भारतीय विज्ञान संस्था, कर्नाटक

सुधीर फाकटकर
सोमवार, 11 जुलै 2022

विज्ञानतीर्थे

शिकागोमध्ये होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेसाठी जात असताना प्रवासादरम्यान स्वामी विवेकानंद आणि भारतीय उद्योगविश्वाचे जनक जमशेदजी टाटा यांची भेट झाली होती. जमशेदजी टाटा एका जागतिक औद्योगिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी व्हॅन्क्युव्हरकडे निघाले होते. ही गोष्ट आहे १८९३ मधील. या भेटीत स्वामीजी आणि जमशेदजींची आधुनिक भारत घडवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेची फलश्रुती म्हणजे १९०९मध्ये म्हैसूरच्या राजघराण्याच्या पाठबळावर बंगळूर येथे स्थापन झालेली जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातली ‘भारतीय विज्ञान संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स -आयआयएस).

भारताच्या सामाजिक प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानात सर्वोत्तम संशोधन साध्य करत ते उद्योग-व्यवसायांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा दृष्टिकोन आहे. यासाठीच विज्ञान-तंत्रज्ञानातील मूलभूत शिक्षण आणि संशोधन साध्य करत संस्था शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करते आहे. आरंभी रसायनविज्ञान आणि विद्युतशास्त्र असे दोनच विभाग असलेली भारतीय विज्ञान संस्था आता या दोन विभागांखेरीज; भौतिकी, गणित, जैविक, यांत्रिकी तसेच आंतरविज्ञान शाखा अशा विभागांमध्ये विस्तारित झाली आहे. या विभागांच्या अंतर्गत एकूण ४५ उपविभाग कार्यरत आहेत. या सर्व विभागांखेरीज जैविक अवशेष, यंत्रमानव, मानवी मेंदू या विषयांमधील संशोधनासाठीही स्वतंत्र केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विभाग आणि केंद्रात असलेली जागतिक दर्जाची उपकरण प्रणाली हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. 

संस्थेने आजपर्यंत मानवी आरोग्याशी संबंधित एड्स, कंपवात, स्मृतीभंश, क्षय, कर्करोग अशा आजारांचे निदान आणि औषधे; ऊर्जाक्षेत्रासाठी अद्ययावत विद्युतवाहक, पेशी आणि पेशीद्रव्य; रेण्वीय पातळीवरील अद्ययावत पदार्थ, मायक्रो पातळीवरील इलेक्ट्रॉनिक्स संवेदक; हवामानबदलाची गणिते मांडणारे प्रारूप; यांत्रिक अभियांत्रिकीतील क्रियाप्रक्रिया सोपे करणारे संगणकीय प्रारूप अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये मूलभूत दिशादर्शक संशोधन केले आहे. जागतिक पातळीवर पोहोचलेले सुमारे ५५ हजार विषयांवरील संशोधन अहवाल भारतीय विज्ञान संस्थेच्या प्रगतीची साक्ष देतात. तब्बल पाच लाख ग्रंथांनी समृद्ध असलेले जेआरडी टाटा स्मृती ग्रंथालय या संस्थेची खास ओळख म्हणता येईल. या ग्रंथालयात येणाऱ्या नियतकालिकांची संख्या १४ हजार एवढी आहे. 

शिक्षण आणि संशोधनाच्या असंख्य संधी असलेली ही महत्त्वाची संस्था आहे. विज्ञान-तंत्रज्ञानात पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. आणि त्यापुढील उच्चशिक्षण-संशोधनाच्या संधी तर आहेच; शिवाय अल्प मुदतीचे विविध अभ्यासक्रम इथे राबवले जातात. यासाठी ‘सेंटर फॉर कंटीन्युईंग एज्युकेशन’ या खास केंद्राअंतर्गत ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अ‍ॅकॅडमीक नेटवर्क्स’, ‘मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सेस’, ‘नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्सड् लर्निंग’, ‘इंडियन टेक्निकल इकॉनॉमिक कार्पोरेशन प्रोग्रॅम’ आणि ‘डायरेक्ट टू होम’ या प्रकल्पांतर्गत विशेष अभ्यासक्रम आहेत. चौफेर विषयांमधील ज्ञान सहजपणे संपादित करण्याची संधी देणारे हे अभ्यासक्रम संशोधक, व्यावसायिक, उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत.  

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या ह्या नामवंत संस्थेच्या कर्तबगार माजी विद्यार्थ्यांची संख्या विविध क्षेत्रात अव्वल स्थानी असल्याचे दिसून येईल.

भारतीय विज्ञान संस्था
सी.व्ही. रामन मार्ग, बंगलोर 560012
संकेतस्थळः https://iisc.ac.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या