भारतीय वानिकी संशोधन आणि शिक्षण परिषद, उत्तराखंड

सुधीर फाकटकर
सोमवार, 14 मार्च 2022

विज्ञानतीर्थे

वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशांचे वरदान लाभलेल्या भारतात आधुनिक वन शिक्षणाची सुरुवात सन १८७८मध्ये डेहराडून येथे झाली. यातूनच पुढे १९०६मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकाराने डेहराडूनच्या निसर्गरम्य प्रदेशात वनांवर संशोधन करणारी संस्था स्थापन केली. स्वातंत्र्योत्तर काळात १९८६पर्यंत वन संशोधन संस्था आणि महाविद्यालय म्हणून ही संस्था कार्यरत राहिली, व १९८६मध्ये तिची पुनर्रचना होऊन केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘भारतीय वानिकी संशोधन आणि शिक्षण परिषद’ या नावाने ही स्वायत्त संस्था आकाराला आली. 

वन संवर्धन, प्रदीर्घ कालावधीसाठी पर्यावरणीय स्थैर्य राखणे, वनांच्या माध्यमातून शाश्‍वत विकास करणे आणि वनांचे शास्त्रीय संशोधन असा दृष्टिकोन समोर ठेवत ही संस्था आरंभापासून कार्यरत आहे. यासाठी वनांसंदर्भात शास्त्रीय तंत्रविज्ञान विकसित करणे, वनांची उत्पादकता तसेच वनांवरील उपजीविका वाढवणे आणि वनस्रोत टिकवणे या ध्येयांचा संस्था पाठपुरावा करत असते. वनसंशोधन कार्यक्रम आखणे, हवामान बदलांच्या अनुषंगाने वनविषयक उपक्रम राबवणे, संशोधित तंत्रविज्ञानाचे भांडार उभारून त्याचा प्रसार करणे, वनस्रोतांवर उपजीविका असलेल्या जातीजमातींशी समन्वय साधत वनस्रोतांचे व्यवस्थापन करणे, वनविषयक संशोधनाला चालना देत वैज्ञानिक आणि तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करणे, वनक्षेत्राच्या वाढीसाठी उत्तेजन देण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन सुविधा निर्माण करणे, वनविषयक आंतरराष्ट्रीय समन्वय साधणे असे या परिषदेचे आणखी काही उद्देश आहेत. या परिषदेत वनविषयक संशोधन, शिक्षण-प्रशिक्षण, वनविषयक विभागीय आणि सांख्यिकीय माहिती तसेच
वनविषयक माहिती प्रसारणासाठी स्वतंत्र संचलनालये आहेत.   

वनांच्या अनुषंगाने वनजमिनींतील माती, पाणी, बीज या मूलभूत घटकांच्या तपासणी; वनस्पतींमधील कर्बोदके, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, आम्ले, सेल्युलोज (तंतू) इत्यादी घटकांच्या प्रयोगशालेय तपासण्या तसेच वनस्पतींच्या रेण्वीय घटकांचे संशोधन;  वृक्षांच्या माध्यमातून मानवी व्यवहारात उपयोगात येणाऱ्या लाकडांच्या गुणवैशिष्ट्यांची तपासणी तसेच ही लाकडे दीर्घ कालावधीसाठी राखून ठेवण्यासाठी जतन प्रक्रिया आणि सर्वंकष मूल्यमापन; आधुनिक पद्धतीने तयार केले जाणारे  स्तरकाष्ठ (प्लायवूड) विकसित करणे, प्रादेशिक ऋतुमानानुसार वृक्षांची लागवड आणि संवर्धन, वृक्षांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्ये, वृक्षांच्या सर्वंकष नोंदी; तसेच वृक्षांवर वाढणाऱ्या बुरशी, वृक्षांना हानिकारक ठरणारी कीड किंवा वृक्षांच्या सान्निध्यात वास्तव्य करणारे कीटक, कोळी आदींचाही अभ्यास या परिषदेच्या विषय-क्षेत्रात येतो. 

वृक्ष हा कागदासाठीचाही महत्त्वाचा स्रोत आहे. याचसंदर्भात ओंडक्यांपासून बारीक चकत्या निर्माण करणे तसेच कागदासाठी योग्य स्वरूपातील लगदा तयार करणे अशा काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रियांचे मूल्यांकन या परिषदेने विकसित केले आहे. व्यावसायिक क्षेत्रातील लाकडांसंदर्भात भारतीय मानांकनाचे प्लायवूड आणि ओंडक्यांची निर्मिती करत ही उत्पादने टिकाऊ राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यावरील रासायनिक प्रक्रियांचाही विकास या परिषदेने केला आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरील प्रकाशनेही अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. 

आजतागायत या परिषदेच्या अंतर्गत डेहराडूनसहीत भारतभर वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशांच्या गरजेनुसार तेरा ठिकाणी संशोधन केंद्रे स्थापन झालेली आहेत. यापैकी प्रत्येक केंद्राचे उद्देश स्वतंत्र असून प्रत्येक ठिकाणी संशोधनाच्या अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये संशोधन, सेवा तसेच व्यवसायांच्याही संधी उपलब्ध असतात.
     भारतीय वानिकी संशोधन आणि शिक्षण परिषद 
    पोस्ट ऑफीस न्यू फॉरेस्ट, डेहराडून 248006 
    संकेतस्थळः https://icfre.gov.in

 

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या