राष्ट्रीय नदी संवर्धन संचलनालय, दिल्ली

सुधीर फाकटकर
सोमवार, 28 मार्च 2022

विज्ञानतीर्थे

भारतीय संस्कृतीत नद्यांच्या प्रवाहांना मोठे महत्त्व आहे. नद्यांना लोकमाता मानले जात असले तरी दुसऱ्या बाजूला वाढते शहरीकरण आणि अन्य अनेक कारणांमुळे नद्यांचे ऱ्हासपर्व सुरू झाले. या ऱ्हासपर्वात औद्योगिकीकरणाची भर पडत गेली तशा अनेक नद्या मरणावस्थेकडे वाटचाल करू लागल्या. विशेषतः विसाव्या शतकाच्या मध्यानंतर नदी प्रदूषणाची समस्या तीव्र होत गेली. १९६१मध्ये नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याबाबतच्या नियमांचे सूतोवाच झाले. पुढे १९८५मध्ये नदी प्रदूषण कमी करण्याचा कार्यक्रम आखला गेला. हा कार्यक्रम मुख्यत्वे गंगा नदीसाठी होता. लवकरच यात यमुना नदीचा समावेश करावा लागला. पुढे १९९५मध्ये देशभरातील सर्वच नद्यांच्या प्रदूषणाचा विचार करता ‘राष्ट्रीय नदी संवर्धन संचलनालय’ स्थापन करावे लागले. 

आपल्या देशात, महानदी किंवा नद म्हणता येतील अशा प्रामुख्याने वीस मोठ्या नद्या असलेली मुख्य खोरी मानली जातात तर तुलनेने त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या किमान शंभरएक अन्य नद्यांची खोरी आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील नद्यांची एकूण संख्या दहा हजारांच्या दरम्यान आहे. एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या नद्यांच्या संवर्धनाचा विचार केल्यास त्यासाठी स्वतंत्र संस्थेची गरज लक्षात येईल.  

नदीत मिसळणारे सांडपाणी आणि नदीतील रेती किंवा तत्सम खनिजांचा उपसा हे नदी दूषित करत नदीचे अस्तित्व नाहीसे करणारे घटक म्हणून अधोरेखित झालेले आहेत. यासंदर्भात नदीत सोडले जाणारे सांडपाणी अन्यत्र वळवून जिरवणे, सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते नदीत सोडणे, अंत्यविधीसाठी विद्युतदाहिन्या उभारणे आणि नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे या उद्देशांसाठी राष्ट्रीय पातळीवर नदी संवर्धन योजना आखून त्यासाठी आर्थिक मदत देण्याचे काम हे संचलनालय करते. 

सांडपाण्यातील जैवरासायनिक घटकांचे विघटन करणे आणि पाणी पुनर्वापरायोग्य करणाऱ्या तत्त्वप्रणालीचा विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये स्थिर असलेली आणि फिरती अशा दोन पद्धती आहेत. फिरत्या पद्धतीचेही काही प्रकार आहेत. तथापि दोन्ही पद्धतीत सांडपाणी वाळू, खडी, धातूमळी, स्पंज, कोळशाची खर, शेवाळ, भाजक्या विटा इत्यादी घटकांचा पद्धतशीर वापर करून पाण्यातील दूषित घटक बाजूला काढले जातात व त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते. 

सद्यःस्थितीत देशातील महानगरे आणि प्रमुख शहरांमधून नद्यांमध्ये जाणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी जेमतेम ४० टक्के पाणी पुन्हा शुद्ध करून त्याचा पुनर्वापर केला जातो. ही आकडेवारी पाहता सांडपाण्याचे म्हणजे वापरायोग्य न राहिल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचे जग किती मोठे आहे, व भविष्यात सांडपाण्याचा पुनर्वापर किती महत्त्वाचा विषय आहे हे लक्षात येईल.  

     राष्ट्रीय नदी संवर्धन संचलनालय

    पंडित दिनदयाळ अंत्योदय भवन  

    सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी मार्ग दिल्ली 110003 

    संकेतस्थळः  https://nrcd.nic.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या