मास्कची विस्तारलेली दुनिया

सुवर्णा येनपुरे-कामठे
सोमवार, 12 एप्रिल 2021

विशेष

कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९मध्ये सापडला असला तरी, भारतात त्याचे आगमन झाले ते मार्च २०२०मध्ये! जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या सूचनांनुसार सुरुवातीला प्रत्येकजण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील महत्त्वाच्या सूचना होत्या. वारंवार हात धुवा किंवा सॅनिटाइझ करा आणि मास्क वापरा. 

मास्क वापरणे, ही गोष्ट गेल्या वर्षापर्यंत तशी बहुसंख्य भारतीयांसाठी नवीच होती. आता कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरायचा तर तो चांगलाच असायला हवा, म्हणून ‘एन-९५’ मास्क चर्चेत आला आणि त्याची मागणीही वाढली. त्याची मागणी इतकी वाढली, की अनेक ठिकाणी ‘मास्क संपले आहेत’ अशी पाटी लावावी लागली. तर काहींनी त्याचा काळाबाजार करायला सुरुवात केली. सध्या अवघ्या २० रुपयांना मिळणाऱ्या या मास्कसाठी अनेकांनी तेव्हा २५०-३०० रुपये मोजले होते. ‘एन-९५’च्या बरोबबरीनेच प्रकाशझोतात आला तो ‘सर्जिकल मास्क’! एकदा वापरा आणि फेकून द्या, या पद्धतीमुळे तो अनेकांच्या पसंतीसही उतरला. पण याचीही बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने, खुद्द डॉक्टरांनाच हा मास्क उपलब्ध होणे काहीकाळ कठीण झाले होते. 

त्यावेळी पहिला प्रश्‍न उपस्थित झाला, तो म्हणजे खरेच सर्वसामान्यांनीही ‘एन-९५’ किंवा ‘सर्जिकल’सारखे मास्क वापरणे गरजेचे आहे का? यावर तज्ज्ञांचे उत्तर आले, की कोरोना विषाणू मास्कमधून सहजासहजी आत शिरणार नाही असा मास्क वापरायला हवा. यासाठी दोन ते तीन लेयर असणारा मास्क आवश्‍यक आहे. 

बरं, आपण वापरत असलेला मास्क कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य की अयोग्य हा प्रश्‍न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा प्रचलित झाली ‘मेणबत्ती टेस्ट’! तुम्ही ज्या प्रकारचा मास्क वापरत आहात, तो घालून जळणाऱ्या मेणबत्तीला फुंकर मारायची. मेणबत्ती विझली तर मास्क चांगला नाही, आणि समजा ती विझली नाही तर मात्र तो मास्क चांगला आहे, असं शिक्कामोर्तब होऊ लागले. हाच निकष पाळून घरगुती मास्क तयार करायला सुरुवात झाली. कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे सावट अनेकांच्या नोकऱ्यांवर पडल्याने त्यांना घरगुती मास्क करण्याने आधार मिळाला. राज्यातल्या अनेक महिला बचत गटांनाही या अवघड काळात मास्कमेकींगने हात दिला. यामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणात मास्कची रेलचेल सुरू झाली आणि ‘एन-९५’ तसेच ‘सर्जिकल’ मास्कवर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला. 

अचानक ‘ट्रेंड’मध्ये आलेल्या कोणत्याही गोष्टीवर विविध प्रयोग झाल्याशिवाय राहत नाहीत. तसेच ते मास्कच्या बाबतीतही सुरू झाले. सुरुवातीला साध्या पांढऱ्या सुती कापडापासून तयार केलेले मास्क, हळूहळू रंग परिधान करू लागले. त्यातच हळूहळू लॉकडाउन उठत असल्याने व्यवसायांना नवी उभारी देण्यासाठी अनेकांनी मास्कच्या विविध ऑफर द्यायला सुरुवात केली. यामध्ये शर्ट, कुर्ता, टीशर्टला मॅचिंग मास्क देण्यास सुरुवात झाली.

 सर्वात आधी मास्कमधील खास प्रयोग म्हणून चर्चेला आला तो ‘फेस प्रिंटिंग मास्क’. केरळमधील कोट्टायम या शहरात राहणाऱ्या बिनेश पॉल यांनी हा प्रयोग मे २०२०मध्ये केला. कोरोनामुळे आधीच फोटोग्राफीचा व्यवसाय तोट्यात जात असताना, त्यांना ही कल्पना सुचली. लोकांचे फोटो काढायचे आणि त्याचे मास्कमध्ये रूपांतर करायचे. हा प्रयोग अनेकांच्या पसंतीस पडला, त्यात या मास्कची किंमतही अवघी ६० रुपये असल्याने हा ‘स्पेशलाइज्ड’ मास्क घेण्यासाठी अनेकांनी त्यांच्याकडे रांग लावली होती.

लॉकडाउनमध्ये घरी बसल्या-बसल्या काय करायचे असा प्रश्‍न होता. मी कर्मशिअल आर्टस्‌चे शिक्षण घेत होते, त्यामुळे पेंटिंग वगैरे गोष्टी चांगल्या जमत होत्या. त्यामुळे कस्टमाइज्ड् मास्क तयार करायचा विचार केला. यामध्ये खणाचे मास्क करायला सुरुवात केली, जे मी अवघ्या ५० रुपयांपासून पुढे विकत होते. लोकांच्याही ते पसंतीस पडले. त्यानंतर हँडवर्क येत असल्याने डिझाइनर मास्कच्या काही ऑर्डर मिळाल्या, ज्यामध्ये मी खास वधू आणि वरासाठी मास्क डिझाइन करून दिले. याची किंमत १२० रुपयांपासून पुढे होती, कारण हँडवर्कमध्ये खूप मेहनत असते. पेंटिंग ही माझी आवड असल्याने पेंटिंग केलेले मास्कही मी या दरम्यान विकले, आणि अजूनही मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- कोमल शिंदे

हौसेला मोल नाहीच!
हौसेला मोल नाही, असे म्हणतात हे खरे आहे आणि काही लोक कोणत्याही परिस्थितीत ही हौस पूर्ण करतात. यापैकीच एक हौस गाजली, ती म्हणजे सोन्याचा मास्क. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाने तब्बल तीन लाख रुपयांचा मास्क तयार करून घेतला होता. त्यानंतर रांका ज्वेलर्सने जुलै महिन्यात सोन्याचा मास्क तयार करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. १२४ ग्रॅम सोन्यापासून तयार केलेल्या या मास्कची किंमत ६.५ लाख रुपये होती. यासाठी तुर्कस्तानावरून डाय मागविण्यात आला होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे, याचा वापर मास्क आणि नेकलेससारखाही करता येणार होता. यामध्ये आतून ‘एन ९५’ मास्क लावला होता, आणि तो खराब झाल्यास बदलायची सुविधादेखील होती. याआधी सुरतमधील एका जेलरने हिरेजडीत मास्क तयार केला होता. याची किंमत दीड ते चार लाख रुपये ठेवण्यात आली होती. 

डिझायनर ब्रायडल मास्क
लग्नाच्या मेंदी ऐवजी हातांना सॅनिटायझर लावण्याची वेळ आलेल्यांनीही, इथून पुढे काही काळ कोरोनाला सोबत घेऊनच जगायचे आहे, अशी मनाशी पक्की गाठ बांधली आणि कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पुढे ढकललेली लग्ने उरकायचा निर्धार केला. मास्कचे प्रयोग लग्नसमारंभातही होऊ लागले आणि मास्कला ‘ब्रायडल लुक’ मिळाला. याकाळात विविध सेलिब्रिटीजनी केलेली लग्ने त्यांच्या विशेष डिझाइनर मास्कमुळे चर्चेत आली. 
 
वधू पक्ष, वर पक्ष मास्क  
लग्न करतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक नियमांचे पालन करा, हा संदेश देण्यासाठी लग्न समारंभात सामील झालेल्या मोजक्या पाहुण्यांना मास्कही देण्यात आले. इथेही ‘ट्रेंड’ लक्षात घेऊन ‘वधू पक्ष’ आणि ‘वर पक्ष’ असे विशेष डिझाईन केलेले मास्क देण्याच्या प्रथेचीही आता नव्या काळातल्या लग्नप्रथांमध्ये भर पडली आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘हाय टेक’ मास्क
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, तो खूप व्हायरल झाला. व्हायरल होण्यामागचे प्रमुख कारण होते, त्यांचा ‘हाय टेक’ मास्क! त्यांच्या ओठांच्या हालचालीनुसार त्यांच्या या ‘हाय टेक’ मास्कवरील एलईडी लाइट्स लागत होत्या.  

बूटिक असल्याने आम्ही कस्टमाईज मास्क करून देतो. त्यामुळे ग्राहकाच्या मागणीप्रमाणे मास्क तयार करून दिला जातो. कोरोनानंतरच्या काळात डिझायनर कपड्यांबरोबर मॅचिंग असे मास्क घेण्याकडे लोकांचा जास्त कल होता. त्यामुळे आम्हीही त्याप्रमाणे डिझायनर मास्क द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला ‘फेस प्रिंट मास्क’ हा प्रकार खूप चालला. त्यानंतर सध्या आम्ही लग्नासाठी वधू पक्ष आणि वर पक्ष असे छापलेले मास्क तयार केले. तसेच स्वतःच्या नावाचे प्रिंट असणाऱ्या मास्कलाही चांगली पसंती आहे. मास्कसाठी आम्ही कापडाचे डबल लेयर वापरतो.
- अक्षय तांबे, द मास्क इम्पोरटेड क्लोदिंग, पुणे 

मास्क हे शिवून घेतलेले असले, तरीही ते आपल्याला जवळपास ९५ टक्के संरक्षण देतात. त्यामुळे शिवून घेतलेले मास्कही सुरक्षित असतात. कोणते मास्क वापरावेत, ही खरी अडचण नाहीच. तर मूळ अडचण आहे मास्क हाताळण्याची! अनेकजण रुमालाची घडी घालून त्याचा मास्क म्हणून वापर करतात, इच्छित ठिकाणी पोचल्यानंतर तो काढतात आणि खिशात ठेवतात. पुन्हा बाहेर निघाल्यावर तोच रुमाल तोंडाला लावून बाहेर निघतात. असा रुमाल किंवा मास्क खरेच सुरक्षित असू शकतो का? तुम्ही मास्क लावल्यानंतर कितीतरी वेळा मास्कला हात लावून तो वर-खाली करणे, कोणी बघत नाही हे लक्षात आल्यावर हनुवटीवर मास्क घेणे ही पद्धत फारच चुकीची आहे. मुळात मास्कला वारंवार हात लावणे किंवा बोलताना मास्क खाली घेणे, धोकादायक ठरू शकते. मास्क कुठे आणि कसा टाकावा, हे ही अनेकांना माहीत नसते. मास्क टाकून देताना तो रस्त्यावर टाकू नये. कचरावेचकांना याचा त्रास होऊ शकतो. वापरलेला मास्क व्यवस्थित कागदात गुंडाळून कचरापेटीत टाकायला हवा. तुम्ही एकच मास्क वापरत असाल, तर त्याचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे. फॅन्सी, डिझाइनर मास्क वापरू शकता, पण योग्य काळजी घेऊनच तो वापरायला हवा. 
- डॉ. संजय गांधी, एम.डी मेडीसीन, डायबेटोलॉजिस्ट   

संबंधित बातम्या