विक्रम साराभाई अवकाश केंद्र, केरळ

सुधीर फाकटकर
सोमवार, 4 एप्रिल 2022

विज्ञानतीर्थे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन -इस्रो) आपल्या देशाचा आधुनिक कालखंडातील गौरवशाली मानदंड आहे. १९६१मध्ये स्थापन झालेल्या अवकाश संशोधन समितीतून १९६९मध्ये इस्रो आकाराला आली. मात्र त्याआधीच १९६२पासून केरळच्या किनाऱ्यावर राजधानी तिरुअनंतपुरमपासून दहा किलोमीटर अंतरावरील थुंबा या ठिकाणी अग्निबाण उड्डाणाचे प्रयोग सुरू झाले होते. ‘थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्र’ म्हणून ही सुविधा आकाराला आली. पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय प्रभावाचा विषुववृत्तासारखा मध्य इथून जवळ असल्यामुळे कमी उंचीवरील अग्निबाण प्रक्षेपणासाठी इथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले.

१९६३मध्ये पाश्चात्त्य बनावटीच्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण होत भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, तर या केंद्रात विकसित झालेला भारतीय बनावटीचा `रोहिणी’ अग्निबाण दशकाच्या आतच अंतराळात झेपावला. या दशकात थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स या देशांची हवामानविषयक साधने अवकाशात घेऊन जाणाऱ्या अग्निबाणांची (साऊंडींग रॉकेट) प्रक्षेपणे होत राहिली. दरम्यान या केंद्राच्या अंतर्गत अग्निबाण इंधन प्रकल्प, अग्निबाण जुळणी सुविधा तसेच उपग्रहविषयक विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र विस्तारत गेले. १९७१मध्ये भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे नामकरण विक्रम साराभाई अवकाश केंद्र असे करण्यात आले.

या केंद्रात अग्निबाण, अग्निबाणाशी संबंधित इंधन आणि अग्निबाणाच्या मदतीने अवकाशयानाच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाणारी उपकरणे व साधनांचा (पेलोड) संशोधन आणि विकास केला जातो. कृत्रिम उपग्रहांसंदर्भात भूस्थिर किंवा ध्रुवीय कक्षांच्या अवकाशयानांचा विकास तर इथे झालेलाच आहे. शिवाय पुनर्वापर करता येईल अशा अवकाशयानांच्या भागाचाही इथे विकास झालेला आहे. भारतीय अवकाशवीरांच्या प्रस्तावीत ‘गगनयान’ मोहिमेसाठीही विकसित झालेले अवकाशयानही इथेच निर्माण केले गेले आहे. तर अग्निबाण इंधनातील प्रज्वलकाचा वापर कमी करणारी नावीन्यपूर्ण ‘एअर ब्रिदींग प्रपल्शन’ प्रणाली या केंद्रात विकसित केली गेली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे विक्रम साराभाई अवकाश केंद्रात वैद्यकीय क्षेत्राला उपयोगी ठरणारे संशोधनही झाले आहे. यामध्ये वैद्यकीय प्राणवायू मूल्यवर्धक (कॉन्सनट्रेटर), यांत्रिक वायूविजनाद्वारे कृत्रीम श्‍वासोच्छ्वास साध्य करणाऱ्या प्रणालीचा (व्हेंटिलेटर) समावेश आहे. तर रासायनिक उद्योगात उपयोगी ठरलेली बावीस प्रकारची रसायने, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी अर्धवाहक पदार्थ तसेच संवेदक या केंद्राने निर्माण केले आहेत.

विक्रम साराभाई अवकाश केंद्राने प्रारंभीच्या काळात प्रयोगशाळा म्हणून वापरलेल्या चर्चचे रूपांतर आता अवकाश संग्रहालयात केले आहे. या संग्रहालयात भित्तिचित्रे आणि प्रारूपांच्या (मॉडेल्स) साहाय्याने भारताच्या अवकाश तंत्रविज्ञान वाटचालीचा प्रवास मांडलेला आहे. खास सुविधा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास शैक्षणिक उद्देशासाठी हवामानविषयक अग्निबाणाचे प्रक्षेपण केले जाते. यावेळी उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असते. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक हजाराहून अधिक विषयांतील संशोधनांचे श्रेय गाठीशी असणाऱ्या या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक प्रकल्प करण्याची संधी उपलब्ध असते.

    विक्रम साराभाई अवकाश केंद्र 
    तिरुअनंतपुरम, केरळ- 695022
    संकेतस्थळः https://www.vssc.gov.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत 
आहेत.)

संबंधित बातम्या