राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

सुधीर फाकटकर
सोमवार, 18 जुलै 2022

विज्ञानतीर्थे

वस्त्रप्रावरणांमध्ये ‘फॅशन’ ही संकल्पना सर्वपरिचित असली तरी फॅशन म्हणजे केवळ आकर्षक वस्त्रप्रावरणे हा समज चुकीचा आहे. कारण वस्त्रप्रावरणांचे स्वरूप वेगवेगळे प्रसंग, वातावरण तसेच कालावधीचाही विचार करता बदलत जाणे अपरिहार्य ठरते. म्हणूनच आधुनिक कालखंडात भूषाप्रकार अर्थात ‘फॅशन’ तंत्रविज्ञानापासून दूर राहिलेला नाही. फॅशन विषयात विकास व सुसूत्रता साधत वापरकर्ते आणि व्यावसायिकांसाठी दिशादर्शक अग्रगण्य संस्था असण्याच्या गरजेतून २००६मध्ये राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आली. दिल्ली येथे मुख्य केंद्र असलेली ही संस्था भारतभर सतरा ठिकाणी विस्तारित झालेली आहे. 

संस्थेत फॅशन, कापड, चर्म, विणकाम या विषयांमधील संशोधनासाठी स्वतंत्र विभाग आहेत. शिवाय फॅशन आणि जीवनपद्धत उपसाधने, फॅशन व्यवस्थापन, फॅशन तंत्रज्ञान असेही खास विभाग आहेत. फॅशन संशोधन विभागात फॅशनविषयक शोध, सादरीकरण, प्रक्रिया इत्यादींवर भर दिला जातो. कापडावरील संशोधनात धाग्यांच्या अभ्यासापासून कापडाचे घटक, नावीन्यपूर्ण आराखडे, जगभरातील पद्धतींवर मूलभूत काम केले जाते. चर्म विभागात आधुनिक जीवनपद्धतीत आवश्यक ठरत चाललेल्या चर्मवस्तूंचा अद्ययावत स्वरूपात विकास केला जातो तर विणकाम विभागात धागे, विणकामाच्या पद्धतींवर अभ्यास केला जातो. याशिवाय फॅशनला संलग्न अशा सजावटीच्या पूरक वस्तूंचाही विकास केला जातो. विविध प्रांतांतील हवामान तसेच संस्कृती आणि सद्यःस्थितीतील जगराहाटी तसेच भविष्याचा वेध घेत फॅशनचा विस्तारही अन्य उपविभागांमध्ये केला जातो.

फॅशनच्या अनुषंगाने भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा, पारंपरिक कला-कौशल्य विकास असे खास प्रकल्प राबवण्यात आले आहेत. आजवरच्या संशोधनातून शास्त्रीय ज्ञानावर आधारित एक हजार प्रकारांमधील फॅशन्स या संस्थेत निर्माण झाल्या असून, आता त्यासंदर्भात स्वामित्व हक्क मिळवण्यापर्यंत वाटचाल सुरू झाली आहे. शिवाय फॅशन विषयावर आठशेच्या दरम्यान शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. या संस्थेत कापडाचे विविध प्रकार, फॅशन्सचे विविध आराखडे तसेच वस्तूंचे संग्रहभांडार आहे. संस्थेने भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने फॅशन्स जगतातील भविष्यकाळाचा वेध घेत खास शैक्षणिक आणि औद्योगिक उपयोजनांसाठी विशेष प्रकल्प अभियान सुरू केले आहे. याशिवाय बिहारमध्ये खादी निर्मिती केंद्र व हातमाग समूह केंद्र अशा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अलीकडेच या संस्थेने दागदागिने  विषयातही नवीन फॅशन्स विकसित करण्यास सुरुवात केली आहे.  

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेतील अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे इथे मिळणाऱ्या संशोधनाच्या संधी. फॅशन विषयक्षेत्रातील शेकडो विषयांचे अभ्यासक्रम इथे राबवले जातात. काही आठवड्यांच्या प्रशिक्षणापासून पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा इथे आहे. किमान दहावी उत्तीर्णांपासून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना इथे संधी मिळते. गरजू विद्यार्थ्यांसाठी इथे शिष्यवृत्तीही दिली जाते. ‘फॅशन’ क्षेत्रातील विविध प्रकारांमुळे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती साध्य झाली आहे. 

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था
हौज खास, गुलमोहोर पार्कजवळ 
दिल्ली. 110016 
संकेतस्थळः https://www.nift.ac.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या