शेर्पांची गोष्ट!

उमेश झिरपे
सोमवार, 5 एप्रिल 2021

विशेष

गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या ‘पर्वतपुत्र शेर्पा’ या मराठी पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही आता प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्त या पुस्तकामागची प्रेरणा, पुस्तक निर्मितीचा प्रवास याविषयी लेखकाच्याच शब्दांत...

अतिउंच शिखरांनी, दुर्मीळ प्राणी, पक्षी, वनस्पतींच्या प्रजातींनी, निसर्गाच्या मनोहरी रूपांनी नटलेल्या हिमालयाची फारशी माहीत नसलेली, किंबहुना दुर्लक्षित असलेली ओळख म्हणजे ‘शेर्पांचे माहेरघर.’ जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम चढाई करणाऱ्‍या जोडगोळीमधील एक शेर्पाच होता. न्यूझीलंडच्या सर एडमंड हिलरी यांच्या साथीने शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले आणि एव्हरेस्ट व शेर्पा यांच्या अतूट नात्याची नांदी घातली. आज शेर्पांशिवाय एव्हरेस्ट चढाई ही जवळपास अशक्यच.

माझ्यासाठी शेर्पा हे डोंगरांएवढेच प्रिय आहेत. मी शेर्पांना माझे डोंगरभाऊ मानतो. नेपाळ हिमालयात जसजशा मोहिमा वाढत गेल्या तसतसे माझा शेर्पांशी असलेला ऋणानुबंध वाढत गेला. या नात्याला खरी कलाटणी मिळाली २०१२ साली. गिरिप्रेमीच्या ‘पुणे- एव्हरेस्ट २०१२’ या एव्हरेस्ट शिखरावर आयोजित भारतातील सर्वात मोठ्या नागरी गिर्यारोहण मोहिमेच्या नेतृत्वाची धुरा माझ्याकडे होती. त्यामुळे शिखर चढाईच्या आधी सर्वांगीण तयारीसाठी माझे नित्यनियमाने दौरे व्हायचे. आधी म्हटल्याप्रमाणे एव्हरेस्ट शिखर चढाईतील महत्त्वाच्या तयारीपैकी सर्वांत प्रमुख म्हणजे शेर्पा साथीदारांची, पर्यायाने शेर्पा एजन्सीची निवड. त्यावेळी माझी भेट झाली ती वांगचू शेर्पा यांच्याबरोबर. पहिल्या भेटीत आपलेसे करणाऱ्‍या वांगचूशी मैत्री झाली, ती त्याच्या अकाली एक्झिटपर्यंत टिकली, नव्हे तर बहरत गेली. आजही वांगचू आठवणीच्या रूपात माझ्याशी जोडलेलाच आहे. वांगचू कर्करोगाने ग्रस्त होता. या अशा शेर्पांशी माझा नवनवीन मोहिमांमुळे ऋणानुबंध वाढतच गेला अन यातूनच या विलक्षण समाजाविषयी माझे कुतूहलदेखील वाढत गेले. 

अतिउंच शिखरांवरील मोहिमांसाठी दुर्गम भागात प्रवास करत असताना अनेकदा छोट्या टी हाउसेसमध्ये (छोटेखानी लॉज) आम्ही जेव्हा थांबत असू तेव्हा शेर्पा कुटुंबच अदबीने व आपुलकीने पाहुणचार करत असे. त्यांनी आग्रहाने दिलेल्या ‘शेर्पा चहा’ची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. नाक (याक या बर्फाळ प्रदेशातील प्राण्याची मादी) या प्राण्याच्या दुधापासून तयार केलेला व चवीसाठी साखरेऐवजी मीठ घालून केलेला चहा कितीही कप प्यायला तरी मन भरतच नाही. मुळात शेर्पा कुटुंबांमध्ये एक कप चहा घेऊन कोणी थांबतच नाही. चहा म्हणजे मनसोक्त पिण्याचा प्रकार अशीच प्रथा आहे. खाण्यापिण्याच्या, पोषाखाच्या जशा प्रथा आहेत, तशा नामकरण करण्याच्या, लग्नाच्या, सणवार साजरे करण्याच्यादेखील वेगळ्या व रंजक प्रथा शेर्पांनी आत्मसात केलेल्या आहेत. मोहिमेसाठी आमच्या कुक असलेल्या फिंजू शेर्पापासून शेर्पांचा प्रमुख असलेल्या कामी शेर्पापर्यंत अनेकांशी गप्पा मारताना शेर्पांचे शेर्पापण उलगडत गेले. 

अतिउंचावर शिखर चढाई करणारे मदतनीस म्हणजे शेर्पा, हे समीकरण हे शेर्पांच्या अतिशय चोख कामामुळे दृढ होत गेले. आज मोहिमेसाठी मदतनीस घेऊन जाणे याला थेट ‘शेर्पा सपोर्ट’ घेणे असेच संबोधतात, इतकी घट्ट मुळे शेर्पांनी गिर्यारोहणात रोवली आहेत. मात्र, गिर्यारोहणापलीकडचा शेर्पा समाज जाणून घेण्याची माझी खूप इच्छा होती. फक्त गिर्यारोहण मोहिमा म्हणजे शेर्पा, एवढीच ओळख नसलेला शेर्पा मला शोधायचा होता. मोहिमांच्या निमित्ताने नेपाळला गेले की अशाच एखाद्या अवलियाला शोधून त्याला भेटल्याशिवाय मला चैन पडायचा नाही. अशा भेटीगाठींतून शेर्पांच्या ‘फायटिंग स्पिरिट’ची प्रचिती यायला लागली. उणीपुरी चार लाखाच्या घरात लोकसंख्या असलेला शेर्पा समाज आज जगभर पसरला आहे. नेपाळमध्येदेखील या शेर्पांनी आपले पंख विस्तारले आहेत. एव्हरेस्ट चढाई करणाऱ्‍या शेर्पांनी नेपाळच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातीलदेखील शिखरे यशस्वीरीत्या चढली आहेत. शून्यापासून व्यवसाय निर्माण करणाऱ्‍या शेर्पांपासून ‘एव्हरेस्ट समीटर्स असोसिएशन’सारख्या प्रतिथयश संस्थांच्या प्रमुखपदावर शेर्पा विराजमान झाले आहेत. कधीकाळी फक्त समान उचलणारा  

‘भारवाहक’ अशी ओळख असलेल्या शेर्पांनी अवघ्या काही दशकांमध्ये मारलेली मजल विलक्षण आहे. असे असले तरी जगभरातील मंडळी शेर्पांना त्यांचे ‘क्रेडिट’ देत नाही. त्यांची ओळख ही मर्यादितच ठेवली जाते. 

हे मी सर्व जवळून अनुभवले आहे. त्यामुळे कुठेतरी शेर्पांचे ‘शेर्पा स्पिरिट’ जगाच्या पटलावर अधोरेखित व्हावे, असे मला मनोमन वाटत असे. आपण पुढाकार घेऊन काय करू शकतो असे विचार मनामध्ये रुंजी घालत असताना ‘शेर्पांची गोष्ट’ आपण जगाला सांगू शकतो, असे वाटले. यातून सुरू झाला ‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाचा प्रवास. मला भेटलेल्या, भावलेल्या शेर्पा मंडळींबद्दल मी टिपण काढण्यास सुरुवात केली. ‘जग घडविणाऱ्‍या’ अनेक शेर्पांना भेटून त्यांची ‘गोष्ट’ मी त्यांच्याच शब्दात ऐकली. यात पहिल्या महिला शेर्पा लेखिका लाक्पा फूटी शेर्पांची गोष्ट प्रेरित करणारी होती, तर साधे पोर्टर म्हणूनदेखील काम न मिळू शकणाऱ्‍या सांगे शेर्पांनी करोडोंची उलाढाल असलेला व्यवसाय उभा करण्याची गोष्ट डोळ्यात पाणी आणणारी होती. विविध पैलू उलगडणाऱ्‍या काही प्रमुख शेर्पांची जीवनकथा मी टिपून ठेवली. सोबतीला गिर्यारोहणात इतिहास घडविणाऱ्या शेर्पांची गोष्टदेखील सोबतीला घेतली व ‘रोहन प्रकाशन’च्या रोहन चंपानेरकरांना भेटलो. त्यांना शेर्पा व त्यांच्या गोष्टी आवडल्या अन लगोलग पुस्तक प्रकाशित करण्याची तयारी दाखविली. नचिकेत जोशी या तरुण सहकाऱ्‍याला घेऊन मी शेर्पांची गोष्ट शब्दबद्ध केली. शेर्पांच्या बहुरंगी इतिहासापासून उज्ज्वल भविष्यापर्यंतचा वेध पुस्तकात घेतला. 

डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने माझे शेर्पा मित्र पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याच हस्ते ‘पर्वतपुत्र शेर्पा’ हे शेर्पा समाजावर आधारित पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले. मराठी आवृत्तीच्या प्रकाशनानंतर विवेक शिवदे या माझ्या गिर्यारोहक मित्राने मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला व रोहन प्रकाशनच्याच भक्कम पाठिंब्याने या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती थेट नेपाळमध्ये जाऊन प्रकाशित करण्यात आली. इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून शेर्पांचे शेर्पापण व त्यांची गोष्ट जगासमोर आणण्यात मदत होईल, असा मला विश्वास आहे.

गिर्यारोहण मोहिमेतील मदतनीस शेर्पांसोबत तुमचे व्यावसायिक नाते असते. मोहीम संपली, करार संपला की तुमचा संपर्कदेखील थांबतो. बहुतांश देशातील गिर्यारोहक शेर्पांशी असाच संबंध- संपर्क ठेवतात. मला, गिरिप्रेमीतील माझ्या गिर्यारोहक साथीदारांना मात्र असे वाटत नाही. शेर्पा हे आपले डोंगरबंधू, आपले आप्तेष्ट वाटतात. त्यांच्या कार्याचा जगभर गौरव व्हावा, असेच वाटते. मात्र, गौरव जरी झाला नाही तरी किमान दखल तरी जगाने घ्यावी, यासाठी आम्ही गिरिप्रेमी या ना त्या प्रकारे झटत असतो. ‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाच्या माध्यमातून ‘शेर्पांची गोष्ट’ सांगून शेर्पांचे शेर्पापण अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

संबंधित बातम्या