नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी, चेन्नई

सुधीर फाकटकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

विज्ञानतीर्थे

सत्तरीच्या दशकात जगभरात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्याने प्रगत देशांना बसली होती. त्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदींच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जा स्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडे नवीन आणि नवकरणीय (अक्षय) ऊर्जेसंदर्भात ध्येयधोरणे ठरवण्यापासून त्याविषयीचे संशोधन आणि त्या क्षेत्राचा विकास करण्याची तसेच उपक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे १९८२मध्ये प्रथम नवकरणीय ऊर्जा विभाग निर्माण झाला, तर १९९२ साली स्वतंत्ररीत्या नवकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रासाठी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन ऊर्जा सुरक्षा आणणे हे मुख्य ध्येय नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाने समोर ठेवले आहे. याबरोबरच प्रदूषण न करणाऱ्या (स्वच्छ किंवा हरित) ऊर्जेचा विकास करणे आणि वापर वाढवणे तसेच या ऊर्जेचा देशभरात  सर्वदूर किफायतशीर दरात पुरवठा करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या ध्येय-उद्देशांच्या पूर्ततेसाठी १९९८मध्ये चेन्नई येथे पवनऊर्जेसंदर्भात स्वतंत्र आणि स्वायत्त ‘राष्ट्रीय पवनऊर्जा संस्था’ स्थापन करण्यात आली. 

पवनऊर्जा क्षेत्रात संशोधन करत उच्च गुणवत्तेचे तंत्रविज्ञान विकसित करणे, या तंत्रविज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे आणि देशात पवन ऊर्जेचा वापर वाढवणे तसेच या विषय-क्षेत्रात सल्ला तसेच मार्गदर्शन सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्था कार्यरत आहे. या संस्थेतील संशोधन विभागात काही किलोवॅट ते काही मेगावॅट शक्तीच्या पवनचक्क्या निर्माण केलेल्या असून या पवनचक्क्यांच्या आधारे वैविध्यपूर्ण संशोधन चालते. या संशोधनात खासगी उद्योगक्षेत्रांनाही सहभागी करण्यात येते. या संस्थेत पवनऊर्जेच्या अनुषंगाने आवश्यक असणारी मानके आणि नियमनांसंदर्भात (स्टॅन्डर्ड अ‍ॅन्ड रेग्युलेशन) प्रणाली तसेच मोजमापन आणि तपासणी सुविधा उभारण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पवनऊर्जा निर्मितीसाठी संस्थेकडून देशभरातल्या विविध ठिकाणच्या वाऱ्याच्या वेगाचा अभ्यासही केला जातो.

साधारण प्रती तास चार लाख मेगावॅट विद्युतशक्तीचा वापर असलेल्या आपल्या देशात पवनऊर्जेचा सध्याचा वाटा सुमारे दहा टक्के आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पवनऊर्जेचा जास्त वाटा असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या स्थानी आहे. तर आपल्यापेक्षा तिप्पट ते सातपट पवनऊर्जेचे उत्पादन चीन, अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये केले जाते. या पार्श्‍वभूमीवर २००६पासून २०२०पर्यंतच्या कालखंडात  पवनऊर्जा सहापट वाढवत भारतही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या (नॉनकन्व्हेन्शल, उदाहरणार्थ सौरऊर्जा, समुद्री लाटांच्या वापरातून मिळणारी ऊर्जा इत्यादी) विस्ताराकडे दमदारपणे वाटचाल करत आहे. यासाठी राज्यांना सहभागी करून पवनऊर्जा विस्ताराचे उपक्रम राबवले जातात. यासाठी केंद्रीय प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून प्रत्येक राज्यात या प्राधिकरणाचे प्रातिनिधीक कार्यालय आहे.  संस्थेने डेन्मार्क सरकारच्या डनिडा या संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने तमिळनाडूतील थुथूकुडी जिल्ह्यात एक विंड टर्बाइन टेस्ट स्टेशनही उभारले आहे. याचबरोबरीने खासगी उद्योगक्षेत्रांनाही पवनऊर्जा साधनसामग्री उत्पादनांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, कार्यशाळा इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यांत्रिक विद्युत आणि विमान अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे वैज्ञानिक अधिकारी तसेच संशोधनासाठी संधी उपलब्ध असतात. 

    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी 
    वेल्लाचेरी, तांब्रम मेन रोड 
    पल्लीकरानी, चेन्नई, तामिळनाडू.  
    संकेतस्थळ ः www.niwe.res.in

(लेखक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या