केनियातील जीवनपद्धती! 

सुमेधा कुलकर्णी
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

विशेष

परदेशात नोकरीला जायचे हे माझे पहिल्यापासूनच स्वप्न होते. मला केनियातील मार्केटिंग रिसर्च  कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. जवळ जवळ दहा वर्षे केनियामध्ये नैरोबी या राजधानीच्या शहरात  राहायची संधी मला मिळाली आहे. केनिया हा अभयारण्यांनी आणि निसर्गरम्य सरोवरांनी नटलेला देश आहे. माझ्या वास्तव्यात तेथील स्थानिक लोकांशी झालेल्या विविध संवादांतून आणि प्रसंगातून मला त्यांची जीवनपद्धती खूप जवळून पाहायला मिळाली आहे. सामाजिक जीवनसंस्कृती, भौगोलिक आणि इतर  उपजीविकेच्या साधनांच्या उपलब्धतेनुसार बदलत असते. त्यामुळे कदाचित चूक-बरोबर ठरवणे उचित  होणार नाही. मी या लेखात केनियातील लोकांच्या चालीरीती, तेथील लोकांची जीवनाकडे पाहण्याची  मानसिकता आणि त्यातील मला दिसलेले वेगळेपण अधोरेखित केलेले आहे.  

मला कामानिमित्त एका मोठ्या जाहिरात कंपनीच्या उच्चपदस्थ महिला एक्झिक्युटिव्हला जेवायला घेऊन जाण्याची संधी मिळाली होती. मला त्यांच्या कंपनीकडून काही रिसर्च प्रोजेक्ट मिळतात का हे बघायचे होते. आमच्या भेटीच्या सुरुवातीपासून ती तिच्या सहा वर्षांच्या मुलाचे - डॅनीचे खूप कौतुक सांगत होती. तो आज शाळेत जायला तयार नव्हता, त्याला मी बरोबर हवी होते आणि अजून असेच काही... मी तिला आमच्या प्रोजेक्टच्या मूळ मुद्यांवर बोलायला भाग पाडत होते. शेवटी तिने मला तिच्या दोन ग्राहकांच्या जाहिरातींच्या कामगिरीचे प्रमाण मोजण्याचे (ॲडव्हर्टिझमेंट ट्रॅकिंग)चे काम देण्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि मला हॉटेलचे बिल वसूल होईल अशी थोडी आशा दिसू लागली. आमचे जेवण संपत आले होते. मी जरा जास्तच उत्सुकतेतून तिला विचारले, की तुझे मिस्टर म्हणजेच डॅनीचे पप्पा काय करतात? ती एकदम चवताळून मला म्हणाली, ‘ओहSS! माझं लग्न झालं नाही, मी अजून खूपच तरुण आहे.’ मला ती काय सांगते आहे हे क्षणभर समजलेच नाही. मी तिला डेझर्टची आठवण करून देऊन शांत केले आणि आमची लंच-मीटिंग संपवली. 

माझी भेट अजून अशाच एका महिला मार्केटिंग मॅनेजरबरोबर झाली. तिनेही आम्हाला प्रोजेक्ट्स द्यायला सुरुवात केली होती. आम्ही कधीकधी वीकेंडला भेटत असू. तिने मला एकदा सांगितले, की तिला लग्न करायचे नाहीय पण तिला आवडणाऱ्या पुरुषाकडून मूल हवे होते. तिने सांगितले, ‘मला त्याच्याशी अजिबात लग्न करायचे नाही, कारण तो नवरा म्हणून तितका चांगला नाहीये आणि मला कुणाच्या आधिपत्याखाली राहायचे नाहीये!’

मला अजून एकीने असेच बोलता बोलता सांगितले, ‘मला दोन गुटगुटीत बाळे हवी आहेत. पण लग्न नको आहे. इकडे लग्न म्हणजे डोकेदुखी आहे - तो बसून ऑर्डर सोडणार आणि मी राबणार. मला माझे स्वातंत्र्य गमवायचे नाहीय. हे पुरुष कधीही दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात आणि पहिल्या बायकोला टाकून देतात.’

बायकांची बाजू समजून घेतल्यावर मला तेथील लग्नपद्धती आणि पुरुषांची बाजू जाणून घेण्यात उत्सुकता होती. माझे याबाबत काही सहकाऱ्यांशी बोलणे झाले. 

केनियातील पारंपरिक विवाहसंस्था ही पितृसत्ताक आहे. तिथल्या बऱ्याच समुदायांमध्ये बहुपत्निकत्वाची पद्धत आहे. लग्नाच्या आधी नवऱ्या मुलाने वधूच्या आईवडिलांना हुंडा देण्याची पद्धत आहे. हा हुंडा  रोकड किंवा पशुधनाच्या स्वरूपात लग्नापूर्वी द्यावयाचा असतो. लग्नापूर्वी पूर्ण हुंडा देता आला नाही, तर  लग्नानंतर काही वर्षांतच देऊन संपवायचा असतो. कधी नवरा ही अट पूर्ण करू शकला नाही तर मुलीचे  आईवडील मुलीला आपल्या घरी घेऊन जातात. उलट मुलीला त्या लग्नात सुख नसेल आणि त्यातून  बाहेर यायचे असेल तर तिच्या आईवडिलांना हुंड्याचे पैसे परत करावे लागतात. त्यामुळे आईवडिलांकडून मुलीवर लग्न संबंध टिकवून ठेवण्यावर नेहमी दबाव असतो. कधी कधी मुलीचे आईवडील हुंडा  मिळवण्याकरिता जो मुलगा जास्त पैसे देईल त्याच्याशी मुलीचे लग्न लावून देतात. यामुळे लग्नाचे वय झालेल्या मुलींमध्ये एखाद्या बाजारातील वस्तूप्रमाणे आपली खरेदी विक्री होत असल्याची भावना निर्माण  होते. 

एकंदरीतच हुंडा पद्धतीमुळे लग्न संबंधातील नवरा आणि बायको या दोघांची गळचेपी होऊ शकते. अलीकडच्या काळात, सुशिक्षित आणि शहरी केनियातील स्त्री-पुरुष प्रेमविवाह किंवा एकत्र-नातेसंबंध (लिव्ह इन रिलेशनशिप) पद्धतीचा अवलंब करीत आहेत. आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि मुख्यत्वे   HIV/AIDS रोगांपासून दूर राहण्यासाठी एकाच जोडीदाराबरोबर सुरक्षित लैंगिक संबंध पाळण्याची  गरज, अशा विविध कारणांस्तव बहुतेकजण लग्न न करताच एकत्र राहतात. त्यांना मुलेही होतात. जोपर्यंत जमते तोपर्यंत एकत्र राहतात. त्यातून एखाद्याला नवीन कोणी भेटले, तर तो पुरुष किंवा स्त्री घर सोडून जातात. बरीच मुले आईबरोबर जातात, थोड्याफार मुलांचे बाप मुलांना आर्थिक मदत करतात, तर काही  मुले अनाथआश्रमातही जातात. 

या सगळ्या गोष्टींमध्ये मालमत्तेचे हक्क उगीचच सोडून जाणाऱ्याला द्यावे लागू नयेत म्हणून बहुतेकांना लग्न नकोच असते. काही काही लोक मात्र खूप उशिरा नातवंड झाल्यावर आयुष्यात लग्नाचा एक सोहळा करायचा म्हणून किंवा प्रॉपर्टीला वारसदार हवा म्हणून लग्न करतात. मला एकाच व्यक्तीबरोबर लग्न करून आयुष्यभर राहिलेली खूप कमी दाम्पत्ये भेटली. 
केनियातील काही जमातींच्या लोकांमध्ये लग्नापूर्वी एकत्र-नातेसंबंधांना मान्यता दिली आहे. कारण त्यातून ‘स्त्रीच्या प्रजनन क्षमते’ची चाचणी होऊ शकते. बहुतेक वेळा स्त्री गर्भवती राहिल्यावर लग्नाची पुढील बोलणी केली जातात. पण कधी कधी एकत्र राहताना जोडप्याला इतर गोष्टींमध्ये संगनमत जाणवले नाही  तर एकत्र-नातेसंबंध लग्नापर्यंत पोचू शकत नाहीत. काही समूहांमध्ये गर्भपात अमान्य आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत स्त्रीला लग्नबाह्य मुलांचे पालकत्व पत्करावे लागते. याच कारणांमुळे केनियात आणि  आफ्रिकेतील बऱ्याच देशांमध्ये कुमारी माता जास्त प्रमाणात दिसतात.  

केनियातील तरुण वर्गाला नैसर्गिक कामभावनेला आवर घालण्याची फारशी सामाजिक बंधन दिसत नाहीत.  त्यामुळे बरेचदा खूप लहान वयात मातृत्व प्राप्त झालेल्या कुमारी मातांचे प्रमाण जास्त दिसते. तिकडे मुले  असलेल्या किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रियांना नवीन पार्टनर मिळू शकतो आणि काहींची लग्नेही जमतात.   या समाजातील स्त्रीला ‘कौमार्य चाचणी’चा फारसा बडगा दाखवला जात नाही.

वर नमूद केलेल्या कारणाशिवाय बहुपतिकत्व प्रथा आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण यामुळे लग्नातील  सौख्य सगळ्याच बायकांना मिळते असे नाही. कदाचित याच कारणांमुळे आधुनिक शिकलेल्या आणि  आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या बायका लग्न करण्यास तितक्या उत्सुक नसाव्यात. हे सगळे खरे असले  तरी केनियातील बायकांची निसर्गाने दिलेल्या मातृत्वाची ओढ कमी झालेली नाही. त्या कुठल्याही  परिस्थितीतून दैवाने पदरात घातलेले मातृत्वाचे दान आनंदाने स्वीकारतात आणि तितक्याच प्रेमाने मुलांचे  संगोपन करतात. तेथील प्रत्येक बाई, आई होणे हा तिचा हक्क मानते.

मला त्यांची लग्नाची परिभाषा एकांगी वाटली. माझ्या समजुतीप्रमाणे लग्न म्हणजे नवरा बायकोच्या गुणांचा गुणाकार आणि त्रुटींचा भागाकार. एकमेकांच्या सहकार्याने दोघांनी समृद्ध आणि समाधानाने जगण्याची वचनबद्धता आणि प्रसंगी परस्परांकरिता त्याग करण्याची समर्पणाची प्रेमभावना. एकंदरीतच त्यांची स्वतंत्रपणे राहण्याची वृत्ती, जबाबदारी आणि त्याग यांचा अभाव मला त्यांच्या लग्नपद्धतीत जाणवला.

हे सगळे माझ्या समजण्यापलीकडचे होते. मला खूपदा ‘तुला मुले किती आहेत?’ असा प्रश्न विचारला जायचा, पण ‘माझे लग्न झाले नाही’ असे मी उत्तर देत असे. मला नंतर समजले की हे माझे उत्तर चुकीचे आहे, ‘मला मुले नाहीत’ हेच बरोबर उत्तर आहे. मला हा जरी एक सांस्कृतिक धक्का (Cultural Shock) होता, तरी माझ्या मनात, भारतातील कुमारी मातांच्या पदरी येणारी आत्महत्या आणि आत्महानी कितपत योग्य आहे? असा विचार येऊन गेला. त्यांची समाजाकडून होणारी उपेक्षा मन खूपच सुन्न करून जाते.  

स्त्रीची मूल होणे ही नैसर्गिक क्षमता आहे आणि तिला तो अधिकार देणारी संस्कृती जरी एका दृष्टीने योग्य वाटत असली, तरी त्यांच्या या जीवनपद्धतीमुळे मुलांचे खूप हाल होतात. तिकडे बारावीपर्यंतचे शिक्षण सरकारकडून फुकटात होते, पण त्यानंतरचे शिक्षण त्यांचे त्यांनाच घ्यावे लागते. त्यातून बरीच मुले Single Parentage मधून आलेली असतात. त्यामुळे आई किंवा वडील यांच्याकडून पुढील शिक्षणाकरिता पैसे मिळतीलच असे नाही. बहुतेक मुले मिळतील त्या नोकऱ्या करून आपल्या आईवडिलांपासून वेगळे राहून आपापला खर्च सांभाळत असतात. आमच्या रिसर्च कंपनीत अशी बरीच मुले मुलाखतदार (Interviwers) आणि कोडिंगचे (Coding)चे काम करायला येत असत. मला त्यांच्याबरोबर बरेचदा जवळून बोलण्याची, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. ही मुले दोन तीन वर्षे नोकरी करून, एखादी शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षण घेतात. मला भेटलेल्या विविध कंपन्यांतील बरेच वरिष्ठ व्यवस्थापक परदेशात शिकून आलेले होते. अगदी, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी अशा विकसित देशांतून त्यांनी डिग्री मिळवलेली असे. परदेशात शिकलेली मुले संख्येने कमी असतील, पण पाश्‍चात्त्य समाजपद्धतीचा पगडा त्यांच्यावर चांगलाच आहे. ‘Survival of fittest’चे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळते. एकंदरीत इकडे सगळेजण आपले जीवन आपल्या क्षमतेप्रमाणे तयार करतात आणि आपल्या मनाप्रमाणे जगतातही. कुणाच्या अपेक्षांचे ओझे उगीचच डोक्यावर घेऊन जगत नाहीत. 

तिकडे म्हातारी झालेली माणसे बहुधा खेड्यांमधून राहतात. बहुतेकांकडे थोडीफार शेती असते त्यामुळे आईवडिलांची जबाबदारी मुलांवर फारशी नसते. ते फक्त पॅरेंट्स डे (Parents Day) आणि सणावारी (Chrismas) आपल्या आईवडिलांना गावी भेटावयास जातात. आपल्या सावत्र भावंडांनाही कधी कधी भेटतात.

आपल्याकडील बहुतेक आईवडील स्वतःच्या सुखांचा त्याग करून आयुष्यभर मुलांकरिता झटत राहतात, त्यांना हवे नको ते पुरवत असतात आणि त्यामुळेच की काय, हीच मुले त्यांच्या सुखांच्या कल्पना पूर्ण झाल्या नाहीत, तर आईवडिलांना दोष देतात. अर्थात याला बरीच मुले अपवाद असतील, पण   आपल्याकडील आईवडिलांनी खरेच विचार करणे गरजेचे आहे. स्वतःच्या हौसेमौजेला मूठ माती देऊन आपल्या मुलांकरिता आयुष्याची तिलांजली देणे खरेच गरजेचे आहे का? मुले मोठी झाल्यावर त्यांचे त्यांना स्वतंत्र सोडून देणे योग्य होणार नाही का?

आपल्याकडील नवरा बायकोतील नातेही असेच स्वार्थी होत चालले आहे. त्या दोघांपैकी जो कमकुवत असेल त्याला गुलाम करून दुसरी व्यक्ती कमकुवत व्यक्तीचा गैरफायदा घेताना दिसते. कायद्याने दिलेले नैतिक हक्क आणि कर्तव्य यामध्ये मोठी फारकत होताना दिसत आहे. या निसर्गात प्राणी-पक्षी सगळेच आपापली जगण्याची शर्यत जिंकत जगत असतात, मग आपणच का अपवाद ठरायचे? अशी विचारप्रणाली हळूहळू मूळ धरू लागली आहे. या विचार प्रणालीचा पुढील पिढ्यांवर किती दूरगामी परिणाम होऊ शकतो, या गोष्टीचा विचार करण्याची गरज प्रत्येक लग्नबद्ध होणाऱ्या व्यक्तीने करण्याची खूप गरज नाही का? मला केनियातील माणसे नात्यांच्या बंधनात फारशी अडकलेली दिसली नाहीत, ते वर्तमानात जगतात. उद्याचा फार विचार करून आजचा दिवस चिंधीगिरी करत जगत नाहीत. ते आपले आयुष्य आपल्या क्षमतेनुसार स्वतंत्रपणे जगत असले, तरी ते सहकार्य भावना विसरत नाहीत. ‘हारांबी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सहकार्याच्या प्रथेचा मला आलेला अनुभव खूपच रोचक आणि हृदयस्पर्शी आहे, त्या प्रसंगाचे विस्तृतपणे वर्णन मी येथे दिले आहे.

केनियामध्ये शिक्षणाला, लग्नाला किंवा अंत्यविधीसाठी ‘हारांबी’ नावाने एक कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी सगळ्या नातेवाईक, ऑफिसमधील सहकर्मी आणि इतरही ज्या व्यक्ती मदत करू शकतील अशांना बोलावले जाते. एकदा माझ्या ऑफिसमधील एक कोडिंगचे काम करणारा मुलगा – जोसेफ (नाव बदलले आहे) याने मला हारांबीचे आमंत्रण दिले. मी कुतूहलापोटी त्याच्या पुढील शिक्षणाकरिता आयोजित केलेल्या हारांबीला गेले होते. जाताना एक हजार शिलींग (स्थानिक चलन) द्यायचे या विचाराने पर्समध्ये  एका पाकिटात एक हजाराची नोट ठेऊन आणि वर असेच काही खर्च करावयास लागले तर म्हणून अजून पाच हजार शिलींग ठेवले.

एका शाळेच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. मी हॉलमध्ये शिरताना दोन मुले कोल्ड्रिंकची छोटी बाटली हातात ठेवून गेले. लगेचच दोन पावले पुढे गेले, तेव्हा अजून एक मुलगा हातात डबा घेऊन उभा राहिला. मी पर्समधून ते हजार शिलींगचे पाकीट काढून त्या डब्यात टाकले. पुढे अजून चालून गेल्यावर फूड स्टॉल लावला होता, त्याच्यात सँडविच, वेफर्स याशिवाय नॉनव्हेज सामोसा आणि अजून काही आफ्रिकी पद्धतीचे खाण्याचे पदार्थ होते. मी एक सँडविच घेतले आणि खुर्च्या मांडलेल्या जागेकडे निघाले, तेवढ्यात अजून एक मुलगा डोनेशनचा डबा घेऊन माझ्यापुढे उभा राहिला. मी त्याला आत्ताच माझे डोनेशन ज्या मुलाला दिले होते त्याच्याकडे बोट दाखवले. तो मुलगा म्हणाला कोल्ड्रिंकचे पैसे गोळा करतोय आणि मी स्नॅक्सचे पैसे गोळा करतोय. मला काय बोलायचे हे क्षणभर सुचलेच नाही. मी नाइलाजाने पर्समधून शंभर शिलींग काढले आणि त्याच्या डब्यात टाकले. तो म्हणाला कमीतकमी एक हजार शिलींग टाकायचे. मी शरमलेल्या भावनेने त्याला एक हजाराची नोट दिली. हॉलमध्ये साधारण १५० लोक जमा झाले असतील. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख वक्ता उभा राहिला. त्याच्या शेजारी जोसेफ जाऊन उभा राहिला. जोसेफला जर्मनीमध्ये डिग्री कोर्सला ॲडमिशन मिळाली होती. त्याला त्याकरिता सात लाख शिलींगची आवश्‍यकता होती. त्यातून त्याचा तिकडे जाण्याचा तिकिटाचा खर्च आणि पहिल्या सेमिस्टरचा राहायचा खर्च भरून निघाला असता. त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीमधून तो कॉलेजची फी भरणार होता आणि नंतर तिकडे पार्टटाइम काम करून पुढील शिक्षण पूर्ण करणार होता.

प्रमुख वक्त्याने खूपच भावनिक होऊन जोसेफ माणूस म्हणून किती चांगला आहे हे त्याच्या भाषणातून सांगितले आणि उपस्थित बंधूभगिनींना जोसेफची पुढील शिक्षणाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. डबा घेऊन दोन-तीन मुले उपस्थित बंधूभगिनींकडून डोनेशन गोळा करायला लागली. माझ्यापुढे परत अजून एक मुलगा आला. मी काही न बोलता एक हजाराची नोट ठेवली. आत्तापर्यंत मी तीन हजार शिलींग दिले होते. जमलेली सगळी रक्कम मोजण्यात आली. एकूण तीन लाख सत्तर हजार शिलींग गोळा झाले होते. त्यांनी त्यात कोल्ड्रिंक आणि स्नॅक्सचे पैसे एकत्र केले. आता चार लाख नव्वद हजार गोळा झाले. अजून दोन लाख दहा हजार शिलींगची गरज होती. परत एकदा डोनेशनचे डबे फिरवले गेले. मी अजून एक हजाराची नोट दिली. या राउंडमधील जमा झालेली रक्कम एकत्र करूनही अजून एक लाख वीस हजार कमी पडत असल्याचे जाहीर केले गेले. जोसेफने सगळ्यांना अजून थोडे डोनेशन देण्याबद्दल अपील केले. परत एकदा डबा माझ्यापुढे आला, मी माझ्याकडे असलेली शेवटची एक हजाराची नोट दिली आणि मनात म्हटले देवा आता त्याचे टार्गेट पुरे कर. तिसऱ्या राउंडमधील डोनेशन मोजले गेले आणि समजले की अजूनही पन्नास हजार शिलींग कमी आहेत. त्यावेळी एक माणूस पुढे झाला आणि जोसेफला मिठीत घेऊन म्हणाला, ‘ही माझी अंगठी घे आणि ती विकून तुझी पुढील शिक्षणाची इच्छा पूर्ण कर!’ 

टार्गेट पूर्ण झाले आणि आता परत डबा फिरणार नाही म्हणून मला हायसे वाटले. पण तो शेवटचा दाता (डोनर) कोण होता हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. मला वाटले की तो कदाचित जोसेफचा कोणी जवळचा नातेवाईक असावा. पण नंतर समजले की त्याला असेच कुणाच्या ओळखीतून बोलावले गेले होते. मला जोसेफचे आईवडील तिकडे दिसतील असे वाटले होते. त्याची आई होती पण वडील कुठे दिसले नाहीत. जोसेफचे पुढील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून आलेले सगळेच खूश होते आणि त्यांच्या बरोबर मीही त्या हॉलमधून हसतमुखाने बाहेर पडले. पण माझ्या मनात राहून राहून सोन्याची अंगठी देऊन जाणारा माणूस येत होता. कोणी कुणाचे नाही आणि आपण येथून वर काही घेऊनही जाणार नाही. आज जर एखाद्याची गरज माझ्याकडे असलेल्या पैशाने पूर्ण होत असेल तर ती करण्यात आनंद मानणारे ते लोक मला खरेच जगावेगळे वाटले आणि पाच हजार शिलींग द्यावे लागले म्हणून मनात होणारी माझी चडफड किती लाजिरवाणी आहे याची जाणीवही झाली. 

बहुतेक आफ्रिकन वसाहतीचे सुसंकृतीकरण (Civilisation) हे ब्रिटिश आणि युरोपियन कॉलनी प्रस्थापित झाल्यानंतर झाले आहे. ‘हारांबी’ ही प्रथा अलीकडील म्हणजे १००-१५० वर्षांपूर्वीची असावी. त्यापूर्वी अशी पद्धत तिथे असेलही, पण त्याचे दुसरे काही नाव असू शकते. ‘हारांबी’ या नावाचा उगम ‘हर हर अंबे’ या भारतीय शब्दांपासून झालेला दिसतो. ब्रिटिशांनी केनियामध्ये वसाहत प्रस्थापित करताना, तिकडे रेल्वेचे रूळ बांधण्यासाठी भारतातून बरेच मजूर बोटींवरून केनियात नेले होते. ते साधारण कच्छ आणि गुजरात या प्रांतातील होते. पुढे हे भारतीय लोक केनियातील स्थानिक नागरिकांपैकीच एक झाले.  केनियातील लोकांच्यात मिसळले, संस्कृतीची कळत-नकळत देवाणघेवाण झाली. हे मजूर ‘हर हर अंबे’ अशी आरोळी देत एकमेकांच्या सहकार्याने अवघड जड लोखंडी रूळ आणि अवजारे उचलत असत. या सहकार्याच्या भावनेतून पुकारलेल्या ललकारीचा स्वाहिली भाषेतला अपभ्रंश म्हणजेच ‘हारांबी!’ पुढे तो प्रथा म्हणून रूढ झाला. केनियातील बहुसंख्य भारतीय वंशाचे गुजराती लोक दर नवरात्रात आंबा मातेच्या  मूर्तीभोवती नऊ दिवस गरबा खेळतात. आंबा मातेची तिकडे मंदिरेही आहेत. परदेशातील या भारतीय संस्कृतीच्या या पाऊलखुणा आपल्या भारतीयपणाचा अभिमान अजून उंच करतात. ‘हर हर अंबे!’ 

(टीप - या लेखात, केनियातील जीवनपद्धतीचे निरीक्षण लिहिले आहे. कुठल्याही जीवनपद्धतीबद्दल माझा कुठलाही आक्षेप किंवा आरोप नाही.) 

संबंधित बातम्या