राष्ट्रीय मसाले बिया संशोधन केंद्र, राजस्थान

सुधीर फाकटकर
सोमवार, 13 जून 2022

विज्ञानतीर्थे

मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे. याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्वातंत्र्योत्तर काळात मसाला पदार्थांच्या बियांवर संशोधन करणारे केंद्र अजमेरमध्ये सुरू केले. नवीन सहस्रकाला सामोरे जाताना राष्ट्रीय मसाले बिया संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. कमी उत्पादन आणि जास्त मूल्य अशी मसाला पदार्थ पिकांची खासियत असते. तथापि, मसाला पदार्थ पिकांचे उत्पादन अन्य पिकांइतके सुलभ नसते. ठरावीक मसाल्याची पिके ठरावीक हवामान असलेल्या प्रदेशातच येतात. राजस्थानमध्ये शुष्क हवामान असलेल्या प्रदेशात धने, जिरे, बडीशेप, मेथी, ओवा, शेपू, शतपुष्पा अशी काही मसाल्याची पिके घेतली जातात. याच अनुषंगाने अरवली पर्वतराजीतील अजमेर येथे ही संस्था स्थापित करण्यात आली आहे. 

मसाला पदार्थ पिकांसाठी पायाभूत, धोरणात्मक आणि उपयोजित संशोधन साध्य करत जनुकीय तंत्रविज्ञानाचे व्यवस्थापन करणे; संबंधित पिकांची गुणवत्ता वाढवणे; उत्पादनक्षमतेचा विकास करणे तसेच या माहितीचा वापरकर्त्यांपर्यंत प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. संशोधनासंदर्भात या संस्थेत कृषीविषयक रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीविषयक जैवतंत्रज्ञान, वनस्पती प्रजनन, पेशी क्रियाविज्ञान, रोगनिदान, मृदाविज्ञान, कीडव्यवस्थापन, बीजतंत्रज्ञान, जैवनियंत्रण, वनस्पती आरोग्य अशा स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. अद्ययावत उपकरणांनी सज्ज अशा प्रयोगशाळांच्या जोडीला लागवडपश्‍चात तंत्रविज्ञान, पीक संरक्षण आणि कृषीविद्या असेही खास विभाग आहेत.

या प्रयोगशाळांमध्ये मसाला पदार्थ पिकांच्या वाणांचा संग्रह, संरक्षण, परीक्षण तसेच शास्त्रीय वर्गवारी केली जाते. प्रतिकूल परिस्थितीत या वाणांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी तसेच गुणवत्ता राखण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास केला जातो. विकसित वाणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी प्रमाणीकरणाबरोबरच उत्पादन तंत्राची निर्मिती केली जाते. मसाला पदार्थ पिकांच्या कीड व्यवस्थापनासाठी योग्य कीडनाशक औषध वापराचे ज्ञान विकसित केले जाते. उत्पादनपश्‍चात प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या तंत्रविज्ञानाचा या संस्थेत मागोवा घेतला जातो. मसाला पदार्थ पिकांच्या विकास, लागवड व उत्पादनातून वापरकर्त्यांचा आर्थिक-सामाजिक विकास साधण्यासाठीही ही संस्था विशेष प्रयत्न करते. 

२००१मध्ये स्थापना झाल्यापासून या संस्थेत मसाला पदार्थ पिकांचे अनेक वाण विकसित झाले असून, देशातील मसाला पदार्थ उत्पादन क्षमता दुपटीपेक्षाही जास्त झाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा काळ्या जिऱ्याचे वाण प्रथमच निर्माण करण्यात आले आहे. भारतातील मसाला पदार्थ लागवड-उत्पादन आणि बाजारपेठांचे नकाशे निर्माण करण्यात आले आहेत. नावीन्यपूर्ण संकल्पना म्हणून राजस्थानमधील जोधपूर, कोटा आणि मध्यप्रदेश, केरळ, उत्तरप्रदेश राज्यातील मिळून आठ शहरांमध्ये ‘मसाला पदार्थ बागा’ उभारण्यात आल्या आहेत. मसाला पदार्थ उत्पादक शेतकऱ्यांसाठी पिकांसाठी लागवडीपासून पीक व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया तसेच विक्रीसंदर्भातही सल्ला व मार्गदर्शन सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय नियमितपणे शेतकरी मेळावे आयोजित केले जातात, तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी मोबाइल फोनच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये मसाला पदार्थ पिकांची माहिती दिली जाते. या संस्थेची उल्लेखनीय सुविधा म्हणजे देशातील विक्रेत्यांना या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून १५ किलोग्रॅम वजनापर्यंत मसाला पदार्थ, तसेच बियाणांची खरेदी करता येते. 

वनस्पती जनुकीय विज्ञान, कृषी पदवी व पदविका विद्यार्थ्यांसाठी या संस्थेत संशोधनाच्या तसेच वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्य करण्याच्या संधी उपलब्ध असतात.

राष्ट्रीय मसाले बिया संशोधन केंद्र 

ताबिजी, अजमेर 305206 
संकेतस्थळः  https://nrcss.icar.gov.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या