वॉशिंग्टन डी.सी.

सुलक्षणा महाजन
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

जनराजधानी

अमेरिका हा जगातला पहिला असा देश आहे की जेथे लोकशाही आणि संघराज्य आधी प्रस्थापित झाले, नंतर राज्यघटना तयार झाली आणि चोवीस वर्षांनी वॉशिंग्टन येथे राजधानी तयार झाली. राजधानीसारख्या इतर अनेक मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या नियोजनाचा प्रस्ताव हा लोकशाहीमध्ये आवश्यक आणि उपयुक्त असतो. तसेच नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची प्रगल्भता वाढण्यासाठी आणि नागरिकांची लोकशाही राज्यव्यवस्थेशी सुसंगत अशी मानसिकता घडविण्यासाठी त्यांचे योगदान असते. 

अमेरिकेसारख्या लोकशाही देशाने घडविलेल्या वॉशिंग्टन डी.सी. या राजधानीच्या निर्मितीची कथा मनोरंजक आहे, तसेच ते लोकशाही प्रक्रियेवर प्रकाश टाकणारे आणि विश्वास ठेवण्यास मदत करणारे उदाहरणही आहे. लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये राजधानीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची निर्णय प्रक्रिया किती दीर्घ असते आणि त्यात अनेकांचे  हितसंबंध, अपेक्षा कशा गुंतलेल्या असतात हे त्यातून लक्षात येते. वाद, विवाद, चर्चा, मुद्द्यांची देवाणघेवाण, तडजोडी आणि नंतर सहमती होऊन महत्त्वाचे निर्णय कसे होतात हेदेखील अशा उदाहरणातून लक्षात येते.

अमेरिकेचे संघराज्य, लोकशाही आणि नवी राजधानी 

ब्रिटिश वसाहतीच्या जोखडामधून १७७६मध्ये स्वतंत्र झालेल्या उत्तर अमेरिकेतील तेरा राज्यांनी नवे संघराज्य घडविण्याचा निर्णय घेतला. १७८१साली ह्या राज्यांच्या प्रतिनिधींनी एक करार करून अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले तरी ही तेरा राज्ये प्रशासनासंबंधीचे बहुतेक निर्णय स्वतंत्रपणे घेत असत. त्यांच्यात ताळमेळ नसे आणि गोंधळ, भांडणे होत असत. तेव्हा त्यांच्यामध्ये सुसूत्रता असावी, संघराज्याचे लोकप्रतिनिधी मंडळ असावे आणि तिला  एका समान राज्यघटनेची चौकट असावी आणि त्याद्वारे त्यांच्यातील संबंधांचे तसेच संघराज्याचे नियमन करता यावे म्हणून एक शक्तिशाली केंद्रशासन असण्याची गरज वाटू लागली. तेरा राज्यांतील प्रतिष्ठित अशा सत्तर पुरुष सदस्यांची घटना समिती स्थापन झाली. त्यातले फक्त पंचावन्न सदस्य फिलाडेल्फिया येथे आयोजित करण्यात आलेल्या घटना समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. चर्चा, वाद असे सर्व सोपस्कार होऊन अखेरीस अमेरिकेची राज्यघटना लिहिली गेली. संघराज्याच्या कामकाजासाठी एक कायमचे केंद्र असावे असेही घटनेने ठरविले. १७८७पर्यंत सर्व राज्यांच्या प्रतिनिधी मंडळात त्यावर चर्चा झाल्या आणि राज्यघटनेवर शिक्कामोर्तब होऊन लोकशाही असलेले संघराज्य अस्तित्वात आले. राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशासाठी कायदे करण्याचे काम लोकप्रतिनिधी मंडळाकडे म्हणजे संसदेकडे तर त्यांच्या अंमलबजावणीचे काम राष्ट्राध्यक्षांवर सोपविण्यात आले. त्यासाठी प्रत्यक्ष मतदानातून राष्ट्राध्यक्ष निवडला जाऊ लागला, तरी त्यावर संसदेचा अंकुश राहील हे बघितले गेले. अठराव्या शतकातील लोकशाहीमध्ये जमिनीचे मालक असणाऱ्या पुरुषांनाच मतदानाचा हक्क होता, म्हणजेच मतदार मर्यादित होते. दर चार वर्षांनी निवडणुकीद्वारे संसद सदस्य आणि राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रथा सुरू झाली. कालांतराने १८७० साली आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या पुरुषांसकट सर्व पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यानंतर पन्नास वर्षांनी, १९२०मध्ये, स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. त्यासाठी मूळच्या राज्यघटनेत दुरुस्त्या करण्यात आल्या. अशा प्रकारे अमेरिकेत लोकशाही व्यवस्था हळूहळू आणि नागरिकांच्या मागण्या आणि गरजा, अपेक्षांनुसार अडीचशे वर्षे विकसित होत आली आहे. 

वॉशिंग्टन शहरातील राजधानी वर्ष १८००मध्ये कार्यरत झाली. लोकशाही देश आणि राजधानीचे शहर घडविण्याचा उपक्रम काही सोपा नव्हता. मागे वळून बघता दोनशे वर्षांपेक्षा जास्त असा हा दीर्घ प्रवास करून आज अमेरिका आणि तेथील नागरिक हे दोन्ही प्रगल्भ झाल्याचे २०२० साली झालेल्या निवडणुकीतून जगाला दिसले. वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर झालेला नव्या राष्ट्राध्यक्षांचा शपथ विधी जगातील असंख्य लोकांना बघता आला. तेव्हा लोकशाही देशाचे प्रतीक असणाऱ्या संसदभवनांचे स्वरूप आणि ऐतिहासिक तसेच जागतिक महत्त्व अधोरेखित झाले. ह्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनच्या निर्मितीची कथा आणि लोकशाही निर्णय प्रक्रियेतील ताणे-बाणे समजून घेणे आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

राजधानीच्या स्थानाची निवड

अमेरिकेच्या नव्या लिखित घटनेनुसार संसदेला कायदे मंडळाचे तर राष्ट्राध्यक्षांना प्रशासनाचे अधिकार मिळाले, तरी त्यांच्या कामकाजासाठी एक कायमचे ठिकाण नव्हते. १७८३ ते १७९० ह्या काळात दर सहा महिन्यांनी ट्रेंटन आणि जॉर्ज टाऊन ह्या मेरीलँड राज्यातील शहरात किंवा प्रीस्टन ह्या न्यू जर्सी राज्यातील शहरात, किंवा पेनसिल्व्हानिया राज्यातील यॉर्क शहरांमध्ये संसदेची अधिवेशने आळीपाळीने होत. ही सर्व शहरे राजधानीच्या स्पर्धेत उतरली. त्यामुळे राजधानी उभारण्याचा निर्णय झाला असला तरी ह्या स्पर्धेतून तोडगा काढणे हे एक आव्हान बनले. राजेशाहीमध्ये एकाच माणसाच्या हातात सत्ता असे तेव्हा त्याच्या मर्जीनुसार राजधानीचे स्थान, स्वरूप आणि वेळापत्रक ठरविण्याचा निर्णय सोपा असे. पण अमेरिकेच्या लोकशाही संघराज्यात ते काम अवघड होते. या शिवाय राजधानीच्या निर्णयात तीन घटकांचा विचार जाणे आवश्यक होते. एक म्हणजे संसद सदस्य, दुसरे राष्ट्राध्यक्ष, आणि तिसरे म्हणजे देशाने स्वीकारलेली राज्य घटनेची चौकट आणि नियम.  

राजधानीसाठी सुयोग्य स्थान निवडण्यासाठी १७९०मध्ये लोकप्रतिनिधींची एक समिती तयार झाली. राजधानीचे स्थान ठरविणे हे या समितीसाठी मोठे आव्हान ठरले. सुरुवातीपासूनच राजधानीच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय चढाओढ, गटबाजी, वंश, राष्ट्रीयत्व, अस्मिता, सत्तास्पर्धा यांसारख्या अनेक विषयांवरून अडथळे निर्माण होत होते. तेव्हा जर ह्या स्पर्धेमध्ये आजच्या अमेरिकेतील पन्नास राज्ये असती तर ती चुरस किती तीव्र असती याची कल्पना केलेलीच बरी! राजधानी असलेले राज्य प्रगत असेल ही अपेक्षा असल्यामुळे प्रत्येक राज्याला राजधानी आपल्याच राज्यात असावी, असे वाटत असे. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वप्रथम समितीने राजधानीचे भौगोलिक स्थान निवडण्यासाठी निकष ठरविले.

राजधानी समुद्र किनारी असावी की देशाच्या मध्यभागी असा प्रश्न आला तेव्हा ते स्थान पूर्व आणि पश्चिम म्हणजेच अटलांटिक-पॅसिफिक समुद्र किनाऱ्यापासून दूर, आणि देशाच्या मध्यावर असावे यावर एकमत झाले. परंतु ते स्थान उत्तरेच्या की दक्षिणेच्या राज्यात असावे ह्यावर वाद झाले! अमेरिकेचे नागरी युद्ध संपून दक्षिण-उत्तरेची राज्ये तेव्हा एकत्र आली असली, तरी त्यांच्यात सामाजिक विषमता मोठी होती. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या लोकांचे, शेतीचे प्रमाण मोठे होते. तर उत्तरेच्या राज्यांमध्ये व्यापार आणि आधुनिक उद्योगांचे प्राबल्य होते. दक्षिण-उत्तर राज्यांतील समाजांमध्ये नवे नाते निर्माण करण्यासाठी राजधानी दक्षिणेच्या जवळ असणे समितीला आवश्यक वाटले. त्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन, अलेक्झांडर हॅमिल्टन, जेम्स मॅडिसन आणि थॉमस जेफरसन ह्या चार महत्त्वाच्या नेत्यांनी चर्चा करून सहमती घडवून आणली. दक्षिणेकडील मेरीलँड राज्यातील जॉर्जटाऊन आणि व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांडर ह्या दोन शहरांच्या मध्यभागी जमिनीचे १०० चौ. मैल क्षेत्रफळ निवडले. दोन्ही राज्यांकडून ती जमीन मिळवण्यात आली. ह्या जमिनीच्या क्षेत्राला लागूनच पोटोमॅक नदीचा मनोहारी किनारा होता. व्यापारासाठी तो उपयुक्त होता. ह्या नवीन विभागाला अमेरिकेचा शोध लावणाऱ्या कोलंबसाचे स्मरण म्हणून ‘डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’ आणि शहराला पहिले राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे स्वातंत्र्य सेनानी वॉशिंग्टन ह्यांचे हे नाव देण्यात आले. म्हणूनच आज ही राजधानी ‘वॉशिंग्टन डी.सी.’ ह्या नावाने ओळखली जाते. राजधानीचे सर्व नियोजन आणि उभारणी करण्याचे काम जॉर्ज वॉशिंग्टनच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीने केले.  

पिअर चार्ल्स लेफंट (Pierre Charles L’Enfant) ह्या वास्तू आणि नगर रचनाकाराने पॅरिसच्या धर्तीवर अमेरिकेच्या नवीन राजधानीचे नियोजन केले. लांब-रुंद काटकोनातले रस्ते आणि त्यांना छेद देणारे काही तिरके रस्ते. रस्त्यांच्या मधल्या जागेत कार्यालयीन आणि इतर इमारतींचे नियोजन होते. संसदेच्या सभागृहाला सर्वात महत्त्वाचे आणि उंच, एका डोंगरावरचे स्थान मिळाले. त्या वास्तू समोर पूर्व-पश्चिम अक्षावर एक लांबच लांब,  रुंद आणि लाखो लोकांना सामावून घेईल असे सार्वजनिक भव्य प्रांगण राखण्यात आले. आज ते राष्ट्रीय मॉल म्हणून ओळखले जाते. त्याच्या एका बाजूला कॉन्स्टिट्युशन तर दुसऱ्या बाजूला इंडीपेन्डन्स अव्हेन्यू हे मुख्य रस्ते आहेत. डोंगराच्या माथ्यावर संसद सभागृहाची वास्तू तयार करण्यात आली आहे आणि तेथवर जाण्यासाठी रुंद पायऱ्याची सोय आहे. संकुलाला कॅपिटॉल म्हटले जाते. ह्या विशाल दगडी इमारतीच्या रचनेवर, त्या उंच इमारतीवर असलेल्या घुमटाद्वारे राजेशाही थाटाची भव्यता प्रतीत होईल ह्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्या काळातील पारंपरिक युरोपच्या वास्तू शैलीचा प्रभाव त्या इमारतीवर असलेला सहजपणे दिसतो. लोकशाही राज्य पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय लोकसभेपेक्षा दुय्यम स्थानी मानले गेले आणि राष्ट्राध्यक्ष सर्व शक्तिमान असले तरी त्यांचे कार्यालय आणि निवास स्थान असलेले हे व्हाइट हाऊस तितक्या प्रमाणात भव्य स्वरूपाचे नाही. कॅपिटॉल हिलच्या जवळ पण एका बाजूला आहे. सुरुवातीच्या आराखड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी काही तरतूद नव्हती. पण आवश्यकता निर्माण झाल्यावर त्यासाठी कॅपिटॉल हिलच्या मागच्या बाजूस इमारत बांधली गेली. 

वॉशिंग्टन शहर गेली दोनशे वर्षे हळूहळू विकसित होत गेले तसे त्याचे स्वरूप, रचना आणि तपशील, सांस्कृतिक महत्त्व बदलत जाऊन अधिक ठसठशीत झाले आहे. आज त्या शहराला जागतिक महत्त्व आले आहे ते तेथील अनेक प्रकारच्या जागतिक संस्थांमुळे. शहराची लोकसंख्या आता ६५ लाख झाली आहे. हे सर्व नागरिक जगातील अनेक देशांतून येऊन स्थायिक झालेल्या लोकसमूहाचे आहेत. बहुभाषिक असले तरी आता इंग्रजी भाषा आणि अमेरिकन संस्कृतीमध्ये ते सामावून गेले आहेत. शहराचा पसारा वाढून जॉर्ज टाऊन आणि ट्रेंटन शहरांना टेकला आहे. असे असले तरी तेथील अनेक विकास नियम मात्र बदललेले नाहीत. राष्ट्रीय मॉलच्या मध्यभागी असलेल्या स्मारकाच्या उंच स्तंभापेक्षा कोणतीही इमारत तेथे उंच नसते. त्यामुळे तेथे न्यू यॉर्क ह्या आर्थिक राजधानीसारख्या गगनचुंबी इमारती नाहीत. जुन्या आणि नव्या वास्तू शैलींमध्ये तसेच अनेक प्रादेशिक वास्तू शैलींमध्ये बांधलेल्या इमारती आकर्षक आहेतच शिवाय वेगवेगळ्या काळाचे, सांस्कृतिक वैविध्याची आठवणही करून देतात. 

वॉशिंग्टनचे पर्यटन 

जगभरातून लाखो लोक वॉशिंग्टनला कामासाठी, शिक्षणासाठी आणि पर्यटनासाठी येतात. तेथील कॅपिटॉल हिलचे संसद भवन हे अमेरिकेतील नागरिकांना आणि पर्यटकांना आकर्षक करणारे, लोकशाहीचे  जागतिक महत्त्वाचे स्थान आहे. तेथील भव्य राष्ट्रीय मॉलच्या दुतर्फा अनेक म्युझियम निर्माण करण्यात आली आहेत. नासा, स्मिथसोनियम, नॅचरल हिस्टरी म्युझियम ही ठिकाणे सर्वात आकर्षक आहेत. आधुनिक कलादालने, अमेरिकेतील मूळचे रहिवासी आणि त्यांची संस्कृती अशा अनेक विषयांना कवेत घेणाऱ्या भव्य आणि कलात्मक इमारतींमध्ये मांडलेली प्रदर्शने बघणे हा एक न संपणारा, अविस्मरणीय आनंद देणारा, पायाचे तुकडे पाडणारा, आणि मनाला दमवणारा उत्सव असतो. सुदैवाने आज तेथे प्रत्यक्ष जाता येते किंवा ते नाही जमले तरी फोटो, चित्रे, चित्रपट, साहित्य अशा विविध माध्यमातून त्यात सामील होता येते. त्यासाठी जागतिक संस्कृतीचे भान आणि मोकळे उत्साही आणि अनुभवोत्सुक मन मात्र पाहिजे.

संबंधित बातम्या