मेंदी ः स्रोत आरोग्यरक्षण व सौंदर्यवृद्धीचा

सुप्रिया खासनीस
सोमवार, 1 ऑगस्ट 2022

भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक मंगलप्रसंगी, सणावारी मेंदी काढण्याची प्रथा आहे. मेंदी हा विशेषतः महिलावर्गाचा आपुलकीचा व जिव्हाळ्याचा विषय. त्याचप्रमाणे मेंदी औषधी वनस्पती असल्याने तिचा उपयोग आरोग्यवर्धनासाठी व शृंगारासाठी केला जातो. त्यामुळे मेंदीने आपले वनौषधीमधील स्थान अबाधित ठेवले असून, शृंगारामध्येही अव्वल दर्जा प्राप्त केलेला आहे.

सौंदर्य व स्वास्थ्यासाठी वनौषधी वापरण्याची भारतीय परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ‘पुनःश्च निसर्गाकडे’ ही आज आपली मनोभूमिका झाली आहे. लोक आरोग्यासाठी सुरक्षित, परिणामकारक अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे पसंत करू लागले आहेत. पुरातन भारतीय परंपरेत वनौषधीचे उपचार आणि सौंदर्यासाठीही वनौषधींचा वापर होत आला आहे.

वनौषधीच्या भांडारात केशरंजनासाठी असलेल्या वनौषधीत मेंदीचा प्रथम क्रमांक लागतो. फक्त भारतातच नव्हे, तर पूर्ण जगभरात या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. परदेशात हीना कंडिशनर व हीना शाम्पू लोकप्रिय झाले आहेत. भारतात व प्राचीन इजिप्तमध्ये मेंदीचा वापर एक थंडावा देणारी वनस्पती म्हणून होत होता. उष्माघातावर किंवा ताप चढल्यावर मेंदीचा लेप लावण्याची प्रथा होती.

मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्वे आहेत. मेंदी नुसतेच हातापायाचे सौंदर्य वाढवत नाही, तर अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या औषधाने त्वचारोग बरे होतात. पानांचा लेप गळवे, खरचटणे, जखमा, भाजणे इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतात. पायांची आग शमविण्यासाठी, शरीरातील अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी डोक्याला किंवा तळपायाला मेंदी लावतात. 

केसांकरिता मेंदीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. केसांना नियमित मेंदी लावल्याने केसांचे आरोग्य वाढते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस मोकळे होऊन खुलतात. त्याला ‘कंडिशनिंग’ असे म्हटले जाते. केसांमध्ये कोंडा होत नाही. या मेंदीबरोबर इतर वनौषधींचा व नैसर्गिक द्रव्यांचा वापर करून केशरंजनाचा फॉर्म्युला जास्तीत जास्त गुणकारी होऊ लागला आहे. आजार टाळण्यासाठी, आरोग्य आणि सौंदर्यवृद्धीसाठी निसर्गनिर्मित मेंदी हा एक उत्तम स्रोत आहे.

मेंदी रंग देणारी वनौषधी असल्यामुळे तिचा जसा आरोग्यामध्ये वापर केला जातो, तसा शृंगारामध्येही वापर केला जातो. हळूहळू या मेंदीने सौंदर्यप्रांतात शिरकाव केला आणि आता तर ती जगभर प्रस्थापित झाली आहे. सणासुदीला, लग्नासारख्या मंगलप्रसंगी हातापायावर सुरेख मेंदी रेखाटण्याची परंपरा आहे. किंबहुना मेंदी लावणे, मेंदीची गाणी, शृंगार या गोष्टी लग्नासारख्या विधींशी निगडित झाल्या आहेत आणि या हिरव्या-लाल रंगानेच अशा मंगल प्रसंगी आनंदाचे रंग भरलेले आहेत.

प्राचीन काळी शृंगारामध्ये लाल व हिरव्या रंगाला प्राधान्य दिल्याचे दिसते. या दोन रंगांमुळे स्त्रियांचा शृंगार, सौंदर्य खुलते म्हणून मेंदीचा समावेश साजशृंगार, सौंदर्यसंवर्धनामध्ये झालेला दिसून येतो. हात-पाय रंगविणे हा शृंगाराचाच भाग आहे. मेंदी पाच-सहा तास सुकल्यानंतर हळूहळू मेंदीचा लाल रंग अधिक गडद होत जातो. हा लाल रंग आपल्या समाजात शुभ मानला जातो. कितीही भरजरी साडी नेसली, तरीही मेंदीविना साजशृंगार अपूर्ण समजला जातो. हल्ली सर्व समाजामध्ये स्त्रियांबरोबर पुरुषांनीही मेंदी लावण्याची प्रथा रूढ झाली आहे. 

मेंदी आता सौंदर्यप्रसाधनातील महत्त्वाची वनस्पती आहे. सौंदर्यप्रसाधनातच तिचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मेंदीच्या फुलांतून हिरोझनसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. त्याला मेंदी तेल असे म्हणतात. मेंदीच्या पानांपासून नारिंगी व लाल रंग मिळतो; तो रंग तळहात, पाय रंगविण्यासाठी वापरता येतो. मेंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असतो, त्यापासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर अत्तरामध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये करण्यात येतो. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी केस आणि नखे रंगविण्यासाठीचा मेंदीचा वापर केल्याची नोंद आहे. मेंदीपासून तयार झालेला नैसर्गिक हेअर डाय अत्यंत कमी धोकादायक असल्याने त्याचे इतर परिणामही होत नाहीत.

मेंदी स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावते. मेंदीचा शृंगाराप्रमाणे आरोग्यासाठीही वापर केला जातो. मेंदी काढण्याच्या व्यवसायामुळे अनेक महिलांना एक रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. तसेच मेंदी आरोग्यवर्धक असल्याने निरनिराळी सौंदर्यप्रसाधने तयार करणे, त्यावर योग्य प्रक्रिया करून उत्पादन बाजारात आणणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे मेंदी व्यवसायास दोन्ही प्रकारे ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे.

संबंधित बातम्या