कॅनडाची राजधानी ओटावा

सुलक्षणा महाजन
सोमवार, 14 मार्च 2022

जनराजधानी
 

एका साध्या व्यापारी आणि संरक्षण केंद्रापासून सुरू झालेला ओटावाचा प्रवास आता राजधानीच्या स्वरूपात स्थिरावला आहे. केवळ जंगलातील लाकडाच्या व्यापारासाठी अस्तित्वात आलेले ओटावा शहर हे दोन नद्यांच्या संगमावर असलेले मोक्याचे गाव होते. नदीतून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे स्थान योग्य होते. व्यापार केंद्र आणि लष्करी छावणी म्हणून त्याचा विस्तार होत होता. राजधानीचे शहर म्हणून त्या शहराची निवड करण्यामागे शहराचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे ठरले. 

उत्तर अमेरिका खंडातील मोठा आणि महत्त्वाचा देश एक देश म्हणजे कॅनडा. गेल्या महिन्यात कोरोनाची लस घेण्यास नकार देणारे निदर्शक राजधानी ओटावावर मोर्चा घेऊन गेले, त्यामुळे ओटावा शहर प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामानाने कॅनडामधले टोरांटो हे सर्वात मोठे असलेले महानगर सर्वांना माहीत असते. शिवाय ऑलिंपिकच्या स्पर्धा भरवलेल्या असल्यामुळे मॉन्ट्रीअल हे दुसरे प्रसिद्ध शहरही अनेकांना माहीत असते. त्यामानाने कॅनडाची राजधानी असलेले ओटावा हे शहर मात्र ब्रिटनची राजधानी लंडन किंवा अमेरिकेची वॉशिंग्टन ह्या राजधान्यांच्या शहरांइतके प्रसिद्ध नाही. आकारमान आणि लोकसंख्येचा विचार करता कॅनडामधील शहरांच्या क्रमवारीत ओटावाचा क्रमांक पाचवा आहे. तरीही ओटावाला राजधानी म्हणून असलेले जागतिक महत्त्व दुर्लक्षिता येत नाही. तीव्र स्पर्धा असताना नामांकन नसलेला नसलेला खेळाडू अचानकपणे सुवर्ण पदक मिळवून जातो त्या प्रमाणे लोकशाही स्पर्धा असलेल्या कॅनडातील शहरांमध्ये अनपेक्षितपणे ओटावाला राजधानी होण्याचा मान मिळाला. लोकशाही राज्यव्यवस्थेच्या ताणतणावात आणि स्पर्धेच्या प्रक्रियेत सुदैवी ठरलेल्या ह्या जनराजधानीची निर्मिती आणि नियोजन कथा म्हणून विशेष महत्त्वाची  वाटते. 

कॅनडा देशाची कुळकथा 
सोळाव्या शतकापासून युरोपमधील  लोक कॅनडाच्या पूर्वेकडील अटलांटिक किनाऱ्यावर पोचू  लागले होते. सुरुवातीला मुख्यतः फ्रेंच आणि नंतर ब्रिटिश लोकांनी तेथे वेगवेगळ्या भागात  हातपाय पसरले. तेथील स्थानिक लोकांच्या जमिनी घेऊन वसाहती स्थापन केल्या त्या व्यापारासाठी. लाकूड, बिव्हर प्राण्यांची केसाळ कातडी आणि खनिजे ह्यांचा व्यापार तेथील नद्यांमधून चालत असे. युरोपमधील बाजारपेठांबरोबरच अमेरिकेच्या भागांशी व्यापार होता. त्याच बरोबर युरोपमधील राजकीय स्पर्धा, भांडणे आणि लढाया तेथे पोचल्या होत्या. इंग्लिश-फ्रेंच लोकांच्या एकमेकांबरोबरच्या लढाया होत्याच. शिवाय  दक्षिणेकडील नवीन संघराज्य स्थापन झालेल्या असलेल्या अमेरिकेशी लढाया होत होत्या. 

तेथील नवीन फ्रान्स म्हणून ओळखला जाणारा प्रदेश लढाई-तह असे सर्व सोपस्कार होऊन  १७६३मध्ये ब्रिटनच्या राणीच्या आधिपत्याखाली आला. त्या नंतर वीस वर्षांनी कॅनडा आणि उत्तर अमेरिकेमध्येही सीमाप्रश्नावावरून अनेक लढाया झाल्या. शेवटी १७८३ साली तह होऊन दोन्ही देशांच्या सीमा मुक्रर झाल्या. शांतता प्रस्थापित झाली. अमेरिकेप्रमाणेच कॅनडामधील काळे गुलाम मुक्त झाले. १७७६मध्ये उत्तर अमेरिकेमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन संघराज्य अस्तित्वात आले होते. मर्यादित लोकशाहीचा प्रयोग ब्रिटिश कॉलनी असलेल्या कॅनडामध्ये सुरू झाला. पुढे इंग्लंडने कायदा पास केल्यावर कॅनडाची राज्यघटना १८६७मध्ये तयार झाली. मूळचे स्थानिक लोक आणि युरोपमधील नागरिकांचा समावेश असलेली राज्यघटना ब्रिटिश राणीच्या आधिपत्याखाली असताना अस्तित्वात आली, नंतर त्यात आवश्यकतेनुसार बदल होत गेले. क्युबेक, मॉन्ट्रियल, टोरांटो आणि किंग्स्टन  अशा चार राज्यांचे संघराज्य घटनेद्वारे अस्तित्वात आले. पुढे त्यात पूर्वेकडील पॅसिफिक समुद्रापर्यंतची राज्ये सामील झाली. आजच्या स्वतंत्र कॅनडामध्ये दहा संघराज्ये आणि तीन प्रदेश समाविष्ट आहेत. आजचा कॅनडा हा देश पूर्वेकडील अटलांटिक समुद्रापासून ते पश्चिमेकडील पॅसिफिक समुद्रापर्यंत आडवा पसरला आहे. कॅनडाच्या उत्तरेला आर्टिक समुद्र आणि दक्षिणेला अमेरिकेचे संघराज्य आहे. 

कॅनडासाठी जनराजधानी 
इंग्लंडची राणी सर्वेसर्वा होती त्या काळातच प्रशासनाच्या दृष्टीने कॅनडामध्ये एक राजधानी, प्रशासकीय मुख्यालय  असण्याची गरज भासू लागली होती. क्युबेक, मॉन्ट्रिअल, टोरांटो, किंग्स्टन आणि ओटावा अशा पाच शहरांमध्ये त्यासाठी स्पर्धा सुरू होती. पैकी किंग्स्टन १८४४ सालीच स्पर्धेमधून बाद झाले तर १८४९ मध्ये मॉन्ट्रिअल मध्ये मोठे दंगे उसळले म्हणून त्या शहराला स्पर्धेमधून बाद करण्यात आले. 

१८५६मध्ये चार राज्यांच्या लोकप्रतिनिधी अधिवेशनात राजधानीच्या शहराची निवड करण्यासाठी मतदान झाले. तेव्हा ओटावा शहराच्या बाजूने ५६ तर विरोधात ६४ मते पडली. क्युबेक शहराला तेव्हा  सर्वाधिक मते मिळाली होती. परंतु क्युबेक आणि टोरांटो शहरे एकमेकांच्या विरोधात ठाकली. मात्र राजधानीसाठी क्युबेकला पैसे देण्यास लोकप्रतिनिधी मंडळाने नकार दिला. राजधानीसाठी कोणत्याच शहराबाबत एकमत होईना. शेवटी हा वाद इंग्लंडच्या राणीकडे नेण्यात आला.  ‘राणी नेहमीच बरोबर असते,’ ही इंग्लिश परंपरा तेव्हा कामी आली. तीनही शहरांना आपापले मत मांडायला सांगण्यात आले. 

टोरांटो आणि क्युबेक शहरातील वादामध्ये ओटावाला सर्वात कमी विरोध होता असे लक्षात आले. शेवटी दोघांच्या भांडणात ओटावा शहराच्या डोक्यावर इंग्लंडच्या राणीने राजधानीचा मुकुट घातला. त्यावेळी राणीच्यावतीने गव्हर्नर जनरल कारभार पाहत असत. त्यांच्या भूमिकेला मान देऊन ओटावा शहरावर राजधानीची जबाबदारी आली.  

संरक्षणाच्या दृष्टीने ओटावा शहर हे सर्वात सुरक्षित असल्याचे मत अमेरिकेतील वर्तमानपत्रांनीही व्यक्त केले. वर अमेरिकन सैनिकांनी ओटावा शहरावर हल्ला करायचे ठरविले तर ते जंगलातच हरवून जातील अशी मल्लिनाथीही केली. कारण तेव्हा ओटावा हे मुख्यतः जंगलातील लाकूड व्यापाराचे आणि बिव्हरच्या प्राण्यांच्या मऊ केसाळ कातडीच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. पुढे दहा वर्षांनी चार राज्यांचे संघराज्य अस्तित्वात आले. तोपर्यंत ओटावा राजधानीचे शहर म्हणून प्रस्थापित झाले होते. कॅनडाचे एक पंतप्रधान लॉरिएल हे ओटावा शहराला कॅनडाचे वॉशिंग्टन मानत असले तरी  बहुसंख्य लोकांना ते मान्य नव्हते. कारण तेव्हा ती एका निर्जन प्रदेशातील राजधानी आहे असेच नागरिकांना वाटत असे. 

ओटावा: भूगोल, इतिहास आणि राजकारण 
ओटावाला राजधानी करण्याच्या निर्णयामागे त्या प्रदेशाचा भूगोल, इतिहास आणि राजकारणही कारणीभूत होते. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या लॉरेन्स नदीमधून मोठा व्यापार चालत असे. कॅनडामधील व्यापार आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पर्यायी जलमार्गाची गरज ब्रिटिश शासनाला वाटू लागली होती.  त्यासाठी ओटावा नदीची उपनदी असलेल्या रेडीयुचे रूपांतर कालव्यात करून पुढे ती ओंटारिओ तलावाला जोडण्याची धाडसी अभियांत्रिकी योजना ब्रिटिश इंजिनिअरांनी आखून पार पाडली. १८३२ साली कालव्याचे काम पूर्ण होऊन त्यातून व्यापार आणि लष्करी वाहतूक सुरू झाली. त्यावेळी केवळ जंगलातील लाकडाच्या व्यापारासाठी अस्तित्वात आलेले ओटावा शहर हे दोन नद्यांच्या संगमावर असलेले मोक्याचे गाव होते. नदीतून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे स्थान योग्य होते. व्यापार केंद्र आणि लष्करी छावणी म्हणून त्याचा विस्तार होत होता. राजधानीचे शहर म्हणून त्या शहराची निवड करण्यामागे शहराचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे ठरले.  

कालांतराने रेल्वे बांधकामाचे आणि वेगवान जमीन वाहतुकीचे युग सुरू झाले तेव्हा रेडीयु कालव्याचे वाहतूक महत्त्व संपले. मात्र तरी रेडीयु कालवा ओटावाचे एक प्रमुख पर्यटन आकर्षण झाला आहे. युनेस्कोने हा कालवा जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. कालव्याच्या दोन्ही किनाऱ्यांवर घरे, हॉटेल आणि करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. थंडीच्या काळात ह्या कालव्याच्या काही भागातील पाणी गोठते तेव्हा तेथे स्केटिंगसाठी मैदान तयार होते. पराकोटीच्या थंडीतही हा परिसर लोकांना आकर्षित करतो. कालव्यातील बास मासेही प्रसिद्ध आहेत.

राजधानीचे स्थान आणि वास्तुशैली 
रेडीयु आणि ओटावा नदीच्या संगमाजवळ दक्षिण किनाऱ्यावर एका डोंगरावर राजधानी संकुलाची जागा निश्चित केल्यावर त्यासाठी नियोजन सुरू झाले. तो डोंगर राणीच्याच मालकीचा होता. तेथून दोन्ही किनाऱ्यांवर वाढणारे ओटावा शहर दिसत असे. डोंगरावरील राजधानीच्या वास्तूंचे दर्शन ओटावा शहराच्या बहुतेक भागातून होत असे. डोंगरावरील जंगल तोडून सैनिकांच्या बराकी बांधलेल्या असल्याने तिला पूर्वी ‘बॅरॅक हिल’ म्हणून ओळखले जात असे. नंतर ‘कॅपिटल हिल’ म्हणून तो परिसर ओळखला जाऊ लागला. 

नऊ हेक्टर जमिनीवर पार्लमेंटची रचना करण्यासाठी वास्तुरचनाकारांची स्पर्धा घेण्यात आली. तीन अभिकल्प निवडले गेले. पण लोकसभेमध्ये त्यावर एकमत होत नसल्याने पुन्हा वाद गव्हर्नर जनरलकडे गेला. त्याच्या निर्णयानुसार वास्तुरचनाकार आणि लँडस्केप रचनाकार नेमले. १८५७मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि पाच वर्षांत पूर्ण होऊन तेथे अधिवेशने आणि कामकाज सुरू झाले. एकंदरीत लोकशाही प्रक्रियेतील सर्व निर्णय किती अवघड, दीर्घ आणि स्पर्धात्मक असतात लक्षात येते. परंतु अशा प्रक्रियेतूनच लोकशाहीला बळ मिळत असते. 

लोकशाही देशांमध्ये राजधानीच्या रचनेमध्ये पार्लमेंटच्या इमारतीला सर्वोच्च स्थान देण्याची परंपरा अमेरिकेने सुरू केली होती तिचेच अनुकरण ओटावा शहराने केले. नावीन्यपूर्ण गॉथिक शैलीमध्ये बांधलेली पार्लमेंटची इमारत आडवी पसरलेली आहे. जवळच भव्य सरकारी कार्यालयाची इमारत आहे. १९०१ साली राजधानी संकुलामध्ये व्हिक्टोरिया राणीचा भव्य पुतळा आणि इतर अनेक स्मारके उभारली गेली. तर १९२० साली तेथे १००शंभर मीटर उंचीचा आकाशात झेपावणारा, मोठे घड्याळ असलेला मनोरा गॉथिक शैलीत बांधला गेला. युरोपमधील पहिले महायुद्ध तेव्हा संपले होते. त्या निमित्ताने विजय आणि शांतीचा मनोरा म्हणून त्याचे बांधकाम झाले. एकेकाळी सर्वसाधारण स्वरूप असलेल्या गावाला अशा प्रकारे राजधानीचे स्वरूप आणि वलय प्राप्त होऊ लागले.  

विसाव्या शतकात ओटावा अनेक अंगांनी वाढले. सरकारी मुख्यालय झाल्यावर लोकशाही राज्याच्या शासकीय जबाबदाऱ्या वाढल्या. शासकीय कार्यालयांची वाढ झाली. शासकीय कर्मचारी संख्याही वाढली. पार्लमेंट इमारतीच्या संकुला जवळच तेथील सर्वोच्च न्यायालयाची इमारत बांधली गेली. संरक्षण व्यवस्था विस्तारली, तसाच व्यापार, निवासी घरांचे विभाग घडायला लागले. नागरी सेवा वाढल्या विद्यापीठाची स्थापना झाली. लोकसंख्याही वाढायला लागली. त्याला रेल्वेच्या जलद वाहतूक सेवेने हातभार लावला. 

शहराचा विस्तार 
एकोणिसाव्या शतकात रेल्वेचे युग अवतरले आणि ओटावा शहराला देशातील सर्व भागांना जोडण्यासाठी खासगी कंपन्या निर्माण झाल्या. १८८० नंतर वीस-तीस वर्षात रेल्वे मार्ग आणि त्यांच्यासाठी नदीवरील पूल बांधले गेले. सुरुवातीला प्रत्येक कंपनीचे स्वतःचे स्टेशन असे. पुढे एक मध्यवर्ती रेल्वे स्थानक बांधले गेले. अटलांटिक ते पॅसिफिक समुद्र किनारे ट्रान्स पॅसिफिक रेल्वेने जोडले गेले. ओटावा ते न्यूयॉर्क रेल्वे सेवा सुरू झाली. प्रवास वेगवान आणि सुखकर झाला. व्यापार वाढला. प्रवासी वाढले. एकंदरीत शांतता काळ सुरू झाला आणि कॅनडामधील समाज स्वस्थ आणि समृद्ध होऊ लागला. युरोपमधून होणारे स्थलांतर वाढले. १९७०च्या दशकात अमेरिकेच्या व्हिएतनाममधील युद्धखोरीचा निषेध करीत अमेरिकेमधूनही अनेक नागरिक कॅनडामध्ये आसऱ्याला जाऊ लागले. कॅनडा युद्धविरोधी धोरणाचे जागतिक केंद्र झाला. 

दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देश स्वतंत्र झाले. राजधानीचे शहर म्हणून ओटावा शहराचे महत्त्व अधिकच वाढले. स्वतंत्र देशांचे दूतावास ओटावामध्ये बांधले गेले. आजमितीस ओटावामध्ये  १३९ देशांचे दूतावास आणि कार्यालये आहेत. ह्या सर्व घडामोडींमुळे राजधानीचा मूळ व्यापारी चेहरा बदलून तो आता आंतरराष्ट्रीय राजकीय केंद्राचा झाला आहे. ओटावा विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे केंद्र झाला आहे. 

गेल्या पन्नास वर्षात आशियामधील भारत, पाकिस्तान आणि कॉमनवेल्थ देशांमधून मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये नागरिक स्थलांतर करू लागले आहेत. इंग्रजी भाषा हा त्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. कॅनडाने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांना सामील करून घेण्याचे उदार धोरण आखले आहे. ह्या सर्व घडामोडींमुळे विसाव्या शतकात कॅनडा बहुवंशीय देश बनला. येथे गरीब-श्रीमंत वर्गातील दरी सर्वात कमी आहे. ह्या सामाजिक बदलांचे प्रतिबिंब तेथील शहरांच्या परिसरावरही पडलेले दिसते. अलीकडच्या काळातले स्थलांतरित नागरिक मुख्यतः नोकरी, धंदा, शिक्षण क्षेत्रात स्थिरावतात त्यामुळे टोरांटो मध्ये ५० टक्के  नागरिक बिगर युरोपीय वंशाचे आहेत. ओटावा मध्ये मात्र युरोपीय वंशाचे नागरिक ७४ टक्के आहेत. 

ओटावा शहरात खूप मोठी भव्य आकर्षणे नाहीत. ऐतिहासिक वास्तू, वस्तू संग्रहालये असली तरी त्यांना वॉशिंग्टनसारखे वलय अजून तरी प्राप्त झालेले नाही. एक प्रकारे लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेची झूल तेथील वास्तूरचनेवर आणि नगर नियोजनावर आहे. आज अनेक प्रकारच्या वास्तुशैलींमध्ये बांधलेल्या इमारती तेथे दिसतात. तसेच तेथील इमारतींचे वापरही अनेकदा बदललेले आहेत. ओटावा शहरातील अनेक इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे किंवा काही इमारतींचे वापर बदलल्यामुळे असे बदल झाले आहेत. खुद्द पार्लमेंटच्या इमारतीचे आगीमुळे दोन वेळेला प्रचंड नुकसान झाल्यावर ती पुन्हा बांधली गेली आहे. तिचा वापर बदललेला नाही. 

पार्लमेंन्टपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नदीच्या पलीकडे १९१२ साली रेल्वेचे मध्यवर्ती युनियन स्टेशन बांधले होते. ओटावा  शहराच्या पुनर्रचनेच्या नियोजनात रेल्वेचे मार्ग बदलले. रेल्वे स्थानकाची वास्तू पाडावी की त्यात बदल करावेत ह्यावर बरीच चर्चा होऊन शेवटी ती इमारत वाचविण्याचे ठरले. १९६६ नंतर त्या स्टेशनच्या इमारतीमध्येच अनेक सभागृहांची रचना करण्यात आली. अलीकडचे तिला नवा साज देण्यात आला आहे. 

एका साध्या व्यापारी आणि संरक्षण केंद्रापासून सुरू झालेला ओटावाचा प्रवास आता राजधानीच्या स्वरूपात स्थिरावला आहे. कॅनडाची लोकशाही प्रक्रिया आणि राजकीय समावेशक प्रतिमा बळकट करीत राजधानी घडली आहे. लोकशाही देशांमध्ये राजकीय सत्ता-स्पर्धा  सतत चालू असतात. परंतु जनराजधानीच्या जडणघडणीमध्ये समावेशकता, सातत्य आणि कालसुसंगत बदल करण्याचे शहाणपण कसे आवश्यक असते ह्याचा वस्तुपाठ म्हणून ओटावाकडे निर्देश करता येईल.

संबंधित बातम्या