उपयुक्त वार्षिक माहितीपत्र 

ॲड. सुकृत देव
सोमवार, 24 जानेवारी 2022


विशेष

प्राप्तिकर विभागाकडून नवीन ॲन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट (AIS), अर्थात वार्षिक माहितीपत्र ही उपयुक्त अशी प्राप्तिकर प्रणाली प्राप्तिकरदात्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.  नोव्हेंबर २०२१पासून ही प्रणाली उपलब्ध झाली आहे. हे वार्षिक माहितीपत्र https://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहता येते. प्रत्येक प्राप्तिकरदात्यांचे वार्षिक माहितीपत्र आणि त्यातील माहिती वेगवेगळी असेल. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती, विविध वजावटींची माहिती, कर भरण्याची माहिती इत्यादी सर्व आवश्यक बाबी त्यामध्ये असतील.

प्राप्तिकराचे पासबुक समजल्या जाणाऱ्या ‘फॉर्म २६ ए एस’चे नवे रूप म्हणजेच हे वार्षिक माहितीपत्र (AIS) आहे. पण हे नवीन वार्षिक माहितीपत्र अधिक सरस आहे. अधिक उत्पन्नाची माहिती, खर्चाचा तपशील देणारे हे माहितीपत्र व्यापक स्वरूपाचे आहे. जोपर्यंत नवे वार्षिक माहितीपत्र पूर्णपणे कार्यान्वित, परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘फॉर्म २६ ए एस’सुद्धा अस्तित्वात राहणार आहे. ‘फॉर्म २६ ए एस’मधून प्राप्तिकरदात्यांना विविध माहिती मिळते. त्यामध्ये, पगारदारांना मिळणारा पगार, व्यवसाय-धंद्यातून मिळणारे उत्पन्न, प्रॉपर्टीमधून मिळणारे उत्पन्न, बँकांमधील मुदत ठेव, बचत ठेव, सुरक्षा ठेवींवरचे व्याज, कमिशन, करदात्यांच्या वतीने कंत्राटदारांच्याद्वारे कापलेल्या कराची माहिती (टीडीएस), करदात्यांच्यावतीने कर गोळा करून प्राप्तिकर भरल्याची माहिती (टीसीएस), आगाऊ कर किंवा स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे भरलेला प्राप्तिकर, प्राप्तिकर परतावा (रिफंड) इत्यादी या सर्व व्यवहारांचा तपशील आता अधिक व्यापक रूपात वार्षिक माहितीपत्रामध्ये दिसतील, याची खात्री आहे.

वार्षिक माहितीपत्राबद्दल काही ठळक मुद्दे 

  • नवीन व सुधारित वार्षिक माहितीपत्रामध्ये पगाराचा तपशील, वेतन, व्याज, लाभांश, व्यावसायिक जमा पावत्या, शेअर व्यवहारातील लाभांश, म्युच्युअल फंड व्यवहार, सिक्युरिटीज व्यवहार, मालमत्ता व्यवहार, परदेशी व्यवहार, क्रेडिट कार्ड व्यवहार इत्यादी बाबींसह प्राप्तिकरदात्यांच्या आर्थिक वर्षातल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपशील दिसणार आहे, हे लक्षात असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक माहितीपत्रामध्ये पुरवलेली (नोंदवलेली) माहिती/मूल्य, नंतर प्रक्रियेतील मूल्य आणि बदलेली माहिती/मूल्य, या सर्व गोष्टींचा समावेश असेल.
  • जर वार्षिक माहितीपत्रामध्ये दिलेली माहिती/व्यवहार तुमच्याकडे असलेल्या माहिती/व्यवहारापेक्षा वेगळी असेल, किंवा माहिती/व्यवहारातले तपशील जुळत नसेल, चुकीचे असतील, तर प्राप्तिकरदाता त्याच्या वार्षिक माहितीपत्रामध्ये ऑनलाइन अभिप्राय/फीडबॅक (Feedback) दाखल करू शकतात. त्यामुळे वार्षिक माहितीपत्रामध्येदेखील बदल होऊ शकतो. या सोयीमुळे प्राप्तिकरदात्यांना खूप उपयोग होणार आहेत कारण, ते कोणाची वाट न बघता स्वतःदेखील अभिप्राय/फीडबॅक पाठवू शकतात.
  • वार्षिक माहितीपत्र प्राप्तिकरदाता लॉगइन करून सर्व्हिसेस टॅबमधून डाउनलोड करू शकतात आणि पीडीएफ फाईल उघडण्यासाठी पासवर्ड आहे : प्राप्तिकरदात्याचा पॅन नंबर (मोठ्या अक्षरात टाकावा) आणि त्याच्याबरोबर प्राप्तिकरदात्याची जन्मतारीख. दोन्ही एकत्रित करून टाकले, तरच वार्षिक माहितीपत्र उघडेल आणि त्यातील सविस्तर माहिती मिळेल.
  • प्राप्तिकर विवरणपत्र भरताना वार्षिक माहितीपत्र व ‘फॉर्म २६ ए एस’मधील सर्व व्यवहार/वजावटी जुळण्याचे आव्हान नक्कीच सर्व प्राप्तिकरदात्यांसमोर आहे, ते जुळल्यानंतरच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावे हेच हिताचे आहे. वार्षिक माहितीपत्र पुढील वर्षी किंवा आर्थिक वर्ष २०२१-२२चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्यावेळेपर्यंत अधिक परिपूर्ण आणि पारदर्शक असेल अशी अपेक्षा नक्कीच आहे.

 

 

संबंधित बातम्या