पन्नाशीचा ‘पिंजरा’

सुनील देशपांडे
सोमवार, 28 मार्च 2022

विशेष

मराठी चित्रपटांच्या इतिहासात अभूतपूर्व यशानं आपलं नाव सप्तरंगांत कोरणाऱ्या ‘पिंजरा’ चित्रपटाला एप्रिल महिन्यात पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. व्ही. शांताराम यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असणाऱ्या या कलाकृतीच्या निर्मितीमागची कहाणी व त्याची वैशिष्ट्य विशद करणारं एक ‘पिंजरा’वलोकन!

वर्ष १९७१च्या सुरुवातीचा काळ. निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम काहीसे चिंतेतच होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ या त्यांच्या चित्रपटाला अजूनही अपेक्षेएवढं यश मिळालेलं नव्हतं. खरं तर मुंबईत ‘जल बिन...’ पंचवीस आठवडे चालला होता, पण इतरत्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळं खर्च भरून निघाला नव्हता. बरीच देणी झाली होती. ती चुकविल्याखेरीज नवीन चित्रपटाला हात घालता येणार नव्हता. विचार सुरू होता. हिंदीऐवजी मराठी चित्रपट, तोही रंगीत बनवला तर? मराठी चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च कमी असतो... पण मराठी चित्रपटातून मिळणारं उत्पन्नही कमीच असणार. समजा चित्रपट चालला तरी आधीचा तोटा कसा भरून निघणार? शिवाय शांतारामबापूंनीच काही वर्षांपूर्वी बनवलेला ‘इये मराठीचिये नगरी’ हा मराठी चित्रपट रंगीत असूनही आपटला होता. अन्य एका निर्मात्यानं बनवलेल्या रंगीत मराठी चित्रपटाची अवस्थादेखील निराळी नव्हती. सत्तरी ओलांडलेले शांतारामबापू काय करावं या पेचात सापडले होते. 

(जाता जाता : शांतारामबापूंप्रमाणे आणखी एक बडे निर्माते अशाच पेचात सापडले होते. त्यांचं नाव राज कपूर. ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) आणि ‘कल आज और कल’ (१९७१) या दोन चित्रपटांनी सपाटून मार खाल्ल्यानं कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या राज यांना त्याच काळात ‘बॉबी’सारख्या तरुणाईला साद घालणाऱ्या प्रेमकथेला हात घालावा लागला हा योगायोग!) 

पन्नास वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांसाठी रंगीत चित्रपट ही चैनीची बाब होती. आणि ही ‘चैन’ करायची तर नव्या चित्रपटाचा विषय आणि त्याचा बाज वेगळा असायला हवा. त्या वेळी शांतारामबापूंसमोर नाव आलं ते अनंत माने यांचं. एकेकाळी बापूंच्या हाताखाली संकलन विभागात काम केलेले अनंत माने एव्हाना दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले होते. शांतारामबापूंच्या मालकीच्या `शांतकिरण’ या कोल्हापुरातल्या स्टुडिओमध्ये मुख्यतः ते चित्रपट बनवत असत. कमी खर्चात आणि नियोजित वेळेत चित्रपट पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘सांगत्ये ऐका’पासून सुरू झालेली त्यांची दिग्दर्शकीय वाटचाल एखादा अपवाद सोडता कायम  भरभराटीची राहिली होती. बापूंनी लगोलग अनंत मानेंना निरोप धाडला. कथाकल्पनेबाबत विषय निघाला तेव्हा माने यांनी ‘ब्ल्यू एंजल’ (१९३०) या एका विदेशी चित्रपटाची कथा त्यांना ऐकवली. एक चारित्र्यसंपन्न प्रोफेसर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बहकविणाऱ्या कॅबेरे नृत्यांगनेला जाब विचारण्यास जातो आणि प्रत्यक्षात तिच्याच मोहपाशात अडकून प्रवाहपतित होतो. या आदर्श प्रोफेसरवर पुढे त्याच नृत्यांगनेच्या ‘शो’मध्ये विदूषक म्हणून काम करण्याची वेळ येते, अशी साधारण कथा. या कथाबीजाला ‘नोरा प्रेंटीस’ या चित्रपटाची थोडी जोड देत त्यांनी कथाकल्पना निश्चित केली. (नायकाला स्वतःच्याच खुनाबद्दल शिक्षा होते, हा भाग ‘नोरा प्रेंटीस’मधला.) 

 मराठमोळ्या प्रेक्षकांना ही कथा कितपत रुचेल याविषयी शांतारामबापू साशंक होते. बऱ्याच चर्चा झाल्या. अखेरीस शांतारामबापू आणि अनंत माने यांनी पटकथेला अंतिम रूप दिलं आणि संवादलेखनाची जबाबदारी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. 

गुणवंतवाडी नामक खेडेगावात चंद्रकला चंद्रावळीकर हिच्या तमाशा पार्टीचं येणं... ज्यांच्यामुळं ‘आदर्श गाव’ हा किताब मिळाला ते आदर्शवादी शिक्षक श्रीधरपंत कुलकर्णी यांनी तमाशाला जोरदार विरोध करणं... माळरानावर उभारलेला तमाशाचा फड गुरुजींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उखडून टाकणं... सूडानं पेटलेल्या चंद्रकलेनं ‘एक दिवस या गुरुजीला बोर्डावर तुणतुणं घेऊन न्हाई उभा केला तर नावाची चंद्रकला न्हवं’ असा पण करणं... नदीपार चाललेल्या तमाशाच्या खेळांना ग्रामस्थांनी चोरून हजेरी लावणं... त्यांना परत आणण्यासाठी गेलेल्या गुरुजींना चंद्रकलेनं आपल्या जाळ्यात ओढणं...  गुरुजींचा सूड घेण्याच्या भरात चंद्रकलेचा जीव त्यांच्यात गुंतणं... गुरुजींच्या वाईटावर असलेल्या एका गावगुंडाचा गुरुजींच्या दारात खून होणं... प्रवाहपतित गुरुजींनी पुढची बेअब्रू टाळण्यासाठी त्या गुंडाच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे चढवून आपलाच खून झाल्याचं चित्र उभं करणं आणि चंद्रकलेसोबत परागंदा होत तिच्या फडात स्वतःची ओळख लपवून सामील होणं... व्यसनांना शरण जात स्वतःच्या आयुष्याची दैना करून घेणं... पोलिसांच्या तपासात गुरुजींच्या खुनाबद्दल खुद्द त्यांनाच अटक होणं... न्यायालयात सत्यकथन करताना ऐन वेळी चंद्रकलेची वाचा जाणं... अखेर गुरुजींना फाशीची शिक्षा झाल्याचं पाहून तिनंही प्राण सोडणं... असा घटनाक्रम पावणेतीन तासांच्या चित्रपटात पाहायला मिळाला. 

हा चित्रपट खरं तर अनंत माने यांनीच दिग्दर्शित करावा अशी शांतारामबापूंची इच्छा होती. ‘नायिकेची भूमिका संध्या करेल, बाकी सर्व गोष्टी ठरवण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे,’ असं त्यांनी माने यांना सांगितलं होतं, पण माने यांनी ‘दिग्दर्शन तुम्हीच करा, मी सहायक म्हणून काम करेन,’ असं त्यांना नम्रपणे सांगितलं. 

गुरुजींच्या भूमिकेसाठी वेगळा चेहरा असावा असा विचार चर्चेत आला तेव्हा मराठी रंगभूमीवर नव्यानंच तळपत असलेलं श्रीराम लागू हे नाव समोर आलं. त्या वेळी गाजत असलेल्या ‘नटसम्राट’, ‘काचेचा चंद्र’ या नाटकांमुळे लागू यांचा नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड बोलबाला होता. पिंजरामधली भूमिका करायला लागू तयार झाले. चित्रीकरण चाळीस दिवसांत पूर्ण करायचं होतं, पण लागूंच्या नाटकांच्या तारखा सांभाळण्याची अट मान्य केली गेली. 

तमाशाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटातील लावण्यांसाठी संगीतकार राम कदम आणि गीतकार जगदीश खेबुडकर ही जोडी निश्चित करण्यात आली. कोल्हापूरचा शांतकिरण स्टुडिओ आणि आसपासच्या परिसरात सर्व चित्रीकरण नियोजित कालमर्यादेत पार पडलं.

२५ मार्च १९७२ रोजी सेन्सॉरसंमत झालेला सप्तरंगी ‘पिंजरा’ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि पाहतापाहता या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. मुंबईतलं ‘प्लाझा’, पुण्यातलं (त्यावेळचं) ‘प्रभात’, कोल्हापुरातलं ‘पार्वती’, सांगलीत ‘जयश्री’ अशा विविध चित्रगृहांमध्ये ‘पिंजरा’च्या लावण्यांची ढोलकी घुमू लागली आणि ज्याच्या त्याच्या मुखी ‘पिंजरा’ हे एकच नाव होते. अनेक शहरांत ‘पिंजरा’नं रौप्यमहोत्सव साजरा केला, तर ‘प्लाझा’मध्ये तो ४३ आठवडे चालला. शांतारामबापूंच्या कंपनीचा सर्व तोटा भरून तर निघालाच, पण आगामी चित्रपटांच्या निर्मितीची तजवीज त्यानं करून ठेवली. 

रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ श्रीराम लागू यांचं रुपेरी पडद्यावरचं पदार्पण आणि मराठीत खऱ्या अर्थानं झालेला रंगीत चित्रपटांचा आरंभ या ‘पिंजरा’नं साध्य केलेल्या ठळक गोष्टी म्हणता येतील. लागू यांचा काहीसा ‘रंगमंचीय’ पण बराचसा संयत अभिनय आजही प्रभावित करून जातो. अभिनय आणि नृत्ये या दोन्ही आघाड्यांवर संध्या यांची कामगिरी तेवढीच सरस होती. तमाशातला सोंगाड्या झालेले निळू फुले आणि नायिकेची खमकी अक्का वत्सला देशमुख यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या होत्या. (लागू आणि फुले यांच्यात काही वर्षानी रंगलेल्या ‘सामन्या’ची अल्पशी झलक इथं पाहायला मिळते.)

संगीतकार राम कदम यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘पिंजरा’मध्ये करून दाखविली. यातल्या दहा गाण्यांत बहुसंख्य लावण्याच होत्या. खेबुडकरांची शब्दकळा एकदम नव्या धाटणीची होती आणि त्याला रामभाऊंनी दिलेल्या चालीही तेवढ्याच ठसकेबाज होत्या. बहुतेक लावण्या उषा मंगेशकर यांनी गायल्या होत्या. ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘छबीदार छबी, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘दिसला गं बाई दिसला’ या लावण्यांनी एक वेगळाच रंग भरला. लावण्या फक्त छचोरच असतात या गुरुजींच्या समजाला छेद देणाऱ्या, ‘ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी’ अशी सुरुवात असणाऱ्या ‘दे रे कान्हा चोळी अन लुगडी’ या एका लावणीसाठी लता मंगेशकर यांना पाचारण केलं गेलं. तर ‘बाबूजी’ अर्थात सुधीर फडके यांनी ‘कशी नशिबानं थट्टा’ या आगळ्या लावणीबरोबरच, ‘उपकारासाठी दिलं, त्याला दान म्हणू नये’ या प्रार्थनेलाही स्वर दिला होता. ह्या सर्व गाण्यांच्या निर्मितीचा प्रवास, हा खरंतर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 

‘पिंजरा’च्या अफाट यशानं प्रभावित होऊन शांतारामबापूंनी वर्षभरातच तो हिंदीत पुन्हा बनवला. बहुतेक कलाकार आणि संगीतकार राम कदम यांना कायम ठेवूनही हिंदीतला ‘पिंजडा’ साफ कोसळला. एखादा चित्रपट का चालतो किंवा का पडतो याचं नेमकं उत्तर कोणालाही सांगता येत नाही. मराठी ‘पिंजरा’ एवढा का चालला? आणि हिंदीत तो का चालला नाही? या प्रश्नांना खरं तर उत्तरं नाहीत. एक मात्र खरं की ‘पिंजरा’ची गाणी आणि एकूणच चित्रपटानं भारावून गेलेली पिढी आजही ‘पिंजरा’वर भरभरून बोलताना आढळेल. काय कारण असेल यामागे? श्रवणीय संगीत? दर्जेदार हाताळणी? ‘व्यक्ती मेली तरी चालेल, पण समाजापुढील आदर्श मरता कामा नये’ हा त्यानं दिलेला संदेश? की या सर्वांची मिळून जमलेली ‘भट्टी?’ 

नरहर कुरुंदकरांसारख्या बुद्धिवादी समीक्षकांनी ‘पिंजरा’वर ‘भडक व बटबटीत’ असा शेरा मारला, तर दादा कोंडक्यांसारख्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने संधी मिळेल तेव्हा ‘पिंजरा’ची टवाळी केली. पण तरीही ‘पिंजरा’ मनापासून आवडणारा, वेगवेगळ्या थरांतला मोठा वर्ग होता. या चाहत्यांनीच ‘पिंजरा’ला भरभरून यश दिलं यात शंका नाही. 

(संदर्भ : ‘शांतारामा’ : व्ही. शांताराम, ‘लमाण’ : डॉ. श्रीराम लागू, ‘संगीतकार राम कदम’ : मधू पोतदार)

संबंधित बातम्या