारे (व्हर्च्युअल टूर) या संस्थेच्या संशोधनकार्याचे महत्त्व कळते. 

केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था
अविकानगर पोस्ट मालपुरा, जि. टोंक 
राजस्थान 304501
संकेतस्थळः  http://www.cswri.res.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या