गर्द हिरव्या उद्यानातील कॅनबेरा

सुलक्षणा महाजन
सोमवार, 18 एप्रिल 2022

जनराजधानी

कॅनबेराच्या रचनेमध्ये आणि नियोजन प्रक्रियेमध्ये सर्वाधिक महत्त्व कशाला असेल तर मानव निर्मित परिसरातील निसर्गाला. झुडपी जंगलाच्या परिसरात स्थानिक जाती-प्रजातींचे विविध वृक्ष, वनस्पती काळजीपूर्वक निवडून रुजविल्या आहेत. राजधानीच्या संपूर्ण क्षेत्रफळापैकी दोन-तृतीयांश जमीन झाडे आणि हरित वनस्पतींनी व्यापली आहे. त्यात गेल्या शंभर वर्षांत सातत्याने भर घातली गेली आहे. त्यामुळेच कॅनबेरा ‘गार्डन सिटी’ नाही, तर ‘गार्डनमधील राजधानीचे शहर’ म्हणून जगात ओळखले जाते.

कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियात इंग्लंडच्या राजघराण्याच्या आधिपत्याखाली वसाहतींची वेगवेगळी सहा राज्ये होती. त्यांच्या प्रशासनात सुसूत्रता असावी ह्या हेतूने त्या सर्वांनी एकत्र येऊन १९००मध्ये एक संघराज्य स्थापन केले.  सुरुवातीला राजधानीची निकड भासली नसली तरी दोन -तीन वर्षातच तेथील कायदेपंडित आणि आर्किटेक्ट अशा व्यावसायिकांमध्ये राजधानीची चर्चा सुरू झाली. राजकारणी लोक त्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. राजधानी उभारण्यासाठी सरकार नवीन  कर आकारणी करेल याची सामान्य नागरिकांना धास्ती वाटत होती. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातील दोन राज्यात सिडनी आणि मेलबर्न या दोन मुख्य शहरात आळीपाळीने लोकसभेची अधिवेशने घ्यावीत असाही मतप्रवाह होता. पण संघराज्याच्या राज्यघटनेमध्येच राजधानी साऊथ वेल्स राज्यात, परंतु सिडनी पासून १०० मैलांच्या आत असावी असे नमूद केलेले होते.

जेव्हा राजधानीच्या स्थानावरून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि वकील अशा व्यावसायिकांच्या मताला राजकारणी नेत्यांपेक्षा जास्त महत्त्व मिळाले. लोकांनीही त्यांची मते मांडली. शेवटी कॅनबेरा ह्या गावाजवळ १०० चौ. मैल टापूची निवड करण्यात आली.  पठारावर असलेली जमीन इंग्लंडच्या राणीच्या मालकीची होती, त्यामुळे कोणताही मोबदला न घेता १९०८ साली ती राजधानी समितीकडे  हस्तांतरित झाली. 

ब्रिटिश लोकांनी ऑस्ट्रेलियात वसाहती स्थापन करण्याआधी तेथे वेगवेगळ्या आदिवासी लोकांच्या, जेमतेम ५००-१००० लोकसंख्या असलेल्या लहान वस्त्या होत्या. सहसा त्या नदीच्या काठी असत. तेथे फारशी वनसंपदा नव्हती. मुख्यतः झुडपी जंगले आणि त्यात वास्तव्य करणारे लहान प्राणी असत. डोंगर माथ्यावर निलगिरीची झाडे असत. झुडपी जंगलातील प्राणी, जमिनीखालील कंदमुळे, नदीमधील मासे इत्यादी या आदिवासी लोकांचे अन्न. ह्या भागात शेतीचा विकास झालेला नव्हता. सर्व वस्त्या पायवाटांनी जोडलेल्या होत्‍या. त्यातही नदीच्या काठावरील पायवाटा जास्त वर्दळ असलेल्या होत्या. स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत, स्थानिक निसर्गाचे ज्ञान संपादन करीत आदिवासी लोक जगत होते. १९व्या शतकात ब्रिटिश पोचले. त्यांनी त्यांच्याबरोबर शेळ्या, मेंढ्या असे प्राणी नेले. ह्या परकीय सजीवांमुळे स्थानिक सजीव जगतावर रोगराईचे संकट आले. आदिवासी टोळ्यांची वाताहत झाली. जमिनीवरील झुडपे कमी होऊन वाळवंट निर्माण झाले. पाणी प्रदूषित झाले. ब्रिटिश वसाहतींच्या ताब्यात सर्व प्रदेश गेल्यावर उरले-सुरले स्थानिक लोक नवीन लोकांबरोबर जुळवून घेत राहू लागले.

कॅनबेरामध्ये ब्रिटिश येण्याआधी नूनावल  (Ngunnawal) लोकांची लहान वस्ती होती. स्थानिक आदिवासी भाषेमध्ये कॅनबेरा म्हणजे एकत्र जमण्याचे ठिकाण. राजधानी निर्मितीसाठी निवडलेले पठार पूर्वी आदिवासी टोळ्यांचे एकत्र जमण्याचे, उत्सव साजरा करण्याचे, देवाण-घेवाण, लग्न जुळवण्याचे ठिकाण होते. एक प्रकारे मूळच्या ऑस्ट्रेलियन लोकांची सांस्कृतिक परंपरा नव्याने जिवंत करणे हे राजधानीच्या स्थान निवडीमागचे एक महत्त्वाचे कारण ठरले.  

जनराजधानीची आखणी 

१९११मध्ये राजधानीच्या अभिकल्पासाठी  जागतिक पातळीवर स्पर्धा घेण्यात आली. त्या आधी नव्या शहराची रचना कशा प्रकारची असावी, त्या रचनेत कशाला महत्त्व असावे, रचनेमागील मूळ संकल्पना कोणती असावी याबाबत व्यावसायिकांमध्ये आणि जनतेमध्ये खूप विचारमंथन झाले होते. त्या काळात  इंग्लंडमधील एबनेझर हॉवर्ड ह्याच्या ‘गार्डन सिटी’ संकल्पनेचा मोठा प्रभाव जगभरात पडला होता. लहान लहान स्वयंपूर्ण लोकवस्त्या, कामाची ठिकाणे आणि निवासी घरांमधील जवळीक, त्या भोवताली हरित पट्टे आणि सर्वांना आरोग्यपूर्ण आणि मानसिक उभारी देणारे जीवनमान ह्या गोष्टींना खूप महत्त्व दिले जात होते. १८-१९व्या शतकात इंग्लंडमधील बहुतेक शहरे बकाल आणि गलिच्छ झालेली होती. दाटीवाटीने वसलेल्या श्रमिकांच्या झोपडपट्ट्या, नदी-नाल्यांमधून वाहणारे प्रदूषित पाणी ह्यामुळे शहरांमध्ये सतत रोगराईचे थैमान असे. त्या पार्श्वभूमीवर गार्डन सिटी संकल्पनेचा मोठा बोलबाला होता. या शिवाय अमेरिकेमध्ये ‘सिटी ब्यूटीफुल’, सौंदर्यपूर्ण शहरांच्या कल्पनेची चळवळ सुरू होती. ह्या चळवळीचा मुख्य रोख भव्य प्रकल्प, त्यामधून प्रतीत होणारा नागरी अभिमान, रुंद रस्ते, लहान मोठी उद्याने आणि सौंदर्यपूर्ण सार्वजनिक ठिकाणांच्या  निर्मितीवर होता. नागरिकांचे जीवन आनंदी असेल तरच त्यांचे आणि समाजाचे नैतिकबळ वाढते, अशी भावना त्या मागे होती. वसाहत विस्ताराच्या काळात इंग्लंडमध्ये नगर रचनेच्या संकल्पनांचा विकास होऊन त्या विचारांनी बांधकाम व्यवसायातले लोक भारून गेले होते. त्यांच्या संकल्पनांची, प्रयोगांची देवाण घेवाण होत असे. त्यातूनच ऑस्ट्रेलियाच्या राजधानी प्रकल्पामध्ये ‘गार्डन सिटी’ आणि ‘सिटी ब्यूटीफुल’ ह्या दोन्ही संकल्पना असल्या पाहिजेत अशा अपेक्षा तेथील व्यावसायिकांच्या लिखाणातून व्यक्त होत असत. राजधानीच्या स्पर्धकांच्या रचना ह्याच मूलभूत संकल्पनांवर आधारित असाव्यात अशी अपेक्षा होती. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहर स्वच्छ आणि तेथील रचना सोयीची असली तरी त्या शहराला काहीच सौंदर्य, स्वतःचे वैशिष्ट्य नाही असेच सर्वांचे मत होते. शिवाय अस्तित्वात असलेल्या कोणत्याही राजधानीपेक्षा कॅनबेराची रचना नावीन्यपूर्ण असावी असे सर्व तज्ज्ञांचे मत होते. 

स्पर्धकांच्या संकल्पनांची छाननी होऊन अमेरिकेतील वॉल्टर ग्रिफिन  ह्या वास्तू रचनाकाराची आणि त्यांची उद्यान रचना करणाऱ्या  पत्नी मेरियन ग्रिफिन ह्यांची संकल्पना निवडली गेली. स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी ह्या दोघांनी प्रत्यक्ष ह्या परिसराला भेट दिलेली नव्हती. मात्र पुढे दहा वर्षे ह्या दाम्पत्याने राजधानीच्या उभारणीसाठी स्थलांतर केले आणि उभारणीच्या कामात स्वतःला वाहून घेतले. राजधानीच्या अभिकल्पात स्थानिक निसर्गाला मध्यवर्ती स्थान दिलेले आहे. उद्यानशास्त्र-कला आणि वास्तुकलेची सांगड हे कॅनबेरा राजधानीचे खरे वैभव आणि वैशिष्ट्य आहे. त्याचे श्रेय ग्रिफिन दाम्पत्याला दिले जाते. त्यामुळेच तेथील कृत्रिम तलावाला ग्रिफिन तलाव नाव देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

कॅनबेराचे नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे डोंगराची पार्श्वभूमी असलेले, त्याखालील नद्यांच्या प्रवाहापासून उंचावर सुरक्षित असलेले, फारशी झाडे नसलेले विस्तृत पठार राजधानीसाठी निवडलेले होते.  पर्वतामुळे थंड वारे अडवले जाऊन तेथील हवामानही संतुलित ठेवायला हातभार लागला आहे. पठाराच्या ईशान्य आणि नैऋत्येला नद्या असल्याने पाण्याची हमी आहे. शिवाय मोठ्या कृत्रिम तलावाचेही नियोजन करण्यात आले आहे. अशा नैसर्गिक परिसराचे फायदे आणि पारंपरिक स्थानमाहात्म्य लक्षात घेऊन तीन लाख लोकवस्तीसाठी राजधानीचे नियोजन करण्यात आले.  राजधानीशी संलग्न कामांसाठी असलेले नागरिक, प्रदेशांचे दूतावास आणि पर्यटक ह्यांच्यासाठी शहर वसविणे, हाच उद्देश ठरविण्यात आला होता. त्यामुळे आजही औद्योगिक किंवा व्यापारी उद्योगांना कॅनबेरा शहराच्या संदर्भात महत्त्व दिलेले नसून ऑस्ट्रेलियाची नैसर्गिक संपत्ती आणि संस्कृती ह्यांना तेथे सर्वाधिक महत्त्व मिळाले आहे. शतक उलटून गेल्यावर तर ह्या संकल्पनेचे प्रतिबिंब शहराच्या रचनेवर स्पष्टपणे पडलेले बघायला मिळते आहे.  

पार्लमेंट इमारत 

कॅनबेरा येथे १९१२ साली राजधानीच्या कामाला सुरुवात होता होताच युरोपमध्ये पहिले महायुद्ध भडकले आणि बांधकाम रखडले. १९२७पर्यंत मेलबर्न येथील जुन्या पार्लमेंटमध्येच लोकसभेची अधिवेशने होत. नंतर कॅनबेरा येथे पार्लमेंटच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या इमारतीमध्ये अधिवेशने होऊ लागली. इमारतीच्या आकार आणि रचनेबद्दल खूप मतभेद निर्माण झाले, हेच त्याचे मुख्य कारण होते. साठ वर्षांनी १९८८मध्ये पार्लमेंटच्या कायम स्वरूपी इमारतीचे उद्‍घाटन राणी एलिझाबेथच्या हस्ते झाल्यावर दोन्ही प्रतिनिधी गृहांची अधिवेशने तेथे होऊ लागली. 

पार्लमेंटची, दोन बुमरँगचे आकार असलेली  इमारत अमेरिकेतील आर्किटेक्ट कंपनीच्या अभिकल्पानुसार बांधलेली आहे. आधुनिक शैलीच्या ह्या इमारतीवर पारंपरिक घुमट नाही. इमारतही उत्तुंग नाही. मात्र देशाचा झेंडा फडकविण्यासाठी चार आधारांवर उभा केलेला उंच पारदर्शक ध्वजस्तंभ आहे. त्यामधून मागील हिरव्या वनराईने नटलेला डोंगर दिसतो. बाकदार छत असलेल्या इमारतीवर हिरवळ राखलेली आहे. लोकांना तेथे जाऊन आजूबाजूचा नयनरम्य प्रदेशाचा आस्वाद घेता येतो. पठारावर, डोंगराची नेपथ्यरचना असलेली इमारत मुख्यतः जमिनीखालील दगड कोरून बांधलेली आहे. त्यामुळे तिची पठारावरील उंची फक्त ४ मीटर आहे. मुख्य प्रवेशद्वार गाठण्यासाठी चढावाचे रस्ते आहेत. प्रवेशदारासमोर एका भव्य पटांगणामध्ये ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या  ‘स्वप्नकाल’ शैलीमध्ये, स्थानिक कलाकारांनी ९० हजार ग्रॅनाईट तुकड्यांमध्ये साकारलेला २००० चौ. फुटाचा रंगीत दगडांचा गालिचा तयार केलेला आहे. 

नवीन पार्लमेंट इमारतीमध्ये ४७०० खोल्या असून हिरव्या, निलगिरीच्या पानांच्या रंगात सजवलेले लोकप्रतिनिधी सभागृह आहे. तर लाल रंगांच्या छटा असलेले सभागृह राज्यसभेसाठी आहे. तेथील दालने मोठी प्रशस्त आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधींची एकमेकांशी सहजपणे गाठ-भेट होत नाही. शिवाय सत्तेमधील लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील प्रतिनिधींना एकमेकांना भेटणे तेथे दुरापास्त असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कार्यालयीन विभाग सोडले तर ह्या पार्लमेंट इमारती बघण्यासाठी सामान्य नागरिकही जाऊ शकतात. सभागृहात चाललेले कामकाज त्यांना बघता येते, एेकता येते. ही इमारत कार्यान्वित झाल्यानंतर त्यामागे असलेल्या जुन्या इमारतीमध्ये आता पार्लमेंट इतिहासाचे म्युझियम तयार केले आहे. 

पार्लमेंटची वास्तू एका त्रिकोणी आकाराच्या काल्पनिक क्षेत्राच्या एका टोकावर आहे. दुसऱ्या दोन टोकांवर, तलावाच्या पल्याड, खालील बाजूला सुरक्षा मुख्यालय आणि महापालिकेचे मुख्यालय यांची योजना केली आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी सर्वोच्च सत्तास्थानी असतात, ह्याची जाणीव ठेवून पार्लमेंटची वास्तू उंच ठिकाणी बांधली आहे. ह्या त्रिकोणाच्या तीन बाजूच्या रस्त्यांना ‘कॉन्स्टिट्यूशन’, ‘कॉमनवेल्थ’ आणि ‘किंग्ज अॅव्हेन्यू’ अशी नावे दिलेली आहेत. त्यामधील क्षेत्र ‘राष्ट्रीय त्रिकोण’ म्हणून ओळखले जाते. त्यातील इमारती काळजीपूर्वक रचना करून बांधल्या आहेत. ह्या सर्व नगररचनेच्या आकृतीबंधातून लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये नागरिकांना मध्यवर्ती सत्तास्थान असल्याचे अधोरेखित केले आहे. ह्या परिसराची संकल्पना वास्तुरचनाकार ग्रिफिन अमेरिकेतील फ्रॅंक लॉइड राईटच्या, सजीव (Organic) तत्त्वांनुसार रचना करीत असे. त्यामध्ये भव्य आणि उत्तुंग आकारांपेक्षा जमिनीलगतचे नैसर्गिक अवकाश याला महत्त्व असे. शिवाय स्थानिक निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण घटक अशा  नगर आणि वास्तुरचनेमध्ये महत्त्वाचे मानले जात आणि त्याचाच प्रत्यय कॅनबेरा राजधानीच्या रचनेमध्ये येतो. 

गर्द हिरव्या उद्यानातील राजधानी

कॅनबेरा राजधानीच्या रचनेमध्ये आणि नियोजन प्रक्रियेमध्ये सर्वाधिक महत्त्व कशाला असेल तर मानव निर्मित परिसरातील निसर्गाला. झुडपी जंगलांच्या परिसरात स्थानिक जाती-प्रजातींचे विविध वृक्ष, वनस्पती काळजीपूर्वक निवडून रुजविले आहेत. राजधानीच्या संपूर्ण क्षेत्रफळापैकी दोन-तृतीयांश जमीन झाडे आणि हरित वनस्पतींनी व्यापली आहे. त्यात गेल्या शंभर वर्षात सातत्याने भर घातली गेली आहे. त्यामुळेच कॅनबेरा गार्डन सिटी नाही तर गार्डनमधील राजधानीचे शहर म्हणून जगात ओळखले जाते. 

ह्या गर्द हिरव्या राजधानीचे दुसरे मुख्य श्रेय जाते ते इंग्लंडमध्ये जन्मलेल्या चार्ल्स वेस्टन ह्या उद्यान तज्ज्ञाला. १९११ ते १९२६ ह्या पंधरा वर्षात त्याने कॅनबेरामधील बोचरे थंड वारे असलेल्या उजाड माळरानावर झाडांचे अस्तित्व नसलेल्या नापिक जमिनीत झाडांची निवड, लागवड आणि जतन करण्याचे प्रयोग केले. त्यामुळेच तेथील डोंगर आणि पठाराला श्रीमंत हिरवा साज मिळाला. हे काम अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीला १० हेक्टर परिसरात त्याने रोपवाटिका आणि स्थानिक वनस्पती, वृक्ष ह्यांचे  संशोधन व जतन करण्याची प्रयोगशाळा उभारली. रोपांचे उत्पादन करण्यासाठी रोपवाटिका स्थापन केली. त्यांच्या या कामामुळे ते पुढे वेस्टन राजधानी परिसराच्या निर्मितीचे प्रमुख अधीक्षक आणि नंतर तेथील पार्क्स आणि गार्डन संस्थेचे प्रमुख झाले. 

स्थानिक, वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मीळ वनस्पती, झुडपे, झाडे ह्यांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी त्यांनी संशोधन करून नवीन पद्धती शोधल्या. त्यांनी १६० हेक्टर डोंगरावर निलगिरीच्या अनेक जातींचे वृक्ष लावून वाढवले. केवळ आठ वर्षात ४५ हजार झाडांचे जंगल तेथे तयार केले. पुढे १९२४ सालापर्यंत त्यांनी एक हजार एकरावर पाईन वृक्षांची लागवड केली. या शिवाय प्रस्तावित शहरातील मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला लावण्यासाठी विशिष्ट वृक्षांची निवड करून तेथे तीन लाख रोपे रुजवण्यासाठी प्रयत्न केले. त्यापैकी केवळ निम्मे वृक्षच जगू शकले. त्यांच्या ह्या सर्व प्रयोगांचे फलित म्हणजे विविध ऋतूंमध्ये तेथे वेगवेगळ्या रंगांची उधळण दिसू लागली. सहाजिकच पशू, पक्षी यांची वर्दळ सुरू झाली. तेव्हा त्यांच्यापासून झाडे वाचविण्यासाठी विशेष पिंजरे तयार करावे लागले. जंगल निर्मितीच्या ह्या सर्व प्रयत्नांना दिशा देण्यासाठी त्यांनी नियमावली घडवली. त्यामुळे पुढील काळात राजधानीचा परिसरच नाही तर शहराच्या उपनगरांमध्येही हरित आच्छादने निर्माण करून त्यात वसाहतींची रचना होऊ लागली. 

सुरुवातीच्या काळात वेस्टन ह्यांनी केलेल्या ह्या सर्व प्रयत्नांमुळे कॅनबेरा राजधानीला एक वेगळेच निसर्गाचे परिमाण लाभले. आणि म्हणूनच आज ही  राजधानी म्हणजे उद्यानातील शहर आणि स्थानिक संस्कृतीचे माहेरघर म्हणून वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.

संबंधित बातम्या