आनंदघन...

सुधीर गाडगीळ
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

कव्हरस्टोरी

असंख्य गाण्यांमधून फक्त ऐकलेल्या लताबाईंना मी पहिल्यांदा पाहिले ते १९६८मध्ये. अगदी स्टेजच्या पुढ्यात बसून, हिराबाग मैदानावर झालेल्या दीदींच्या सत्काराच्यावेळी. दीदींची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग आला ते मात्र त्यानंतर दहा वर्षांनी. नंतरची तीन दशके मुलाखतींच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या.

लतादीदींनी ‘आनंदघन’ या टोपणनावानं काही मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्याही काळात नवे वाटणारे काही प्रयोगही त्यांनी केले. आजही त्यांच्या त्या संगीताचा गोडवा किंचितही उणावलेला नाही. वेगवेगळ्या निमित्तांनी दीदींशी बोलताना, गप्पा मारताना  ‘आनंदघन’ हे टोपणनाव घ्यावसं त्यांना का वाटलं असेल, असा प्रश्न मनामध्ये असायचा. मग एका मुलाखतीत मी त्यांना त्याबद्दल विचारलंच. ‘भालजींना संगीतकार मिळत नव्हता. संगीतकार शोधतोय,’ असं ते मला म्हणाले. मग मी म्हटलं, ‘मी करते.’ तर म्हणाले, ‘तू नको करू. नाही जमलं तर तुझं गायिका म्हणून स्थान जाईल.’ मी म्हटलं, ‘मी टोपणनाव घेते. म्हणून मग मी ‘आनंदघन’ हे टोपण नाव घेतलं. समर्थ रामदासांची ‘आनंदवनभुवनी’ ही रचना गाता-गाता ‘आनंदघन’ हे नाव मला सुचलं. ‘मोहित्यांची मंजुळा’ चित्रपटाच्या वेळेची ही गोष्ट आहे.’

अशाच एका मुलाखतीत मी त्यांना विचारलं, ‘मराठी पाऊल पडते पुढे,’ या गाण्यात रचनांचे वैविध्य आहे ते कशामुळे आहे? त्या म्हणाल्या, ‘हे गाणं ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातलं आहे. या गाण्यात लोकसंगीताच्या वेगवेगळ्या सुरावटी वापरल्या आहेत. ‘शुभघडीला शुभमुहूर्ती...’ या ओळीच्यावेळी बाबांच्या गाण्याचे सूर सापडले ‘कृष्णार्जुन युद्ध’मधले, मग ते वापरले. असं करत करत ते गाणं वैविध्यपूर्ण झालं.’ 

असंख्य गाण्यांमधून फक्त ऐकलेल्या लताबाईंना मी पहिल्यांदा पाहिले ते १९६८मध्ये. अगदी स्टेजच्या पुढ्यात बसून, हिराबाग मैदानावर झालेल्या दीदींच्या सत्काराच्यावेळी. दीदींची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग आला ते मात्र त्यानंतर दहा वर्षांनी. नंतरची तीन दशके मुलाखतींच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या.   

‘मनोहर’ साप्ताहिकाने १९७९मध्ये केलेल्या एका विशेष अंकाच्या निमित्ताने शांता शेळके आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांनी मला लताबाईंना भेटवले. तो त्यांच्याबरोबर झालेला पहिला संवाद. नंतर मग १९८४च्या सुमारास दूरदर्शनसाठी मी पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती घेतल्या, त्या पाचही वेळा मी लताबाईंना भेटलो. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचा निवेदक या नात्यानेही जवळजवळ दरवर्षी लताबाईंना भेटण्याचा योग  येत असे. 

१९९०मध्ये त्यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने गोव्यात झालेली मुलाखत आणि त्याच्या आधी फाळके पुरस्काराच्या निमित्ताने मुंबईत झालेली मुलाखत या मी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतींपैकी मलाच सगळ्यात आवडलेल्या मुलाखती आहेत. त्यातले काही भाग आजही आठवतात. 

यातल्या एका मुलाखतीत मी दीदींना विचारलं, ‘सत्तर वर्षांच्या तुमच्या कारकीर्दीचा आढावा कसा घ्याल? ’ त्या म्हणाल्या, ‘अगदी पूर्वी अभिनय करता करता गाणारे होते. नंतर मी, रफी, किशोर आमची फळी गाऊ लागली, आणि संगीतकारही मग नवं संगीत करू लागले. आमच्या आधीच्या काळात, म्हणजे नूरजहाँच्या काळात सूर, तालांवर मर्यादा होती. आमचे मात्र ‘पुरुषांचे’ सूर होते, काळी दोन, सफेद तीन, सफेद चार; त्यामुळे आम्हाला मर्यादांचं बंधनच नव्हतं. आमच्या काळात संगीतकारांनाही खात्री पटली की यांना कोणताही सूर दिला तरी हे गायक गाऊ शकतात.’ एकदा त्यांना मी विचारलं, ‘संगीतकारांच्या रचनांचं आव्हान वाटले का कधी?’ म्हणाल्या, ‘नाही आव्हान असं नाही, पण चार संगीतकारांच्या रचना कसून गायच्या हे भान मात्र ठेवलं; एक सज्जाद  हुसेन, दुसरा, सलिल चौधरी, तिसरा मदन मोहन आणि चौथा हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथ भाऊ म्हणून नाही, पण त्याच्या चाली गाणं अवघडच होतं.’  दीनानाथ बाबांकडून तुम्ही काय घेतलंत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या होत्या, ‘माझं गाणं हीच बाबांची देन आहे.’ 

दीदींची शेवटची भेट अजूनही मनात ताजी आहे. ७ जुलै २०१९ला दीदींच्या पेडर रोडच्या घरात त्यांना भेटलो होतो. माझा मुलगाही बरोबर होता. त्यावेळी त्यांनी विचारलं, ‘तुमच्या मोबाईलची रिंगटोन मदन मोहनची  आहे ना हो?’ मी ‘हो’ म्हणालो. तर, ‘अरे ऽऽ.... त्याची मूळ चीज माझीच आहे, मागं मीच सांगितलीय मदनला,’ असं म्हणून आत्ता दीड वर्षांपूर्वी, म्हणजे त्यांच्या वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी आम्हाला ती चीज ऐकवली. मी आणि माझा मुलगा खलास...

ती चीज मनात कायमची कोरली गेलीय!

संबंधित बातम्या