भारतीय हवामानशास्त्र विभाग, दिल्ली

सुधीर फाकटकर
सोमवार, 11 एप्रिल 2022

विज्ञानतीर्थे
 

हवामानशास्त्राची प्राचीन परंपरा असलेल्या भारतात आधुनिक हवामानविज्ञानाची सुरुवात सतराव्या शतकात झाली. पुढे एका शतकानंतर (त्यावेळचे) कलकत्ता आणि मद्रास येथे हवामानविषयक वेधशाळा कार्यान्वित झाल्या. एकोणिसाव्या शतकात भारतातील दुष्काळ, वादळांमुळे हवामानविषयक वेधशाळांचे महत्त्व वाढत गेले. लवकरच मुंबईसह अन्य प्रांतातही वेधशाळा उभारल्या गेल्या आणि १८८५मध्ये ‘भारतीय हवामानशास्त्र विभाग’ स्वतंत्रपणे आकाराला आला. सुरुवातीला या विभागाचे मुख्यालय सिमला (१९०५) होते, नंतर ते पुण्यात हलविण्यात आले (१९२८) आणि १९४४पासून ते दिल्लीमध्ये आहे. जागतिक हवामान संघटनेचा सदस्य असलेल्या भारताने हवामानशास्त्रात सर्वप्रथम संगणकाचा वापर केला. हवामानविषयक कृत्रिम उपग्रह पाठवणाऱ्या विकसनशील देशांच्या यादीत भारत पहिला आहे. 

हवामानविषयक नोंदी आणि पृथःकरण करत हवामान माहितीची गरज असलेल्या शेती, पाटबंधारे, हवाई दळणवळण, सागरी उद्योग व अन्य व्यवसायांना तसेच नागरिकांना आगामी काळातील हवामानाचा अंदाज देणे; आकडेवारी उपलब्ध करून देणे, हवामानविज्ञानात संशोधन करणे आणि संबंधित तंत्रविज्ञान शाखांचे प्रशिक्षण देणे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे उद्देश आहेत. 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या या विभागाची दिल्लीसहीत कोलकता, चेन्नई, मुंबई, नागपूर, गुवाहाटीमध्ये विभागीय कार्यालये असून प्रत्येक राज्यात हवामान केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये १) शेती, २) नागरी, ३) जलविषयक, ४) उपकरणे, ५) संपर्कमाध्यमे, ६) खगोलीय, ७) कृत्रिम उपग्रह, ८) भूकंप आणि ९) प्रशिक्षण असे विभाग आहेत. हे विभाग शेतीसाठी ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ आणि ‘अ‍ॅग्रोमेट’ सुविधा; जलविषयक पाऊसमान नोंद, पूर नियंत्रण आणि जलशास्त्राचा अभ्यास करतात. उपकरण विभागात भूपृष्ठावरील आणि वातावरणातील हवामानाशी संबंधित सर्व प्रकारची उपकरणे निर्माण करण्यासाठी स्वतंत्र उपविभाग आहेत. खगोलीय विभागात पृथ्वीच्या हवामानाशी संबंधित मुख्य खगोलीय घटक सूर्य आणि चंद्राच्या स्थिती-गतीच्या नोंदी ठेवत अवलोकन केले जाते. याच विभागात वातावरणाच्या विविध स्तरांमधील सूक्ष्मकणांचा रासायनिक अभ्यास तसेच हवेच्या गुणवत्तेसंदर्भात संशोधन केले जाते.

१९८२पासून या विभागाने कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून हवामानविषयक नोंदी-निरीक्षणे करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात हवामानशास्त्र विभाग इस्रोशी भारतीय सुदूर संवेदन उपग्रह मालिका आणि भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून समन्वय साधत असतो. दैनंदिन व्यवहारातील अनेक विषयांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेल्या हवामान विभागाची माहिती दैनंदिन बातम्यांच्या स्वरूपात येत असतेच. शिवाय प्रादेशिक भाषांमधील वार्षिक राष्ट्रीय पंचाग, केंद्रीय आणि राज्य पातळीवरील वार्षिक अहवाल, पर्जन्यविषयक खास वार्तापत्र, संशोधन प्रसिद्ध करणारे ‘मौसम’ विशेषांक, हवामानविषयक घटनांवर आधारित विशेष अहवाल, हवामानाशी संबंधित तंत्रविज्ञानविषयक लेख असलेले ‘मौसम मंजूषा’ याखेरीज माहितीपत्रके-भित्तिपत्रकांद्वारे हवामानविषयक माहिती प्रसिद्ध केली जाते.  भारतभर व्याप्ती असलेल्या हवामानशास्त्र विभागात प्रशिक्षण तसेच कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात. हवामान विभागाची प्रशिक्षण केंद्रे दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि पुणे येथे आहेत. प्रशिक्षण केंद्रांमध्ये हवामानशास्त्रातील विविध प्रकारचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. काही अभ्यासक्रम शालान्त परिक्षा उत्तीर्ण पात्रतेपासून आहेत. 

भारतीय हवामानशास्त्र विभाग 
मौसम भवन, लोधी मार्ग, दिल्ली 110003   
संकेतस्थळः https://mausam.imd.gov.in
(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या