मोहरी संशोधन संचालनालय, राजस्थान

सुधीर फाकटकर
सोमवार, 2 मे 2022

विज्ञानतीर्थे

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याकडे होणारे तेलबियांचे उत्पादन नगण्यच होते, शिवाय या पिकांवरील संशोधनही तुरळक प्रमाणात होत होते. ही निकड ओळखूनच १९४७मध्ये केंद्रीय तेलबिया समिती स्थापन करण्यात आली. या समितीने राज्य सरकारे तसेच कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने तेलबिया पिकांच्या उत्पन्नवाढीसाठी धोरणे आखली. पुढे वीस वर्षांनंतर केंद्रीय पातळीवर तेलबियांवरील संशोधन-कार्यक्रम हाती घेण्यात आला, व देशभर तेलबिया संशोधन संस्था उभ्या राहण्यास प्रारंभ झाला. राजस्थानमधील भरतपूर येथे १९९३मध्ये स्थापन झालेली 'मोहरी संशोधन संस्था' यापैकीच एक. २००९मध्ये ह्या संस्थेला ‘मोहरी संशोधन संचालनालयाचा दर्जा देण्यात आला. देशभरात सहा विभागांमध्ये आता संस्थेची ३१ ठिकाणी उपकेंद्रे आहेत.    

तेलबियांबाबत धोरणात्मक आखणी करत संशोधन केंद्रांच्या सहकार्याने आणि बहुविद्याशाखीय तंत्रविज्ञानाच्या आधारे तेलबिया पिकांचे वाण विकसित करणे, तेलबियांसंदर्भात गुणवत्तापूर्ण जनुकीय संशोधन करणे, तसेच तेलबिया पिकांवरील कीड व्यवस्थापन, संबंधित शेतकऱ्यांपर्यंत तेलबिया पिकांच्या अद्ययावत माहितीचा प्रसार असे उद्देश समोर ठेवून संस्था काम करते. जैवतंत्रज्ञान, जीवरसायनविज्ञान तसेच मोहरी पीक उत्पादन, सुधारणा व संरक्षण या विषयांसाठी संस्थेच्या प्रयोगशाळा आहेत; तर तंत्रविज्ञान व्यवस्थापन, कृषी उद्योग-व्यवसाय, पीक अवलोकन व मूल्यमापन आणि ज्ञानमाहिती असे स्वतंत्र उपविभाग आहेत. 

स्थापनेनंतर पंचवीस वर्षांत संस्थेने मोहरी पिकासंदर्भात लागवडीसाठी खते-औषधे, पोषक द्रव्ये, कीड प्रतिबंध इत्यादींवरील संशोधन तसेच प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियांचा शोध घेत मोहरीच्या आठ प्रकारांमधील तब्बल २४८ जाती विकसित करत संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या जातींच्या बियाणांच्या निर्मितीसाठी स्वतंत्र अशी बीज उत्पादन आणि प्रक्रिया प्रणाली इथे उभारण्यात आली आहे. यातील अनेक जातींसाठी पाण्याचा वापर पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे, मोहरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांच्या वापरावर आधारलेले वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान तंत्रविज्ञानही इथे शोधून काढण्यात आले आहे. मोहरी पिकासाठी वापरात येणाऱ्या खतांचा-औषधांचाही वापर अचूक आणि मर्यादित ठेवण्याबद्दल इथे संशोधन झाले आहे. 

संस्थेतील अद्ययावत संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इथे रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. रेडिओ प्रसारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाते. याचबरोबर विज्ञान मेळावे व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच संचलनालयाच्या केंद्रांना भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला-मार्गदर्शन सुविधा आहे. मोहरी संशोधन संचलनालयाने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन, त्यांच्या समस्या समजून घेत, त्यांना मोहरी पिकाची माहिती देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणारी, ‘माझा गाव, माझा गौरव’ योजनाही नव्याने आखली आहे. हवामानासंदर्भातही आगाऊ सूचना देणारी प्रणाली इंटरनेट-भ्रमणध्वनीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. 

जीवविज्ञान आणि कृषिशास्त्रातील पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना इथे संशोधन प्रकल्प करण्याची संधी मिळू शकते. तसेच त्यापुढेही पीएच. डी. उच्चशिक्षण व संशोधन करता येते.

मोहरी संशोधन संचालनालय

सेवर, भरतपूर , राजस्थान 321303
संकेतस्थळः   https://www.drmr.res.in
(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या