भारतीय तांदूळ संशोधन संस्था, हैदराबाद (तेलंगणा)

सुधीर फाकटकर
सोमवार, 10 जानेवारी 2022

विज्ञानतीर्थे

आपल्या देशात शेतीविषयक संशोधनाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्वकाळात १९२९मध्ये स्थापन झालेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेपासून पासून सुरू होतो. स्वातंत्र्यानंतर कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत या परिषदेचा विस्तार होत शेती आणि संबंधित विषय-क्षेत्रांसाठी संचलनालय, राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्था केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांची निर्मिती होत गेली. आज भारतात राष्ट्रीय पातळीवर ७९ संशोधन संस्था केंद्रे, १३ कृषी संशोधन संचलनालये, सहा ब्युरो आणि ७० कृषी विद्यापीठे आहेत. याखेरीज ग्रामीण पातळीवर असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांची संख्या ७२२ आहे. यातच आताच्या तेलंगणा राज्याच्या राजधानीतील ‘भारतीय तांदूळ संशोधन संस्था’ आहे. 

भारतीय तांदूळ संशोधन संस्था १९७५मध्ये आकाराला आली. भारतीयांचा आहारातील एक प्रमुख घटक म्हणून तांदळाची ओळख आहे. अभ्यासकांच्या मते भारतात तांदळाचे सहा हजार दरम्यान वाण आहेत. तांदळासंदर्भात उत्पादकांसाठी कल्याणकारी आणि वापरकर्त्यांसाठी उचित पोषणमूल्याचे धोरण समोर ठेवून ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या धोरणाच्या अनुषंगाने तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तांदळाचे गुणवत्तापूर्ण वाण विकसित करणे तसेच लागवड, उत्पादन प्रक्रियांसाठी पर्यावरणीय हानी टाळणारे तंत्रविज्ञान विकसित करण्याचे ध्येय या संस्थेने बाळगले आहे.   

संस्थेच्या ध्येयउद्देशांच्या पूर्ततेसाठी तांदूळ पिकाच्या अनुषंगाने 
१) सुधारणा २) उत्पादन ३) संरक्षण आणि ४) माहिती प्रसारण असे स्वतंत्र विभाग आहेत. तांदूळ पीक सुधारणा विभागात तांदूळ रोपांच्या पैदाशीसंदर्भात जनुकीय पातळीवरील संशोधन चालते. शिवाय या विभागात तांदळाच्या देशी आणि संकरित वाणांच्या बियांणासंदर्भात अभ्यास केला जातो. उत्पादन विभागात तांदळाच्या पिकासाठी सुयोग्य जमिनीच्या संदर्भात मृदा विज्ञान-अभियांत्रिकीच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. उत्पादन विभागात तांदूळ पिकांसंदर्भात हवामानाचाही अभ्यास केला जातो. संरक्षण विभागात तांदूळ पिकावरील संभाव्य कीड आणि त्या किडीच्या निर्मूलनासाठी कीटकनाशकांवर संशोधन केले जाते. माहिती प्रसारण विभागात या संशोधन संस्थेत विकसित होणाऱ्या नावीन्यपूर्ण ज्ञानमाहितीचा प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तांदूळ पीकवाढीसाठी आवश्यक असलेल्या सौरऊर्जेचा अद्ययावत पद्धतीने ‘फोटो थर्मिक इंडेक्सींग’ अभ्यासणारी प्रणाली येथे आहे. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास स्वतंत्र विभाग आहे. या विभागात तांदूळ बियाणांच्या उपलब्धतेपासून लागवड ते पीक व्यवस्थापन आणि विक्रीपर्यंत मार्गदर्शनपर उपक्रम असतात. अद्ययावत माध्यमांच्या (मोबाईल, इंटरनेट, अ‍ॅप इत्यादी) वापरातूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना या संस्थेतील ज्ञानमाहितीचा उपयोग करून घेता येतो. कृषी आणि संबंधित विषयांमधील विद्यार्थ्यांना इथे संशोधन तसेच कार्यक्षेत्राच्या विविध संधी उपलब्ध असतात. 

तांदळाच्या शेकडो देशी आणि संकरित जाती विकसित केलेल्या या संस्थेने देशभर तांदूळ पिकामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकारी तत्त्वावर ऑल इंडिया कोऑर्डीनेटेड राइस इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम हा खास कार्यक्रम आखलेला आहे. या संस्थेने विकसित केलेल्या तांदळाच्या संशोधनाचा आत्तापर्यंत अठरा राज्यांनी उपयोग केलेला आहे. हैदराबादस्थित भारतीय तांदूळ संशोधन संस्थेप्रमाणेच ओरिसात कटक येथेही तांदूळ पिकावर संशोधन करणारी केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राइस रिसर्च 
राजेन्द्रनगर, हैदराबाद, तेलंगणा
संकेतस्थळः www.icar-iirr.or

संबंधित बातम्या