भौतिकीय संस्था, ओरिसा

सुधीर फाकटकर
सोमवार, 9 मे 2022

विज्ञानतीर्थे
 

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अणूचा साद्यंत शोध घेण्यास सुरुवात झाली. अणूचे मूलकण, त्या मूलकणांवरील ऊर्जा भार, रासायनिक क्रिया-अभिक्रिया इत्यादींबद्दल मूलभूत विज्ञान विकसित होऊ लागले. याचदरम्यान अणूच्या मूलकणांचेही विज्ञान जाणून घेण्यास प्रारंभ झाला. यातूनच मूलकणांच्या विज्ञानाची (पार्टिकल फिजिक्स) शाखा उदयास आली. दरम्यान अणुगर्भिय (न्युक्लियर) संशोधनानेही आघाडी घेतली होतीच. तर दुसऱ्या बाजूला कुठलाही पदार्थ द्रव किंवा घनरूपात येताना त्या ‘संघनीत’ पदार्थाची आण्वीय पातळीवर केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक अभ्यासाची शाखा ‘कन्डेन्स्ड फिजिक्स’ही निर्माण झाली. 

भारतातही या आधुनिक विज्ञानाची दखल घेत १९५४मध्ये अणुऊर्जा आयोग स्थापन होऊन त्या अंतर्गत मूलभूत संशोधन संस्था आकार घेऊ लागल्या. ओरिसाच्या राजधानीत तिथले राज्य सरकार आणि अणुऊर्जा आयोगाच्या सहकार्याने १९७२मध्ये  निर्माण झालेली ‘भौतिकीय संस्था’ त्यापैकी एकच. उत्कल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेल्या बिधुभूषण दास यांनी ही संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. १९८५मध्ये संस्था स्वतंत्र आवार असलेल्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाली.  
उच्च ऊर्जा, संघनीत पदार्थ भौतिकी तसेच अणुगर्भिय भौतिकी या तीन विषयांवरील सैद्धांतिक आणि प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन या संस्थेत चालते. संशोधनासाठी विद्युतभार असलेल्या अणूचा म्हणजे आयनचा अभ्यास करणारी ‘आयन झोत’ प्रयोगशाळा, ‘आयन त्वरक’, सूक्ष्मकण दहा लाख पट विस्तार करून दाखवणारे इलेक्ट्रॉन पद्धतीचे सूक्ष्मदर्शक; अवरक्त, दृश्य तसेच नीलातीत किरणांचे वर्णपट विश्‍लेषक, क्ष-किरण विवर्तक, उच्च विद्युतदाब तसेच प्लाझ्मा पदार्थ प्रणाली आणि रासायनिक पदार्थ प्रयोगशाळा आहेत. प्रगत देशांच्या धर्तीवर आपल्या देशात वातावरणीय मूलकणांचे निरीक्षण करण्यासाठी तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यात एक खास वेधशाळा (इंडिया बेस्ड न्युट्रीनो ऑब्झर्व्हेटरी) उभारण्यात येत आहे. या वेधशाळेच्या उभारणीसाठी या संस्थेने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. 

अत्यंत समृद्ध ग्रंथालय तसेच भौतिकी विषयांच्या अनुषंगाने वर्षभर नियमितपणे आयोजित होणारे परिसंवाद, चर्चासत्रे आणि परिषदा हेही या संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘फिजिक्स ओपन डिस्कशन’ ही भौतिकविज्ञानावरील खुली चर्चा आयोजित केली जाते.

अणू, अणुगर्भिय तसेच संघनीत पदार्थ भौतिकीचा उपयोग दैनंदिन व्यवहारांमध्ये अप्रत्यक्षरीत्या दिसत असतो. यामध्ये औषधोपचारांतील रेणू-संयुगे, शरीरांतर्गत तपासणी किंवा त्यासाठी वापरण्यात येणारी विशेष औषधे या विज्ञानातून विकसित होत असतात. त्याचप्रमाणे या विज्ञानातून निर्माण होणारे अतिसंवाहकता असलेले पदार्थ इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये वापरले जातात. ज्या उपकरणांमुळे विविध प्रकारची प्रतिमा निर्मिती तसेच आधुनिक संकेतवहन साध्य झाले आहे. आजच्या युगातील आंतरजालीय किंवा अलीकडचे स्पर्श-पटल (टच स्क्रीन) तंत्रज्ञान हीदेखील याच विज्ञानाची देणगी आहे. 

भौतिकीमधील विविध उपशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अथवा संशोधन करण्यासाठी या संस्थेत मुबलक संधी उपलब्ध असतात. तसेच वैज्ञानिक अधिकारी म्हणूनही येथे कारकीर्द करता येते.

भौतिकी संस्था 
सैनिक स्कूल पोस्ट ऑफीस,
भुवनेश्वर 751005 
संकेतस्थळः https://www.iopb.res.in
(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या